Saturday, November 9, 2013

एक वर्ष झालं!



मागच्या वर्षी याच सुमाराला प्रवासाला निघालो होतो आम्ही ... उत्सुकता, काळजी, युफोरिया असं सगळं ओझं सोबत घेऊन. रात्रभराच्या प्रवासात झोप लागणं शक्यच नव्हतं ... डोळ्यात न बघितलेल्या बाळाविषयी इतकी स्वप्नं होती, की झोपायला वेळच नव्हता.

कशी असेल ती? मनात नाही भरली तर? आपल्याला जमेल ना सगळं नीट? घरातले सगळे स्वीकारतील ना? जन्मदात्री गेली म्हणून बाळाला देऊन टाकायला तयार झालेले नातेवाईक कसे असतील? सौदा करताहेत का ते बाळाचा? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?

“इतक्या लहान बाळात काही मेडिकल प्रॉब्लेम असले तरी समजणार नाहीत. फार मोठी रिस्क आहे ही.” एका अनुभवी हितचिंतकांचा प्रामाणिक सल्ला. "बाळ न बघता हो म्हणू नका, आणि इतकं लहान शक्यतो नकोच." सगळंच इतकं अचानक झालंय, की धड विचार करायला वेळच झाला नाही. अजून काहीच नक्की नाही, त्यामुळे कुणाला सांगणं, त्यांचं मत घेणंही शक्य नाही. फक्त कायदेविषयक आणि वैद्यकीय सल्ला मात्र घेतलाय.

सगळं नीट झालं, तर आयुष्य बदलूनच जाईल एकदम. आणि फिसकटलं काही कारणाने तर? न बघितलेल्या बाळासाठी घेतलेल्या अंगड्या-टोपड्यांकडे बघायची हिंमत होईल परत? प्रवास संपता संपत नाही. तिथे पोहोचल्यावरसुद्धा पहिला दिवस फक्त पूर्वतयारीचा. उरलीसुरली खरेदी करायची आणि वाट बघत बसायची.

कसा तरी दिवस संपतो. दुसर्‍या दिवशी सकाळीच एक एवढुस्सं गाठोडं हातात येतं. नव्या स्पर्शामुळे बावरलेला चेहरा तासाभरात शांत होतो. हे इतकं गोडुलं आहे, की बघताक्षणी त्याच्या प्रेमात न पडणं अशक्य. पण अजून सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायचीय. आपल्या हातात आहे, पण अजून हे आपलं नाही. हा दिवस कालच्या दिवसापेक्षा जास्त छळणारा. समोर आहे, त्याला आपलं म्हणायचं नाही हे कसं शक्य आहे?

दुसर्‍या दिवशी दुपारी अखेर सगळे सोपस्कार पूर्ण होतात. ही लाडूबाई आता आपली! एवढी निराशा आणि अनिश्चितता अनुभवल्यावर विश्वास बसत नाही यावर. पुढचा महिनाभर तरी जमीन दिसूच नये एवढी हवेत आहे मी! या परीने अशी काही जादूची कांडी फिरवली आहे, की सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात, शंका हवेत विरूनच जातात. 



आपल्यांना मनवण्यात खर्च केलेला वेळ आणि एनर्जी, सरकारी दिरंगाई, झारीतले शुक्राचार्य आणि न संपणारं वाट बघणं ... तरीही, It was worth the wait.