काही वर्षांपूर्वीपर्यन्त - म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर सात वर्षांपूर्वीपर्यन्त - मी असं हिरीरीने म्हणत होते, की माझ्या मुलांचं शिक्षण मराठीमधूनच व्हायला हवं. मतृभाषेमधून शिक्षण घेणं मुलांना सोपं जातंच, शिवाय आपल्या भाषेशी, आपल्या मातीशी नाळ न तुटणं फार महत्त्वाचं आहे.माझ्या मुलांना पुण्यातल्या ’अक्षरनन्दन’ सारख्या शाळेत घालण्याचं - खरं म्हणजे स्वतः अशी शाळा सुरु करण्याचं स्वप्न मी बघत होते.
आजची परिस्थिती खूपच बदललेली आहे. माझ्या मुलांची मातृभाषा कोणती असणार? प्रसाद अणि मी एकमेकांशी मराठीमधून बोलतो, पण प्रसादचं मराठीचं ज्ञान कामचलाऊ म्हणता येईल इतपतच आहे. त्याला मराठी लिहिता - वाचता येत नाही, मराठी नाटक, कविता, वाङ्मयाचा गंध नाही. माझ्या मुलांची ’पितृभाषा’ कन्नड आहे - जिच्यामध्ये मला एक वाक्य सुद्धा धड बोलता येणार नाही. मी मराठीचा हट्ट धरून प्रसादला मुलांच्या शिक्षणापासून दूर ठेवणं हा प्रसादवर अन्याय होईल. आणि मुलांचं दहावीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्येच राहणार असा निर्णय मी आज कसा घेऊ? महाराष्ट्रामध्ये - दस्तूरखुद्द पुण्यामध्ये आज मराठी शाळांची परिस्थिती दयनीय आहे. माझ्या मुलांना वेगवेगळ्या भाषा बोलणार्या, वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर शिकायला मिळायला हवंय. त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी, हिन्दी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, जपानी ... शक्य तेवढ्या सगळ्या भाषा पडायला हव्यात. आपल्या देशामध्ये - खरं तर जगात कुठेही - त्यांना सहज संवाद साधता यायला हवाय. बंगळूरला रहायचं आणि पुण्याची स्वप्नं बघायची अशी त्यांची अवस्था होता कामा नये. Let them become citizens of the world!
पण अशी जडणघडण झाल्यावर मातीशी नातं जडणं त्यांना जड जाईल का? ती कुठल्या भाषेत कविता वाचतील? त्यांचा ब्लॉग, डायरी - जे काही ज्या कुठल्या स्वरूपात असेल, तसं, कुठल्या भाषेत लिहितील? कुठल्या भाषेत संवाद साधतांना त्यांना घरच्यासारखं वाटेल? त्यांना शिवाजी महाराज कसे भावतील? एवढॆ सगळे वेगवेगळे संस्कार घेतल्यानंतर त्यांचं भारतीयपण, मराठीपण / कानडीपण, पुणेकर / मंगळूरकरपण कशामध्ये असेल? तानाजी आणि शेलारमामाची, हिरकणीची गोष्ट ते त्यांच्या मुलांना कुठल्या भाषेमध्ये सांगतील?
सध्या ज्या वेगाने भाषांची, संस्कृतींची सरमिसळ चालू आहे, ती बघून असं वाटतंय की आणखी वीसएक वर्षांनी प्रादेशिक संस्कृती, भाषेची अस्मिता असं काही शिल्लकच राहणार नाही. खरं म्हणजे प्रादेशिक भाषाच आज आहेत तशा शिल्लक राहू शकणार नाहीत. आज माझ्या ऑफिसमध्ये मला मराठीमधून व्यवहार करता येईल का? नाही. महेशशी माझं बोलणं वरकरणी मराठीमधून असलं, तरी आमच्या संवादाची दोन - तीन वाक्यं घेतली तरी जाणवेल - या संवादाचा गाभा मराठी नाही. "या jar साठी E1 वर सर्च मार. नाहीतर google वर सापडेलच. ती FTP ने डाउनलोड करून मला मेल कर, निखिलला cc कर." या भाषेला काय म्हणायचं? ही आजची बोलीभाषा आहे. अन्य प्रांतीय कुणी असतील, तर या वाक्यांमधल्या मराठी शब्दांच्या जागी हिंदी / दुसर्या भाषेतले शब्द येतात एवढाच फरक. मित्रमंडळींच्या अड्ड्यांवर अशीच चौपाटीवरच्या भेळेसारखी भाषा असते. कॉलेजचीसुद्धा अशीच. आणखी पाच - दहा वर्षांनी नवे लेखक जे पुढे येतील, त्यांची मतृभाषा हीच असेल. त्यांचं ललित लेखन याच भाषेत असेल. या भाषेच्या व्याकरणाचे नियम (?), म्हणी, वाक्प्रचार, शुद्धलेखन यांची पुस्तकं येतील. (:०) ) आणि हो, या भाषेत स्माईली पण असतील. "r u thr?" हे एक प्रमाणभाषेतलं, शुद्ध वाक्य असेल. (डिक्शनरीमध्ये r - from old English 'are' असं स्पष्टीकरण सुद्धा सापडेल बहुतेक :))