Monday, March 26, 2012

Open


आंद्रे आगासी. माझ्या मनातली त्याची प्रतिमा म्हणजे खेळ कमी आणि दिखावा जास्त. मुद्दाम पुस्तक मिळवून त्याच्याविषयी वाचावं असं काही मला आपणहून वाटलं नसतं. खरं सांगायचं तर माझ्या लाडक्या स्टेफीच्या नव‍र्‍याचं पुस्तक म्हणून हे पहिल्यांदा वाचायला घेतलं... म्हणजे पुस्तक सुंदर आहे म्हणून अनघाने आधी सांगितलं होतं,पण अंतस्थ हेतू स्टेफीला या पंकमध्ये नेमकं काय बरं दिसलं असावं हे तपासण्याचा होता. :D

पण पुस्तक वाचत गेले तसतसा त्यात दिसणारा आंद्रे खूप ओळखीचा वाटायला लागला. टेनिस आवडतही नाही, आणि सोडवतही नाही अश्या चक्रव्यूहात धडपडणारा. स्वतःच्या शोधातला.

व्यावसायिक टेनिसमधलं करियर म्हणजे पंधराव्या-सोळाव्या वर्षी सुरू होणार आणि तीस - पस्तिसाव्या वर्षी तुम्हाला ‘माजी’मध्ये जमा करणार. जे काही करून दाखवायचंय ते या पंधरा-वीस वर्षांच्या काळात. स्पर्धा, प्रसिद्धी, पैसा, फिरती आणि टेनिससारखा शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कस लावणारा खेळ. इथे जागेवर टिकून राहण्यासाठीही धावत रहावं लागतं. हा सांघिक खेळ नाही. त्यामुळे विजयही तुमचाच आणि अपयशही फक्त तुमचांच. त्यात वाटेकरी नाहीत. तुमची एक एक चूक मॅग्निफाय करून जगाच्या कानाकोपर्‍यात स्लो मोशनमध्ये हजारो वेळा चघळली जाते. तुमचं काम म्हणजे हारेपर्यंत खेळत रहायचं, आणि हारल्यावर पुन्हा जिंकण्यासाठी!

अश्या खेळामध्ये एक मनस्वी खेळाडू उतरतो - किंवा ढकलला जातो. त्याला या खेळाविषयी कधीच प्रेम नव्हतं. त्याच्या लहानपणी त्याच्या वडलांनीच ठरवून टाकलंय की आन्द्रे टेनिस खेळणार, आणि तशी तयारीही चालू झालीय. टेनिस सोडून आन्द्रेला दुसरं काही येत नाही, आणि टेनिसचा तर मनापासून तिटकारा आहे. इतक्या वषांच्या सरावातून तो तांत्रिक दृष्ट्या खूपच सरस आहे. पण व्यावसायिक स्तरावर खेळताना खेळाचं तंत्र हा जिंकण्यातला फार छोटा भाग असतो. इथे बाजी मारून जातात त्या लढण्याची इच्छा, एकाग्रता, चिकाटी,consistancy अश्या गोष्टी. आणि मनातून वाटल्याशिवाय यांत्रिकपणे खेळणं आन्द्रेला येत नाही. त्यामुळे कधी उत्तम खेळी,कधी पहिल्याच फेरीत नामुष्कीचा पराभव, कधी लोकांच्या गळ्यातला ताईत, कधी सगळीकडून टीकेचा मारा असा आन्द्रेचा हा सगळा प्रवास आहे. निराशेच्या गर्तेत म्हणजे अगदी उत्तेजक द्रव्य घेण्यापर्यंत जाऊन तो परत येतो. परत उभा राहतो, कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतो.

चुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांसाचा माणूस या पुस्तकात भेटतो, म्हणून मला ‘ओपन’ आवडलं.

बाकी त्याचं विश्व आणि माझं विश्व यांची काहीच तुलना नसेल, पण आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्या कन्फ्युजनमध्ये आणि आपण कुवतीएवढं करून दाखवत नाही या टोचणीमध्ये मी त्याच्या अगदी जवळपासच आहे. :D :D

Open - An Autobiography
Andre Agassi
2009, Harper Collins Publishers

Thursday, March 22, 2012

रंग न डारो शाम जी ...
हे ऐकलं म्हणजे मी थेट रेल्वे कॉलनीमध्ये जाऊन पोहोचते. उन्हाळ्यातली संध्याकाळ. नुकताच सूर्यास्त होत असतो. खेळता खेळता फारच तहान लागली म्हणून नाइलाजाने पाणी प्यायला घरात जावं लगतं. बाहेर भानगावकर काकांची (त्यांच्या एवढ्याच वयाची) सायकल उभी आहे... म्हणजे कुमार लावलेले असणार. कुमारजी म्हणजे काकांचं दैवत. "गाणं ऐकणं" म्हणजे फक्त आणि फक्त कुमारजींना ऐकणंच असू शकतं काकांच्या मते. काकांनी रेल्वेत नोकरी केली त्याच्या दुप्पट वर्षं पेन्शन घेतली असावी. आणि आयुष्यभरात मिळालेला रेल्वेचा प्रत्येक पास कुमारांच्या मैफिली ऐकण्यासाठी गावोगाव हिंडण्यासाठीच वापरला असावा. घर बांधतांनासुद्धा, कुमारांचं गाणं ऐकायला मिळावं, म्हणून काकांनी कुमारांच्या देवासजवळ असलेल्या इंदोरला बांधलं!

घरी हॉलमध्ये आई, बाबा, मामी, काका बसलेत. पन्हं किंवा सरबताचे संपलेले ग्लास शेजारी दिसताहेत. कुमारांची नवीन बनवून आणलेली कॅसेट लावताना काकांचे डोळे लकाकतात. कॅसेट सुरू होते, आणि "दिन डूबा ..." सुरू झाल्याबरोबर काकांची समाधी लागते, ती थेट दीड तासाने "अवधूता कुदरत की गत न्यारी ..." संपल्यावरच उतरते. कुमारांची नवी कॅसेट ऐकण्याइतकाच खास अनुभव काकांना कुमार ऐकतांना बघण्याचाही असतो. या कॅसेटमधल्या "रंग न डरो शाम जी" मध्ये तर अशी जादू आहे, की दरवेळी ही बंदीश ऐकताना मला त्या उन्हाळ्यातल्या संध्याकाळचा वास येतो.
**************
कॅसेट्सचा जमाना जाऊन युगं झाली, पण आईकडून ढापलेली ही कॅसेट मी अजूनही जपून ठेवली आहे. एकदा नवर्‍याने ही कॅसेट बघितली. "कुठल्या जुनाट कॅसेट लावत असतेस- म्युझिक सिस्टीम खराब होऊन जाईल अश्याने." म्हणून त्या कॅसेटला घरच्या म्युझिक सिस्टीमवर प्रवेशबंदी झाली. अर्थात याने मला फार फरक पडला नाही. तसंही घरी निवांत बसून गाणं ऐकायचा मुहुर्त कधी लागतो? मी कॅसेट हळूच गाडीत नेऊन ठेवली, गाडीतल्या सिस्टीमवर ऐकायला सुरुवात केली ;)

पण तेंव्हापासून या कॅसेटचं वय झालंय, ती खराब झाली तर "रंग न डारो" कुठे ऐकायला मिळणार? या धोक्याची जाणीव झाली, . मागच्या आठवड्यात अखेरीस कुमारांच्या सिड्यांचा सेट घेतला, आणि माझ्या ‘रंग न डारो’ ची सोय झाली :) अडचण एकच आहे, - ही सिडी ‘अवधूता, कुदरत की गत न्यारी ...’ वर संपत नाही. त्यामुळे मैफिल अर्धीच राहून जाते.

तुमच्या जुन्या कॅसेट्स, सिड्यांचं तुम्ही काय करता?

Wednesday, March 21, 2012

रमाबाई

    "उंच माझा झोका" बघायची अजून संधी नाही मिळाली मला. पण रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर कुणाला मालिका काढावीशी वाटली याचाच इतका आनंद झालाय!

    रमाबाई पहिल्यांदा मला भेटल्या त्या आजीने सांगितलेल्या आठवणींमधून. गावंच्या गावं ओस पाडणार्‍या प्लेगच्या साथीमध्ये आजीचे वडील तिच्या जन्मापूर्वीच दगावले, तिच्या अजाणत्या वयात आईही पुन्हा प्लेगलाच बळी पडली. मामाने भाचरांना आधार देण्याऐवजी होतं नव्हतं ते घशात घातलं, आणि ही भावंडं उघड्यावर पडली. सगळ्यात मोठा भाऊ बारा तेरा वर्षांचा, ही सगळ्यात धाकटी तीन-चार वर्षांची - जे घडून गेलं ते कळण्याचंही वय नसलेली. बाकीच्या भावंडांचं काय होईल ते होईल, किमान हिला तरी मी शिकवणार, शहाणी करणार म्हणून त्या बारा-तेरा वर्षांच्या ‘मोठ्या’ भावाने हिला पुण्यात सेवासदनला आणून सोडलं. ज्या काळात चांगल्या खात्यापित्या घरचे शहरातले आईबापसुद्धा मुलींच्या शिक्षणाचा फारसा विचार करत नव्हते, तेंव्हा त्या आडगावातल्या, जवळ शून्य पुंजी घेऊन आलेल्या भावाला आपल्या बहिणीला शिकवण्याची संधी दिली, ती सेवासदनने. तिच्यासारख्या कितीतरी निराधार मुली तिथे शिकल्या, कुणा नातेवाईकाच्या आश्रित होण्याऐवजी स्वाभिमानाचं जगणं जगल्या. रमाबाई रानडेंची ओळख म्हणजे केवळ न्यायमूर्ती रानड्यांची दुसरेपणावरची पत्नी एवढीच नाही. या माऊलीने सेवासदनमधल्या सगळ्या मुलींना आईची माया दिली. आजीच्या किश्श्यांमधून मला भेटल्या त्या सेवासदनमधल्या मुलींची पंगत बसल्यावर त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत चौकशी करणार्‍या, त्यांना सुट्टीला आपल्या बंगल्यावर बोलावणार्‍या रमाबाई !

    पुढे नंतर त्यांची अजून ओळख झाली ती "आमच्या आयुष्यातील काही आठवणी" वाचताना. न्यायमूर्ती रानड्यांच्या योग्यतेच्या पुरुषाने एका लहान वयाच्या मुलीशी पुनर्विवाह करावा? कितीतरी वर्षं पटलं नव्हतं हे. पण रमाबाईंच्या आठवणी वाचताना जाणवलं, त्यांच्याइतकं परस्परपूरक आणि समृद्ध सहजीवन त्या काळात फार थोड्यांच्या वाट्याला आलं असेल. पेशवाईतल्या रमाबाई - माधवरावांसारखीच हीसुद्धा एक रमा-माधवाची जोडी. आणि रमाबाई केवळ न्यायमूर्तींची सावली बनून राहिल्या नाहीत. त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्त्वानेही त्या तितक्याच मोठ्या वाटतात मला.

    रमाबाई, तुम्ही घराबाहेर पडला नसतात तर आजीचं काय झालं असतं माझ्या?

Saturday, March 17, 2012

Zen Habits


काल कुठून तरी या ब्लॉगवर जाऊन पोहोचले. जगातल्या सगाळ्यात लोकप्रिय ब्लॉगपैकी हा एक आहे, मान्य. पण मला याच शोध काल लागला. आणि शोध लागल्यापासून मी आधाश्यासारखी इथल्या पोस्ट वाचतेच आहे.
**************
नोकरी लागल्यावर वर्षभरात मी केस पुन्हा कापण्याच्या निर्णयाला येऊन पोहोचले होते. लहान केस आवडतात म्हणून नाही, तर मोठे केस मेंटेन करायला वेळ मिळत नाही म्हणून. बदलणारे प्राधान्यक्रम, कित्येक गोष्टी ‘सोडून देण्या’चा निर्णय, या सगळ्याचं हे एक उदाहरण होतं. केस मेंटेन करता आले नाहीत तर फार काही बिघडत नाही, कापून टाकता येतात. जगण्यातल्या कित्येक गोष्टी अश्या ‘कापून टाकण्याचे’ निर्णय आपण घेत असतो, ते आवश्यकच असतं. कळीचा मुद्दा हा आहे, की या गोष्टी काढून टाकून आपण कश्यासाठी जागा करतो आहोत? ज्यासाठी जागा केली, ती खरंच प्रायॉरिटी आहे का? नाही्तर ट्रेकला जाताना सॅकमध्ये जागा नाही म्हणून पाण्याची बाटली काढून टाकून जास्तीचे कपडे भरण्यासारखं चाललंय आपलं. सॅकचं वजन कमी झालं, पण जास्त महत्त्वाची गोष्ट बाहेर राहिली.

सहा आठवड्याच्या कामातून त आपण वर्षभराची पोटापाण्याची सोय करू शकतो असं गणित थोरोने मांडलंय. ही ‘पोटापाण्याची सोय’ माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग व्यापून टाकते आहे. कारण सहा आठवडे काम = एक वर्षाची सोय एवढं सोपं गणित मला मांडता येत नाही. जेंव्हा हातपाय चालणार नाहीत तेंव्हा काय करायचं? डोक्यावरचं छप्पर मला पुण्यातच, चांगल्या वस्तीत, किमान दोन बेडरूमचं लागतं. चारचाकी लागते, वीज लागते, इंटरनेट लागतं - एक ना दोन हजार गोष्टी येतात माझ्या ‘पोटापाण्याच्या सोयी’मध्ये. वर्षाला सहा आठवडेच काय, वर्षाचे सगळे आठवडे काम केलं तरी मला खात्री नसते पोटापाण्याची सोय झालीय म्हणून. आपलं आयुष्य आपण फार गुंतागुंतीचं करून ठेवलंय. हे सोपं बनवल्याखेरीज मजा नाही हे गेले काही महिने फार प्रकर्षाने जाणवतंय.

सुखाने नोकरी करायची असेल, तर घरातल्या काही गोष्टींकडे काणाडोळा करायला शिकावं लागतं. फक्त घरातल्याच नाही, मनातल्याही. घरातली आणि मनातली ही अडगळ, आपण कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं, तरी ताण तणावात भर घालत राहते. आज ना उद्या तिच्याशी दोन हात करावेच लागणार आहेत.

शिस्त लावायची म्हणून सवयी लागत नसतात. आतून ते करायची इच्छा जागी व्हायला लागते. जे आतून करावसं वाटतं ते करणं हा कळीचा मुद्दा आहे.
**************
या आणि अश्या सतराशे साठ गोष्टी. मला फक्त विचाराच्या पातळीवर जाणवताहेत. त्यावर कार्यवाही करण्याची निकड जाणवली नव्हती अजून. झेन हॅबिट्सवाला बाबा हे सगळं प्रत्यक्षात आणतोय. माझा हे करायचा मुहुर्त कधी लागणार?

Monday, March 12, 2012

कं पोस्ट ३ - अर्थात कचर्‍यातून घेतलेले धडे

या उद्योगाविषयी मी इथे आणि इथे लिहिलंय. हा यातला शेवटचा भाग.

या चुकत - माकत केलेल्या प्रयोगातून मिळालेले धडे:
१. फ्लॅटवासियांनी पहिला प्रयोग करताना शक्यतो कोणा जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करावा. योग्य काळजी घेतली नाही तर घरात चिलटं, डास, किडे होण्याची  आणि आपण पुन्हा कंपोस्टिंगच्या वाटेला न जाण्याची शक्यता आहे.

२. डबे घासून रंग काढताना चांगलाच घाम निघाला. त्यामुळे डबे बाहेरूनही घासून चकाचक पांढरे करायचे आणि त्यावर मस्त वारली चित्र काढायची हा कलात्मक बेत रद्द करावा लागला. पण नंतर डब्याचा तळ कापण्याच्या ठोकाठोकीत हे रंगाचे उरलेले लपके इतके पटापट सुटे होत होते - पुन्हा हा प्रयोग केला, तर आधी डबे कापणार, मग उरलेला रंग घासणार.

३. ओला कचरा म्हणजे काय हे घरातल्यांना, कामवाल्या बाईला समजायला आणि पटायला हवंय. किती सांगितलं तरी अधून मधून कंपोस्ट बिनमध्ये प्लॅटिकच्या पिशव्या आणि ऍल्युमिनियम फॉईलचे तुकडे निघतातच.

४. कचरा कुजताना त्यातून पाणी गळतं. हे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पाणी साचून राहिलं तर दुर्गंधी आणि माश्या, डास होण्याची शक्यता आहे. कंपोस्ट बिन तुम्ही अगदी घरात सुद्धा ठेवू शकता असं तज्ञ म्हणतात. पण मला तरी कुठलंच डिझाईन या गळणार्‍या पाण्याची पूर्ण काळजी घेतं आहे असं वाटलं नाही. त्यामुळे कंपोस्ट बाल्कनीमध्ये ठीक आहे, घरात नको. (बाल्कनीत  एका पसरट, उथळ कुंडीत कोरडी माती ठेवून मी ती कंपोस्टच्या स्टॅंडखाली ठेवून दिली त्यामुळे या पाण्याचा त्रास झाला नाही.)

५. कंपोस्ट लवकर होण्यासाठी खरं म्हणजे दोन महिन्यांनी त्यात गांडुळं सोडायला हवी. (गांडुळं बिनमधून बाहेर पडत नाहीत. सूर्यप्रकाशात त्यांची त्वचा कोरडी पडते आणि ती मरतात.) पण याला घरच्या ५०% लोकसंख्येचा तीव्र विरोध होता. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण मायक्रोबनाच हे काम करायला लावायचं असं ठरवलं. गांडुळं वापरली तर चहासारखं दाणेदार, एकसारखं दिसणारं खत मिळतं. मायक्रोबने केलेल्या कंपोस्टला हे टेक्श्चर नसतं.

६. कंपोस्ट बनत असताना त्यात बारीक किडे झाले होते. हे किडे बिनच्या बाहेर पडत नाहीत. पण नवरोबाने किडे बघितल्यावर बिनचं झाकण घट्ट बंद करायला सुरुवात केली. हवा खेळती राहणं बंद झाल्यावर किडे अजून वाढले. त्यावर माती टाकल्यावर जास्तीची ओल शोषली गेली, किडे कमी झाले.

७. आंब्याच्या कोयी कुजायला खूप जास्त वेळ लागतो. शक्यतो आंब्याच्या कोयी घरातल्या कंपोस्ट बिन मध्ये टाकू नयेत.

८. कंपोस्ट बिन उघड्यावर ठेवणार असाल तर झाकण लावायला विसरू नका - कबुतरं, कावळे कचरा पसरून ठेवतात.

९. डेली डंपचं डिझाईन खरोखर मस्त आहे. जागा कमी लागते, तयार कंपोस्ट वेगळ्या डब्यात असल्यामुळे अर्धवट कुजलेल्या कचर्‍यातून वेगळं करत बसावं लागत नाही, आणि कचर्‍याला सुटणारं पाणी खालच्या खतात बर्‍याच अंशी सामावलं जातं.

१०. कचरा पहिल्या दिवशी दिसतो त्यापेक्षा खूप कमी होतो. सुरुवातीला मला रोज वाटायचं - या आठवड्यानंतर डबा भरणार, दुसरा डबा सुरू करावा लागणार. पण आठवडाभराने पुन्हा कचरा जुन्या पातळीलाच असायचा!

११. प्रयोगासाठी लागणारा वेळ : बिन तयार करणे - एक दिवस. त्यानंतर रोज दोन मिनिटं, आणि आठवड्यातून एकदा दहा मिनिटं.

१२. प्रयोगाचा खर्च -
  • सकाळ फुलोरा कार्यशाळा - १०० रु. (खरं तर मी फुलोरा चे वर्षभराचे पैसे भरले होते. पण वर्षभरातल्या पाच कार्यशाळांपैकी या एकाच दिवशी जाता आलं मला. तो एक दिवस सत्कारणी लावला असं नंतर मनाचं समाधान करून घेतलं ;) )
  • रंगाचे रिकामे डबे - १०० रु ला एक, एकूण २०० रू.
  • स्टॅंड - आईकडून दान
  • मायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड आणि मिक्श्चर - सुमारे ५० रू (लिक्वीड अजून भरपूर शिल्लक आहे)
  • गार्डन स्प्रे - ६० रू (रोज लिक्वीडची फवारणी करायला)
अन्य साहित्य:
  • तिखट पावडर - साधारण १० -१२ चमचे
  • खायचा सोडा - १० -१२ चमचे (जुनं, खराब झालेलं इनो वापरलं)
१३. "काय मस्त भाज्यांची देठं जमली आहेत तुझ्याकडे - मी घेऊन जाऊ का खतात घालायला?" असं आईला म्हणण्याचा मोह झाला तरी टाळावा. आपल्याला कंपोस्टिंग प्रकल्पाने झपाटलं असलं, तरी बाकी जग नॉर्मलच चालत असतं. त्यामुळे आल्यागेल्या पाहुण्यांना उत्साहाने कंपोस्ट बिन उघडून दाखवू नये.  :D
***************************
पहिल्या पोस्टीत म्हटलंय तसं हा प्रयोग माफक प्रमाणात यशस्वी झाल्याचं मी घोषित केलंय. सद्ध्या फक्त बागेतल्या कचर्‍याचं कंपोस्टिंग चाललंय. जरा बाल्कनीतलं ऊन, पाऊस आणि कंपोस्टिंगला लागणारा वेळ याचं गणित जुळवायचा प्रयत्न आहे. तो जमला, की पुन्हा सगळा ओला कचरा यात वापरता येईल.

Friday, March 9, 2012

कं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट

धागेदोरे वर कंपोस्टिंगच्या प्रकल्पाविषयी प्राची यांनी लिहिलंय. त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे माझ्या कंपोस्ट प्रकल्पाचे काही फोटो आणि माहिती.

मागे कं पोस्टमधे म्हटलंय त्याप्रमाणे मी कंपोस्ट बिन घरीच बनवली, ‘डेली डंप’चं डिझाईन वापरून. हे त्या प्रयोगाचे टप्पे:

१. रंगाचे २० लिटरचे २ रिकामे डबे घेतले.

कंपोस्ट बिनसाठी वापरलेले रंगाचे डबे

    (आता खरं तर डेली डंपच्या डिझाईनमध्ये ३ डबे आहेत. वरच्या डाब्यात कचरा टाकत रहायचा. दुसर्‍या डब्यात तयार होत असलेलं कंपोस्ट असतं, आणि सगळ्यात खालच्या तिसर्‍या डब्यात तयार कंपोस्ट ठेवतात. पण रंगाच्या दुकानात तेंव्हा दोनच रिकामे डबे शिल्लक होते आणि एकदा प्रयोग करायची सुरसुरी आल्यावर तिसरा डबा मिळेपर्यंत मला दम नव्हता :). त्यामुळे कंपोस्ट तयार झाल्यावर जेंव्हा गरज पडेल तेंव्हा तिसरा डबा घेऊ असा विचार करून दोन डबे घरी आणले.

    तुम्ही कुठल्याही बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनवलेले डबे वापरा असं डेली डंपवाल्यांचं म्हणणं आहे. रंगाचे डबे बायोडिग्रेडेबल नसले तरी रिसायकल्ड आहेत त्यामुळे चालतील असं मी ठरवलंय.)

२. या डब्यांमध्ये वाळलेल्या रंगाचा जाड थर होता. डबे घासून शक्य तितका रंग काढून टाकला.

३. रंगाचा वरच्या डब्याचा तळ आणि खालच्या डब्याचं झाकण घरच्या विंजिनेराकडून याप्रमाणे कापून घेतलं:
खालच्या डब्याचं झाकण आणि वरच्या डब्याचा तळ दोन्ही असं कापून घेतलं.

(दुसर्‍या डब्याचा तळ नंतर गरज लागेल तेंव्हा कापू असा विचार केला. तो नंतर अंमळ महागात पडला. कसा ते पुढे समजेलच.)

४. ड्राय बाल्कनीमध्ये ओल्या - सुक्या कचर्‍याचे डबे होते, तिथेच शक्यतो हा खांब ठेवायचा विचार होता. खालचा डबा, त्यावर कापलेलं झाकण, त्यावर तळ कापलेला डबा असा पिसाचा मनोरा तिथे ठेवला. वरचा डबा ठेवताना त्याच्या तळाच्या पट्ट्या आणि खालच्या झाकणाच्या पट्ट्या शक्यतो एकावर एक ठेवल्या.

५. टाकलेला कचरा खालच्या डब्यात पडू नये आणि थोडं पाणी शोषलं जावं, म्हणून वरच्या डब्यात तळाला टाईम्सचा एक अख्खा पेपर घातला. त्यावर ‘इनोरा’चं कंपोस्ट स्टार्टिंग मिक्स घातलं. थोडी बागेतली खराब झालेली माती घातली. कंपोस्ट बिन तयार! हा होता मागचा फेब्रुवारी महिना.

६. यावर रोज स्वयंपाकघरातला ओला कचरा आणि बागेतला कचरा घातला. त्यावर पाण्यात मिसळलेलं ‘इनोरा’चं मायक्रोबॅक्टेरियल लिक्वीड रोज फवारायचं आणि कचरा वरखाली करायचा. बिनचं झाकण लावताना थोडी फट ठेवायची.

७. आठवड्यातून एकदा एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा खायचा सोडा यात मिसळला. यामुळे वास येत नाही आणि किडे कमी होतात. फार ओलसर वाटलं, तर माती / पेपराच्या कपट्या असं घालायचं.

८. असं साधारण मार्च मध्यापर्यंत चाललं. एक दीड महिना हा प्रयोग केल्यावर घरात मोठे डास आणि चिलटं दिसायला लागली, बिनला वास यायला लागला, आणि बिनची रवानगी बंदिस्त ड्राय बाल्कनीतून बाहेरच्या बाल्कनीत झाली. माझी बाहेरची बाल्कनी उघडी आणि उत्तरेला आहे. उन्हाळ्यात पूर्ण बाल्कनी उन्हाने भाजून निघते. कंपोस्ट बिन सावलीच्या जागी कुठे ठेवणार? बाल्कनीतच कमीत कमी ऊन लागेल अश्या कोपर्‍यात हा खांब ठेवला.
बाल्कनीतला खताचा खांब

    (बिन हलवताना लक्षात आलं - खालच्या डब्याला भोकं न पाडल्याने कचर्‍यातून पडणारं पाणी खाली गोळा झालं होतं. त्यामुळे डास झाले होते. तातडीने खालच्या डब्याला भोकं पाडून घेतली. पाणी साठायचं थांबल्यावर डास गेले. )

९. साधारण दोन महिन्यांनी एप्रिलमध्ये वरचा डबा भरला. तो खाली ठेवून खालचा रिकामा डबा वर घेतला. पुन्हा डब्यात कचरा टाकायला सुरुवात केली.

१०. उन्हाळा संपला आणि पाऊस सुरू झाला. आता वरच्या डब्याचं झाकण थोडंही उघडं ठेवता येई ना. पावसाचं पाणी आत जायला लागलं. शिवाय पाऊस पडत असताना बाहेर जाऊन कचरा टाकायचा मंडळी हळुहळू कंटाळा करायला लागली. शेवटी मी पावसाळ्यापुरता हा प्रयोग स्थगित केल्याचं जाहीर केलं.

११. साधारण दिवाळीच्या सुमाराला मी पहिला डबा कंपोस्ट म्हणून वापरायला घेतला. गांडुळ खतासारखं चहाच्या भुकटीचं टेक्श्चर यात तयार होत नाही, पण तयार खताला अजिबात वास वगैरे नाही.

**********************************************

याचा पुढचा भाग लवकरच पोस्टते.

Saturday, March 3, 2012

नोस्टाल्जिया

पिकासामध्ये सेपियाचे प्रयोग ...आणि हा ब्लॅक ऍंड व्हाईट ...

फोटोमधले रंग कमी झाल्यावर तो जास्त सुंदर का दिसतो? :)

*****************************
प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात आलं ... पोस्टीच्या नावामुळे वाचणार्‍यांचा गोंधळ होतोय. हे जुने फोटो नाहीत. नव्याच फोटोंना पिकासामध्ये जुनं रूपडं दिलंय. नोस्टाल्जिया आहे तो जुन्या फोटोंच्या रूपड्याबाबतचा. आणि पहिल्या फोटोतली कॅमेरावाली आजी आणि नात मधली लाडूबाई आहे.