सध्या वाचत असलेल्या पुस्तकांविषयी ही माझी विस्कळीत निरीक्षणं. माझ्या वाचनाला विशेष शिस्त नाही. पुस्तक हातात पडलं, आवडलं, वाचलं असं माझं वाचन असतं. कधी कधी महिनेच्या महिने फारसं काही वाचायला मिळत नाही, तर कधी काय वाचू आणि काय नको असं होण्यासारखी मेजवानी असते.
ही रूढार्थाने पुस्तक परीक्षणं नाहीत. पुस्तकाचा सर्वांगीण आढावा यात नाही - फक्त वाचून मला काय वाटलं अशी first impressions आहेत ही.
***********************************************************************************
- Red Sun - सुदीप चक्रवर्ती
नक्षलग्रस्त भागातल्या आपल्य प्रवासांविषयी लिहिलेलं सुदीप चक्रवर्तींचं पुस्तक. नक्षल भागात भटकतांनाच हे हातात पडलं, त्यामुळे खूपच रिलेट झालं. यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहायचा विचार आहे.
- Light on Pranayama - बी के एस अय्यंगार
खरं म्हणजे प्राणायाम ही वाचायची गोष्ट नाही, करण्याची आहे. पण प्राणायामामागचं शास्त्र समजून घ्यायचं आसेल, तर हे पुस्तक छान आहे. प्राणायाच्या सर्व अंगांचा सविस्तर आढावा घेतलाय यात. केवळ प्राणायाम करताना बैठक कशी असावी यावर एक संपूर्ण प्रकरण आहे पुस्तकात! सद्ध्या याच्या जोडीला कृती कुठे शिकता येईल याचा विचार चाललाय.
एक वाचायलाच हवं असं पुस्तक! पुन्हा वाचायचं होतं. ‘वरदा’ने याची आवृत्ती बाजारात आणलीय. आईने त्यांना फोन करून ४ प्रती मागवल्या होत्या, आणि त्यातल्या एका प्रतीवर मी क्लेम लावून ठेवला होता. काल पुस्तक हातात पडलं, आज वाचून संपलं :)
छोट्या रमाची घरच्यांच्या विरोधात शिकतांना होणारी तारांबळ, आंबे पाडताना हातातला दागिना हरवल्याचा प्रसंग, आणि ‘जेथे जातो तेथे’- इंगळीचा प्रसंग एवढ्या तीनच गोष्टी मला आठवत होत्या या पुस्तकातल्या. रमाबाईंनी लिहिलेल्या आठवणी न्यायमूर्ती रानड्यांच्या मृत्यूपर्यंतच्याच आहेत, त्यामुळे यात सेवासदनाची गोष्ट येत नाही. मला तर या विषयावर पुढे वाचायची, माहिती करून घ्यायची खूप इच्छा आहे. त्यामुळे रमाबाईंवरच्या अजून पुस्तकांचा शोध चालू आहे.
- Open - an Autobiography - Andre Agassi
आवडलं. यावर
स्वतंत्र पोस्ट टाकलीय. त्यामुळे परत इथे लिहित नाही.
अतिशय परिणमकारक, हलवून टाकणारी गोष्ट.
इथे वेगळी पोस्ट टाकलीय तिच्याविषयी.
- The Cairo Trilogy - Naguib Mahfouz
१९१९ ते १९४४ मधल्या कैरो शहरात घडाणारी गोष्ट. मूळ अरेबिक कादंबर्यांच्या मालिकेचा हा इंग्रजी अनुवाद. लवकरच (बहुतेक) याविषयी वेगळी पोस्ट लिहीन.
ब्रह्मदेशाच्या ऑंग सान स्यू चीचं चरित्र. आवडलं. यावर (बहुधा) स्वतंत्र पोस्ट टाकायचा विचार आहे.
वृक्षगानचं अजून एक पारायण. पण या वेळी नुसतीच गंमत म्हणून वाचण्याऐवजी काही शिकायला मिळतंय का म्हणून बघितलं. तेंव्हा लक्ष्यात आलं - शिकण्यासाठी ‘आपले वृक्ष’ जास्त सोपंय.
- बखर अंतकाळाची आणि अंताजीची बखर - नंदा खरे
इतिहासाचं, त्यातही मराठ्यांच्या इतिहासाचं प्रेम असेल, आणि सर्व ऐतिहासिक पुरुषांना महानायक बनवणार्या आपल्या कादंबर्या वाचवत नसतील, तर ही पुस्तकं आवश्य वाचा. इतिहासाचा ‘वर्म्स आय व्ह्यू’ मस्त मांडलाय. यावर (बहुधा) एक स्वतंत्र पोस्ट लवकरच टाकीन.
अखेरीस वाचली. किती तरी वर्षं ही मिळवण्यात गेली. त्यानंतर ‘बोअर आहे’ असं विश्वसनीय सूत्रांकडून कळल्यामुळे पुन्हा मागे पडली. पण वाचायला काहीच शिल्लक नाही अशी स्थिती झाली मागच्या महिन्यात, आणि ‘गोरा’ बाहेर काढली. मला तरी आवडली.
‘आपले वृक्ष’ चा हा पुढचा भाग. कितीतरी सुंदर ओळखीच्या - अनोळखी देशी झाडांची माहिती. हे पुस्तक एकदा वाचून ठेवून देण्यासारखं नाही. ते संग्रही ठेवायला हवं, नवं झाड दिसलं म्हणजे त्यात पडताळून बघायला हवं.
- Dreams from my father- Barack Obama
सध्या या पुस्तकात बुडून गेले आहे. Again, another brutally honest story. पानापानाला प्रश्न पडतोय - एवढा विचार आपल्याकडच्या राजकारणात कुणी करतं का? राजकारणाबाहेर राहून राजकारणाला नावं ठेवणं हे तर आपल्या देशातल्या ‘विचारवंतां’चं व्यवच्छेदक लक्षण. या पुस्तकाविषयी वेगळी पूर्ण पोस्टच लिहायला हवी.
- आहे मनोहर तरी - सुनीताबाई देशपांडे
काही पुस्तकं एकदा वाचून ठेवून देण्याची असतात, काही पुन्हा पुन्हा वाचण्याजोगी. हे यातल्या दुसर्या वर्गातलं.
कॉलेजला असताना ‘आहे मनोहर तरी’ पहिल्यांदा वाचलं होतं. ‘सुनीताबाई’ वाचताना जाणवलं की, ‘आहे मनोहर’ मधले कुठलेच संदर्भ आपल्याला आठवत नाहीयेत, पुन्हा एकदा वाचायला हवं ते पुस्तक. आता वाचल्यावर जाणवलं - पुन्हा वाचणं हे केवळ जुने संदर्भ जागे करणं नाही - नव्याने समजणंही आहे. मला आत्ता हे पुस्तक जसं समजलं, तसं मागे समजलंच नव्हतं... अजून काही वर्षांनी वाचल्यावर कदाचित पुन्हा असंच वाटेल. :)
- The Vioce Book - Michael McCallion
अभिनय, अध्यापन अश्या क्षेत्रात काम करणारे, वक्ते, गायक अश्या ज्या ज्या लोकांना आवाज वापरण्याचं कौशल्य अवगत असलंच पाहिजे त्यांच्यासाठी हे उत्तम पुस्तक आहे. तासंतास चालणारे कॉन्फरन्स कॉल घेताना आवाजात फारच ताण जाणवतोय म्हणून एका voice expert ना भेटले, त्यांनी या पुस्तकातले काही व्यायाम सुचवले. पुस्तक एकदा वाचून हातावेगळं करण्यासारखं नाही - पुन्हा पुन्हा रेफरन्ससाठी वाचण्याजोगं आहे. तुमचा आवाज तुम्हाला योग्य साथ देत नसेल, तर हे पुस्तक आवश्य वाचा.
‘मृण्मयी’ विषयी खूप काही ऐकून होते, कितीतरी दिवसांपासून वाचायचं होतं. मला वाटतं हे पुस्तक मला समजलंच नाहीये. उघड्या डोळ्यांनी, कुठलीच मजबूरी नसताना तिने असं लग्न का पत्करावं? हे लग्न न करता तिला आयुष्यात कधी कोकणाला भेट द्यायला मिळालीच नसती का? नही झेप्या.
- नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे
हे जगन्नाथ कुंटे म्हणजे ‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ वाल्या कृष्णमेघ कुंटेचे वडील. कलंदर भटकंती या घराण्याच्या रक्तातच असावी. एक सोडून तीन तीन नर्मदा परिक्रमा करतानाचे आपले अनुभव त्यांनी इथे मांडले आहेत. त्यांच्या आध्यात्मामधल्या अधिकाराविषयी मला माहिती नाही, आणि नर्मदेविषयी धार्मिकतेतून आलेली ओढही नाही. तरीही आवडलं. कुठल्याही भटक्याला आवडावं असं पुस्तक.
- चकवाचांदण - मारुती चितमपल्ली.
मारुती चितमपल्लींची आत्मकथा. सुंदर आहे. साध्या सरळ भाषेत लेखकाने आपल्या आयुष्यातले अनुभव मांडलेत.
- एका नक्षलवाद्याचा जन्म - विलास मनोहर.
नक्षलग्रस्त भागात इतकी वर्षं राहिल्यानंतर विलास मनोहर जेंव्हा नक्षलवादाविषयी लिहितात, तेंव्हा काहीतरी insightful वाचायला मिळेल अशी अपेक्षा असते. कादंबरीतलं या प्रदेशाचं आणि माडिया गोंड आदिवासींच्या जीवनाची वर्णनं प्रत्ययकारी आहेत. त्यांची होणारी वंचना काळजाला भिडते. पण नक्षलवादाच्या प्रसाराची त्यांनी सांगितलेली कारणं एवढी सरळ आहेत का? संपूर्ण कादंबरीत एकही नेकीने चालणारा सरकारी माणूस दिसत नाही... एवढं काळं-पांढरं चित्र आहे का हे? यात करड्याच्या अनेक छटा दिसतील अशी अपेक्षा होती.
- उत्सुकतेने मी झोपलो - शाम मनोहर.
कथासूत्र नसलेल्या लेखनाला कादंबरी म्हणायचं का? वेगळा प्रयोग, मला तरी फारसा झेपला नाही. निराशेने मी झोपले.
- एका दिशेच शोध - संदीप वासलेकर.
कुठल्या इंग्रजी पुस्तकावर आधारित नसलेलं, भाषांतरित नसलेलं जगामधल्या आज घडत असणार्या बदलांविषयीचं हे मी तरी वाचलेलं पहिलं मराठी पुस्तक. सध्याच्या परिस्थितीत असं पुस्तक मराठीत असणं हेच विशेष. प्रकाशनानंतर एका महिन्याच्या आत पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली आहे ! ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे प्रकरण मला विशेष आवडलं. लेखकाच्या जागतिक पातळीवरच्या अनुभवाचं सार इथे वाचायला मिळतं. पुस्तकाच्या विषयाचा आवाका मोठा असल्यामुळे थोडं जनरलायझेशन, simplification होतंय असं वाटलं.
- सुनीताबाई - मंगला गोडबोले.
पु.ल. आणि सुनीताबाईंविषयी आता नवीन काही लिहिण्यासारखं आहे का? विशेषतः सुनीताबाईंविषयी लिहिणार तरी काय ‘आहे मनोहर तरी’ च्या बाहेरचं? असं वाटत होतं. सुनीताबाईंचं आयुष्य, लेखन, पु.लं.च्या कर्तृत्वामधला त्यांचा वाटा याचं विश्लेषण मंगला गोडबोलेंनी छान केलंय. पुस्तकाची रचना आणि ‘आहे मनोहर तरी’ मधून घेतलेले संदर्भ यामुळे थोडी पुनरुक्ती वाटाली, पण पुस्तक वाचनीय नक्कीच आहे.
- जनांचा प्रवाहो चालला - विनय हार्डीकर.
आणिबाणीच्या काळातल्या अनुभवांविषयी. आणीबाणी नेमकी काय होती, हे समजून घ्यायचा प्रयत्न चाललाय सद्ध्या. आत्मपरीक्षण कसं असावं याचं हे पुस्तक उत्तम नमुना आहे.
4 comments:
जब्बरदस्त !!! हे पेज सगळ्यात बेस्ट आहे :)))
यातल्या प्रत्येक पुस्तकावर एकेक पोस्ट येऊडे नक्की. (अर्थात 'राजबंदिनी'ने सुरुवात झालेली आहेच. आता उरलेली कंटिन्यु कर)
हेरंब, अरे आता मध्यरात्र असेल ना तुझी ... इतक्या रात्री जागत बसला आहेस?
कधी कधी पुढचं पुस्तक वाचायची इतकी घाई असते, की वाचलेल्याविषयी लिहिण्याचा धीर नसतो. त्या पुस्तकाविषयी काही म्हणायचं असेल, तर ते मग वाहून जातं. म्हाणून, वाचता वाचता केलेल्या नोंदी आहेत ह्या. यातल्या ‘राजबंदिनी’, दोन्ही बखरी, चकवाचांदण एवढ्या पुस्तकांविषयी पोस्ट पूर्ण झाली. बाकीची आता वाहून गेलीत. :( .
Thanks for this post.
Thanks for this post.
Post a Comment