Monday, January 30, 2017

सोन्याची फुलं

    कधीकधी तुम्हाला कुणाची तरी मनापासून आठवण येते आणि तेंव्हाच त्यांनाही तुमची आठवण येते. टेलिपथी म्हणा. अशा वेळी तुमची भेट झाली तर त्यासारखं सुख नाही. शनिवारी असंच झालं. टेकडीवरच्या सोनसावरीची आठवण झाली अचानक. तिला भेटावंसं वाटलं, पण तिच्या घराचा नेमका पत्ताच आठवेना! पत्ता विसरण्यात मी हुशार आहेच. त्यामुळे वेळ वाया न घालवता सरळ आईला फोन केला. तिने सांगितलेल्या पत्त्यावर गेले, तर तिथे अशी सोन्याच्या फुलांची उधळण चालली होती!!!

सोनसावर किंवा पिवळी सावर. (पिवळी सावर नाव आवडत नाही मला अजिबात. ही फुलं सोन्याचीच. त्यांचा रंग खरंच सोन्यासारखा वाटतो उन्हात.) फारसं उंच नसणारं – बरेचदा झुडूप म्हणावं असंच – झाड. फांद्यांची रचनाही काही काटेसावरीसारखी (लाल शेवरी) नेटकी नाही. फुलं तशी मोजकीच – एकदम सगळं झाड भरलेलं मी तरी बघितलं नाही अजून. काटेसावरीसारखी या झाडावर किडे – माशा – पक्षी अशा सगळ्यांची झुंबड उडालेली दिसत नाही मधासाठी. पण सोनसावरीच्या एकेका फुलाने मला वेडं केलंय. फुलाचा रंग म्हणजे सोन्याचा धमक पिवळा! उतरत्या उन्हात न्हायलेली अशी फुलं बघणं म्हणजे मेजवानी. आजुबाजूची सगळी झाडं पानं टाकून बोडकी. पायथ्याचं गवतही सुकलेलं. काळी माती, सुकलेलं गवत, आणि त्यावर उठून दिसणारी ही झाडाखाली पडलेली सोन्याची फुलं! अजून थोडी झाडाच्या शेंड्यावर, कुठे एखादं शेजारच्या झुडुपाच्या काट्यात अडकलेलं. पहिलं झाड दिसलं, मग दुसरं, मग मला सगळीकडे सोनसावरीची झाडंच दिसायला लागली!


    इतक्या वर्षांपासून ही टेकडी तशी ओळखीची आहे. सोनसावरीचं एखादं झाड, त्यावर फुललेलं एखादंच फुल बघितलं होतं आतापर्यंत. पण इथेच दुसर्या बाजूला एवढी सोनसावरीची झाडं आहेत, त्या झाडांखाली असा फुलांचा सडा पडतो हे नवल बघायला परवाचा शनिवारच यावा लागला. माऊने आणि मी वेड्यासारखी फुलं वेचली. माऊने तर वाटेत भेटलेल्या कुणाकुणाला ती वाटलीही. मग घरी आईला आणून दाखवली फुलं.

    रविवारी सकाळी माझ्या नेहेमीच्या टेकडीवर गेले, तिथलीही सोनसावर फुललेली! आणि आजवर मी तिथे सोनसावरीची दोन – तीन झाडं पाहिली होती, आज मला तिथे सहा तरी झाडं भेटली. इतकी वर्षं कुठे लपून बसली होती ही झाडं काय माहित! रविवारी संध्याकाळी मग परत आई-बाबांना ही झाडं बघायला घेऊन गेले. आज परत अजून नवी झाडं सापडली!!! काही लोकांना स्वप्नात धन दिसतं, ते “मी इथे इथे आहे, मला बाहेर काढा” म्हणतं म्हणे. शनिवारी सोनसावरीने आठवण काढ्ली, आणि तिचा माग काढल्यावर टेकडीवर मला सोन्याची खाण लागली आहे.

Wednesday, January 18, 2017

कुकडेश्वर आणि नाणेघाट

नाणे घाटात गेले होते रविवारी माऊसोबत. यापूर्वी एकदा नाणेघाटात जायची प्रयत्न केला होता – म्हणजे लेण्याद्री, शिवनेरी, माणिकडोहची भटाकंती करतांना ड्रायव्हरला नाणे घाटात पण जायचं आहे सांगितलं होतं, पण म्हणजे गाडी कुठवर जाते, तिथून किती चालत जायचं, रस्ता कसा आहे याची माहिती काढली नव्हती, आणि ऐन वेळी ड्रायव्हरने नाणे घाटात कसं जायचं मला माहित नाही म्हटल्यामुळे तो बेत राहिलाच होता. 
या वेळी माऊच्या “जिम”चा ट्रेक होता त्यामुळे आयतीच संधी होती जायची. त्यात पण बेश्ट म्हणजे आम्ही नाश्ता करायला थांबलो ते कुकडेश्वरला. या कुकडेश्वरच्या देवळात मला जायला मिळालं होतं वीस एक वर्षांपूर्वी. तिथे गेलो ते जोशी काकांनी सांगितलं म्हणून.

जुन्नरवरून पुढे आपटाळ्याला जायचं, मग पुढे पुर म्हणून गाव आहे त्याच्या जवळ हे सुंदर मंदिर आहे एवढ्या माहितीवर आम्ही सगळे मंदिर बघायला गेलो होते तेंव्हा. बहुतेक डिसेंबर – जानेवारीच असवा. जुन्नर परिसरात ऍस्टर, झेंडू, शेवंतीची शेतं मस्त दिसत होती. हवा पण मस्त होती. पण जुन्नर सोडल्यावर ते “जवळच असणारं” आपटाळं काही केल्या येईना. त्यात रस्ता सांगितल्याप्रमाणे “गाडी जाईल असा”च होता, पण माहिती देणार्‍याला जाणारी गाडी बैलांची अपेक्षित होती. त्यामुळे गाडीचं एक चाक बैलगाडीच्या चाकोरीत, दुसरं वर असं, खच्चून भरलेल्या मारुती व्हॅनमध्ये (आठ जण तरी होतो गाडीत किमान!) आपटत आपटत आम्ही हे आपटाळं-खुंटाळं-शिंकाळं शोधत होतो. जोशी काका शाळेत जीवशास्त्र शिकवायचे. त्यामुळे सगळी हाडं खिळखिळी होत असतांना त्यांना अर्थातच “हाडाचे शिक्षक” असा बहुमान मिळणं भागच होतं. त्यांनीही तो मनापासून स्वीकारला. (तसेही बिचारे न स्वीकारून जातात कुठे – रस्त्यात दुसरं कुठलं वाहन नव्हतंच. दिवसभर सोबत राहणं भागच होतं म्हणा त्यांना!) असे नसलेल्या रस्त्याने आम्ही एकदाचे त्या आपटाळ्याला पोहोचलो. पुर आणि कुकडेश्वर अजून त्याच्या पुढे. वाट सांगणारे “कुण्या गावाहून आलीत येडी इकडे” म्हणून बघत होते. कुकडेश्वराला पोहोचलो, आणि प्रवासात मिळालेल्या सगळ्या टेंगळांचं चीझ झालं. आसपास कुणीही माणूस नाही, नुसती शेतं. त्या शेतांमध्ये जुनं, मोडकळीला आलेलं, सुंदर कोरीव काम असणारं कुकडेश्वराचं मंदीर. मंदिराचा एक खांब पंचेचाळीस अंशाच्या कोनात फिरलेला, तरीही छत तोलून धरलेला. जवळ कुकडी नदीचा उगम. घरून आणलेला डबा तिथे खाल्ला, कुकडीच्या उगमाच्या डोहातलं पाणी प्यायलं, तिथल्या झाडांवर, शेतात जरा खेळलो, आणि “हाडाच्या शिक्षकांना” उत्तम जागा सुचवल्याबद्दल दाद दिली.


जुनं कुकडेश्वराचं मंदिर


कुकडी नदीचा उगम तेंव्हा असा दिसत होता

एवढे सगळे (+ फोटो काढणारा?) एका गाडीत बसून (नसलेल्या रस्त्याने) ट्रीपला गेले होते!
आता जोशी काका नाहीत. काकू, आई, बाबा अशा सहलींची दगदग झेपण्यासारख्या वयाचे राहिलेले नाहीत. तेंव्हाची आठ – दहा माणसांना घेऊन जाणारी मारुती व्हॅन इतिहासजमा झाली. त्या ट्रीपमधले तरूण तडफदार उत्साही मेंबर आता रोजीरोटीच्या जिंदगीत बुडालेत. त्यांना सगळ्यांना एका वेळी एका दिवसाच्या ट्रीपसाठी घराबाहेर काढणं अशक्य व्हावं. पण मस्त ट्रीप म्हणजे कुकडेश्वर सारखी असंच अजूनही हे सगळे म्हणतील.
त्यामुळे कुकडेश्वरला नाश्ता करायला जायचं म्हटल्यावर मी खूशच झाले! जुन्नर गेलं पण “आपटाळा स्पेशल” रस्ता काही लागला नाही. सगळा चांगला गुळगुळीत डांबरी रस्ता. त्यात रस्त्याला चक्क व्यवस्थित पाट्या. म्हणजे रस्ता विचारण्याचीही वेळ येणार नाही. आपटाळं गेलं, पुर आलं, कुकडेश्वरालाही पोहोचलो सहजच. इथवर रस्ता झालाय म्हटल्यावर मनात शंका आली माझ्या – इथे गर्दी झाली असणार का म्हणजे? पण नाही, बघायला आलेल्यांची गर्दी नव्हती तिथे. पण जुनं मंदीर पडलं, त्यामुळे त्याचं नूतनीकरण, डागडुजी चालली होती. जुनं सगळीकडून प्रकाश, हवा येणारं मंदिर जाऊन आता भिंती झाल्यात. पण त्या दगडी आहेत, जुनं कोरीवकाम असलेल्या. सुदैवाने ऑईल पेंट नाही फासला त्याला अजून कुणी. (कुकडीच्या उगमाजवळ छोटंसं कुंड बांधलंय आता. हे मागे नव्हतं बहुतेक. आणि मंदिराच्या शेजारीच शाळा आहे. ही शाळा पूर्वी बघितलेली आठवत नाही, पण वीस वर्षंच काय जगाच्या सुरुवातीपासून ती अशीच असावी असा तिचा एकंदर अवतार वाटला.) जुन्यासारखं वाटणं शक्यच नव्हतं परत, पण नव्याने बघितलेल्याने फार निराशा नाही केली एकूण.

कुकडेश्वराचं नवं मंदिर


मंदिराच्या मागचा प्रचंड पिंपळ छाटून अगदी भुंडा केलाय :(

असे कुठेतरी अचानक दिसणारे बाप्पा मला फार आवडतात!

कुकडी नदीचा उगम आता असा दिसतोय

कुकडेश्वरहून मग गेलो नाणे घाटात. तिथल्या गुहेतला शिलालेख दक्षिण भारतातल्या सगळ्यात जुन्या आणि महत्त्वाच्या शिलालेखांपैकी. सम्राट अशोकानंतर थोड्यात वर्षांनी, इ.स. पूर्व पहिल्या शतकात खोदलेला, सातवाहन राजा सातकर्णी याची राणी नागनिका हिचा. ब्राह्मी लीपीमध्ये, प्राकृतातला. सातवाहन काळात कोकणातून देशावर जे व्यापार चालायचा, त्यात नाणे घाटाचं स्थान सगळ्यात महत्त्वाचं होतं. कल्याण – सोपारा ही त्या काळातली महत्त्वाची बंदरं. तिथून सातवाहनांच्या राजधानीला – पैठणला जाताना हा सगळ्यात जवळचा रस्ता. सातवाहनांच्या काळानंतर या घाटाचं महत्त्व कमी झालं. पण अजूनही खाली कोकणातून जुन्नरला सोयरिकी होतात. नाणे घाटात वाटसरूंना निवार्‍यासाठी गुहा खोदलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. संपूर्ण घाटात दगडी रस्ता होता बैलगाड्या, घोडी, माणसांची ये-जा करण्यासाठी. आणि घाट चढून वर आल्यावर तो प्रसिद्ध दगडी रांजण – टोल वसुलीसाठी.

दिसला रांजण? याचा नीट फोटो मी का काढला नाही हे मलाच कळत नाहीये!
नाणे घाटातला जुना रस्ता

इथून बैलगाड्या चढून यायच्या? इथून नुसतं सॅक घेऊन पायी जातांना नीट सांभाळून चालायला लागतंय. ठीक आहे, तेंव्हा रस्त्याची डागडुजी होत असेल, इतके उकललेले दगड नसतील. पण एवढ्या अंगावर येणार्‍या चढावरून भरलेली बैलगाडी घालणं म्हणजे चेष्टा नाही. बैलाचा पाय निसटला तर मालासकट, जोडलेल्या बैलांसकट गाडी घेऊन थेट निजधामाला पोहोचण्याची शक्यता. आजुबाजूला सगळं जंगल. आपल्याला घाट उतरून एखाद्या तासात कोकणात उतरता येतं. तेंव्हा लोक सामान घेऊन काही नुसता घाट चढत नसणार. त्यांना पुढे बाजारपेठेपर्यंत जाऊन मालाची खरेदी – विक्री पण करायची असणार. किती दिवस लागत असतील या प्रवासाला? आणि वाटेत अवघड वाटा, जंगली श्वापदं, चोर – लुटारू काय काय धोके असतील? आणि हे धोके असतांनाही असा प्रवास करणार्‍याला या व्यापारातून किती फायदा होत असेल? त्याची कल्याणहून माल घेऊन देशावरची प्रत्येक फेरी म्हणजे सिंदबादची एकेक सफर असेल बहुतेक!

गुहेबाहेर थांबलेली वानरसेना :) 

नागनिका राणीचा शिलालेख

घाटाशेजारी (टॉवरच्या मागे) जिवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका


काल हवा ढगाळ होती, त्यामुळे आजुबाजूचे किल्ले फारसे नीट दिसले नाहीत. येताना वाटेत चावंड किल्ला दिसला, हडसर – निमगिरी, भैरवगड आणि ढाकोबा धूसरच दिसले.  कधी बघणार हे सगळं?

***

तोंड न उघडणं महत्त्वाचं. फिरायला गेल्यावर कुणी तिथल्या जागेची माहिती सांगत असेल तर आपण त्यात भर घातलीच पाहिजे असं नाही. ठीक आहे, लोक ‘ब्राम्ही भाषे’विषयी बोलायला लागल्यावर आपल्याला सांगायची खुमखुमी येते. पण म्हणून नीट आठवत नसणारी माहिती सांगू नये. असे बरेच घोळ घातलेत काल. सुदैवाने फारसं कुणी ऐकत नव्हतं म्हणून बरं. पण त्यातल्या एकाने जरी चुकीची माहिती लक्षात ठेवली, तरी ती माझी चूक.:(

Thursday, January 12, 2017

अडाणी

आजोबा नातवाबरोबर बससाठी थांबलेले होते. नातवाची मैत्रीण अजून आली नव्हती. नातवाने विचारलं, “आजोबा, ती केंव्हा येणार?” बसची वेळ होत आलेली. मैत्रीण यायलाच हवी खरं तर. येईलच आता. मला वाटलं आजोबा हेच सांगणार नातवाला. आजोबांनी काय सांगावं? “बघ, बघ, लिफ्टचा आवाज येतोय. लिफ्टमध्येच आहे ती, येईलच आता!”

नातू लहान आहे आजोबांपेक्षा. त्याचे कान आजोबांपेक्षा नक्कीच तिखट असणार. लिफ्टचा आवाज येत नाहीये हे त्याला नक्की समजणार. आजोबा आपल्याशी विनाकारण खोटं बोलले हे समजल्यावर सहज, विनाकारण थापा कशा मारायच्या हे सहज शिकून जाईल नातू. आजोबांनाही गुरुदक्षिणा म्हणून एखादी लोणकढी ऐकायला मिळेल लवकरच.

अजून एक छोटी मैत्रीण. तिला सांभाळणार्‍या ताईकडे सोपवून आई नोकरीला जाते. ताई तिला थोड्या वेळाने शाळेत सोडते. गेले काही दिवस छोटीला शाळेत जायला नको वाटतंय. ती घरातून निघायलाच तयार होत नाही शाळेत जायचं म्हटल्यावर. ताईने काय करावं? ताई तिला म्हणते, “चल आपण बागेत खेळायला जाऊ!” मग छोटी आनंदाने निघते घरून. पण घराबाहेर पडल्यावर तिला बागेत नाही, शाळेत जायला लागतंय रोज. शाळेत जायच्या आधीच ताईने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसतो हे चांगलं शिकवलंय तिला.

शाळेत लेकाला सोडायला आलेली आई. नेहेमीचाच सीन – लेकाला शाळेत जायचं नाहीये. आई त्याला सांगतेय – शाळेत गेलं नाही तर वॉचमन दादा अंधार्‍या खोलीत कोंडून ठेवतात! घाबरून मुलगा शाळेत जातो. शाळेत जाणं हा अंधार्‍या खोलीला पर्याय बनतोय त्याच्यासाठी. पण आई खूश आहे – मुलाला कुरकुर न करता शाळेत पाठवण्याचा सोप्पा मार्ग सापडलाय तिला.

दुर्दैवाने मला लहानपणी कधी आईने शाळेत जायला पर्याय नसेल तर “तुला शाळेत जावंच लागेल” म्हणूनच ठणकावून सांगितलंय, बागुलबुवा किंवा अंधार्‍या खोलीत कोंडून ठेवणार्‍या वॉचमनच्या गोष्टी सांगितल्या नाहीत. साखरेत घोळवून सांगणं, वाईट वाटेल, रडू येईल, आपण वाईट दिसू म्हणून खरं न सांगणं असल्या गोष्टी तिला यायच्याच नाहीत अजिबात. लहान मुलांचं नाजुक मन सांभाळणं शिकलीच नव्हती ती बहुतेक.  त्यामुळे अमुक गोष्ट केली नाही तर शिक्षा मिळणार असली, तर तो अगदी खरा खुरा, जाणवणारा धपाटा मिळण्याची खात्री असायची, बुवा येईल आणि तुला घेऊन जाईल अशी न दिसणारी, कल्पनेतली भीती घालताच आली नाही तिला.

आईचं चुकलंच. अजूनही मला खोटं बोलता येत नाही – पांढरं / करडं/ काळं – कुठल्याच रंगाचं - अगदी माऊशी सुद्धा! कधी शिकणार मी आता? आणि माऊला कधी शिकवणार?