Friday, December 3, 2010

Out of mind notification

आपुन का भेजा खेकडे के माफिक वाकडा चलता है. तर सध्या जीव चाकोरी सोडून दगडाधोंड्यात जाऊन पडण्यासाठी तडफडतोय. आजचा शेवटचा दिवस पाट्या टाकायचा. ‘out of office' सुद्धा लावून झालं तिकडे. म्हणून म्हटलं इकडे पण एक ‘out of mind' लावून टाकावं. आता दोन महिने ऑफिस, काम, लॅपटॉप, नेट या सगळ्याशी घेणं नास्ति आणि देणं नास्ति. बघू खेकड्याच्या आत काही सापडतंय का ते.


*********************************************

सॉफ्टवेअरच्या कोर्सचे शेवटचे दिवस. ‘कॅम्पस’ जोरात चाललेले. प्रत्येक कॅम्पसच्या निकालाबरोबर एक एक ग्रूप ढवळून निघत होता. वर्गातली सगळी समीकरणं बघता बघता बदलत होती. आजवर एकमेकांवर खुन्नस खाऊन असणारे एका कंपनीमध्ये जॉब मिळाल्यावर अचानक जानी दोस्त बनत होते. पहिले नोकरी मिळवलेले वर्गातल्या टॉपरसमोर माज दाखवून घेत होते. अजून जॉब न मिळालेले प्रत्येक निकालाबरोबर जास्त जास्त खोलात. सांधा बदलून वर्गातल्या अश्वस्त मैत्रीमधून नोकरीच्या अनोळखी विश्वात पाऊल टाकण्याचे दिवस. मी अजून धडपडतच होते. नोकरी केलीच पाहिजे का, आणि मुंबईला नोकरी करायची का या दोन शंकांमुळे धड मनापासून प्रयत्न करत नव्हते, आणि एकीकडे आजुबाजूच्या बाकीच्यांना नोकरी मिळेल तसतशी अस्वस्थ. एव्हाना मी लकी आहे - माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला जाणार्‍याचं की हमखास सिलेक्शन होतं अशी माझी ख्याती झाली होती.

एका इंटरव्ह्यूला मी एकटी गेले होते, त्यामुळे माझी सोबत मलाच लकी ठरली असावी - तर सिलेक्शन झालं. एकीकडे जीव भांड्यात पडला, दुसरीकडे तडाजोडीची नोकरी, तीही मुंबईत म्हणून नाराजी. कोर्स संपला. पंधरा दिवसांनी नोकरी सुरू होणार, तोवर पुण्याला आले. पुण्यात प्रयत्न करून बघावा असा विचार होता. त्यासाठी कुठे जायचं, कोण मदत करू शकेल याची माहिती शून्य. पंधरा दिवस धडपड करून काहीच हाताला लागलं नाही, आणि निरुपायाने मुंबईला जॉईन करण्यासाठी मी सामानाची बांधाबांध सुरू केली. आयुष्यात नियोजनापेक्षा योगायोगानेच इतक्या गोष्टी होत असतात ... याही वेळी त्याचा अनुभव आला. निघायच्या काही तास आधी पुण्यातल्या कंपनीची सिलेक्शनची मेल आली. दुसरंच काहीतरी करायचा मानस असताना मी अशी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात येऊन पोहोचले.

नाइलाजाने सुरू केलेल्या नोकरीत हळुहळू प्रगती होत गेली. जवाळचे मित्रमैत्रिणी मिळाले, कामाचं चीज झालं, जास्त जबाबदारीचं काम मिळत गेलं. काहीही प्रयत्न न करता मोठ्या, पूर्वीपेक्षा जास्त प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली. अजून वेगळा अनुभव, नव्या संधी मिळाल्या. या सगळ्याच्या जोडीला कामाच्या वाढत्या ताणाची जाणीव, कामाच्या वेळावर नियंत्रण नसणं, कधी विनाकारण संधी डावलली जाणं हेही. आज नोकरीने मला काय दिलं याचा विचार करताना जाणवतं ते म्हणजे मी कितीही नाकारलं, तरी हातात काहीच नव्हतं तेंव्हा शून्यातून सुरुवात करून या क्षेत्राने मला ओळख दिली, आर्थिक बाजू संभाळून धरली. वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी दिली. प्रोफेशनलिझम दिला, आत्मविश्वास दिला.

त्याच वेळी आपल्याला काय हवंय हे शोधण्याची आचही काहीशी कमी झालीय, वर्षानुवर्षाच्या सवयीतून आहे हे असंच चालू ठेवणं सोयीचं आहे असा एक इनर्शिया आलाय. सुरक्षिततेची सवय लागलीय. आपल्या आयुष्यातली इतकी वर्षं ज्याची मनापासून पॅशन नाही अश्या कामाला दिलीत, पुढचीही सगळी वर्षं द्यायची का हा प्रश्न आता छळतोय. इतके दिवस रूटीनच्या वेगामध्ये मागे टाकलेले सगळे प्रश्न फेर धरताहेत.

तर मी वाट बघत होते ती ‘मोठी सुट्टी’ अखेरीस सुरू होणार. आज कामाचा शेवटचा दिवस. पुढचे दोन महिने सध्याच्या रुळलेल्या चाकोरीपासून जास्तीत जास्त दूर जाऊन स्वतःच्या जवळ जायचा प्रयत्न आहे.

Friday, November 12, 2010

चवळी सूप

खादाडी पोस्ट लिहिण्याला माझा तात्त्विक विरोध आहे. असल्या पोस्ट लिहिताना लेखकाला समस्त वाचकवर्गाला टुकटुक करून आम्ही काय काय मस्त खाल्लं हे सांगण्याची संधी मिळते. वर आणखी शिक्षा म्हणून छान छान फोटो टाकता येतात. हा वाचकांवर (विशेषतः ऑफिसमध्ये बसून ब्लॉग वाचणार्‍या बापड्या वाचकांवर) अन्याय आहे. तेंव्हा खादाडीवरची पोस्ट लिहिणार नाही असा माझा निश्चय आहे. तो मी फक्त या पोस्टपुरता गुंडाळून ठेवलेला आहे  याची कृपया नोंद घ्यावी :D

साहित्य: चवळीचे चार दाणे, कॅमेरा, ऊन, पाऊस, माती, पेशन्स इ.

वेळ: सुमारे तीन महिने

कृती: बारीक पांढर्‍या चवळीच्या पाकिटातले लाल दिसणारे चार दाणे घ्यावेत.
साधारणपणे ऑगस्टमध्ये ते पेरावेत. त्यांना भरपूर ऊन आणि पाऊस मिळाला पाहिजे. आठवडाभरात त्यांना कोंब येतात. कबुतरं, मध्येच पडलेली उघडीप यात दोन कोंब वाळून जातात. उरलेले दोन वेल तासातासने वाढत असावेत असं वाटण्यासारख्या वेगाने चढत जातात. त्याला खालीलप्रमाणे फुलं आली, म्हणजे वेल नीट वाढतोय असे समजावे.

ही फुलं जोडीजोडीने येतात. फुल एका दिवसात वाळतं, आणि चवळीची शेंग दिसायला लागते. प्रत्येक शेंग पूर्ण वाढून काळपट झाली की काढावी आणि सावलीत सुकवावी. दोन दिवसांनी तिचे दाणे काढावेत. याप्रमाणे रोज १५-२० दाणे निघतील. ते सठवत रहावेत. वेलावरच्या सगळ्या शेंगा याप्रमाणे काढून झाल्या, म्हणजे लक्षात येते, की याची उसळ अर्धी वाटीपेक्षा जास्त होणार नाही.
तेंव्हा घरात कुणी नसताना चवळीचे सूप करून एकटयाने प्यावे. पुराव्यासाठी एक फोटो काढून ठेवावा.

सूचना:

१. फुलं मोजून किती शेंगा येणार, ‘पीक’ किती निघणार याची स्वप्नं बघू नयेत. अंदाज हमखास चुकतो. काही शेंगा पोचट निघतात, काही भरण्यापूर्वीच सुकून जातात. तेंव्हा भरून, वाळून हातात पडेपर्यंत शेंग आली म्हणू नये.
२. सुपात काहीही घातले / घालायचे राहिले, तरी घरच्या चवळीचे सूप गोडच लागते. तेंव्हा पुढची कृती विचारू नये.
३. वेलावर नुसती फुलं असताना आल्यागेल्या प्रत्येकाला "ओळखा बरं कसला वेल आहे ते" म्हणून भाव खाऊन घ्यावा. नंतर कुणाला देण्याइतके चवळीचे दाणे निघण्याची शक्यता कमीच असते.

Monday, October 25, 2010

हावरट

पुस्तकांची खा खा सुटलीय. किती घेतली आणि वाचली तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही.

एका दिवसात २ पुस्तक प्रदर्शनं.

    दुर्गा भागवतांचं ‘आठवले तसे’. (झालं वाचून. दुर्गाबाईंनी टीका केलेली माणसंही मोठ्या कर्तृत्त्वाची माणसं आहेत. त्यांच्याहून मोठं कर्तृत्त्व आणि स्पष्ट विचार असणार्‍या दुर्गाबाईंना टीका करण्याचा हक्क पोहोचतो. आपण तो भाग सोडू्न द्यायचा.)

    साधनाताई आमटेंच्या आठवणी - ‘समिधा’. (नेहेमी मोठ्या झालेल्या माणसांच्या बायकोच्या आठवणी म्हणजे अन्याय, फरफट, दिव्याखालचा अंधार यांचंच चित्रण जास्त असतं. हे पुस्तक तसं नाही. हा दोघांनी मिळून केलेला प्रवास आहे. त्यामुळे फार आवडलं पुस्तक.)

    स्वगत - जयप्रकाशांची तुरुंगातली दैनंदिनी, पुलंनी मराठीत आणलेली. (उत्सुकता म्हणून घेतलीय, पण सुरुवातीचे काही दिवस वाचून तरी फार तात्कालिक संदर्भ वाटताहेत - आणिबाणीच्या परिस्थितीचे. बघू पुढे काही इंटरेस्टिंग सापडतंय का ते.)


    रविंद्रनाथांची ‘गोरा’ - कित्येक दिवसांपासून वाचायची आहे. गॉर्कीच्या ‘मदर’सारखीच रटाळ आहे असं ऐकून आहे, तरीही. (एक आशावादी, महत्त्वाकांक्षी प्रकल्प.घरात पुस्तकं ठेवायला जागा नाही, तरी जे वाचण्याची खात्री नाही असं पुस्तक मी कशाला विकत आणलंय मलाही माहित नाही. सुदैवाने नवर्‍याची पुस्तकं वेगाळी असतात, त्यामुळे अश्या विकत घेऊन न वाचलेल्या पुस्तकांची त्याला कल्पना नाही. नाही तर काही खैर नव्हती.)

    पूर्निया - डॉ.अनिल अवचटांचं पहिलं पुस्तक.

    ना ग गोर्‍यांचे सीतेचे पोहे.

    राजा शिरगुप्पे यांची शोधयात्रा - ग्रामीण महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांची.

    विनय हर्डीकरांचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’.

    महाराष्ट्र देशा - दोन प्रती (हार्ड बाऊंड मिळतंच नाहीये आता), ‘हिंदू’(आणि त्याच्यावर फुकट मिळाल्यामुळे ‘कोसला’), टाईम्स सूडोकू आणि जिब्रानचं प्रॉफेट ही पुस्तकं देण्यासाठी घेतली आहेत, त्यामुळे ती मोजायची नाहीत.

    ‘अक्षरधारा’वाले कार्ड स्वीकारत नाहीत, जवळचे पैसे संपले. आणि निवडलेली पुस्तकंही हातात मावेनाशी झाली. नाही तर?

    अजून दिवाळी अंक नाही दिसले कुठे.

    पुणे बुक फेअरला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा स्टॉल आहे. तिथे ‘किशोर’ मधल्या निवडक कथा, कविता, इ. ची संकलित पुस्तकं होती. आमच्याकडे माझे भाऊ लहान असतानापासूनच्या काळातले किशोरचे अंक जपून ठेवलेले होते. या जुन्या अंकांमध्ये काही अतिशय सुंदर लेखमाला होत्या - ‘चीनचे प्राचीन शोध’ - यात कागद, रेशीम, घड्याळ, लोहचुंबक, चिनी माती अश्या शोधांविषयी अतिशय रंजक माहिती होती. ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ मध्ये पारा आणि गंधकापासून औषधनिर्मिती करणारा नागार्जुन, शुल्बसूत्रकार कात्यायन, पिंगल अश्या प्राचीन भारतीय ज्ञानोपासकांविषयी फार सुंदर माहिती होती. पाठयपुस्तक निर्मिती मंडळाला या मालिका पुस्तकरूपाने प्रसिद्ध नाही करता येणर का?

Monday, October 18, 2010

हेरगिरी

    आपले बॉलिवूडवाले तारेतारका ‘स्ट्रिक्टली प्रायव्हेट’ मध्ये लग्न वगैरे उरकून घेतात ना, टपून बसलेल्या मिडियावाल्यांना गुंगारा देत, तसं आल्याचं झाड लपून छपून फुलत असावं अशी मला शंका होती. रोज सकाळी मी बघते, तेंव्हा झाड नेहेमीसारखंच दिसत होतं - पण एक दिवस मला छडा लागलाच. सकाळी तपकिरी आणि पिवळी अश्या रंगसंगतीची दोन नाजुक फुलं झाडाजवळ पडलेली सापडली. मग कालच्या दिवशी सारखं दोन दोन तासांनी झाडावर नजर ठेवून होते, आणि शेवटी चोरी पकडलीच :)

    तर आल्याचं फूल हे असं दिसतं ... ‘हिरवाईचा उत्सव’ मधल्या फोटोतली आल्याची कळी होती ना, तिला आलेली ही फुलं. फूल दुपारी फुलतं, आणि लगेच रात्री गळूनही पडतं. काल संध्याकाळच्या वेड्या पावसामध्ये कॅमेर्‍यावर छत्री धरून हा फोटो काढलाय ...


    फ्लॅशमुळे पिवळा रंग इथे फिकट दिसतोय - प्रत्यक्षात तो पिवळा धमक आहे. पुन्हा, पाऊस नसताना फूल आलं, तर अजून चांगला फोटो घेता येईल.

Wednesday, October 13, 2010

चाकोरी

महिन्यांमागून महिने. सकाळी नाईलाजाने उठायचं, आवरून ऑफिसला जायचं, घरी परतल्यावर उरलेलं ऑफिसचं काम, जे शनिवार-रविवारवर टाकणं शक्यच नाही तेवढंच घरातलं काम, बागेशी गप्पा, वाचन, गाणं ऐकणं असं काहीतरी थोडंफार - डोकं ताळ्यावर ठेवण्यापुरतं. एक दिवस संपला. शनिवार -रविवार एका दिवसाने जवळ आला या आनंदात झोपायचं. जगायचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस. त्यांची वाट बघत उरलेले दिवस घालवायचे.

    काहीतरी जबरदस्त चुकतंय. माझं ऑफिसमधलं काम एवढं बोअरिंग नाही. किंबहुना अश्या ठिकाणी, अश्या प्रकारचं काम करायला मिळणं हे कित्येकांचं स्वप्न असेल. मग मला असं साचलेल्या डबक्यासारखं का वाटतंय?

    कारण या दिवसाला काही उद्देशच नाहीये. काल केलं म्हनून आज ऑफिसचं काम करायचं, असा प्रकार चाललाय. पुन्हा न मिळणार्‍या वेळाचा प्रचंड अपव्यय. पाट्या टाकणं. Its not fair to my employer, my family, myself.
   
    थोडं थांबून, या चौकटीच्या बाहेर जाऊन चित्राकडे बघायला हवंय. त्यातून कदाचित आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होईल, मिळतंय त्याची किंमत कळेल. कदाचित लपलेला उद्देश सापडेल. कामातला इंटरेस्ट सापडेल, किंवा इंटरेस्टिंग काम सापडेल.

    तर एवढं फ्रस्ट्रेशन आल्यावर मला कळलं - नेहेमीच्या कामातून ब्रेक घेणं गरजेचं असतं. कुणाला ब्रेक म्हणजे आठवडाभराची घरच्यांबरोबरची सहल पुरेल, कुणाला एखादा हिमालयातला ट्रेक पुन्हा स्वतःची ओळख करून देईल. तर मोठ्ठी सुट्टी घ्यायचा प्लॅन आहे. प्लॅन करताना मोठ्ठी वाटाणारी सुट्टी काय काय करायचंय याचं गाणित बसवताना लहान वाटायला लागलीय :) सुट्टीच्या नुसत्या कल्पनेनेच एकदम मन फुलपाखरू झालंय. मला पाच वर्षं एक काम केल्यावर अशी सुट्टी घ्यायला हवी - नव्याने विचार करायला. हे समजण्यासाठी एवढे महिने खर्च करायला लागलेत!

Monday, October 4, 2010

ऑल इन / आफ्टर अ डेज वर्क

(मागच्या जर्मनी भेटीमध्ये काही पूर्व जर्मनीतले सहकारी, काही पश्चिमेचे, एक ब्राझिलची अशी टीम होती, त्यामुळे बर्‍याच गंमतीजमती झाल्या.त्याविषयी लिहायला सुरुवात केली होती, पण दोन महिन्यांपासून हे अर्धमुर्ध लिहून पडून आहे ... आज तसंच प्रकाशित करते आहे.)

********************


माणसं तशी एकेकेट्याने असताना बर्‍यापैकी नॉर्मल वागतात - पण त्यांची काही कॉम्बिनेशन्स एकदम डेंजर असतात.  असंच एक कॉम्बिनेशन गेले दोन आठवडे झाले होतं. त्याचा हा कॅलिडोस्कोप.

********************

रात्री साडेनऊला ऑफिसमधून निघून वाट शोधत परदेशातलं अनोळखी गाव बघायला साधारणपणे शहाणी म्हणण्यासारखी माणसं जात नाहीत. पण सगळेच "जाऊन तर बघू या" म्हणणारे निघाल्यावर अश्या प्रवासात धमाल मजा येते. नकाशा, जीपीएस अश्या क्षुद्र साधनांवाचून तुमचं काही अडत नाही. एक एक्झिट चुकली तर पुढची ... त्यात काय एवढं? नाही तरी आपल्याला काय घाई आहे पोहोचायची? रोज हॉटेलपासून ऑफिसपर्यंतचा प्रवासही रोमांचक असतो - कारण रोज नवाच रस्ता सापडतो.

********************

मला जर्मन बीयर चढलीय का? का खरंच माझ्या आजुबाजूचे लोक या भागातल्या डुकरांच्या संख्येविषयी, डुकरांच्या रोगांमधल्या स्पेशलायझेशनविषयी गंभीर चर्चा करताहेत? इथली डुकरं स्वच्छ असतात, त्यांची पिल्लं गोजिरवाणी दिसतात हे मान्य. पण डुक्कर हा प्राणी माणसाला स्पेशलायझेशन म्हणून का बरं निवडावासा वाटावा? आणि या उच्च शिक्षणासाठी ब्राझीलहून युरोपला शिकायला यावं? या परिसरात साडेचार लाख डुकरं आहेत? नाही ऍक्च्युअली त्यांनी साडेचार मिलियन म्हटलं ... म्हणजे पंचेचाळीस लाख! (पुण्यात किती असावीत?) हानोवरचं व्हेटर्नरी कॉलेज आणि क्लिनिक डुकरांसाठी जगप्रसिद्ध आहे ही ज्ञानप्राप्ती हा सगळा संवाद ऐकण्यातून झाली. यांची चर्चा चाललीय तोवर अजून एक बियर घ्यावी हे बरं. इट हेल्प्स मेंटेन युअर सॅनिटी.

********************

एखाद्या माणसाची सूचना तुम्हाला मान्य होत नाही, परिस्थितीशी अगदीच विसंगत वाटते कधीकधी. मान्य. पण म्हणून तुम्ही कामाच्या ठिकाणी, मिटिंगमध्ये ‘हाल्फ’ (अर्धा) म्हणून त्याची संभवना करू शकता? हे जरा जास्तच होतंय. चारपाच वेळा ‘हाल्फ’ ऐकल्यावर मला शोध लागला ... ही बाई हिच्या ब्राझिलियन पोर्तुगीज उच्चारांप्रमाणे जर्मन ‘राल्फ’ चा ‘हाल्फ’ बनवते आहे :D. आधी जर्मन ‘र’एवढा गटरल - बहुसंख्य अन्यभाषिकांना न झेपणारा ... त्याचं पोर्तुगीज रूप एवढं भीषण असेल याची मला कल्पना नव्हती.

********************

जर्मन सॉसेजेस कुणी कसं खाऊ शकतं? त्याला एक विचित्र वास असतो, आणि प्लॅस्टिकचा तुकडा खाल्ल्यासारखा स्वाद असतो. एकदम साउअरक्राउटशी स्पर्धा करेल इतका अनइंटरेस्टिंग प्रकार आहे हा.

********************

दररोज स्टीक आणि वाईनवाचून जेवण न होणार्‍या ब्राझीलच्या बाईला जर्मनीमध्ये रात्री साडेबारा वाजता मेथी खाकरा आणि दही - पोहे मेतकूट खायला घालायची आयडिया कशी वाटते? याला आन्तरराष्ट्रीय स्तरावरची देवाणघेवाण म्हणायचं का? ;) आणि जेंव्हा ही आंतरराष्टीय परिषद सिंगापूरमधल्या कुणाला तरी चर्चेत सामील करून घेते, तेंव्हा तर मी स्वतःच आचंबित होते. खरंच जग एवढं जवळ आलंय? जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून लोक एकमेकांच्या सहकार्याने एवढ्या मोठ्या आर्थिक उलथापालथी घडवून आणतात? यातल्या कुणालाच या आर्थिक घडामोडींमधून प्रत्यक्ष फायदा नाही. फायदा होणार तो कंपनीला. त्या अजस्त्र यंत्रातल्या खिळ्यांना कदाचित एखादी शाबासकीची मेल मिळेल या धडपडीकरता. बस. what motivates them to go that extra mile? याच्या एक शतांश डेडिकेशन दाखवलं तरी आपल्या देशाचे किती प्रश्न सुटतील!(मग पन्नास वर्षं झाली तरी बेळगावचा प्रश्न का बरं सुटत नाही? काश्मीर धुमसायचं का थांबत नाही? आपल्याला एकाही शेजार्‍याबरोबर बरे संबंध का निर्माण करता येत नाहीत? )

********************

राजाच्या जुन्या बागेतल्या मेळ्यामध्ये खेळ करणारे हे ऍक्रोबॅट्स रबराचे बनवलेले आहेत का? यांना मिळतात तश्या टाळ्या पुण्यातल्या दोरीवरच्या डोंबार्‍याच्या मुलीला कधी मिळणार? दर उन्हाळ्यात इथे आकर्षक दारूकामाची स्पर्धा असते. दर रविवारी एक या प्रमाणे आठ - दहा जगप्रसिद्ध फटाक्यांचे निर्माते आपलं दारूकाम सादर करतात, आणि त्यातून त्या वर्षाचा विजेता निवडला जातो. आजचं दारूकाम छानच होतं, पण तोक्योमध्ये त्यांच्या उन्हाळी उत्सवामध्ये (हानाबी मध्ये) याहून सरस काम बघायला मिळतं. दारूकामाच्या आधी एक गरम हवेचा बलून सोडतात, आणि त्या बलूनच्या खाली एक जिमनॅस्ट हवेत तरंगत कसरती करत असते. बलूनला लटकत कसरती करायला वेताचा मलखांब हा किती परफेक्ट प्रकार होईल!

********************

ब्राझिल हा दक्षिण अमेरिकेतला एकमेव पोर्तुगीजभाषिक देश आहे. (बाकी संपूर्ण दक्षिण अमेरिका स्पॅनिश बोलणारी.) काही काळ पोर्तुगीज साम्राज्याची राजधानी रिओला होती. ब्राझिलची सहकारी म्हणजे गोरी, काळी, पिवळी, इंडियन - काय रंगाची असणार याविषयी मला काहीही कल्पना नव्हती. प्रत्यक्ष भेटल्यावर समजलं - ब्राझिलची सहकारी म्हणजे कुठल्याही रंगाची असू शकते. ब्राझिल हा अतिशय सुंदर देश आहे, भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, लोकशाही विशेष रुजलेली नाही. इथली संस्कृती काही बाबतीत अमिरिकेला अगदी जवळची, तर कौटुंबिक संबंध एकदम भारतातल्यासारखे. आपली सासू ऐशीव्या वर्षी केवढी ऍक्टिव्ह आहे याचं वर्णन वर्णन ओल्गा सांगत होती ... आयुष्यभर तिने पब चालवला - अजूनही ती रोज थोडा वेळ गल्ल्यावर बसते. काठापदराची साडी, ठसठशीत कुंकू आणि हातभर बांगड्या घालणारी माझी सासू पबच्या गल्ल्यावर बसली तर कसं दिसेल असं चित्र क्षणभर माझ्या डोळ्यापुढे तरळून गेलं :)

********************

Thursday, September 30, 2010

हिरवाईचा उत्सव

गणपती संपले, पावसाळा संपत आला. सध्या बागेत स्पर्श, रूप आणि गंध अशी तिहेरी मेजवानी आहे ... परवा तर चक्क एक फुलपाखरू आलं होतं सातव्या मजल्यावरच्या आमच्या छोट्याश्या गच्चीत! 

या हिरवाईच्या उत्सवाचे थोडे फोटो.

सकाळ सोनचाफ्याच्या घमघमाटाची, दुपार सोनेरी उन्हात चमकणार्‍या पिवळ्या - केशरी एक्झोर्‍याचीसंध्याकाळ जाईच्या नाजुक सुगंधाची. पावसाच्या मार्‍यामुळे जाईच्या फुलाने सोनचाफ्याच्या पानाचा आसरा घेतलाय! 


रात्र वेड लावणार्‍या रानजाईची!

गणेशवेलाची नाजुक वेलबुट्टी

राक्षसाचा ब्रह्मराक्षस झालाय ...


स्कॉलरही महास्कॉलर बनलाय


हे काय आहे सांगू शकाल? आल्याचा एक कोंब असा झालाय. माझ्या तरी माहितीप्रमाणे आल्याला फुल येत नाही. मग हे काय असावं?दोन चवळीचे दाणे पेरली होते, त्याचा वेल...


Monday, September 13, 2010

थोरोचं वॉल्डन

    सद्ध्या थोरोचं ‘वॉल्डन ऍन्ड अदर रायटिंग्ज’ वाचते आहे. नेहेमी पुस्तक वाचायला घेतलं, म्हणजे ते हातावेगळं होईपर्यंत त्याच्याविषयी बोलायला मला वेळ नसतो. हे मात्र चवीचवीने, रोज थोडं वाचावंसं वाटतंय. पुस्तकाचा अजून जेमतेम पाचवा हिस्सा संपलाय, पण मी थोरोच्या प्रेमात पडले आहे. सध्या मला चावत असणारे गैरसोयीचे प्रश्नच हा बाबा विचारतोय.
    कुठल्या तरी आर्किटेक्टने त्याच्या विचाराने बांधलेलं घर माझं घर कसं असू शकेल? माझं घर माझ्या गरजांप्रमाणे, माझ्या प्रकृतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे बनलं पाहिजे. मी ते बांधलं, तरंच ते खरं माझं घर होईल असं थोरो म्हणतो. एकदम पट्या. घर घ्यायचं ठरवल्यापासून हा प्रश्न मला छळतोय.

    थोरोने काही इंटरेस्टिंग दगड गोळा केले होते. हे दगड घरात ठेवल्यावर त्याच्या लक्षात आलं - त्यावर धूळ बसते, आणि ही धूळ नियमित झटकण्याचा नवा व्याप आपण निष्कारण मागे लावून घेतलाय. त्याने शांतपणे ते दगड पुन्हा बाहेर टाकून दिले. मी गोळा केलेले, दुसर्‍या कुणी प्रेमाने दिलेले किती धोंडे मी उगाचच वाहत असते. ही सगळी अडगळ मी कधी घरातून काढून टाकणार?

    कुठल्याही जागी जाण्याचा सर्वोत्तम मार्ग पायी जाणं हा आहे. नाही पटत? विचार करा. मी विमानाने गेले, तर प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ चालण्यापेक्षा खूपच कमी असेल. पण त्या विमानाच्या तिकिटाचे पैसे कमावण्यासाठी मी घालवलेला वेळ हा प्रवासावर खर्च केलेला वेळंच आहे. म्हणजे मी एवढा वेळ केवळ प्रवासाच्या पूर्वतयारीत खर्च केला, आणि पायी जाताना ज्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, त्या बघण्याची संधीही घालवली. डोक्याला फार त्रास देतोय हा थोरो.

    माझे दिवसाचे नऊ किंवा त्याहून जास्त तास कमवण्यावर खर्च होतात. खेरीज ऑफिसला जाण्यायेण्यातला वेळ, ऑफिसचा विचार करण्यात घालवलेला ऑफिसबाहेरचा वेळ वेगळा. वर्षाकाठच्या दहा सुट्ट्या आणि मला घेता येणारी बावीस दिवसांची रजा हा माझा ‘फावला वेळ’. वॉल्डनच्या प्रयोगानंतर थोरो म्हणतो, की वर्षाचे सहा आठवडे काम त्याच्या अन्न-वस्त्र-निवारा या प्रथमिक गरजा भागवायला पुरेसं होतं. उरलेला वेळ त्याला वाटेल तसा वापरायला मोकळा होता. म्हणजे थोरोच्या हिशोबाच्या नेमकं उलटं माझं गणित आहे. वर्षाचे शेहेचाळीस आठवडे काम आणि सहा आठवडे मोकळीक. याचा अर्थ एक तर मला माझ्या नोकरीमधून अन्न-वस्त्र-निवार्‍यापलिकडचं बरंच काही मिळतंय, किंवा मी वेळेचा अतिशय इनएफिशिअंट वापर करते आहे. सोचनेकी बात है.

    साधारणपणे पुस्तक हातात आलं, म्हणजे मला थेट विषयाला भिडायची घाई असते. प्रस्तावना, लेखक परिचय, अर्पणपत्रिका असल्या गोष्टीच काय- कित्येक वेळा पुस्तकाचं नावसुद्धा मी धड वाचत नाही. (आत्ता सुद्धा पुस्तकाचं नाव हे लिहिताना प्रथम नीट वाचलं ;) ) पण या घिसडघाईला वॉल्डन अपवाद ठरलं. राफ वॉल्डो इमरसनची प्रस्तावना मी चक्क मुख्य पुस्तक वाचण्यापूर्वी, मनापासून वाचली. एका समकालीनाला थोरो किती समजला होता हे या प्रस्तावनेत प्रतिबिंबित होतं.

    मराठीतून थोरोला भेटायचं असेल, तर दुर्गाबाईंनी 'वॉल्डनकाठी विचारविहार' नावाने थोरोच्या लिखाणाचा गाभा असणारं ‘वॉल्डन’ मराठीत आणलंय.  इंग्रजी पुस्तक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे.

Walden & other writings
Henry David Thoreau
2002 Modern Library Paperback Edition

वॉल्डनकाठी विचार विहार
अनुवाद: दुर्गा भागवत
१९६५

इ-प्रत: http://books.google.com/books?id=yiQ3AAAAIAAJ&printsec=frontcover&dq=walden

Wednesday, August 18, 2010

मावसबोलीने दत्तक घेतलेली सुसान

  सुसान हे मूळ जर्मन गाणं नाही. ते लिहिलं आणि गायलं कॅनडाच्या लिओनार्ड कोहेनने (Leonard Cohen), इंग्रजीमध्ये.   इथे ते मूळ गाणं आहे. त्याची अनेक भाषांतरं झाली, अनेक गायकांनी ते गायलं. जर्मनमध्ये याच्या दोन आवृत्त्या आहेत. हेरमान व्हान वीन (Herman van Veen) या डच गायकाने म्हटलेली जर्मन आवृत्ती मी प्रथम ऐकली,आणि तिच्या प्रेमात पडले. मूळ इंग्रजी गाण्याचा शोध नंतर लागला, पण हेरमान गातो तो थोमास वोईटकेविट्शने केलेला काहीसा स्वैर अनुवाद मला जामच आवडतो. मूळ काव्यातल्या हाडामांसाच्या सुसानला या अनुवादात जलपरी बनवलं आहे. मूळ गाणं इंग्रजी आहे हे माहित नसताना जर्मनवरून मराठीत मी केलेला हा अनुवाद. (भाषांतर करताना काय काय करू नये याचं उदाहरण म्हणा याला.) इंग्रजी गाणं उपलब्ध असताना जर्मन भाषांतरावरून भाषांतर करण्यात काय हाशील म्हणून आजवर प्रकाशित केला नव्हता. हेरंबचा खो पार शिळा होऊन गेलाय आणि अजूनही अडेलतट्टू डोकं काम करायला तयार नाहीये, म्हणून हे नाईलाजाने पोस्टते आहे.


हे मी निवडलेलं जर्मन गाणं: (थोमास वोईटकेविट्शने केलेला स्वैर अनुवाद)
***********************************************************************
Suzanne

Suzanne lacht dich an
auf der Bank, die beim Fluß steht
tausend Schiffe ziehn vorbei
und sie zeigt dir wie ein Kuß geht
du sagst dir sie muß verrückt sein
denn sie fällt aus dem Rahmen
mit dem Übermut der Menschen
deren Kräfte nie erlahmen
und du willst ihr gerade sagen
ich muß gehen es ist zuende
doch sie hält deine Hände
über deine Lippen kommt kein Wort
Und sie will ans andre Ufer,
und du möchtest mit ihr mitgehn
zusammen Hand in Hand
sie ist deine große Liebe
aber noch kämpft dein Gefühl mit dem Verstand

Hat Jesus nicht bewiesen,
daß selbst Wunder noch geschehen
er, der frei von Furcht und Angst war,
konnte übers Wasser gehen
wenn sie dich allein zurückläßt
würde dich das sehr verletzen
doch du läßt die Zeit verstreichen
anstatt Berge zu versetzen
und du weißt wohl, du wirst leiden
doch du kannst dich nicht entscheiden
und sie fragt dich mit den Augen
über deine Lippen kommt kein Wort
und du möchtest mit ihr mitgehn
zusammen Hand in Hand
sie ist deine große Liebe
aber noch kämpft dein Gefühl mit dem Verstand

 Suzanne lacht dich an
auf der Bank die beim Fluß steht
und du hörst ihre Pläne
und du denkst, daß dein Bus geht
über euch kreisen Möven
das Licht wird langsam blasser
und du spürst wie es kalt wird
und du starrst auf das Wasser
niemand gibt dir die Antwort auf all deine Fragen
was euch drüben erwartet
kann Suzanne auch nicht sagen
und du siehst, daß sie aufsteht
und du möchtest mit ihr mitgehn
zusammen Hand in Hand
sie ist deine große Liebe
aber über dein Gefühl siegt der Verstand
***********************************************************************

हे मूळ इंग्रजी गाणं:
***********************************************************************
Suzanne takes you down to her place near the river

You can hear the boats go by
You can spend the night beside her
And you know that she's half crazy
But that's why you want to be there
And she feeds you tea and oranges
That come all the way from China
And just when you mean to tell her
That you have no love to give her
Then she gets you on her wavelength
And she lets the river answer
That you've always been her lover
And you want to travel with her
And you want to travel blind
And you know that she will trust you
For you've touched her perfect body with your mind.

And Jesus was a sailor
When he walked upon the water
And he spent a long time watching
From his lonely wooden tower
And when he knew for certain
Only drowning men could see him
He said "All men will be sailors then
Until the sea shall free them"
But he himself was broken
Long before the sky would open
Forsaken, almost human
He sank beneath your wisdom like a stone
And you want to travel with him
And you want to travel blind
And you think maybe you'll trust him
For he's touched your perfect body with his mind.

Now Suzanne takes your hand
And she leads you to the river
She is wearing rags and feathers
From Salvation Army counters
And the sun pours down like honey
On our lady of the harbour
And she shows you where to look
Among the garbage and the flowers
There are heroes in the seaweed
There are children in the morning
They are leaning out for love
And they will lean that way forever
While Suzanne holds the mirror
And you want to travel with her
And you want to travel blind
And you know that you can trust her
For she's touched your perfect body with her mind.
***********************************************************************

(इंग्रजी गाणं जालावर इथे उपलब्ध आहे.)

आणि हा मराठी भावानुवाद:

***********************************************************************
सुसान

नदीकाठच्या बाकावर
सुसान तुझ्याकडे बघून हसते आहे.
हजारो नावा तुमच्या समोरून ये जा करताहेत
आणि ती तुला दाखवते आहे - मुका कसा घेतात ते.
तू स्वतःशीच म्हणतोस, वेड लागलंय हिला
कारण प्रसंगाच्या चौकटीत बसत नाही ती
ज्यांचं बळ कधीच सरत नाही,
अश्या माणसांचा आत्मविश्वास घेऊन वावरणारी
अन तिला पलिकडच्या तिरावर जायचंय

तिच्या हातात हात घेऊन
तुला तिच्यासोबत जावंसं वाटतंय
फार प्रेम आहे तुझं तिच्यावर
पण तुझ्या भावनांचा अजून विचारांशी लढा चाललाय
आणि तुला तिला आत्ता सांगायचंय
मला निघायला हवंय, सगळं संपलंय
पण तुझे हात तिने हातात घेतलेत
आणि तुझ्या ओठांतून शब्द फुटत नाहीयेत

येशूने हे दाखवून दिलंय
की चमत्कार अजुनही घडतात
भीतीपासून मुक्त असणाऱ्याला
पाण्यावर चालत जाता येतं
ती एकटं सोडून गेली
तर तुला फार वाईट वाटेल
तरीही इकडचे पहाड तिकडे करण्याऐवजी
तू वेळ काढतो आहेस
ती नजरेने तुला विचारते आहे
आणि तुझ्या ओठांतून शब्द फुटत नाहीयेत

नदीकाठच्या बाकावर
सुसान तुझ्याकडे बघून हसते आहे.
तिच्या योजना तू ऐकतो आहेस
तुझ्या मनात चुकणाऱ्या बसचा विचार आहे
तुम्हा दोघांच्यावर आकाशामध्ये
घारी घिरट्या घालताहेत
हळुहळू प्रकाश मंदावतोय
थंडी वाढते आहे, तुला जाणवतंय
तू पाण्याकडे टक लावून बघतो आहेस
तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
कुणाकडेच नाहीत
तुमच्यापुढे वर काय वाढून ठेवलंय
ते सुसानलाही ठावूक नाही
ती उठलेली तू बघतोस

तिच्या हातात हात घेऊन
तुला तिच्यासोबत जावंसं वाटतंय
फार प्रेम आहे तुझं तिच्यावर
पण तुझ्या भावनांवर विचारांनी जय मिळवलाय

***********************************************************************
    हेरंब तुझा खो वाया घालवल्याबद्दल स्वारी. मावसबोलीतल्या एखाद्या अस्सल कवितेचं मनापासून केलेलं भाषांतर टाकते लवकरच.
 
    आता कुणाला खो देऊ मी? अनुजा, अनघा आणि G (तुझा ब्लॉग इंग्रजी असला, तरी तिथे मी सुंदर मराठी कविता बघितल्या आहेत) - तुम्हाला माझा खो.

Sunday, July 25, 2010

हानोवरमध्ये बघण्यासारखं?

    ऑफिसच्या कामानिमित्त थोडया दिवसांसाठी हानोवरला आले आहे. रोज दिवसभर कामच चालतं, त्यामुळे गावात फेरफटका मारला नव्हता. काल ती संधी मिळाली.

    हानोवरला पर्यटक फारसे येत नाहीत. पर्यटकांनी आवर्जून यावं असं इथे काहीच नाही. पण चुकूनमाकून कुणी आलंच, तर त्यांना आपलं गाव बघता यावं, म्हणून हानोवरच्या सगळ्या प्रेक्षणीय जागी घेऊन जाणारा एक लाल पट्टा रस्त्यावर आखला आहे. मुख्य रेल्वे स्टेशनपासून सुरुवात करून गावातली सगळी प्रेक्षणीय स्थळं बघून पुन्हा स्टेशनवर आणून सोडणारी ही चार - साडेचार किलोमीटरची वाट आहे. काल या वाटेवरून हानोवरमध्ये भटकले. सगळ्यात दुष्टपणा म्हणजे जिथून ही वाट सुरू होते, तिथेच नेमकं काही बांधकाम चालू आहे, आणि रस्त्यावर कुठेच लाल पट्टा नाही. पंधरा मिनिटं शोधल्यावर पुढे तो पट्टा सापडाला. काही वैशिष्ठ्यपूर्ण वास्तुरचना, जुनी चर्च, ज्यूंचं स्मारक असं बघत बघत टाऊन हॉलला पोहोचले. अतिशय सुंदर वास्तू आहे ही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथे बांधकाम सुरू करण्यापूर्वी दलदल होती - तिथे भराव घालून त्यावर देखणी इमारत बांधली आहे. घुमटाच्या वरून शहराचं विहंगम दृष्य बघायला मिळावं, म्हणून वर घेऊन जाणारी खास लिफ्ट आहे. घुमटाच्या सौंदर्याला बाहेरून किंवा आतून बाधा न आणता आपल्याला चाळीस मीटरपेक्षा जास्त उंच नेणारी ही लिफ्ट घुमटाच्या आकाराप्रमाणे वळत, १५ अंशात तिरपी वर जाते (जर्मन इंजिनियरिंग!), आणि आपण जमिनीपासून सुमारे १०० मीटर उंचीवर येऊन पोहोचतो. वरून दिसणारं गावाचं विहंगम दृष्य खासच.

    नवा टाऊन हॉल वगळता अगदी आवर्जून बघायला म्हणून जावं, असं इथे फारसं काही नाही. साधं गावासारखं गाव. तरीही त्याचा खरा चेहेरा दिसल्यावर एखादं गाव तुम्हाला आवडून जातं. काल असंच झालं. ‘लाल वाटेवरून’ जाता जाता पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. सहा तास भटकून झालं होतं, आणि आता नवं काही बघायला डोळे, कॅमेरा, पाय उत्सुक नव्हते. हवा फारशी उबदार नव्हती. थोडक्यात, छान कुठेतरी बसून कॉफी घ्यावी असा मूड होता. आता अश्या वेळी मस्त टेबल बघून रस्त्यावरच्या कॅफेमध्ये बसायचं, का ‘काफे टू गो’ घ्यायची? तंद्रीमध्ये ‘काफे टू गो’ ऑर्डर केली, आणि आता कुठे निवांत बसायला मिळणार म्हणून स्वतःवरच वैतागले. सुदैवाने मार्केट चर्चशेजारी वार्‍यापासून आडोश्याला एक बाक होता. तिथे बसकण मारली, आणि कॉफी प्यायले. शेजारीच उघड्यावर एक पुस्तकांचं कपाट होतं. मी तिथे १५-२० मिनिटं बसले असेन. तेवढया वेळात एक काकू पुस्तकं बघून गेल्या. एक तरूण छानसं स्माईल देत आला, एक पुस्तक ठेवून दुसरं घेऊन गेला, एक जोडगोळी येऊन पुस्तकं बघून गेली. कसली पुस्तकं आहेत म्हणून मी ही डोकावले. आत डॅफ्ने ड्यू मॉरिएची कातडी बांधणीमधली जुनी ‘रेबेका’ होती. फ्रेड्रिक फोरसिथ होता. काही कॉम्प्युटरविषयक पुस्तकं होती. नवी, जुनी, वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं. एक कपाट भरून. बाजाराच्या चौकात ठेवलेली. कपाटावर लिहिलं आहे,

    "हे आपल्या शहरातलं पुस्तकांचं कपाट आहे. तुम्ही इथली पुस्तकं कधीही घेऊ शकता, स्वतः शोधू शकता. तुम्ही इथली पुस्तकं वाचा. त्यासाठी ती घरी न्यायला काहीच हरकत नाही. इथलं पुस्तक घेऊन तुमच्याकडचं दुसरं पुस्तक त्याच्याजागी आणून ठेवू शकता. तुम्हाला ते आवर्जून वाचावंसं वाटलं, म्हणजे ते नक्कीच इतरांनीही वाचण्यासारखं आहे. तेंव्हा तुमचं वाचून झाल्यावर इतरांना वाचायला ते परत कपाटात ठेवायला विसरू नका. तुमच्याकडे भरपूर पुस्तकं असतील, आणि तुम्ही ती इथे आणून ठेवू इच्छित असाल, तर या कपाटात मावतील एवढीच पुस्तकं ठेवा."

    मी हानोवरच्या प्रेमात पडले आहे. कारण इथे असं पुस्तकांचं कपाट आहे, आणि त्याचा वापर करणारी माणसं आहेत. टाऊन हॉलच्या घुमटाच्या शंभर मीटर उंचीवरून दिसणार्‍या देखाव्याइतकंच पाच फुटावरून बघितलेलं हे जुनं कपाटही मनोहर आहे.

*******************************
(फोटो काढलेत, पण कार्ड रीडर सोबत आणला नाहीये. त्यामुळे पुण्याला परतल्यावर फोटो टाकेन थोडेफार.)

स्टेटस अपडेट

Tuesday, June 8, 2010

आय (डोन्ट) सी यू

अचानक ध्यानीमनी नसताना आय सी यू बाहेरच्या प्रतिक्षाकक्षामध्ये तळ ठोकायची वेळ आली, आणि एक वेगळंच जग बघायला मिळालं.

जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल, डिलक्स वगैरे वर्गभेद इथे नसतात.
"तुमचं कोण?" एवढा एकच प्रश्न या परिवाराचा एक भाग होण्यासाठी पुरेसा असतो.
"आमच्या पेशंटने आज म्हणे एक डोळा उघडला!" एवढी बातमी इथल्या लोकांना आनंदित करायला पुरेशी असते.
तुमचा पेशंट एकदा त्या काचेच्या दाराआड गेला, की तुम्ही फक्त बाहेर वाट बघायची.
आत ठेवलेल्या आपल्या माणसाला भेटता येत नाहीये, म्हणून तळमळणार्‍या काकूंना कुणी गावाकडची ताई "तुमच्या पेशंटला पाजायला घेऊन जा" म्हणून शहाळ्याचं पाणी देते, तेंव्हा काकूंबरोबरच अजून कुणाकुणाच्या नातेवाईकांचेही डोळे भरून येतात.

"आपल्याच नशीबात अमूक तमूक का" असा प्रश्न पडत असेल तर जरा वेळ इथे बसा. आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होतो.
कारण इथे तुम्हाला जबरी अपघातानंतर गेले दहा दिवस मृत्यूशी झगडणार्‍या पंचवीस वर्षांच्या मुलाची आई भेटते.
पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेल्या बाईचा नवरा भेटतो.
चार दिवसांपासून मुलांना आजोळी धाडून, कपड्यांची बॅग भरून सासूबरोबर पुण्याला आलेली, इथल्याच बाकड्यावर रात्री झोपणारी सून दिसते.
पोराच्या इलाजासाठी आज लगेच पंचवीस हजार कुठून आणू म्हणून काळजीत पडलेले गावाकडचे आजोबा दिसतात.
ज्यांचे नातेवाईक आयसीयू पर्यंत पोहोचूच शकले नाहीत, त्यांच्यापेक्षा हे सगळे नशीबवान असतात.
आणि तुम्ही?

Monday, June 7, 2010

जॉब सॅटिस्फॅक्शन, ओनरशीप, कमिटमेंट, क्वालिटी, सर्व्हिस लेव्हल इ. इ.

    ती माझ्याकडे गेली चार वर्षे पोळ्या, केर-फरशी करते आहे. वर्षाला तिच्या मोजून चार ते पाच सुट्ट्या असतात, आधी सांगून घेतलेल्या. रोज सकाळी साडेसातला ती कामावर हजर असते. बाई ग, शनिवार-रविवारी जरा उशिरा आलीस तरी चालेल (खरं म्हणजे पळेल ... तेवढीच मला उशिरा उठायला संधी) हा माझा सल्ला तिला फारसा पटत नाही. सकाळचं पहिलं काम उशीरा सुरू केलं म्हणजे तिचं वेळापत्रक कोलमडतं.

    चार दिवसांपूर्वी तिची काकू गेली, त्याच दिवशी बहिणीचं अचानक ऑपरेशन करावं लागलं. दवाखान्यात बायकांच्या वॉर्डात पुरुषमाणसांना थांबायला परवानगी नाही. माहेरची मंडळी सुतकात अडकलेली. म्हणजे दवाखान्यात बहिणेवेसोबत हिला थांबायला हवं. रोज रात्री दवाखान्यात झोपून ती सकाळी कामावर हजर आहे. सकाळची घाईची कामं उरकून मगच ती घरी जाते. Business Continuation Plan in place, and successfully applied.

    आपल्याला कामावर पोहोचायला उशीर झाला किंवा खाडा झाला, तर घड्याळाच्या तालाबरहुकूम धावणार्‍या किती घरांची वेळापत्रकं कोलमडतील याची एवढी समज हिला मुळातूनच असेल? वेळेचं नियोजन, प्रायॉरिटी ठरवणं, कामामधलं डेडिकेशन कुठे आणि कधी शिकली ही? सातत्याचा विचार करायचा तर मी हिला सीएमएमआय लेव्हल ५ देईन!

    तथाकथित उच्च कौशल्याची आणि ‘जबाबदारीची’ कामं करणार्‍यांना आठवड्याचे सातही दिवस, वर्षाकाठी चार दिवसाच्या सुट्टीवर या सातत्याने काम करता येईल?

Thursday, June 3, 2010

सोन्याच्या धुराचा ठसका

    डॉ. उज्ज्वला दळवींचं ‘सोन्याच्या धुराचा ठसका’ वाचलं. सौदी अरेबियामध्ये पंचवीस वर्षं डॉक्टर म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी रोचक भाषेत मांडलेत. प्रवासी म्हणून एखाद्या देशात जाणं, आणि तिथे राहून, ‘आतले’ म्हनून तो देश अनुभवणं यात खूप फरक असतो. यापूर्वी सौदीविषयी ‘अतिरेक्यांना पैसा इकडून मिळतो’या आरोपापलिकडे काहीच माहिती नव्हती मला.  
    पुस्तकातली ‍अकरा बाळंतपणं झाल्यानंतर दीड वर्षं दिवस राहिले नाहीत म्हणून नैराश्य आलेली त्यांची पेशंट विसरता येत नाहीये. आणि पोटाच्या मागे या रानटी वस्तीमध्ये येऊन पडेल ते काम करणार्‍या जगभरातल्या चाकरमान्यांचे अनुभवही. त्यांची पिळवणूक, अपेक्षाभंग, आणि तश्याही वातावरणात त्यांनी काय एन्जॉय केलं ते. जबरदस्त ठेच लागली पुस्तक वाचताना.

जिथे दुसरं मतच खपवून घेतलं जात नाही, अश्या परक्या ठिकाणी रहायचं?
रानटी कायदा आणि त्याची अंधळी अंमलबजावणी अश्या जंगलच्या राजमध्ये जगायचं?
काय कपडे घालावेत, काय खावं, कुणाशी बोलावं, काय काम करावं ... या सगळ्याचा निर्णय दुसरं कुणीतरी करणार?
डोळ्यासमोर होणारा उघडउघड भेदभाव नजरेआड करायचा?
पैसे मिळतात म्हणून कमीपणाची वागणूक आणि मनमानी खपवून घ्यायची?
अश्या समाजात वाढणारी तुमची मुलं काय संस्कार घेत असतील?
आयुष्यात इतक्या तडाजोडी कुणी करू शकतं?

आत्मसन्मान ही चैनीची गोष्ट आहे का?
ताठ मानेने काम करायला मिळणं इतकं अवघड आहे?
आयुष्यभर अश्या वातावरणात जगू शकतात माणसं?
याला पर्याय नाही? का थोड्या दिवसांनी याचीही सवय होते?
मायदेशातला नोकरीधंदा सोडून जायलाच हवं अश्या ठिकाणी?

नाही हजम झालं.

बहुतेक मला सुरक्षिततेच्या कवचाची फार सवय झालीय.
किंवा मला स्वातंत्र्याची चटक लागलीय.
का माझ्यामध्ये पुरेशी महत्त्वाकांक्षा नाही?
रिस्क घेण्याची तयारी नाही?
का सुखासुखी कुणी इथे जाणार नाही - मला त्यांची मजबूरी समजत नाहीये?

Monday, May 31, 2010

बिचारी झांटीपी

    नवर्‍याने आयुष्यात एक काम धड केलं नाही. हिनेच त्याला खाऊ - पिऊ घालायचं, संसाराचं गाडं ओढायचं. त्याने फक्त रिकामटेकड्या शिष्यांना गोळा करायचं, आणि दिवसभर तोंडपाटीलकी करायची. या सत्याच्या शोधाने कधी कुणाचं पोट भरलंय? काही कामधंदा नको का माणसाला? काही पोटापाण्याची व्यवस्था?

    शिष्यांनी तरी किती डोक्यावर चढवून ठेवावं याला? हाक मारून ओ देत नाही म्हणून वैतागून शेवटी अंगावर पाणी फेकावं, तर त्यावर याची टिप्पणी ... "ढगांच्या गडगडाटानंतर पाऊस पडाणारच!" ... आणि हे सुद्धा कौतुकाने नोंदवून ठेवणारे याचे शिष्य.

    हे अथेन्सचे नागरिक तरी एवढ्या निरुपयोगी आणि निरुपद्रवी माणसाला कसे घाबरले कोण जाणे.

    पण याला तरी समजलं पाहिजे ना? बिनाकामाचा असला तरी असल्याचा आधार होता. आता सत्याच्या नावाने घरदारावर तुळशीपत्र ठेवून मरायला निघाल्यावर पोरांकडे कोण बघणार?  झांटीपीच्या नशीबाचे भोग काही संपत नाहीत.

    तत्त्वामागे जाणारा सॉक्रेटिस इतिहासात अजरामर, आणि फरफटत खस्ता खात त्याच्यामागे येणारी बिचारी कजाग झांटीपीही.

    आता नवरा-बायकोची भांडणं काय होत नाहीत? फाटक्या तोंडाची असली म्हणून काय झालं, प्रेम होतंच ना तिचं नवर्‍यावर? जगरहाटीपेक्षा काय वेगळी अपेक्षा ठेवली होती तिने संसाराकडून? पण एकदा नवर्‍याच्या अंगावर टाकलेलं पाणी शतकानुशतकं छळत राहणार बिचारीला. आणि आपला बिनकामाचा नवरा एवढं काय करून गेलाय हा प्रश्न सुद्धा.

*************************************************************

    तुकोबाची अवली काय किंवा सॉक्रेटिसची झांटीपी ... त्यांच्या नवर्‍यांचं कौतुक वाचताना मला नेहेमी हा प्रश्न पडलाय ... यांच्या बायकांना काय वाटत असेल?

Thursday, May 27, 2010

वैशाख पौर्णिमा

घाबरू नका ... मी यापुढे दिवसाला तीन पोस्ट लिहायला सुरुवात करणार नाहीये ... ही पोस्ट २ महिन्यांपासून ड्राफ्ट म्हणून पडून आहे योग्य मुहुर्ताची वाट बघत ... आज फक्त ती प्रकाशित केलीय वेळेचं औचित्य साधून.

*************************************************************
    वैशाख वणव्याने तप्त झालेल्या धरतीवर आपल्या सौम्य शीतल चांदण्याची वृष्टी करणारा पौर्णिमेचा चंद्र. जे परिपूर्ण असतं, ते सुंदर असतं, आनंदी असतं. पौर्णिमेच्या चंद्रासारखं. एका तपश्चर्येची पूर्तता होण्यासाठी याहून सुयोग्य वेळ कुठली असणार?    
    सत्य शोधायला महालाबाहेर पडलेला, अपार करुणेने भरलेला तो राजपुत्र. सत्य शोधायला त्याने सर्व मार्ग अवलंबले. देहदंडन करून बघितलं, वेगवेगळे गुरू करून बघितले. त्याला सत्य सापडलं ते स्वतःच्या आत शोधल्यावरच. आयुष्य हे दुःखाने भरलेलं आहे. या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. ही तृष्णा विझवून टाका, दुःख आपोआप दूर जाईल. वैशाख पौर्णिमेला त्याला हे गूढ उकललं. आयुष्यभर ज्याचा ध्यास होता, ते सत्य सापडण्याच्या क्षणी तो म्हणतो ...

अनेक जाति संसारं संधाबिस्सं अनिब्बस्सं
गहकारक गवेसन्तु, दुक्ख जाति पुन: पुन:
गहकारकं दिठ्ठोसि पुन गेह न काहसि
सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसङ्गमत्
विसंङ्खारगतं चित्तं तण्हानं खयमज्झगा

    आनंद, दुःख, आशा निराशा याचं घर बांधून मला जखडून ठेवणाऱ्या तुला मी जन्मामागून जन्म शोधतो आहे. तुझ्या या घरापायी मला कितीएक जन्मांची दुःख सहन करावी लागली. आता मात्र मी तुला बघितलंय - परत काही तू मला बांधून ठेवू शकणार नाहीस. तुझे पाश, तुझं घर सगळंच आता भंग पावलं आहे. मनातले सगळे विकार गळून गेले आहेत, मला पुन्हा पुन्हा या चक्रात अडकवणारी तहान शमली आहे.

*************************************************************
    बौद्ध होणं सोपं आहे ... बुद्ध होण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार?

Wednesday, May 26, 2010

स्कॉलर आणि राक्षस

    वर्षभरापूर्वी गच्चीतल्या बागेची सुरुवात केली तेंव्हा दोन फिलोडेंड्रॉनची रोपं आणली होती.

    हा माझा ‘स्कॉलर’:

     शाळेत, कॉलेजमध्ये पहिल्या बेंचवर बसणारी सिन्सियर, अभ्यासू मुलं असतात ना, पहिल्या दिवसापासून सगळ्या असाईनमेंट पूर्ण असणारी, तसा. लावल्यापासून आजपर्यंत नियमित, एका वेगाने वाढणारा. कुंडीत मॉसस्टिक लावल्यावर सिन्सियरली तिला धरून चढलेला. प्रत्येक पान नेटक्या आकाराचं, रंगाचं. अगदी भेटायला आलेल्या मैत्रिणीने ‘हे प्लॅस्टिकचं झाड ना?’ म्हणून विचारलं, इतका शिस्तीचा.
    यांना कधी कंटाळा येत नाही का? दंगा करावासा वाटत नाही का? सगळ्या नियमांमध्ये आणि शिस्तीमध्ये बोअर होत नाही का? सारखं काय शहाण्यासारखं वागायचं? हे प्रश्न मला स्कॉलर मंडळींना बघून पडायचे, आज याला बघून पडतात. हे आपल्याला झेपणारं नाही, याची तेंव्हाही खात्री होती, आजही आजे. स्कॉलर मंडळींविषयीचा जुनाच आदर याच्याविषयी वाटतो.

    आणि हा राक्षस:

    याचं सगळं त्या स्कॉलरच्या उलट. कुठलाही नियम याला मान्य नाही. कुंडीतल्या मॉसस्टिकचा आणि याचा दूरान्वयेही संबंध नाही, कारण आपण कसं वाढावं हे दुसरं कुणी ठरवणंच मुळात याला मान्य नाही. तो अपनी मर्जी का राजा आहे. सगळी पानं साधारण एका आकाराची असावीत हे याच्या गावीही नाही. याचं आजवर आलेलं प्रत्येक पान जुन्या पानापेक्षा मोठं आहे, म्हणून त्याचं प्रेमाचं नाव ‘राक्षस’. नर्सरीमधून आणल्यावर पहिल्यांदा ज्या कुंडीत हा राक्षस लावला, ती त्याला आवडली नाही. आणि आपली नाराजी त्याने अगदी स्पष्टपणे व्यक्तही केली. नुसतंच भुंडं खोड, पानांचा फारसा पत्ता नाही, असलेली पानं लगेच पिवळी पडणं असा बाग-आंधळ्यालासुद्धा नजरेआड न करता येणारा तीव्र निषेध त्याने व्यक्त केला. त्यामुळे थोड्या दिवसांतच त्याला नवी कुंडी मिळाली. हे नवं घर आवडल्याचंही आणि खूश असल्याचंही त्याने तितक्याच जोरात सांगितलं. एवढा तरारून आला, की हेच ते जुनं केविलवाणं झाड यावर विश्वास बसू नये.
    गच्चीतल्या वेड्या वार्‍यावर डोलायला याला आवडतं. भले त्यामुळे पानांच्या चिंध्या झाल्या तरीही. वार्‍यापासून थोडं संरक्षण म्हणून याला कोपर्‍यात हलवावं, तर शेजारच्या भिंतीवर घासून हा पानांची लक्तरं करून घेतो. त्यामुळे मारामारी करून आलेल्या पोरासारखा का दिसेना, याला तिथे वार्‍यातच ठेवायचं असं मी ठरवलंय. नाही तरी मला कुठे व्हर्सायसारखी ‘शिस्तबद्ध’ बाग करायचीय? तो मजेत असला म्हणजे झालं. स्कॉलरसारखा मला याच्याविषयी आदर बिदर वाटत नाही - पण आपल्यासारखंच कुणीतरी आहे हे बघून बरं नक्कीच वाटतं.
    आता तुम्हीच सांगा, या दोघांना एका जातीची दोन झाडं कुणी म्हणेल का? या बोटॅनिस्ट लोकांना काही समजत नाही असं माझं मत झालंय.

(फोटो भर दुपारच्या रम्य वातावरणात काढलेत, आणि दोघंही आता या फोटोंपेक्षा दुप्पट मोठे झाले आहेत... पण ताजे फोटो काढायचा कंटाळा केलाय फोटोमुळे पोस्ट लांबणीवर पडेल म्हणून ... तेंव्हा समजून घ्या.)

दुसरा वाढदिवस    २४मे ला ब्लॉगचा दुसरा वाढदिवस होता. ब्लॉगवरचं दुसरं वर्ष कसं होतं याचा सहजच मनाशी आढावा झाला. यावर्षी कितीतरी मराठी ब्लॉगर्सशी मैत्री झाली. ब्लॉगर मेळावे, इ-सभा आणि व्यक्तिगत पातळीवरही ब्लॉगर्सचा परस्परसंवाद या वर्षी वाढल्यासारखा वाटतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत आता ‘मराठी ब्लॉगर परिवार’असं काही आहे असं वाटतंय. कदाचित असा परिवार पूर्वीही असेल आणि मला त्याची कल्पना नसेल, किंवा तेंव्हा थोडा विस्कळित असेल. 
   ब्लॉग हे मराठीमध्ये तुलनेने नवीन माध्यम आहे, आणि हळुहळू ते बाळसं धरतंय. त्याचा आवाका, शक्तीस्थानं आणि मर्यादा यांचा आपल्याला अजून अंदाज येतोय. मराठी ब्लॉगलेखनाचं स्वरूप, दर्जा, ब्लॉगकडून अपेक्षा याविषयी गेल्या काही दिवसात नीरजाच्या आणि वटवट सत्यवानाच्या पोस्टच्या निमित्ताने भरपूर लिहिलं गेलंय. त्यात अजून भर टाकण्यासारखं माझ्याजवळ काही नाही.
    माझ्या ब्लॉगवरच्या लेखनाच्या स्वरूपात बदल झालाय. अगदी सुरुवातीच्या पोस्ट या वहीतलं लिखाण ब्लॉगवर पुन्हा उतरवणं या स्वरूपाच्या होत्या. दोन वेळा हाताखालून गेल्यामुळे त्याच्या मांडणीमध्ये जास्त नेमकेपणा होता, लांबीही जास्त होती. भाषेचा बाज काहीसा वेगळा होता. हळुहळू पोस्टची लांबी कमी झालीय. फोटोचा, दुव्यांचा वापर वाढलाय. लिहिण्यातला प्रवाहीपणा वाढल्यासारखा वाटतोय. स्वतःचं नसलेलं लिखाण इथे न टाकण्याचा माझा मूळ बेत होता. पण कवितांच्या वहीमधून हळुहळू माझे आवडते कवी इथे दिसायला लागलेत. आपले नसलेले फोटो, चित्रं न टाकण्याचं मात्र एक ऍन फ्रॅंकचा अपवाद सोडल्यास जमलंय. नेहेमीच्या मराठी अनुभवविश्वाबाहेरचं काही मांडता आलं तर बघावं अशी एक इच्छा होती. फुटकळ अनुवादांमधून ती काही अंशी का होईना पण साधता येते आहे असं वाटतंय. फुकटात जागा मिळते आहे म्हणून वाट्टेल ते (महेंद्र काका, मला उगीचच तुमच्या ब्लॉगवर टीका केल्यासारखं वाटतंय हे लिहिताना ... तुमच्या ब्लॉगचं नाव बदला प्लीज :D ), लिहिणं टाळायचं, जे जालावर उपलब्ध आहे, त्याची द्विरुक्ती टाळायची असं एक धोरण होतं. तरीही थोड्याफार ‘टाईमपास’ पोस्ट झाल्यात. पण एकंदरीत स्वतःच्या मनाला भिडणारं, आपल्याला परत कधी वाचावंस वाटेल असं लिहायचं हे बर्‍यापैकी जमलंय असं वाटतंय.
    दोन वर्षात पन्नास -पंचावन्न पोस्ट म्हणजे मी अजूनही ‘स्लो ब्लॉगर’च आहे. अर्थात ब्लॉगला सुरुवात करताना याची कल्पना होती. माझ्या कामाचं स्वरूप बैठं आहे, आणि कामानिमित्त‘व्हर्च्युअल टीम’ मध्येच बहुधा आठवडेच्या आठवडे संवाद असतो. त्यामुळे हाडामांसाच्या माणसांशी प्रत्यक्ष बोलणं, लॅपटॉपच्या बाहेरच्या खर्‍याखुर्‍या जगाकडे बघणं ही प्रायॉरिटी होती. आणि लिहिल्यापेक्षा जास्त वाचणं ही सुद्धा. त्यामुळे साधारण दोन आठवड्याला एक पोस्ट झाली तरी मी सुखी आहे. ब्लॉगवरच्या प्रतिक्रियांना आवर्जून उत्तरं लिहिणं हे मात्र ‘ब्लॉगेटिकेट्स’ मधून शिकलेय.
    ब्लॉग दोन वर्षांचा झाल्यासारखा वाटतोय का तुम्हाला? ‘मोठा’ झाल्यावर त्याने अजून काय काय करायला हवं असं तुमचं मत आहे? आणि हो, वर वाढदिवसाचा केक ठेवलाय :)

Tuesday, April 6, 2010

तीन जिप्सी

हरेकृष्णजींची ही पोस्ट वाचली, आणि निकोलाउस लेनाऊ (Nikolaus Lenau) या ऑस्ट्रियन कवीची Die drei Zegeuner (तीन जिप्सी) ही कविता आठवली. लेनाऊची मूळ कविता बॅलड प्रकारची - म्हणजे गेय आहे. हा त्या कवितेचा मी केलेला स्वैर अनुवाद ...

************************************************************
एकदा माझी थकली भागलेली गाडी
रेताड माळरानावरून
रडत खडत चालली होती
तेंव्हा कुरणामध्ये मला तीन जिप्सी दिसले.

सायंकाळच्या प्रकाशात उजळून
त्यांच्यातला एकजण आपल्याचसाठी
हातातल्या सारंगीवर
एक मनस्वी गाणे छेडत होता

दुसर्‍याच्या हातात चिलीम होती
आणि जगातल्या आणखी कुठल्याच गोष्टीची
गरज नसावी अश्या समाधानात
तो चिलीमीच्या धुराकडे बघत होता

तिसर्‍याने आपल्या झांजा एका झाडावर अडकवून
मस्त ताणून दिली होती
झांजांच्या दोरीवरून वार्‍याची झुळुक जात होती
आणि त्याच्या हृदयावरून एक स्वप्न चाललं होतं

तिघांच्या फाटालेल्या कपड्यांवर
रंगीबेरंगी ठिगळं होती
पण नियतीवर
तिघांनीही मात केली होती

आयुष्य आपल्यावर रुसतं तेंव्हा
त्याला कसं झटकून टाकायचं
हे झोपून, चिलीम ओढून, सारंगी वाजवून
तीन प्रकारे त्यांनी मला दाखवलं होतं.

जिप्सींचे सावळे चेहेरे
आणि काळेभोर केस
कितीतरी वेळ बघितल्यावर
पुढे जाणं भाग होतं

************************************************************

Monday, March 29, 2010

तृणाचे पाते

अजून एक जालावर न सापडलेली कवितांच्या वहीतली कुसुमाग्रजांची कविता ...

तृणाचे पाते

अश्विन पिऊन तरारलेले एक तृणाचे गोंडस पाते
मला म्हणाले डुलता डुलता जीवित म्हणजे रहस्य मोठे


    कालच रात्री नऊ काजवे आले शिलगावून मशाली
    शोधित फिरती चहूकडे ते इथे तिथे त्या झडाखाली
    विचारले मी शंभर वेळा काय आपले हारवले ते
    मौन सोडिले कुणी न कारण त्यांनाही ते ठाऊक नव्हते!


जाग पहाटे येता दिसला क्षितिजावर एकाकी तारा
पडला होता ढगावरी तो रेलून तंद्रीमध्ये बिचारा
मी म्हटले त्या "घराकडे जा! जागरणाचे व्रत का भलते?"
तो रागाने बघे मजकडे कारण त्यासही माहित नव्हते!


    पलिकडच्या त्या आंब्यावरती कुणी सकाळी आला पक्षी
    खोदित बसला आकाशावर चार सुरांची एकच नक्षी
    मी पुसले त्या "कोणासाठी खुळावल्यागत गाशी गीते?"
    पंख झापुनी उडून गेला कारण त्यासही कळतच नव्हते!

दूर कशाला? मी वार्‍यावर असा अनावर डोलत राही
का डुलतो मी? का हसतो मी? मलाही केंव्हा कळले नाही!
मलाही केंव्हा कळले नाही!!

Thursday, March 25, 2010

दोन घडीचा डाव

    आठवड्याच्या सुट्टीनंतर आलेल्या सोमवारची सकाळ. मनाला शनिवार - रविवारमधून बाहेर काढण्यासाठी धडपड चालू असते. शुक्रवारी रात्री निग्रहाने मिटलेल्या लॅपटॉपवरच्या न वाचलेल्या मेलची संख्या एकीकडे अस्वस्थ करत असते. आणखी तासाभरात ऑफिसमध्ये पोहोचलं, म्हणजे सरळ शुक्रवार रात्रीपर्यंत वेळ काळ काही सुचू नये एवढं काम आहे याचं कुठेतरी दडपण येत असतं. पुढच्या शनिवार रविवारचे बेत मनाच्या एका कोपर्‍यात हळूच आकार घेत असतात. खूप दिवसात न ऐकलेलं ‘म्युझिक ऑफ सीज’आठवणीने लावलेलं असतं. थोडक्यात, नेहेमीसारखाच एक सोमवार. नेहेमीच्याच सरावाने घरून ऑफिसकडे ड्रायव्हिंग. नेहेमीच्याच सुसाट वेगाने हायवेवरून पळणार्‍या गाड्या. आल इझ वेल.
    अचानक गाड्यांच्या रांगेत पुढे कुठेतरी करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज येतो. मागच्या गाड्याही ब्रेक लावतात, टायर रस्त्यावर घासत गेल्याचे आवाज, कुणी समोरच्या गाडीला धडकलेलं, कुणाला मागच्या गाडीने ठेकलेलं, एखादा नशीबवान कुठला ओरखाडा न उठता त्या गर्दीतून सहीसलामत सुटतो. गाडी शिकताना शिकवलेलं डबल ब्रेकिंगचं तंत्र तिच्याकाडून आपोआप वापरलं जातं. स्किड न होता, समोरच्या गाडीला धक्काही न लागता गाडी थांबते. मागचीही थांबणार, तेवढ्यात मागून त्या गाडीला धक्का बसतो, आणि ती गाडी मागून येऊन धडकते.
    सुदैवाने फार नुकसान नाही झालेलं गाडीचं. थोडक्यात निभावलंय. ऑफिसच्या कामाचा मात्र आज जबरी खोळंबा होणार. गाडी आधी मेकॅनिककडे न्यायची म्हणजे अर्धा दिवस तरी गेलाच ... दोन मिनिटात मनात हिशोब होतो. पुढे रांगेत काय झालंय बघितल्यावर तिला कळतं ... बाकी सगळ्या गाड्यांना लहानसहान पोचे आलेत, दिवे फुटलेत. पण एक गाडी सोडून पुढे टाटा सफारी पुढच्या मिनीट्रकवर जबरदस्त आदळलीय ... सफारीची टाकी फुटून रस्त्यावर तेल पसरलंय, गाडीचं नाकाड ट्रकखालून काढायला क्रेन लागणार.
    पुढ्चे सगळे सोपस्कार पार पडतात, गाडी मेकॅनिककडे पोहोचवायला नवरा येतो. उरलेला दिवस ऑफिसच्या कामाचा ढीग उपसण्यात जातो. रात्री मात्र मनाची बेचैनी जाणवते. काय झालंय आपल्याला ? एक छोटा अपघात. सुदैवाने आपली त्यात काही चूक नव्हती. गाडीलाही मोठं काही झालेलं नाही. अपघाताच्या जागेपासून गॅरेजपर्यंत आपणच गाडी चालवत नेली. मग हे काय वाटतंय आता नेमकं?
    टेल लॅम्प नसणार्‍या त्या मिनीट्रकच्या मागे आपली गाडी असती तर?
    रस्ताभर स्किड झालेल्या चाकांच्या खुणा उमटवत त्या ट्रकवर आदळाणारी टाटा सफारी आपल्या मागे असती तर?
    प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डबल ब्रेकिंग झालं नसतं तर?
    कधीही ड्रायव्हिंग करताना तो सोबत असतो, तिच्या नकळत तो अपघात टाळत असतो हे खरंय. पण म्हणून मुद्दाम त्याची परीक्षा बघणं बरोबर नाही.
    कधीतरी मरायचंय हे माहित आहे, पण तो कधीतरी नेहेमीच दूरवरच्या भविष्यातला आहे असं आपण समजून चालतो. आपल्याला कसं मरायचंय हे तरी आपण कुणाला सांगितलंय का? कुठलंही क्रियाकर्म करण्यापेक्षा देहदान कर माझं ... आणि एक मस्त वडाचं झाड लाव म्हणून सांगायला पाहिजे नवरोबाला.
   आताशी तर कुठे कसं जगायचं ते उमगायला लागलंय. एवढ्या गोष्टी करायच्या राहिल्यात. आणि कुठली गोष्ट अर्धवट सोडणं तिला आवडत नाही. जास्त जागरूक रहायला हवं तिने. तिची गाडी नकळतच नेहेमी फास्ट लेनमध्ये असते. कुठे पोहोचायचंय इतक्या वेगाने? ठरवून फास्ट लेनमधून बाहेर पडायला हवंय.
    गाडी दुरुस्त झाली, पुन्हा रूटीन सुरू झालं. पण रस्त्यावर त्या जागी गाडी स्किड झालेल्या खुणा बघितल्या, म्हणजे रोज तिला जाणवतं. its just not worth being in the fast lane.

Friday, March 12, 2010

मराठीने केला कानडी भ्रतार …

    नवऱ्याची भेट होईपर्यंत मी कर्नाटकात फारशी कधी गेले नव्हते. बहुसंख्य द्रविडेतरांप्रमाणे मलाही दक्षिणेतल्या सगळ्या जिलब्या सारख्याच अनाकलनीय होत्या. महाराष्ट्राच्या दक्षिणेला राहणारे सगळे ‘मद्राशी’ असा एक सोप्पा समज होता.कानडीशी आलेला संबंध म्हणजे एकदाच गाणगापूरहून सोलापूरला येताना चुकून गुलबर्ग्याऐवजी गाणगापूर रोडला गेल्यावर सोलापूरला परतण्यासाठी झालेले हाल, आणि एकदा विजापूर बघायला जाताना वाटेत गाडीचा अपघात झाल्यावर गाडीबाहेर ऐकलेली कडकड एवढाच. त्यातून हे काही गुजराती किंवा पंजाबी सारखं सहज समजणारं प्रकरण नाही याची मात्र खात्री झाली होती. तर कोथरूडमध्ये भेटलेला, चारचौघांइतपत बरं मराठी बोलणारा नवरोबा मुळचा असं काही वेडवाकडं बोलणारा निघेल याची मला कशी कल्पना असणार?
    लग्न ठरलं तेंव्हा मी पहिल्यांदा कर्नाटकात गेले. आणि नवऱ्याच्या आजी आजोबांसकट निम्म्यापेक्षा जास्त नातेवाईकांना माझ्याशी मराठीत बोलताना ऐकून गार झाले. उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच लोकांना कोकणी येतं आणि त्यामुळे मराठी समजतं, तोडकंमोडकं का होईना, पण बोलता येतं हा शोध लागला. त्यात भाषावार प्रांतरचनेपूर्वी धारवाड – हुबळी मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे जुन्या मंडळींना बंगळूरपेक्षा मुंबई-पुणे जवळची हे ज्ञान प्राप्त झालं.
    नवऱ्याच्या काकूंनी कानडी अंकलीपी भेट दिली, आणि मग रस्त्याने चालताना प्रत्येक दुकानाची पाटी कोड्यासारखी ‘सोडवण्याचा’ नवा खेळ सुरू झाला. (अजूनही जोडाक्षरं आणि आकडे घात करतात, पण एव्हाना हुबळीतल्या नेहेमीच्या रस्त्यावरच्या बहुसंख्य पाट्या माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत:) ) देशपांडेनगर? हे देशपांडे इथे कर्नाटकात काय करताहेत? तर आजवर अस्सल मराठी समजत असलेली निम्मीअधिक नावं अस्सल कानडीसुद्धा आहेत हे समजलं. या नावांसारखेच हळुहळू अस्सल मराठी शब्दसुद्धा कानडी वेषात भेटायला लागले – अडनिडा, गडबड, किरणा, अडाकित्ता, रजा … परवा तर मामेसासुबाईंनी सुनेचं कौतुक करताना ‘अरभाट’ म्हटलं, आणि मला एकदम जीएंची अरभाट आणि चिल्लर माणसं आठवली.
    नुकतंच लग्न झालं होतं, तेंव्हा एकदा नवऱ्याच्या दोस्तांनी बाहेर जमायचा बेत केला एक दिवस. आणि नवऱ्याने घरी येऊन घोषणा केली,
    “आम्ही आज वैशालीला जाऊ.”
    “म्हणजे ? मला न विचारता ठरवताच कसं तुम्ही सगळे असं?”
    “अगं आम्ही वैशालीला जातोय. .. तुला आवडतं न तिथे जायला?”
    अस्सं. म्हणजे मला तिथे जायला आवडतं, म्हणून मुद्दाम मला वगळून वैशालीमध्ये भेटताय काय? बघून घेईन … हळुहळू तापमान वाढायला लागलं, आणि आमचं लग्नानंतरचं पहिलं कडाक्याचं भांडण झालं. या प्राण्याचा ‘आम्ही’ आणि ‘आपण’ मध्ये हमखास गोंधळ होतो हे माझ्या हळुहळू लक्षात आलं. बेळगावच्या पलिकडून मराठीकडे बघणाऱ्यांची गोची लक्षात यायला लागली. ज्या भाषेत ‘ते’ इंजीन आणि ‘तो’ डबा जोडून ‘ती’ गाडी बनते, ती भाषा शिकणं किती अवघड आहे तुम्हीच बघा!

६ x ८ मधली किमया

आयोवामध्ये एरिन नावाची एक मुलगी आहे. आपल्या मोजून सहा बाय आठ फुटाच्या बाल्कनीमध्ये तिने बाग केलीय. बाग म्हणजे कोपर्‍यात केविलवाणी उभी असणारी एखादी हिरवी कुंडी नव्हे. ती या जागेत रोजच्या वापरातल्या भाज्या, फळं अशी झाडं लावते आहे, आणि त्याच बरोबर नेटकी फुलझाडं सुद्धा. शिवाय ओला कचरा जिरवण्यासाठी कम्पोस्ट बिन, बसायला दोन खुर्च्यासुद्धा तिने या जागेत माववल्या आहेत. आज अपघाताने तिचा हा ब्लॉग सापडला, आणि तो वाचून ... विशेषतः ही  पोस्ट बघून मी थक्क झाले. तिने अगदी बाग करायचं ठरवल्यापासून, झाडांच्या निवडीपासून सगळे टप्पे आपल्या ब्लॉगवर मांडलेत. एवढ्या कमी जागेत, मोजक्या भांडवलावर किती सुंदर बाग फुलू शकते ते एकदा तिच्या ब्लॉगवर बघाच.

माझ्याकडे तर याच्या दुपटीपेक्षा जास्त जागा आहे, आणि आपल्या देशातल्या सुंदर हवामानाची देणगी आहे. यापुढे बागेसाठी जागा नाही ही सबब बंद!

Thursday, March 4, 2010

फटकळाचा फटका आणि बेडकांचे गाणे

    बऱ्याच दिवसांनी कवितांची वही चाळली. त्या सगळ्या आवडत्या कवितांमधून आज सगळ्यात आवडलेल्या या दोन कविता . दोन्ही कविता जालावर कुठे सापडल्या नाहीत, त्यामुळे इथे देते आहे:

फटकळाचा फटका - वसंत बापट

पूर्वज ऐसे पूर्वज तैसे मिजास पोकळ करू नका
मनगट असता मेणाऐसे मशाल हाती धरू नका ॥

सुवर्णभूमी भारतमाता
राव मारता कशास बाता
घरादाराची होळी होता टिमकी बडवत फिरू नका ॥

प्रतिवर्षाला यमुना गंगा
महापुराचा दाविती इंगा
भगिरथाचे कूळ न सांगा नावही त्याचे स्मरू नका ॥

शरण जायचे जर अन्याया
कशास म्हणता ‘जय शिवराया’
अभिमानाचे नाटक वाया करून खळगी भरू नका ॥

विज्ञानाचा जिथे पराभव
तिथे मिरवता पुराणवैभव
ज्ञानरवि नभी येता अभिनव जा सामोरे डरू नका ॥

नव्या युगाची पायाभरणी
करील केवळ तुमची करणी
पराक्रमाने उचला धरणी आता हिंमत हरू नका ॥

*************************************************************
 
बेडकांचे गाणे : विंदा करंदीकर
 
डरांव् डुरूक् डरांव् डुरूक् डरांव् डरांव् डरांव्
आम्ही मोठे राव, डरांव् डरांव् डरांव् ॥

सागर म्हणती उगाच मोठा,
भव्य किती डबक्यांतिल लाटा,
सागर नुसते नाव, डरांव् डरांव् डरांव् ॥

गंगाजळ ना याहुन निर्मळ,
या डबक्याहुन सर्व अमंगळ,
बेडुक तितुके साव, डरांव् डरांव् डरांव् ॥

खोल असे ना याहुन कांही,
अफाट दुसरे जगात नाहीं,
हाच सुखाचा गांव, डरांव् डरांव् डरांव् ॥

चिखल सभोती अमुच्या सुंदर,
शेवाळ कसे दिसे मनोहर,
स्वर्ग न दुसरा राव, डरांव् डरांव् डरांव् ॥

मंत्र आमुचा डरांव आदी,
अनंत आणिक असे ‘अनादी’
अर्थ कसा तो लाव, डरांव् डरांव् डरांव् ॥

*************************************************************

Tuesday, February 9, 2010

फ्री हिट काऊंटरवाल्यांचे आभार!

    डिसेंबर २००८ मध्ये ब्लॉगवर फ्री हिट काऊंटर टाकला. तोवर साधारण ५०० हिट्स झाल्या असतील असा अंदाज होता, त्यामुळे ५०० पासूनच सुरुवात केली. त्यानंतर दर पोस्टला किती लोकांनी भेट दिली, हे बघणं हा नवा चाळा सुरू झाला. आपण लिहितो, ते केवळ स्वान्तसुखाय असं कितीही म्हटलं, तरी ब्लॉग हिट चा आकडा वाढणं हे सुखावणारंच होतं. माझ्याही नकळत मनात कुठेतरी हिशोब होत असावा ... या आठवड्याला किती हिट्स झाल्या याचा. परवा अचानक फ्री हिट काऊंटर ७००० च्या जवळ होता तो सरळ २८०० ला रिसेट झाला. टेंप्लेट कोडला हात लावलेला नसताना हे कसं काय झालं म्हणून अस्वस्थ वाटलं उगाचच. त्या अस्वस्थ वाटण्याने जाणीव करून दिली ... हा काऊंटर काढून टाकायचा असं आपण ठरवतो आहोत, पण कुठेतरी मनात ‘टार्गेट’ आहे किती ब्लॉग हिट्स हव्यात याचं. 
    रिसेट झाल्यामुळे आता त्या आकड्याला काही किंमत नाही राहिली. ... The counter does not count any more. एका निरर्थक ‘उद्दिष्टा’पासून मुक्त केल्याबद्दल फ्री हिट काऊंटरवाल्यांचे आभार मानायला पाहिजेत!
    पुढच्या ब्लॉगसफाईमधे काऊंटर नक्की काढून टाकणार!

Wednesday, February 3, 2010

कॅच मी इफ यू कॅन...

    पुण्याला नवीनच रहायला आलो होतो तेंव्हाची गोष्ट. सोसायटीमध्ये आमची बिल्डिंग कोपऱ्याला होती ... त्यात आमचा मागच्या बाजूचा फ्लॅट.एका बाजूला ऊसाचं शेत आणि दुसरीकडे कालवा आणि त्याच्या बाजूची झाडी, पेरूची बाग असा ‘व्ह्यू’ मिळायचा खिडक्यांमधून. सगळीकडे हिरवंगार. आमच्यासारखेच ही हिरवाई ऍप्रिशिएट करणारे बरेच पाहुणेही यायचे घरी. मुख्यतः उंदीर. शेतातलं खाणं संपलं, की ते आमच्याकडे यायचे. एक दिवस तर आजी रात्री झोपलेली असताना तिच्या बोटाला उंदीर चावला! तर उंदरांचा बंदोबस्त हा एक आवश्यक कार्यक्रम झाला.

    सुरुवातीला एक - दोन वेळा उंदरावर विषप्रयोग करण्यात आला. पण विष खाऊन तो कुठेतरी कोपऱ्यात मरून पडलेला असायचा, आणि नंतर मेलेला उंदीर शोधणं फार जिवावर यायचं. त्यात परत हा उंदीर खाऊन कावळ्याला, कुत्र्याला अशी पूर्ण त्याच्या अन्नसाखळीमध्ये विषबाधा होणार, एका उंदरासाठी आपण पर्यावरणाचं एवढं नुकसान करणार हे काही योग्य नाही असं सर्वानुमते ठरलं. सापळा लावण्याचा पर्यायही फेटाळण्यात आला, (कारण आता आठवत नाही.) त्यानंतर उरलेला पर्याय म्हणजे उंदीर पकडणे. ही उंदीर पकडणे मोहीम म्हणजे एकदम ‘क्वालिटी फॅमिली टाईम’ असायचा ... आई, बाबा, मी, घरी असलेच तर भाऊ असे सगळेच ऍक्टीव्ह भिडू या रोमहर्षक खेळामध्ये भाग घ्यायचे. महाभारतामध्ये कसे आपण धर्मयुद्धाचे नियम वाचतो, तसे यातही नियम होते. पहिला नियम म्हणजे आपलं उद्दिष्ट उंदीर पकडणं हे आहे - उंदीर मारणं नाही. आपली बिल्डिंग दोन वर्षांपूर्वी झाली - आपण या जागेत उपरे आहोत. उंदरांच्या कित्येक पिढ्या इथे आपल्या कितीतरी आधीपासून राहत आहेत. दुसरं म्हणजे फेअर गेम. उंदीर आपणहून बाहेर जात असेल,तर त्याला धरायचं नाही. नाहीतरी आपण त्याला बाहेर काढण्यासाठीच हे करतोय ना? आणि धरल्यावर विनाकारण झोडपायचं नाही ... फक्त बाहेर जरा लांब कचराकुंडीमध्ये टाकून द्यायचं.

    साधारण आठ दहा दिवसातून एकदा आमचा सामना व्हायचा. म्हणतात ना, ‘प्रॅक्टिस मेक्स अ मॅन पर्फेक्ट’ ... सुरुवातीला शिकाऊ असणारी आमची टीम हळुहळू यात चांगलीच तरबेज झाली. गोल कीपर, सेंटर फॉरवर्ड असा प्रत्येकाचा रोलसुद्धा ठरलेला. कुठलं शस्त्र कोणी, कधी वापरायचं, हे सुद्धा ठरलेलं. एक दिवस मात्र हाईट झाली. सकाळीसकाळीच आईने उंदीर बघितल्याची खबर दिली. पद्धतशीर कामाला सुरुवात झाली. first define your scope. म्हणजे पहिल्यांदा बाकी खोल्यांची दारं बंद करायची, नॉन प्लेईंग मेंबर्सना मैदानाबाहेर काढायचं. उंदीर आणि त्याच्यापाठोपआठ हिंडणारी आमची टीम यांचं कार्यक्षेत्र मर्यादित करायचं. स्वयंपाकघरातल्या लॉफ्टवर खुडबूड ऐकू येत होती. काठीने तिथलं सामान हलवून उंदराला खाली उडी मारायला लावणं हे माझं काम. ते मी चोख बजावलं. दुसरीकडे काठी फिरवून उंदराला आईच्या दिशेने जायला भाग पाडणं हे भावाचं काम. done. येणाऱ्या उंदराला बरोबर खराट्याखाली धरायचं. आईचं काम. खराट्याखालून त्याला कोळश्याच्या चिमट्याने धरून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं - माझं काम. पिशवीला गाठ मारून ती कचरा कुंडीमध्ये फेकून यायची - बाबांचं काम. दहा मिनिटात operation successful.

    सगळे आपापली आयुधं जागेवर ठेवून वळणार, तोच पुन्हा फ्रिजच्या मागून खुडबूड ... दुसरा उंदीर. पुन्हा एकदा व्यूहरचना, काठ्या, खराटा, चिमटा, उंदराची कचराकुंडीमध्ये रवानगी. आता आजीच्या झोपायच्या खोलीतल्या लाफ्टवरून आवाज. तिसरा उंदीर. बाथरूमच्या वरच्या माळ्यावर. चौथा उंदीर. आईबाबांच्या बेडरूममध्ये ... पाचवा. तिथेच अजून एक ... सहावा! हे म्हणजे जरा अतीच होत होतं. एका वेळी उंदीर पकडायचे म्हणजे किती ... टीम आता बऱ्यापैकी दमलेली होती. तरीही हातासरशी सहाव्याची कचराकुंडीमध्ये रवानगी केलीच. हुश्श म्हणून शेवटी एकदाचे सगळे बसणार, तोच पुन्हा स्वयंपाकघरात लॉफ्टवर खुडबूड. आता मात्र हद्द झाली. हा नक्की शेवटाचा असं म्हणून अखेरीस सगळे उठले. तर हा उंदीर म्हणजे घुशीच्या आकाराचा होता ... आजवर पकडलेल्या सगळ्यांचा बाप शोभावा असा. त्याला मी सराईतपणे लॉफ्टवरून हुसकलं. भावाने नेहेमीप्रमाणे आईच्या खराट्याच्या दिशेने ढकललं. पण हा पठ्ठ्या आईच्या दिशेने जाण्याऐवजी परत खालून सरळ उडी मारून पुन्हा लॉफ्टवर पोहोचला. जमिनीवरून लॉफ्टवर उडी मारणारा उंदीर आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. पुन्हा मी वरून हुसकल्यावर याच प्रसंगाची पुनरावृत्ती. दोन चार वेळा हे झाल्यावर उंदीर बहुतेक एवढी उंच उडी मारून दमला असावा. आता तो लॉफ्टवरून उतरायलाच तयार नव्हता. काठी त्याला लागून रक्त निघालं तरी हलत नव्हता. आता? शेवटी भावाने दुसरीकडून लॉफ्टवर काठी घातली, आणि उंदराने सरळ माझ्या अंगावर उडी मारली.

    "ईईईईईsssss" मी किंचाळले. त्यामुळे आई दचकली. ती बेसावध असताना उंदीर तिच्या समोरून फ्रिजच्या मागे जाऊन लपला.

    "आपण सगळे १० मिनिटाचा ब्रेक घेऊ या का? उंदीर सुद्धा किती दमलाय आता!" मी म्हटलं. प्रस्ताव एकमताने मंजूर झाला, आणि सगळ्यांनी एक छोटा ‘ड्रिंक्स ब्रेक’ घेतला. ब्रेक के बाद पुन्हा लढाईला तोंड फुटलं. उंदीर रक्तबंबाळ झालेला दिसत होता, पण थांबायला तयार नव्हता. काही केल्या तो खराट्याखाली येत नव्हता. "अरे बाबा, एवढा आकांताने पळू नकोस. इथे कुणाला तुझा जीव घ्यायचा नाहीये." मी म्हटलं. उंदीर काही ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नसावा. त्याचं पळणं आता स्लो मोशनमध्ये चाललं होतं. पण आमच्या काठ्या आणि खराटेसुद्धा एव्हाना स्लो मोशनमध्येच फिरायला लागल्यामुळे तो हाती लागत नव्हता. अर्धा पाऊण तास अशी लढत दिल्यावर अचानक तो गायब झाला. आमच्या दमलेल्या भिडूंनी बराच शोध घेतला, पण त्याचा थांगपत्ता लागेना. अखेरीस तो उंदीर हवेत विरून गेला हे मान्य करून सगळ्यांना माघार घ्यावी लागली. दिवसभर कुठे काही खुडबूडही ऐकू आली नाही.

    रात्री आईबाबांनी अंथरूण घालताना बेडखालचा ड्रॉवर उघडला, तेंव्हा सकाळचा पराक्रमी उंदीर ड्रॉवरच्या झाकणाच्या आत चादरीच्या घडीवर सापडला!

Tuesday, February 2, 2010

हरवलेला

घराच्या वस्तूशांतीच्या वेळची गोष्ट. भरपूर नातेवाईक मंडळी जमली होती. तीन चार दिवस घर एकदम गजबजलेलं होतं. वास्तूशांत झाली, घर शांत व्हायला सुरुवात झाली. एक एक पाहुणे मंडळी जायला लागली आणि घरातली एक एक वस्तू जागेवर यायला लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत घर मोकळं झालं, हळुहळू नॉर्मलवर येऊन पोहोचलं ... आणि तिला शोध लागला, एक चमचा गायब आहे! पाहुणे मंडळींपैकी कुणीतरी आपला चमचा ठेवून तिच्या चमच्यातला एक घेऊन गेलेत. लग्नाच्या आधी दोघांनी मिळून संसाराला लागणाऱ्या गोष्टींची यादी बनवून हौसेने केलेल्या खरेदीतला एक. दर बदलून आलेला चमचा वापरताना तिला हटकून त्याची आठवण येते. कुठे असेल बिचारा? आपला चमचा कसा ओळखू येत नाही या लोकांना? तेंव्हा स्वतःचा विसरले तसा हा सुद्धा कुठेतरी गळपटणार ... महिनेच्या महिने कुठल्यातरी डब्यात पडून राहणार, किंवा अजून कुठेतरी विसरलेला असणार ... धुवून आल्यावर पुसताना कुणी त्याच्याकडे बघून ओळखीचं हसणार नाही. त्याच्या बरोबरचे बाकीचे काय करताहेत या क्षणी याचा हळूच मनाशी हिशोब लावणार नाही. काय काय लिहून ठेवलंय बिचाऱ्याच्या नशिबात कोण जाणे. उरलेल्या पाचांशी त्याची आता जन्मात भेट नाही!

Thursday, January 21, 2010

अजून थोडे फोटो ... ३ (शेवटाचा भाग)

कूर्ग आणि उटीच्या भटकंतीमध्ये भेटलेली ही काही फुलं -
नुकत्याच पडलेल्या पावसाचा थेंब ... रस्त्याच्या कडेच्या रानफुलावर


कूर्गमधली जांभळी कोरांटी


कूर्गमध्ये आम्ही ज्या होम स्टे मध्ये राहात होतो, तिथलं, सकाळच्या उन्हातलं कुठल्यातरी फळभाजीच्या वेलाचं (मला ओळखता येत नाहीये) हे फूल


उटीच्या बोटॅनिकल गार्डनमधले २ फोटो ...

आम्ही उटीचं रोझ गार्डनही बघितलं ... पण रोझ गार्डनचं तिकिट आमच्या उत्साही ड्रायव्हरने काढून आणलं - प्रवेश करताना समजलं की त्याने आणि कॅमेऱ्याचं तिकिट काढलंच नव्हतं. तिकिट नाही म्हटल्यावर नवऱ्याने आत गेल्यावर कॅमेऱ्याला हात लावू दिला नाही. आत फोटो काढायचे म्हटलं तर दिवस पुरला नसता.

Wednesday, January 20, 2010

वाचणाऱ्या कामगाराचे प्रश्न

बेरटोल्ड ब्रेख्त हा एक जर्मन साहित्यातला दिग्गज. डाव्या विचारसरणीचा ब्रेख्त आपल्याला भेटलेला असतो तो पुलंनी मराठीत आणलेल्या ‘तीन पैश्याच्या तमाशा’मुळे, किंवा त्याने आणलेल्या रंगभूमीवरच्या नव्या प्रवाहांमुळे.

ब्रेख्तच्या एका कवितेचा हा मराठी स्वैर अनुवाद ...

*****************************************************

वाचणाऱ्या कामगाराचे प्रश्न

सात दरवाजे असणारं थेबेस कुणी बांधलं?
पुस्तकांमध्ये बांधणाऱ्या राजांचे उल्लेख आहेत.
हे राजे स्वतः त्या शिळा वाहत होते का?
आणि अनेक वेळा बेचिराख झालेलं बॅबिलॉन
इतक्या वेळा परत कुणी बांधलं? सोन्याने भरलेल्या लिमा शहराच्या
कुठल्या घरांमध्ये तिथले बांधकाम कामगार राहत होते?
चीनची भिंत बांधून पूर्ण झाल्यावर
संध्याकाळी तिथले सगळे गवंडी कुठे गेले?
भव्य रोममध्ये
कितीतरी विजयाच्या कमानी आहेत. कुणी बांधल्या या?
सिझरचे हे सगळे विजय कुणाविरुद्ध होते?
एवढा बोलबाला असणाऱ्या बायझांझमध्ये
सगळ्या रहिवाश्यांसाठी फक्त प्रासादच होते का?
महासागरामध्ये रात्री अटलांटिस बुडत होती तेंव्हासुद्धा
मालक त्यांच्या गुलामांना आज्ञा सोडत होते.
तरूण अलेक्झांडरने भारतात विजय मिळवले.
त्याने एकाट्याने?
सिझर गॉल्सशी लढला.
त्याने सोबत किमान एक आचारी तरी नेला असेल ना?
आपलं आरमार बुडाल्यावर स्पेनचा फिलिप रडला.
दुसरं कुणीच रडलं नाही?
पानापानागणिक विजय.
विजयाच्या मेजवानीसाठी कोण खपलं?
दर दहा वर्षांकाठी एक महापुरुष.
त्याची किंमत कोण चुकती करतं?
इतक्या गोष्टी,
इतके प्रश्न.


*****************************************************

मीही कामगारच आहे. जरा ‘ग्लोरिफाईड’ कामगार म्हणा फार तर. ब्रेख्तच्या कामगाराएवढं माझं जगाच्या इतिहासाचं वाचन नाही. पण आपल्या इतिहासातला ‘सोन्याचा धूर निघणारा काळ’ वाचताना मलासुद्धा हे प्रश्न पडले होते :)


मूळ जर्मन कविता इथे सापडेल.

येणार ... येणार ...(वरतीमागून घोडं)

एव्हाना ब्लॉगर्स मेळाव्याचे वृत्त, छायाचित्र सगळ्या सहभागी ब्लॉगर्सनी टाकली आहेत. तेंव्हा ही पोस्ट पेठे काका आणि सर्व संयोजकांचे आभार मानण्यासाठी. मुख्य म्हणजे एक दिवसाचा मेळावा यशस्वी झाला अशी घोषणा करून आपले संयोजक स्वस्थ बसलेले नाहीत. मेळाव्यात ठरल्याप्रमाणे मराठी ब्लॉगर्ससाठी फोरम तयार करणे, नवीन ब्लॉग मराठीतून सुरू करण्यासाठी मार्गदर्शन यासाठी त्यांनी काम सुरू केलं आहे. या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मला करता येण्यासारखी काही मदत असेल तर नक्की सांगा रे.

Tuesday, January 12, 2010

अजून थोडे फोटो ... २

कूर्ग बघून झाल्यावर २ दिवस जास्तीचे ठेवले होते ... त्यामुळे उटीला जाऊन यायचं ठरलं. असं काहीही पूर्वनियोजन न करता भटकण्यामध्ये मस्त मजा असते. काहीच अपेक्षा नसताना जे काही अनुभवायला मिळतं, ते सगळं बोनस असतं ना :)

दोड्डाबेट्टा म्हणजे निलगिरी पर्वतामधलं सगळ्यात उंच शिखर. दोड्डाबेट्टाला गाडीतून जाता येतं. वरून निलगिरीचं सुंदर दृष्य दिसतं ...हे उटीमधलं लेक: 
पयकारा हे उटीजवळचं गाव. हिरव्यागार टेकड्या, सुंदर तळं, छोटासा धबधबा, पार्श्वभूमीला निलगिरीच्या रांगा अशी ही रमणीय जागा आहे. पयकाराच्या या टेकडीच्या परिसरात कित्येक बॉलिवूडपटांचं चित्रीकरण झालेलं आहे:पयकाराजवळच्या मुदुमलई पॉईंटवरून दिसणारं हे मुदुमलईचं जंगल ...म्हैसूरला परत जाताना जवळ तासभर वेळ होता, म्हणून वाटेत नंजनगूडचं मंदिर बघायला थांबलो. नंजनगूड देवळातला लाकडी रथ
उटीची सहल तिथल्या बोटॅनिकल गार्डनला आणि रोझ गार्डनला भेट दिल्याखेरीज पूर्ण होऊच शकत नाही. तिथली फुलं ब्रेक के बाद.

Friday, January 8, 2010

अस्वस्थ करणारी गोष्ट

    ऍनच्या ८० व्या वाढदिवसाची बातमी पाहिली तेंव्हापासून लिहायचं होतं तिच्याविषयी. महेंद्र काकांनी शिंडलर्स लिस्टविषयी लिहिलं आणि पुन्हा आठवण करून दिली.

***********************************************

    ऍन फ्रॅंक पहिल्यांदा भेटली कॉलेजमध्ये असताना. तिच्या डायरीचा मराठी अनुवाद वाचताना. पहिल्या भेटीतच चटका लावून गेली, पण आधाश्यासारखं वाचत गेलं म्हणजे वाचलेलं पचवायला फारसा अवधी मिळत नाही. हळुहळू मी तिला विसरले.
    पुढच्या वेळी आमची भेट झाली ती स्टाइलिस्टिक्समध्ये ... भाषांतर कसं करू नये याचा उत्तम नमुना म्हणून! ऍन फ्रॅंकने तिची डायरी लिहिली डच भाषेत. डच मधून जर्मन, इंग्रजी, फ्रेंच अशी ती हळुहळू वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होत होत जगभर पोहोचली. प्रत्येक भाषांतरकारने `ये हृदयीचे ते हृदयी' करताना थोडंफार गाळलं होतं, आणि एका भाषांतरावरून दुसरं भाषांतर अशी भाषांतरं झाल्यामुळे कानगोष्टींसारखी गत झाली होती. मूळ डयरी म्हणजे पौगंडावस्थेतल्या ऍनची जीवाभावाची सखी होती. त्यात तिने आपल्या आईवडिलांविषयी, नव्यानेच जाग्या होत असणाऱ्या लैंगिक जाणिवांविषयी मोकळेपणाने लिहिलं होतं. ही भाषांतरावरून केलेली भाषांतरं अधिकधिक सोज्ज्वळ होत गेली, आणि त्याच वेळी खऱ्या ऍनपसून दूरही. या अभ्यासाच्या निमित्ताने ऍनची डायरी इंग्रजी, मराठी, जर्मन मधून वाचली. त्या वेळी आमच्यावर हिटलर, थर्ड राईश आणि दुसऱ्या महायुद्धाविषयीच्या इतक्या पुस्तकांचा मारा होत होता, की ऍन पुन्हा एकदा विस्मृतीमध्ये गेली.

    पुन्हा एकदा वर्षभरापूर्वी ऍनच्या भेटीचा योग आला ... ऍमस्टरडॅम बघताना. इतक्या वर्षांपासून माहित असलेली गोष्ट. नुकतीच डाखाऊची छळछावणी बघितलेली. एवढ्या छळकथा ऐकल्यावर अजून काय धक्का बसणार ऍनचं घर बघताना? त्यामुळे गावातल्या टूरिस्ट ऍटॅक्शन्सपैकी एक आयटम - आलोच आहोत तर बघू या असा दृष्टीकोन होता ऍन फ्रॅंक म्युझियमला जाताना. पण ऍनने पुन्हा एकदा रडवलं. अंगावर येणाऱ्या त्या छोट्याश्या जिन्याने वर जाताना ऍनच्या डायरीमधलं वास्तव समोर आलं. एवढ्याश्या जागेत महिनोनमहिने एवढी माणसं कशी राहिली असतील? बिग बॉसचा पहिलाच एपिसोड बघून मी नवऱ्याला म्हटलं होतं ... कुणी मला कितीही पैसे दिले तरी अश्या बंदिस्त घरात मी दोन दिवसांच्या वर काही नॉर्मल राहू शकणार नाही. दिवसरात्र घरातच राहायचं. घराबाहेर पडणं सोडा, पण खिडकीचा पडदासुद्धा वर करायचा नाही. दिवसा कामगार खाली काम करत असताना पाण्याचा नळ, फ्लश असले आवाज होऊ द्यायचे नाहीत. रात्री खालच्या कारखान्यातली माणसं घरी गेली, म्हणजे थोडी फार मोकळीक जिन्याने खाली - वर करायला, थोडा आवाज करायला. देश जर्मनीच्या कब्जामध्ये. जगभर युद्ध पेटलेलं. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा. त्यात कधी नव्हे तेवढा कडक हिवाळा. बाहेरच्यांनी जिवावर उदार होऊन त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तू कश्या पुरवल्या असतील? गोष्ट एका दिवसाची नाही. महिने च्या महिने असं जगायचंय. हा अज्ञातवास कधी संपणार माहित नाही. त्यांचं मनोबल कसं टिकून राहिलं असेल? असं दिवाभीतासारखं अनिश्चिततेमध्ये जगण्यापेक्षा छळछावणीतल्या यातना परवडल्या असं नसेल वाटून गेलं या माणसांना? खिडक्यांच्या पडद्याच्या फटीतून बाहेर बघताना बारा तेरा वर्षाच्या ऍनला कसं दिसलं असेल जग?

    काही दिवसांपूर्वी जर्मन बातम्यांमध्ये ऐकलं ... ऍन फ्रॅंक आज जिवंत असती तर ८० वर्षांची झाली असती. ८० वर्षांच्या आयुष्यात बघावं लागणार नाही एवढं तिने १५ - १६ वर्षात भोगलंय. ऍन कशी म्हातारी होईल? जगायला उत्सुक असणारी एक टीनेजर मुलगी म्हणून ती मनाच्या कोपऱ्यात कायमची जाऊन बसलीय.

***********************************************

    ऍनच्या आयुष्यावर ऑस्कर विजेता हॉलिवूडपट आहे. पुन्हा एकदा तिचं आयुष्य अनुभवायची माझी तरी तयारी नाही सद्ध्या. पण तुम्हाला मिळाला तर आवश्य बघा.

(ऍनचं छायाचित्र जालावरून साभार)

Wednesday, January 6, 2010

अजून थोडे फोटो ...१

‘बेपत्ता’ मालिकेतल्या फोटोंची ही पुढची इन्स्टॉलमेंट :)

इरुप्पूच्या वाटेवरइरुप्पू धबधब्याजवळची खासियत ... ’blue flutter' फुलपाखरेआणि हा इरुप्पू धबधबा -कॉफीची फुलंमडिकेरीजवळ ऍब्बे फॉल्स
दलाई लामा भारतात आश्रयाला आल्यावर तिबेटी निर्वासितांसाठी ज्या वसाहती तयार केल्या, त्यातली एक बैलकुप्पेची. बैलकुप्पेचं तिबेटी ‘गोल्डन टेंपल’कुशालनगरच्या ‘निसर्गधाम’ शेजारची कावेरीडुब्बरेचा एलिफंट कॅम्प ... इथे तुम्हाला हत्तींना आंघोळ घालायची संधी मिळते. हत्ती मस्त नदीच्या पाण्यात झोपलाय, आणि चार माणसं (प्रत्येकी शंभर रुपये मोजून) मोरी घासायच्या ब्रशने हत्ती घासताहेत :Dही डुब्बारेची कावेरी ... भागमंडला असो, नंजनगुड असो, श्रीरंगपट्ट्ण असो की कुशालनगर ... कावेरी सगळीकडेच सुंदर दिसते!तलकावेरी हे कावेरीचं उगमस्थान. तलकावेरीच्या टेकडीवरून परिसराचं विहंगम दर्शन होतं. बाराच्या उन्हात अनवाणी चारशे पायऱ्या चढाव्या लागल्या, तरीही worth it.
हे झाले कूर्गमधले काही फोटो. ऊटी, पयकारा आणि फुलांचे फोटो ब्रेक के बाद ...