Sunday, January 31, 2016

अलिबाग - आवास - सासवण्याची भटकंती

    मागच्या आठवड्यात एक कोकणाची छोटीशी भटकंती झाली. अलिबागजवळचं आवास गाव, अलिबागचा कुलाबा किल्ला, सासवण्यांचं शिल्पकार करमरकरांचं संग्रहालय हे बघितलं. अलिबागची कान्होजी आंग्रेंची समाधी संध्याकाळी सहाला बंद होते त्यामुळे ती बघता आली नाही, आणि चढू न शकणार्‍या मेंबरांची संख्या आणि ऊन बघून कनकेश्वरला जायचं कॅन्सल केलं. हे या भटकंतीचे काही फोटो:


आवासचा समुद्रकिनारा
    आवासला "जोगळेकर कॉटेजेस"ला उतरलो होतो त्यांच्या जागेत मुचकुंदाचं झाड होतं. मुचकुंदाची फुलं बघितली होती, पण फळं पहिल्यांदाच बघायला मिळाली.
मुचकुंदाची फळं

आवासचा किनारा
    किनार्‍याच्या जवळंच एका वेलाला मस्त शेंगा होत्या. नाव - गाव काही आठवत नव्हतं, पण हे विषारी किंवा हात न लावण्याजोगं असावं एवढंच आठवलं:

दिसताहेत की नाही मस्त? या खाजकुयलीच्या शेंगा आहेत!
ही आहेत खाजकुयलीची फुलं.

    सासवण्याला शिल्पकार करमरकरांच्या घरचं संग्रहालय छोटंसं पण छान आहे. त्यांच्या पुतळ्यांचे अंधळे - छोट्या बाळांचे - मोठ्यांचे - प्राण्यांचे - घारे - पिंगे - काळे असे वेगवेगळ्या प्रकारचे डोळे फार बोलके असतात. ही त्यांच्या एका प्रसिद्ध शिल्पाची प्रतिकृती:     कुलाब्याचा (अलिबागचा) किल्ला छोटासा, पण बघायला छान आहे.  किल्ल्यात एक माहितीफलक आहे, बाकी गाईड वगैरे चोचले नाहीत. मुंबईचे इंग्रज आणि जंजिर्‍याचा सिद्दी अशा दोन शत्रूंवर मराठ्यांना इथून नजर ठेवता येई. भरती - ओहोटीच्या वेळा नीट बघून इथे जायला हवं. ओहोटीला चालत / घोडागाडी घेऊन आणि भरतीला तरीतून किल्ल्यात जाता येतं.

    आवासहून येतांना गावात (कोरड्या ठिकाणी) दोन मोठे शंख दिसले म्हणून उचलून पुण्याला आणले. पुण्याला आल्यावर धुण्यासाठी ते पाण्यात टाकले. जरा वेळाने बघितलं तर त्यातल्या गोगलगायी फिरायला बाहेर निघाल्या होत्या! आता या शंखांचं काय करायचं हा प्रश्न आहे. :)

***

   या ट्रीपच्या वेळी साहजिकच कोकणाची याच्या आधीची ट्रीप आठवली. असाच जानेवारी महिना. सव्वीस जानेवारी आणि वीकेंडच्या मधला एक दिवस सुट्टी काढून गेले होतो तेंव्हा. तिथे ऑफिसच्या कामासाठी रात्री अकरा – साडेअकराला फोन. तो घेतला नाही म्हणून केवढं रामायण, खोटे आरोप, मनस्ताप! बरंच झालं ... ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती. आतापर्यंत मी जो विचार करायचा टाळत होते तो या निमित्ताने केला आणि अखेरीस निर्णय घेतला – आता पुरे. ज्यातून आपल्याला काहीही आनंद मिळत नाही अशा कामासाठी यापुढे दिवसरात्र एक करून राबायचं नाही. पुढे काय करणार काहीही ठरलेलं नसताना चक्क राजिनामा देऊन टाकला, आणि एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलं. थोडे दिवस मनसोक्त भटकंती केली, सुट्टी उपभोगली, कालपर्यंत आपण कंपनीचं आयडी लावून, आयडेंटिटी घेऊन जगत होतो, आता खरी / वरवरची / खोटी कुठली आयडेंटिटी (आणि महिन्याला मिळणारे पैसेही) नाहीत हेही अनुभवलं. मग माऊ आली आणि तिने अजून मोठ्ठी, अर्थपूर्ण आयडेंटिटी देऊ केली. काही दिवस फक्त मी आणि माऊ असेही एन्जॉय केले, आणि मग आपल्याला ज्यातून आनंद मिळेल अशा कामाचा शोध सुरू झाला. सुदैवाने तसं काम सापडलंही! या ट्रीपला जातांनाही थोडं काम मी सोबत घेऊन गेले होते. त्यासाठी मुद्दाम थोडा वेळ काढून ते संपवलं. ते करतांना आपला ट्रीपचा वेळ वाया गेला असं अजिबात वाटलं नाही, आणि मागच्या वेळच्या ट्रीपमुळे आपला केवढा मोठा फायदा झालाय हे जाणवलं!!!

Wednesday, January 20, 2016

डोळे असून ...

मी गेली आठ वर्षं तरी या सोसायटीमध्येच राहते आहे, आणि वर्षभर रोज माऊला शाळेच्या बससाठी सोसायटीच्या गेटवर सोडते आहे. गेटजवळ एक ऑस्ट्रेलियन बाभळीचं झाड आहे. आजपर्यंत एकदाही डोकं वर करून या झाडाकडे नीट मनापासून बघितलं नव्हतं. (ऑस्ट्रेलियन बाभळीत काय बघाण्यासारखं असायचंय?) आज त्या झाडाची एक शेंग खाली बेंचवर पडलेली माऊने उचलली. तिच्या मित्राच्या आईने दाखवलं तेंव्हा पहिल्यांदा मी या शेंगेतल्या बिया बघितल्या, आणि थक्क झाले!

आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा कोपर्‍यामध्ये निसर्गाची इतकी अद्भुत कलाकारी बघायला मिळते, आणि आजवर हे न बघणारे आपण किती करंटे आहोत हे परत जाणवतं. मळकट तपकिरी शेंगा, छोट्या काळ्या बिया. पण त्या बियांना शेंगेशी जोडणारे तंतू इतके सुंदर! इतक्या वर्षात एकदाही हे दिसू नये माझ्या नजरेला?!


(फोटो खाली पडालेल्या शेंगेचे आहेत ... त्यात दिसणारी पानं दुसर्‍या झाडाची आहेत. )