Wednesday, March 13, 2019

माऊली

पुण्यातल्या बहुसंख्य सोसायट्यांप्रमाणे आमच्याकडेही मधे कबुतरांनी उच्छाद मांडला होता. त्यानंतर सोसायटीमध्ये मांजरांची एन्ट्री झाली, आणि कबुतरांच्या शिकारी व्हायला लागल्या. कबुतरांची संख्या जरा नियंत्रणात आली. पण मग दर अडीच महिन्यांनी माऊची पिल्लं यायला लागली. या सगळ्या माऊ अगदी सहनशील. पोरांनी कितीही छळलं, तरी अजिबात पंजा न मारणार्‍या. पण एवढी मुलं पिल्लांना हाताळणार म्हणजे त्यांचे हालच. त्यामुळे खाली खेळायला जातांना रोज मी घरच्या माऊला आधी सांगायचे ... खाली माऊच्या पिल्लांशी खेळायचं नाही, माऊला हात लावायचा नाही. मलाच हे फार अवघड जात होतं, मग माऊची काय अवस्था. किती वेळा माऊने आणि सखीने माझी यावरून बोलणी खाल्ली असतील.
ही पिल्लं काही महिने दिसायची, मग नाहीशी व्हायची. परत नवी पिल्लं. या वेळची तर पिल्लं चक्क पूल टेबलच्या आत घातली होती. एकदम सुरक्षित जागा. पण त्यामुळे सगळी पोरं पूल टेबलवर चढून पिल्लांशी खेळायला लागली. मांजरांचा बंदोबस्त करायलाच हवा असं ठरलं. मोठीचं ऑपरेशन करायचं ठरलं, पिल्लांसाठी कोकणात एक घर शोधलं. पिल्लं आपल्या घरी जाईपर्यंत त्यांना कुणीतरी घरी सांभाळावं असं ठरलं. आणि सखीची आई पिल्लांना घरी सांभाळायला घेऊन आली. दोन दिवस सखीकडे, मग दोन दिवस माऊकडे असा पिल्लांचा पाहूणचार सुरू झाला.


 तीन पिल्लांच्या तीन तर्‍हा हळुहळू आम्हाला कळायला लागल्या. लक्सा, पेबल्स, ल्युसी अशी मुलांनी खाली पिल्लांची बारशी केली होती. लक्सा सगळ्यात मोठा, शहाणा आणि शांत. माझा लाडका.

पेबल्या एक नंबरचा मस्तीखोर. हळूच येऊन हाताला चावणार. लक्श्या झोपला असला तरी त्याच्या खोड्या काढणार. पायात पायात येणार. आणि सगळ्यांना चाटून पुसून मस्त स्वच्छ पण करणार.

ल्युसी या दोघांपेक्षा नाजुक दिसणारी. पण हिची नखं एकदम डेंजर. आणि दादा लोकांशी बरोबरीने भांडणारी. पेबल्या, लक्श्या लाडाने मांडीवर येऊन बसतील, झोपतील. ही बया स्वतः तर यायची नाहीच, त्यांनाही उठवेल.

दिवसभर नुसता यांचा दंगा बघत बसावं.


दरम्यान त्यांच्या आईचं ऑपरेशन झालं, चार दिवस विश्रांती घेऊन ती काल सोसायटीमध्ये परतली. आल्यावर तिने पिल्लं शोधायला सुरुवात केली. एवढी मोठी पाचशेवर घरं असणारी सोसायटी, पण इथे आपली पिल्लं कोणाकडे असणार हे कसं लक्षात आलं हिच्या? माऊ आणि सखीची आई यांना पाहिल्याबरोबर ती यांच्या मागे लागली, पिल्लांना भेटवा म्हणून. पिल्लं आपल्याच दंग्यामध्ये मग्न. त्यांनी काही फार उत्सुकता दाखवली नाही आधी. मग दूध प्यायचा प्रयत्न केला. हिचं ऑपरेशन झालेलं, चार दिवसात दूध पाजलेलं नाही. त्रास होत असणार त्यामुळे.  ती काही पाजू शकली नाही पिल्लांना. मग पिलांना परत वर घरी आणलं. ही लिफ्टमध्ये काही येईना. तिथेच बाहेर घोटाळत राहिली. अर्धा – एक तास तरी लिफ्टजवळच बसून असेल ती. भेटवावं का हिला परत पिल्लांना? रात्री सखीची आई आणि मी परत खाली आलो. जरा शोधल्यावर जिन्याजवळच सापडली ही. तिला घरी आणलं. पिल्लांना पोटभर भेटायला दिलं. पिलांनी थोडं दूध प्यायचा प्रयत्न केला, आईच्या कुशीत शिरली. आईने त्यांना पोटभर चाटलं. पिल्लं परत सुटी खेळायला लागली. नेहेमी मस्ती करणारा पेबल्या तेवढा आईच्या मागेमागे करत होता.  मग हिला खाली नेऊन सोडली.
आज पिल्लांचा कोकणात जायचा दिवस. तिथे त्यांना भरपूर मोकळी जागा मिळणार हुंदडायला. छान घर मिळणार कायमचं. पहाटे लवकर जायचं होतं त्यांना. पिल्लं गेली, आणि घर एकदम शांत वाटायला लागलं. माऊ जागी असून सुद्धा. थोड्या वेळाने दारात म्याव म्याव ऐकू आलं. बघते, तर आई! सात – आठ जिने चढून आली ही पिल्लांना भेटायला! पिल्लं कुठे आहेत? तिचा प्रश्न तिच्या डोळ्यात सहज वाचता येत होता. तिच्या तोंडावर दार बंद करायची काही हिंमत झाली नाही माझी. पिल्लं नाहीत. पिल्लं खूप दूर, त्यांच्या नव्या घरी गेलीत. आता परत नाही भेटणार ग ती तुला. त्यांना मस्त घर मिळालंय, मजेत राहतील. हे सगळं समजावताना मला तिने बोललेलं ऐकू येत होतं... माझी पिल्लं आहेत ना? मला न विचारता कशी नेली तुम्ही? नवं घर, मोठं घर, कायमचं घर जे काय असेल ते – माझं घर नाहीये ना ते? मला परत पिल्लं नकोत हे तुम्ही ठरवणार, माझ्या पिल्लांना चांगलं घर कुठलं हेही तुम्हीच ठरवणार. मला तरी घेऊन चला तिकडे! चार दिवसांचा तुमचा सहवास, तुम्हाला पिल्लं घरून गेल्यावर उदास वाटतंय. मला?
सकाळी पिल्लं दूध अर्धवट पिऊन गेली, त्या उरलेल्या दुधाकडे ढुंकूनही बघितलं नाही तिने. घरभर फिरली, थोडा वेळ झोपली, पुन्हा घरभर फिरली असं कितीतरी वेळ चाललं होतं तिचं. शेवटी मग सोबत बघून तिला लिफ्टमधून खाली पाठवली. ती पुन्हा चढून सखीच्या घरी गेली ... पिल्लं तिथे तरी आहेत का ते बघायला. त्या घरात पिल्लांच्या बस्कराचा वास घेतला, त्यांची खेळणी हुंगली. जरा वेळाने पुन्हा ही हिरकणी सगळे जिने चढून माझ्याकडे येईल. तिला तोंड द्यायची हिंमत कशी गोळा करू हा प्रश्न आहे.