Thursday, July 21, 2011

कुसुमाग्रज: सूत्रबंधन


‘समिधा’ मधूनच, पुन्हा एकदा.

**************************************************

सूत्रबंधन

    निवडुंगाच्या फडातून मला कण्हण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी जवळ जाऊन पाहिले.

    विदीर्ण झालेला एक मोठा थोरला पतंग काट्यांच्या शरपंजरी पडला होता.

    मी चौकशी करताच आपली कहाणी तो मला सांगू लागला,

    "आकाशात मी खूप उंच गेलो होतो." तो म्हणाला, "कागद असून सुद्धा पक्ष्यांसारखा मी आभाळावर संचार करीत होतो. जमिनीवरून स्वप्नांसारखे भासणारे मेघ आता आपल्या जवळ आले आहेत असे मला वाटाले. आनंदाने आणि अभिमानाने मी धुंद झालो. आणखी खूप वर जायचे, चांदण्यांच्या जगात प्रवेश करायचा असे मी ठरविले.

    "तेवढ्यात माझी आणि एका पक्ष्याची आभाळात भेट झाली. त्याच्या फडफडणार्‍या क्षुद्र पंखांची आणि रंगहीन सौंदर्याची मी कुचेष्टा केली आणि त्याला सांगितले: तू आकाशात संचार करणारा आहेस पण मी आकाशाला जिंकणारा आहे.

    "पक्षी उत्तरला नाही. माझ्यामागे जमिनीपर्यंत खाली गेलेल्या सुत्राकडे त्याने एक तिरस्काराचा कटाक्ष टाकला आणि तो पुढे निघून गेला.

     "ती अवहेलना मला सहन झाली नाही. या सूत्रबंधनामुळे मी आकाशावर विजय मिळवतो असे या पक्ष्यांना वाटते काय? माझे स्वतंत्र सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी मी आवेशाने ते बंधन तोडले. थोडा वेळ मी आणखी उंचावर गेलो --

     आणि नंतर वार्‍यावर हेलकावे खात या निवडुंगात येऊन पडलो!"

Tuesday, July 19, 2011

कुसुमाग्रज: आकाशाचे ओझे

कुसुमाग्रज, समिधा संग्रह.

*****************************************

आकाशाचे ओझे

    एका उंच पिंपळाच्या शिखरावर ती लहानशी चिमणी बसली होती. आपले दोन्ही पंख तिने पसरले होते.

    सारे बळ एकवटून पिंपळाचा शेंडा तिने कवळून ठेवला होता.    ती हालत नव्हती, चिवचिवत नव्हती.तिच्या चेहर्‍यावर काही विलक्षण गांभीर्य दिसत होते. तिच्या इवल्याशा डोळ्यांतून विलक्षण तेज ओसंडत होते. 

    क्षण गेले, घटका गेल्या, दिवस जाऊ लागला; पण ती होती तशीच राहिली.
    तिच्या आप्तमित्रांना नवल वाटले. अनेक चिमण्या तिच्याजवळ चिवचिवत आल्या आणि विचारू लागल्या, ‘चिऊताई, हे असं काय करता हो? काय होतंय् तुम्हाला?’

    ती बोलता बोलेना. एकाग्र दृष्टीने नुसती त्यांच्याकडे पाहात राहिली.
     सर्व चिमण्या चिवचिव करीत तिच्याजवळ सरकू लागल्या. तिला काय होतंय हे पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या.
     त्याबरोबर ती एकदम आवेशाने ओरडली, ‘मागे सरा. मला धक्का लावू नका! नाहक सार्‍या पृथ्वीचा नाश होईल!’

    चिमण्यांना काहीच कळेना. सार्‍याच गोंधळात पडल्या. शेवटी एक चतुर चिमणी पुढे येऊन म्हणाली, ‘चिऊताई, पंख उघडून तुम्ही गंभीरपणाने पिंपळावर का बसल्या आहात हे आम्हाला कळलंच पाहिजे. नाही तर आम्ही सर्वजणी मिळून तुम्हाला इथून उठायला लावू! या पिंपळावर तुमची एखादी आळई किंवा काडी हरवली आहे काय?’

    ‘आळई किंवा काडी?’ चिऊताई उद्वेगाने हसून म्हणाली, ‘क्षुद्रांच्या मनात क्षुद्र विचारच येणार! बायांनो, मी आकाशाचं ओझं माझ्या पंखांवर उचलून धरलेलं आहे!’

    ‘म्हणजे?’ सर्वजणी चिवचिवल्या!
    ‘त्याचं असं झालं’ चिऊताई सांगू लागल्या, ‘आज सकाळी या पिंपळावर बसून मी उडण्याच्या विचारात असता एक भयंकर आवाज आला आणि सारं आकाश खाली कोसळून पडलं! सर्वांत उंच अशा या झाडावर मी असल्यानं ते अर्थातच माझ्या पंखावर आलं. तेंव्हापासून ते प्रचंड ओझं मी उचलून धरलं आहे. मी उठले तर आकाश खाली पडेल आणि पृथ्वीचा चक्काचूर होईल, सार्‍या प्राणिमात्रांचा नाश होईल!’

    चिमाण्यांनी तिची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला. आकाश पडत नाही आणि पडलं तरी आपल्या पंखांमुळे अडत नाही असं सर्वांनी तिला सांगितले.

    --पण तिची समजूत पटली नाही. चिमण्या निघून गेल्या आणि आकाशाचे ओझे पंखावर घेऊन ती चिमणी बसून राहिली! 

Monday, July 18, 2011

कुसुमाग्रज: सप्तर्षी

कुसुमाग्रज, समिधा संग्रहातून.
************************************************

सप्तर्षी

    ते सातही ऋषी वृद्ध होते.

    त्यांच्या पांढर्‍या सफेत दाढ्या छातीच्या खाली गेल्या होत्या आणि डोक्यावरील शुभ्र जटा रुप्याच्या उंच टोपांसारख्या दिसत होत्या.

    एकमेकांत ठराविक अंतर ठेवून ते ध्रुवाच्या भोवती प्रदक्षिणा घालीत होते.

    कोणीही बोलत नव्हते, थांबत नव्हते अथवा इकडेतिकडे पाहात नव्हते. खाली मान घालून सारेजण चालत होते.

    त्यांची निष्ठा अपूर्व होती. निष्ठेनेच त्यांच्या वृद्ध पायांत अदम्य सामर्थ्य निर्माण केले होते.

    त्यांचा हा अनंतकालीन प्रवास चालू असताना एकदा काहीतरी उत्पात झाला आणि एक मोठा थोरला धूमकेतू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला.

    अवकाशात स्वच्छंदाने मुशाफिरी करणार्‍या धूमकेतूला त्या सात वृद्ध ऋषींचा हा उपक्रम पाहून नवल वाटले. तो कुतुहलाने त्यांच्याबरोबर चालू लागला आणि चालता चालता त्याने विचारले,

    "मुनींनो, का आपण असं भ्रमण करीत आहात?

    कोणीही त्याला उत्तर दिले नाही. सर्वांनी त्याच्याकडे एकेक कटाक्ष टाकला आणि आपला प्रवास पुढे चालू ठेवला.

    धूमकेतूने सभोवार पाहिले. सात ऋषींच्या मागे एक वृद्ध स्त्रीही झपाट्याने चालत असलेली त्याला आढळली.

    त्याने विचारले, "ऋषिजनहो, ती स्त्री आपल्या पाठीमागे लागली आहे म्हणून आपण असे फिरता आहात काय?"

    सर्वजण संतप्त आणि उद्विग्न झाले. आता बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. "आम्ही सर्वजण अनंतकाळापासून त्या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालीत आहोत!" एक ऋषी म्हणाला.

    "कशाकरिता?"

    "हे पूजन आहे, ही भक्ती आहे!"

    "परंतु या भक्तीने तुम्ही आपल्या दैवताच्या जवळ जाऊ शकता का? पूर्वीइतकेच तुमच्यापासून ते दूर आहे!

    ऋषिमंडळ काहीसे विचलित झाले. परंतु एकजण निग्रहाने उत्तरला, "आमचं सुख साधनेचं आहे, साध्य संपादनाचं नाही!"

    "तुम्ही खरोखरी सुखी आहात काय?" धूमकेतूने विचारले.

    सातही ऋषींचे चेहरे अस्वस्थतेने भारावून गेले.

    धूमकेतू म्हणाला, "मला वाटतं, अन्तराळात तुमच्याइतकं दुःखी कोणीही नाही! माझ्याबरोबर तुम्ही प्रवासाला येता का? या असीम आकाशातील अनेक सौंदर्यं मी तुम्हाला दाखवीन. रंगीत पिसारा फुलवणारा व्याधाचा तारा, शुभ्र संथ तेजाची धार धरणारी शुक्राची चांदणी, चंद्रांची माळ गळ्यात घालून फिरणारा शनी, श्वेतकमलं जिच्यात उमलली आहेत ती आकाशगंगा! आपण याल तर -- "

    ऋषींनी असहायपणे परस्परांकडे पाहिले. ‘हो’ म्हणण्याचे सामर्थ्य अथवा धैर्य आता कोणातही राहिले नव्हते.

    "आमची निष्ठा अचल आहे. कोठलंही सौंदर्य आम्हाला मोह पाडू शकत नाही!" एक जण कसाबसा उत्तरला.

    धूमकेतू निघून गेला आणि ऋषिमंडळ पूर्ववत् खाली मान घालून प्रदक्षिणा घालू लागले! पण ती निष्ठा --

Sunday, July 17, 2011

कुसुमाग्रज: चांदणी

पुन्हा एकदा ‘समिधा’. खूप वर्षांनी हा संग्रह वाचायला घेतलाय, आणि किती तरी कविता नव्यानेच भेटताहेत. त्यातल्या काही इथे तुमच्याबरोबर शेअर करायचा मानस आहे.

चांदणी

    शुक्राची तेजःपुंज चांदणी पाहून तो वेडा झाला.

    त्याने शुक्रावर जावयाचे ठरवले.

    आपले अर्धे आयुष्य खर्च करून त्याने एक प्रचंड शिडी तयार केली.

    आणि एके दिवशी तो शुक्रावर चढून गेला.

    संतुष्ट दृष्टीने त्याने तेथून आकाशाकडे पाहिले.

    शुक्राइतकीच तेजःपुंज अशी एक नवी चांदणी आकाशात तळपत होती.

    उर्वरित अर्धे आयुष्य खर्च करून त्याने पुन्हा एकदा एक प्रचंड शिडी सिद्ध केली. आणि तो पृथ्वीवर आला!

Saturday, July 16, 2011

कुसुमाग्रज: तपश्चर्या

अजून एक ‘समिधा’ मधली लाडकी कविता ...


तपश्चर्या

    पारिजातकाच्या झाडास त्या वेळी अशी सुंदर सुगंधी फुले येत नव्हती. कसला तरी गंधहीन आणि सौंदर्यहीन मोहर येई आणि मातीला मिळून जाई.

    इतर वृक्षांचे आणि फुलझाडांचे वैभव पाहून पारिजातकाच्या अंतःकरणात आसूया उत्पन्न झाली. तो दुःखी होऊ लागला.

    सभोवारची सुंदर झाडे त्याच्या दुःखाची कुचेष्टा करू लागली. त्याच्या विषादाचे विडंबन करू लागली!

    पारिजातकाने ठरवले, जगातील कोणत्याही वृक्षाजवळ नसलेले वैभव आपण मिळवले पाहिजे, वाटेल ते करून सर्व वनस्पति-सृष्टीत श्रेष्ठत्व संपादन केले पाहिजे.

    त्याने तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.

    त्याच्या नम्र मस्तकावरून कालप्रवाहाच्या असंख्य लाटा गेल्या, अगणित वादळे गेली, अनेक वणवे गेले.

    पण त्याचा निर्धार ढळला नाही. तो खाली मान घालून तपश्चर्या करीत राहिला.

    अखेर त्याचे तप सफल झाले, परमेश्वर त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. ‘वर माग’ म्हणून पारिजातकास त्याने आज्ञा केली.

    तपाला बसतेवेळी मनात असलेली इच्छा पारिजातकाने, दीर्घ श्रमांच्या ग्लानीमध्ये बोलून दाखवली.

    तो म्हणाला - चांदण्यासारखी सुंदर, निशिगंधासारखी शुभ्र, कमलासारखी आरक्त, त्यांचा गंध मधुर आहे, पण उद्दाम नाही अशा फुलांचा विपुल फुलोरा मला लाभावा.

    ईश्वराने त्याची इच्छा सफल केली. स्वर्गात शोभण्यासारख्या सुंदर फुलांनी पारिजातक बहरून गेला. जणू असंख्य स्वप्नांचा थवाच त्याच्या फांद्यांवर येऊन बसला होता!

    परिमलाच्या द्वारा त्याच्या वैभवाचे वृत्त सार्‍या रानात पसरले. सर्व वृक्ष त्याच्यापुढे नम्र झाले. त्यांनी पारिजातकाचा जयजयकार केला.

    पारिजातकाने डोळे उघडले. आपले अतुल वैभव त्याच्या दृष्टीस पडले. त्याची ग्लानी उतरली. तो आवेशाने उद्गारला, "मी तापसी आहे! मला हे वैभव काय करायचे?"

    आपल्या देहावर बहरलेली ती सारी संपदा त्याने खालच्या धुळीत टाकून दिली!

कुसुमाग्रज : स्वप्नमंजुषा

पुन्हा एकदा समिधा ...

स्वप्नमंजुषा

    आकाशात चंद्रोदय झाला.

    चंद्राचे निळसर किरण गवाक्षातून माझ्या शय्येवर आले.

    मी उठलो आणि दार उघडले.

    तू जादूगार दाराबाहेर उभा होतास!

    सहस्रावधी स्वप्नांनी भरलेली चंदेरी स्वप्नमंजुषा तू माझ्यापुढे केलीस.

    आणि मला सांगितलेस, यांतील एका स्वप्नाची निवड कर.

    मी पाहू लागलो. स्वप्नाची निवड करू लागलो.

    सागरासारखी निळी, उषःकालासारखी सोनेरी, शुक्रासारखी तेजस्वी आणि इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी अशी स्वप्ने होती ती!

    सारीच मृगजलासारखी मोहक होती!

    मी भांबावून गेलो आणि प्रत्येक स्वप्नाचे सौंदर्य पाहू लागलो.

    जादूगारा, तू तिष्ठत उभा होतास हे मी विसरलो. एका स्वप्नाची निवड मला करावयाची होती याचे मला विस्मरण झाले.

    स्वप्नामागून स्वप्ने मी पाहू लागलो, आणि त्यातच सारी रात्र संपून गेली.

    आकाशात अरुणोदय झाला आणि त्या ज्वालामय प्रकाशात, हे जादूगारा, तू आपल्या स्वप्नांसह अदृष्य झालास!

Wednesday, July 13, 2011

कुसुमाग्रज: कारागृह

कुसुमाग्रजांच्या ‘समिधा’ संग्रहातली ही एक लाडकी कविता ... जालावर कुठे दिसली नाही म्हणून इथे टाकते आहे ...

****************************

कारागृह

    या कारागृहातून मी कधी मुक्त होणारच नाही का?
    सोनेरी उन्हाचा कवडसा गवाक्षातून माझ्या अंगावर आला की रोज मला आशा वाटते.
    आज मुक्ततेचा सुवर्णदिन उगवला आहे!
    दिवसाबरोबर ती आशाही क्षणाक्षणाने मावळते.
    आणि रात्रपक्षी गवाक्षाच्या गजांवर फडफडू लागल्यावर माझे अंतःकरण रात्रीप्रमाणे अंधारमय होते.

***

    मुक्त करायचेच नाही तर या बंदिगृहाला हे गवाक्ष तरी का ठेवलेस?
    तासन् तास त्या लोखंडी गजांजवळ मी उभा राहतो आणि बाहेर क्षितिजापर्यंत पसरलेल्या स्वतंत्र जगाचे दर्शन घेतो.
    माझ्या आशा आपले पंख पसरतात.
    आणि त्या अथांग जगाच्या कानाकोपर्‍यांतून विहार करतात.
    लोखंडाच्या हिमस्पर्शाने मी शेवटी भानावर येतो.
    दूर गेलेले माझ्या आशांचे पक्षी
    जखमी होऊन माघारी येतात
    आणि अंतःकरणाच्या घरट्यात रक्तबंबाळ होऊन पडतात!

***

    केव्हा तरी मला मुक्त करणार असशील तर लौकर कर!
    मला आता भीती वाटू लागली आहे.
    या काळ्याकभिन्न चिरेबंदी भिंतींची नव्हे,
    या भयानक एकान्ताची नव्हे,
    नागाप्रमाणे विळखा घालणार्‍या या शृंखलांचीही नव्हे,
    तर या सर्वांसंबंधी मला वाटणारा द्वेष नष्ट होण्याची!
    पारतंत्र्य प्रिय होण्यापूर्वी
    स्वातंत्र्यावरील श्रद्धा नाहीशी होण्यापूर्वी
    माझ्यातील मी मरून जाण्यापूर्वी
    मुक्त करणार असशील तर मला मुक्त कर!