Thursday, December 29, 2011

मिनिट्स ऑफ द मिटिंग

    आजकाल माझी टीम व्हर्च्युअल असते. म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात बसलेले लोक स्वतःला एक टीम म्हणवून घेतात आणि एकत्र काम करतात. महिनेच्या महिने बरोबर काम करून कधी समक्ष भेटण्याचा योग येत नाही. याचा एक फार मोठा तोटा आज जाणवला - ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये सगळ्यांनी एकत्र बसून मिटिंग मिटिंग खेळायची संधी क्वचितच मिळते, आणि यातून कलाक्षेत्राची मोठी हानी होते आहे.

    नॉन व्हर्च्युअल मिटिंगच्या सुखद आठवणीत आज बुडून गेले होते.

    एखादं काम आज हातावेगळं करायचंच म्हणून आपण आज सगळं बाजूला ठेवून बसावं, आणि मॅनेजरने पकडून मिटिंगला घेऊन जावं. मिटिंग रूममध्ये कुडकुडत (ऑफिसच्या मिटिंगरूममध्ये बसलेला माणूस गार पडलाच पाहिजे असा नियम असावा. एवढं कमी टेंपरेचर तिथे कशाला करून ठेवतात माहित नाही.) आपण बाहेरच्या कामाच्या उबदार आठवणीने तळमळत असावं. पाच एक मिनिटात आपल्याला अंदाज येतो, आपल्या पक्षाची चार टाळकी दिसावीत म्हणून आपल्याला इथे ओढून आणलंय - इथे आपलं काहीही काम नाहीये. यानंतर सुरू होते निव्वळ जागं राहण्याची धडपड. त्या धडपडीतून मग अश्या कलाकृती निर्माण होतात:    आता मला सांगा, डेस्कवरून केलेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये असं काही निर्माण करण्याची ताकद आहे का? आपल्या कामाचं इथे काही चाललेलं नाही म्हटल्यावर मी फोन हळूच डिस्कनेक्ट करून टाकीन, किमान पक्षी ‘म्यूट’ करून आपल्या कामाला लागेन. पण मग कलेचं काय?


Tuesday, December 27, 2011

ज्वाला जशा उसळती ...

सगळ्या उत्सुकतेने माना उंचावून बघताहेत आकाशाकडे ... उद्याची वाट बघत :)
बदामी एक्झोराच्या कळ्या

* पोस्टीच्या नावातच ‘जशा’ ऐवजी ‘जश्या’ लिहिलं होतं मी ... ते नजरेला आणून दिल्याबद्दल आभार, सविता! आता दहा वेळा लिहून टायपून काढायला पाहिजे हा शब्द. :)

Monday, December 26, 2011

कं पोस्ट


१. वास आलेला चालणार नाही.

२. घरात चित्रविचित्र किडे नकोत.

३. चिलटं, माश्या अज्जिबात नकोत.

४. घरात गांडूळं चालाणार नाहीत.

५. दुसर्‍या टेरेसवर कचरा नकोय.

६. उगाच फुकटचे खर्च सॅंक्शन होणार नाहीत.

    एवढ्या अटी आणि शर्ती घेऊन सोसायटीचा ओला कचरा प्रकल्प असताना या विषयातल्या आडाणी व्यक्तीने घरात वेगळा प्रयोग सुरू करणे याला निव्वळ खाज म्हणतात.

    तर माझ्या मोठ्ठ्या सुटीत सुदैवाने एका कंपोस्टिंगवरच्या कार्यशाळेला जायला मिळालं. तिथे बघितलेल्या तयार सिस्टीम्स एक तर माझ्या बजेटमध्ये नव्हत्या, किंवा मर्यादित जागा, तिथे वेळ, ऊन, पाऊस यापासून संरक्षण नसणं, कबुतरांचा उपद्रव आणि जोडीला नवरोबाकडून आलेल्या वरच्या अटी यात बसण्याएवढ्या आखुडशिंगी बहुदुधी आहेत असा विश्वास मला वाटला नाही. त्यामुळे कंपोस्ट स्टार्टिंग मिक्श्चर, मायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड, दोन-चार माहितीपत्रकं आणि आपल्याला काय करता येईल याच्या आयडिया एवढंच कार्यशाळेतून घेतलं.

    फेब्रुवारीमध्ये आमचा घरचा कंपोस्ट प्रकल्प सुरू झाला, दिवाळीपासून मी बागेत हेच कंपोस्ट वापरते आहे - घाबरू नका. कंपोस्टिंगच्या नावाखाली कचर्‍याचे फोटो आणि बारकावे दाखवून तुम्हाला बोअर करत नाही. यात अश्या ‘खाज असलेल्या’ लोकांनाच रस असेल असा माझा अंदाज आहे. कंपोस्ट कसं करायचं (किंवा काय काय करायचं नाही) याचे तपशील कुणाला हवे असतील तरच माहिती टाकते. यातलं फार काही समजलंय असं मला वाटत नाही. फक्त हा प्रयोग ‘मॉडरेटली सक्सेसफुल’ झाल्याचा माझा निष्कर्ष आहे. पण यातून धडा घेऊन पुन्हा कंपोस्टिंग नक्की करणार.

******************************

    एवढं काय नडलं होतं घरी कंपोस्टिंग करण्याचं?

    दोन - अडीच वर्षांपूर्वी माझी छोटीशी बाग सुरू केली तेंव्हापासून काहे गोष्टी खटकत होत्या. बागेसाठी आपण माती विकत आणतो. माती काही कारखान्यात तयार होत नाही. जमीन लागवडीखाली आल्यावर तिथे सकस मातीचा थर तयार व्हायला वर्षं लागतात. पैशाची चणचण असली, म्हणजे शेतकरी शेतातली माती विकतात. ही माती आपण आयती विकत घेतो, चार सहा महिने - वर्षभर वापरतो, तिच्यात वेगळीवेगळी खतं मिसळतो, आणि तिचा कस कमी झाला म्हणून टाकून देतो ... पुन्हा नवी माती मातीमोलाने विकत घेतो. म्हाणजे बागकामाच्या हौसेच्या नावाखाली थोडीथोडी माती आपण निकस करत राहतो.

    आपल्या बागेत एक छोटीशी कमीत कमी परावलंबी इकोसिस्टीम बनवता येईल का? बागेतलाच कचरा वापरून खत बनवलं, आणि जुन्या मातीमध्ये ते मिसळून तिचा कस कायम राखला तर? बाहेरची खतं वापरलीच नाहीत तर? (कीटकनाशकं वापरायचा प्रश्नच नव्हता, कारण रोगर किंवा दुसर्‍या केमिकल कीटकनाशकाचा मलाच त्रास होतो. त्यामुळे बागेत फवारायचं म्हणजे डेटॉलचं पाणी, फार फार तर साबणाचं पाणी. याव्यतिरिक्त काही मी वापरणं शक्य नाही.) हा कंपोस्टिंगचा पायलट म्हणजे त्या मोठठ्या किड्याचा एक छोटासा भाग.

Sunday, December 18, 2011

लव्ह ऍट फर्स्ट साईट ...

    सध्या दिवसच असे आहेत, की यांच्याकडे बघाल तर प्रेमातच पडाल. त्यांचे मोहक रंग आणि ताजेपणा भुरळ पाडल्याखेरीज राहणार नाहीत तुम्हाला. काय घेणार आणि काय सोडणार ... सगळंच हवं. मग आपल्याला काय पाहिजे आहे, काय करायचंय याचा विवेक राहतो बाजूला.  

    बघा आता तुम्हीच ...Thursday, December 15, 2011

हिंजवडी

    मोठ्या शहराजवळचं एक गाव. शहराजवळ असूनसुद्धा तसं दूरच, कारण गाव कुठल्या हायवेवर नाही. गावाला पक्का रस्ता नाही. पिण्यासाठी चांगलं पाणी नाही. टिपकागदावर पसरणार्‍या शाईच्या ठिपक्यासारखं शहर चहूबाजूंनी पसरत असताना हे गाव तसं बाजूला पडलेलं. अजून आपलं गावपण थोडंफार जपून असलेलं.

    गावात एक फॅक्टरी आली. फॅक्टरीच्या लोकांनी पक्का रस्ता बनवला. फॅक्टरीच्या मालाचे ट्रक, कामगारांना आणणार्‍या बसेस, मोठ्या मॅनेजर लोकांच्या गाड्या सुरू झाल्या. गावातली वर्दळ वाढली. हळुहळू अजून काही फॅक्टर्‍या आल्या, गावाला वर्दळीची थोडी सवय झाली. चहाच्या टपर्‍या आल्या, हॉटेल आलं. सिक्ससीटर सुरू झाल्या.

    त्यानंतर गावात सेझ आला, जवळून एक ‘बायपास’ निघाला, आणि गावाचं रूपच पालटलं. दहा वर्षांपूर्वी जिथे रस्ताच नव्हता, तिथे आता रस्ता ओलांडणं हे एक संकट होऊन बसलं. कंपन्यांच्या देशी-परदेशी पाहुण्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स आली, मॉल आले, बंगल्यांच्या सोसायट्या आल्या, रेसिडेंशिअल टॉवर्स आले. गावाचं इंग्रजाळलेलं नाव जगभरात पोहोचलं.

    इथल्या कंपन्यांच्या चकचकित ऑफिसच्या काचेच्या आतलं जग आणि बाहेरचं जग ही दोन वेगवेगळी विश्व आहेत.

    आत वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जगभरातल्या कस्टमरसाठी काम चालतं. परदेशी कस्टमरांसाठी ही आपलं काम स्वस्तात करून घेण्याची सोय. त्यांच्या दृष्टीने स्वस्तात काम करणारे कामगार. पण आपल्यासाठी हे उद्योग देशाला निर्यातीचा पैसा मिळवून देतात. त्यामुळे त्यांचा मान मोठा. शिवाय पगारही बरा. परदेशी प्रवासाची संधी. हे परदेशात आपल्या देशाची तरूण, महत्त्वाकांक्षी, उच्चशिक्षित, मेहेनती अशी प्रतिमा वगैरे निर्माण करतात. ‘इंडिया शायनिंग’म्हणतात ते यांच्यामुळेच.

    बाहेर गेल्या वीस - पंचवीस वर्षातला कायापालट भांबावून बघणारं गाव आहे. शेती गेली, शेती विकताना आलेला पैसा उडून गेला. नव्या कंपन्यांमध्ये गावच्या तरुणांसाठी काम नाही. विस्थापित न होता आपल्याच गावात ते उपरे झालेत. गावपण संपलं, तसं बकालपण आलं. गुन्हेगारी वाढली. संध्याकाळी ओसंडून वाहणार्‍या रस्त्यावर कुणा आयटीवाल्याचा धक्का गावकर्‍याला लागला, तर त्याला धरून मारायला हात शिवशिवायला लागले. शरद जोशी म्हणतात तो ‘भारत’ हाच असावा.

    अजून दहा वर्षांनी गावातल्या मूळ रहिवाश्यांची अवस्था शहरातल्या झोपडपट्टीसारखी होणार का?

    ते जात्यातले, म्हणून सुपातल्यांनी डोळेझाक करायची?

************

    गेले काही दिवस ऑफिसमधून बाहेर पडलं, की हा किडा डोक्यात वळवळायला लागतो. विकास कशाला म्हणायचं, काय मार्गाने देशाने जायला हवं वगैरे मोठे प्रश्न आहेत. त्याची मोठी आणि पुस्तकी उत्तरं शोधाण्यात मला आत्ता रस नाहीये. मला रोज दिसणरं, माझ्या ऑफिसच्या लगतचं हे चित्र बदलण्यासाठी मला काही करण्यासारखं आहे का?

Saturday, December 10, 2011

राजबंदिनी

* १९३५च्या सुधारणांमध्ये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.
* लोकमान्य टिळकांना ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं, आणि रत्नागिरीला ब्रह्मदेशाच्या थिबा राजाच्या राजवाड्याचे अवशेष आहेत.
* विपश्यना ध्यानपद्धती गोयंका गुरुजींनी ब्रह्मदेशातून भारतात आणली.
* इरावती कर्वेंचं नाव ब्रह्मदेशातल्या इरावद्दी नदीवरून ठेवलेलं होतं.
* आझाद हिंद सेना ब्रह्मदेशातल्या जंगलांमधून कोहिमापर्यंत पोहोचली.
* दुसर्‍या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या घनदाट जंगलात टिकून राहण्यासाठी इंग्रज सैनिकांना जिम कॉर्बेटने मार्गदर्शन केलं होतं.
* ऑंग सान स्यू की असं काहीतरी नाव असलेली बाई इथे लोकशाहीचा लढा लढते आहे.
*************************************************************
    डोक्याला ताण देऊनही जेमतेम पाच दहा वाक्यात माझं ब्रह्मदेशाविषयीचं ‘ज्ञान’ संपतं. ईशान्य भारतातली राज्य सुद्धा आम्हाला धड माहित नसतात, तिथे ईशान्य भारताच्या पलिकडच्या या शेजार्‍याविषयी काय माहिती असणार?

    प्रभा नवांगुळ यांनी लिहिलेलं ‘राजबंदिनी’ हे स्यू चीचं (हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे,‘की’ नाही हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच समजलं.) चरित्र वाचलं, आणि भारताच्या अजून एका अस्वस्थ शेजार्‍याची थोडीशी ओळख झाली.

    आज ब्रह्मदेशात जगात सर्वाधिक काळ लष्करी हुकूमशाही चालू आहे. आणि तिथे लोकशाही यावी म्हणून स्यू चीचा अहिंसक लढा चाललाय. ब्राह्मी वेशातला, केसात फुलं माळलेल्या, नाजुक अंगकाठीच्या स्यू चीचा फोटो पाहिला, म्हणजे मला तर ही एखादी संसारात बुडून गेलेली चारचौघींसारखी बाईच वाटते. तिला वर्षानुवर्षे स्थानबद्ध करून ठेवण्याइतकी भीती लष्करी हुकूमशाहीला का बरं वाटत असावी? या उत्सुकतेने हे पुस्तक वाचायला घेतलं.

    ऑंग सान स्यू ची ही ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे जनरल ऑंग सान यांची धाकटी मुलगी. १९८८ सालापर्यंत ती इंग्लंडमध्ये आपल्या ब्रिटिश नवर्‍याबरोबर आणि दोन मुलांबरोबर साधंसरळ आयुष्य जगत होती. १९८८ साली तिच्या आईच्या आजारपणामुळे स्यू ची थोड्या दिवसांसाठी म्हणून रंगूनला आली, आणि हळुहळू ब्रह्मदेशाच्या लोकशाहीसाठीच्या लढ्याचा चेहेराच बनून गेली. तिचा लढा आजही संपलेला नाही. तिच्या मृदु चेहेर्‍यामागे एक दृढनिश्चय लपलेला आहे. वर्षानुवर्षांचा एकांतवास, पतीची, मुलांची ताटातूट, पतीचं आजारपण आणि अखेर भेट न होताच मृत्यू - यातलं काहीच तिला तिच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यापासून दूर करू शकलेलं नाही.

    स्यूची विषयी मला तरी आजवर काहीच माहिती नव्हती. तिच्याविषयी कुठलं पुस्तकही बघायला मिळालं नव्हतं. इतकी मर्यादित माहिती उपलब्ध असताना या पुस्तकासाठी लेखिकेने घेतलेले परिश्रम वाखाणण्यासारखे. जरूर वाचा.

राजबंदिनी - ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र
लेखिका: प्रभा नवांगुळ
प्रकाशन: राजहंस, २०११
किंमत: रु. २५०

    आता ‘फ्रीडम फ्रॉम फियर’ हे स्यू चीचं पुस्तक मिळवून वाचायचंय.