Sunday, January 9, 2022

Aus dem Leben eines indischen Taugenichts

तुम्ही सहज म्हणून एखादी गोष्ट करायला घेता, आणि त्यातून अगदीच अनपेक्षितपणे वेगळं काही करायला मिळतं. असं खूप वेळा झालंय माझ्या बाबतीत. तसाच हा एक सुखद योगायोग. कित्येक वर्षांनी मी लॉकडाऊनच्या काळात चित्रं काढली, रंगवली. गंमत म्हणून ती सोशल मिडियावर शेअरही केली. ती आवडली म्हणून आवर्जून सांगणार्‍यांमुळे हुरूप आला, अजून चित्रं काढली. राजगुरू सरांनीही यातली काही चित्रं पाहिली, आणि त्यांचा मला फोन आला, “मी जर्मन भाषेत एक आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहितोय, त्या पुस्तकामध्ये तू काही रेखाटनं करशील का?” 


राजगुरू सरांबरोबर काम म्हणजे मज्जा आणि शिकणंही. त्यामुळे ध्यानीमनी नसताना आलेली ही संधी मी नाकारणं शक्यच नव्हतं.
 

“मी पुस्तक वाचते, त्यात चित्रासारख्या जागा शोधते, एखादं चित्रं काढून तुम्हाला दाखवते. तुम्हाला आवडलं तर पुढे करू. मी व्यावसायिक चित्रकार नाही, या सगळ्याचं रीतसर शिक्षणही घेतलेलं नाही. बघू कसं जमतंय ते.” मी सरांना म्हटलं.
 

कुणालाही प्रोत्साहन देणं, नवं काही करायला पाठबळ देणं ही सरांची खासियत. “तुला जमेल हे नक्की!” त्यांनी सुरुवातीपासून पूर्ण विश्वास दाखवला.

 
एक एक करत अशी सात – आठ चित्रं काढून झाली. याचे फोटो काढून मी सरांना पाठवत होते, त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढचं काम करत होते. पुस्तकाचा आकार किती असणार, त्यात ही चित्रं कशी दिसणार याचा फार विचार नव्हता केला सुरुवातीला. त्यातल्या तांत्रिक खाचाखोचा मग लक्षात आल्या. आभाताई भागवत, सुश्रुत कुलकर्णी अशा चित्रकलेतल्या आणि पुस्तक प्रकाशन – छपाईमधल्या तज्ज्ञांचा मग सल्ला घेतला. त्यांच्या सूचनेप्रमाणे बदल केले, आणि प्रूफामध्ये कशीतरी दिसणारी चित्रं आता एकदम चकाचक सफाईदार दिसायला लागली.   


जर्मन पुस्तक पुण्यात छापण्यामध्ये येणार्‍या अडचणी, करोना, लॉकडाऊन, दिवाळी अंक छपाईची गडबड या सगळ्यात आज सतीश आळेकरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. एज्युनोव्हा प्रकाशनाने काढलेलं हे पुस्तक अगदी देखणं झालंय.  


    
कित्येक वर्षात मी जर्मन पुस्तक वाचलेलं नाही, पण हे पुस्तक वाचताना कुठे डिक्शनरीची गरज पडली नाही. सर जसे वर्गात हसत खेळत गप्पा मारत शिकवतात, तशीच अगदी सहज, सगळ्यांना समजेल अशा शैलीत लिहिलेली ही गोष्ट आहे.


 

वर्गात सर शिकवत असताना काहीतरी बारीक बारीक खोड्या विद्यार्थीधर्माला जागून चालायच्याच. जर्मनचा आमचा वर्ग म्हणजे एसपीचं ‘जर्मन डिपार्टमेंट’ ही एक छोटी खोली होती. सरांच्या टेबलाच्या समोर भिंतीच्या तिन्ही बाजूंनी आमच्या खुर्च्या. म्हणजे पुढचा बेंच – बॅकबेंचर अशी काही भानगड नसायची. तर कुणीतरी पद्माच्या पायातला बूट उडवला, आणि तो सगळ्या वर्गाच्या मध्यावर सगळ्यांचा समोर येऊन पडला. “नेम चुकला वाटतं!” सर म्हणाले, आणि मग अख्ख्या वर्गात हशा! असे सरांनी वर्गात शिकवतांना घडलेले कितीतरी किस्से आहेत. त्याहूनही जास्त किस्से सरांनी सांगितलेले लक्षात आहेत. गोष्ट सांगण्याची उत्तम हातोटी सरांजवळ आहे. त्यामुळे पुढेमागे या पुस्तकाचं अभिवाचनही सरांनी करावं, असं मी सरांना म्हणेन.

Sunday, August 1, 2021

चिव चिव चिमणी

माऊला एक मांजराचं पिल्लू पाळायचंच होतं. आधी तू स्वतःचं आवरायला शीक, पिल्लाला सांभाळण्याइतकी मोठी (आणि शहाणी) हो, मग बघू असं म्हणून मी आजचं संकट उद्यावर ढकललं होतं. पण नको तेव्हा माऊच्या बाबालाही नेमकं मार्जारप्रेमाचं भरतं आलं. वाटेत दिसलेलं एक पिल्लू स्वतःच उचलून आणून “बाबाला नकोय” म्हणून सांगायची त्याने सोय ठेवली नाही. सोसायटीच मांजराची पोरकी पिल्लं सापडतातच. असंच एकदा गच्चीत अगदी छोटं पिल्लू अडकलंय असा निरोप मिळाला, आणि माऊ आणि बाबा त्याला काढायला गेले. तोवर एका मार्जारप्रेमी ताईने ते पिल्लू ताब्यात घेतलं होतं. फारच छोटं आहे, त्याला माणसांची सवय नाही, एक – दोन दिवस माझ्याकडे रुळवून मग तुला देते असं ती म्हणाली आणि पिल्लू घरी घेऊन गेली. आणि दुसर्‍या दिवशी ते पिल्लू बागेत हरवलं. मग प्रचंड रडारड. आता यानंतर जे कुठलं मांजराचं पोरकं पिल्लू माऊसमोर येईल, त्याला घरात घेणं भागच होतं. तर अशा रीतीने ही चिऊ घरी आली. घरी म्हणजे घराच्या गॅलरीत. कारण ती आली मी  घरी नसताना. माऊने तिला प्रेमाने अंडं उकडून दिलं, दूध भाकरी दिली. सखीमंडळ जमा होऊन ऑलरेडी बारशाची तयारी सुरू झाली होती. अडचण एकच होती, की पिल्लू बोका आहे का भाटी हे अजून त्यांना ठरवता आलं नव्हतं. त्यामुळे सर्व प्रकारची नावं गोळा करणं चाललं होतं. (यातल्या एका कन्यकेने मला वायरलेस पासवर्ड पण मागितला. कशाला, तर पिल्लू बॉय आहे का गर्ल हे गूगलवर चेक करायला!)

दुष्काळातून उठून आल्यासारख्या दिसणार्‍या या उंदराएवढ्या पिल्लाने सगळं खाणं गट्टम करून वर अजून दुसर्‍या माऊसाठीची पोळी आणि अंडही संपवलं! मी घरी पोहोचेपर्यंत हे सगळं बाहेर यायला सुरुवात झाली होती, आणि गॅलरीचं माईनफिल्ड झालेलं होतं. दिवसभरात हे आवरेल असं वाटलं, पण दुसर्‍या – तिसर्‍या दिवशीही हीच अवस्था. दिवसभर झोपेल तिथे, बसेल तिथे, जाईल तिथे बारीक बारीक चिरकत होतं पिल्लू. “तुझी सू सारखी शी करतेय बघ!” मी माऊला चिडवून घेतलं. ती बिचारी दिवसभर पिल्लाची शी पुसत होती. एवढं करून पिल्लू पहिल्या दिवशीपेक्षा बरंच अक्टीव्ह वाटत होतं, आवाज फुटायला लागला होता. डॉक्टरांकडे जाऊन जंतांचं औषध आणि पिसवांसाठी पावडर आणली, पण तरीही शी चालूच. त्यातल्यात्यात सवड काढून पिल्लाचे उपद्व्याप चालूच होते. गॅलरीतून चढून गच्चीत जाणं, शेजारच्यांच्या गॅलरीमध्ये उडी मारून मग तिथे अडकून बसणं, गॅलरीच्या खिडकीतून उडी मारून घरात येणं, लोटून ठेवलेली गॅलरीची दारं उघडून घरात येणं. परत डॉक्टरांकडे नेलं, तर त्यांनी सांगितलेलं ऐकून मी हादरलेच. हिचं पित्ताशय सुजलंय, बरं होण्याची आणि जगण्याची शक्यता कमी आहे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. त्यासाठी माऊच्या मनाची तयारी करायलाही. चार चार औषधं आणि एक्सरेसाठीचं प्रिस्क्रिप्शन घेऊन तिथून जड पावलांनीच माऊ आणि मी आलो. त्या रात्री सव्वातीन वाजता घराच्या दुसर्‍या गॅलरीतून पिल्लाचा आवाज आला. धडपडत उठून बघितलं तर ही कन्या गॅलरीच्या वरून कोणी टपकू नये म्हणून एक इंच जाडीचे बार लावले आहेत त्या बारवर फिरतेय. बर्‍याच विनवण्या करून बया उतरायला काही तयार नाही. बास्केटमध्ये भाकरीचा तुकडा ठेवून बास्केट वर केली तर पुढचे दोन पाय बास्केटमध्ये घातले, तुकडा काढून घेतला आणि ही महाराणी वर ती वरच. “बस आता इथेच!” म्हणून वैतागून मी झोपायला गेले शेवटी. पंधरा मिनिटात पावसाची भुरभुर सुरू झाली, आणि हिचं म्याव म्याव. आता मात्र बाईसाहेब गुमान बास्केटमध्ये उतरल्या. डॉक्टरांनी तिचं पित्ताशय कमकुवत आहेत म्हणून अंड्याचं पिवळं बलक पचायला जड जाईल, ते देऊ नका म्हणून सांगितलेलं, इकडे सकाळी तिने गच्चीत जाऊन तिच्याच आकाराचं कबूतर मारून खाल्लं. इतकं उपद्व्यापी आणि resourceful पिल्लू (माऊनंतर) मी पहिल्यांदाच बघतेय.


 

पूर्वी पोरं जगत नसली की दगड्या, धोंड्या वगैरे नावं ठेवायचे. हे पिल्लू किती जगणार आणि किती दिवस घरी राहणार याविषयी शंकाच होती. त्यात सारखं चिरकून ते इतकं घाण झालेलं होतं, की मुलगा आहे का मुलगी तेसुद्धा बघायला उचलून घेववत नव्हतं. पहिल्या दिवशी माऊची सोबतीण म्हणून तिला चिऊ म्हटलं तेच मग कायमचं नाव झालं तिचं. पण चिऊपेक्षा कासव किंवा  गोगलगाय वगैरे नाव ठेवलं असतं तर बरं झालं असतं बहुतेक. ही खर्‍या चिमणीसारखी कुठूनही बघता बघता भुर्रकन गायब होतेय.

बरीच औषधं झाली, पण चिमणी बरं व्हायचं नाव घेईना. एकेका दिवशी सकाळपासून आपण फक्त हिची जगोजागी केलेली ठिपका ठिपका शी साफ करतोय असं जाणवलं की अगदी फ्रस्ट्रेशन यायचं. पण या दिवसात माऊसुद्धा माझ्याबरोबरीने हे काम करत होती. चिऊ घरी आल्याने तिची नेहेमीची दुसरी मांजर घरी येत नाही, चिऊशी तर नाहीच, जुन्या मांजरीशीही खेळायला मिळत नाही म्हणून एकदाही तक्रार केली नाही माऊने! त्यात एक दिवस चिमणी बेपत्ता झाली. कुठेच मिळेना. खरं सांगायचं तर माझा जीव भांड्यात पडला यापुढे हिची घाण साफ करायला नको, आणि माऊच्या नजरेसमोर पिल्लू मेलं तर ते दुःख पाहणं नको. चिऊ हरवणं, प्रयत्न करूनही न सापडणं किती सोयीचं त्यापेक्षा!

पण माऊने बरीच शोधाशोध केली, आणि सकाळी बेपत्ता झालेलं पिल्लू संध्याकाळी परत सापडलं! ती सापडल्यावरचा माऊचा आनंद बघून स्वतःच्या विचारांची लाज वाटली.

दोन आठवडे झाले, तीन आठवडे झाले, डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं खाऊनही चिऊच्या परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा दिसेना, आणि इतका भयंकर काही आजार असेल तर तब्येत त्यामुळॆ खालावतेय असंही दिसेना. आली तेव्हा नुसतेच मोठ्ठे डोळे आणि हाडांचा सापळा असं रूप होतं, त्यात मात्र हळुहळू बदल होऊन जरा अंग धरल्यासारखं वाटायला लागलं, खाणं, हगणं आणि झोपणं याव्यतिरिक्त काही करायला तिला थोडी सवड मिळायला लागली. एक दिवस चिऊ दोरीशी खेळायला लागली, तेव्हा माऊला झालेला आनंद शब्दात न सांगता येणारा.        

चिऊला येऊन महिना होईल उद्या. महिनाभरात तिने मला बरंच काही शिकवलं. कुठल्या गोष्टीत पाच मिनिटाच्या वर न रमणारी, झाडांना पाणी घालताना टाळाटाळ करणारी माऊ कंटाळा न करता, किळस न वाटून घेता एका आजारी पिल्लासाठी इतकं करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.  इतकं आजारी पिल्लू हरवल्यावर बरं झालं, ब्याद टळली असं न म्हणता माऊ भर पावसात ‘आपल्या’ पिल्लाचा शोध घेत फिरेल, त्याला घेऊनच येईल असंही वाटलं नव्हतं. माऊला काही गोष्टी शिकायला अवघड जातात, मी थकून जावं इतके कष्ट पडतात. पण आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ती शिकतेय, शहाणी होतेय, ज्याला आपलं म्हटलं त्याला वार्‍यावर न सोडता त्याच्यासाठी काही करतेय  हा फार मोठा दिलासा आहे माझ्यासाठी. थॅंन्क्यू चिमणे.
 
Thursday, March 25, 2021

Fibre of the society

 बापट सरांनी वर्गात एक गोष्ट सांगितलेली आठवतेय आज. गरवारे कंपनीमध्ये कॉस्ट कटिंगचा विचार चालू असतो, तेव्हा दोराच्या तंतूची गेज कमी करण्याची एक सूचना येते. या दोराच्या पक्केपणावर विसंबून असणारे अनेक लोक आहेत; हा त्यांचा विश्वासघात होईल याची बाकी बोर्ड मेंबरना जाणीव करून देत एक मेंबर त्याला विरोध करतो. त्या माणसाच्या नियतीमुळे कित्येक सैनिकांचे, अवघड जागी उतरून कामं करणार्‍यांचे प्राण वाचले असतील. जोवर अशी माणसं मोक्याच्या पदांवर आहेत, तोवर त्या समाजाच्या वस्त्राचा पोत भक्कम राहतो.

 

पाचशेच्या वर घरं आहेत आमच्या सोसायटीमध्ये. एवढा सगळा ओला कचरा कुजवून त्याचं कम्पोस्ट बनवणारा प्लांट आहे. घराघरातला कचरा उचलून तो या प्लांटला नेणं, त्याचं खत बनवणं हे काम बिनबोभाट वर्षानुवर्षं चालू आहे. हे काम करणारे काम नीट करत नाहीत, वाटेल त्या वेळेला कचरा उचलतात, उचलताना सांडतात, खत करण्याऐवजी बराचसा कचरा मनपाच्या गाडीत चढवतात, ओला सुका एकत्र गोळा करतात, खतात प्लॅस्टिकचे तुकडे, तेल असं काहीही निघतं – एक ना दोन हजारो तक्रारी असतात सोसायटीच्या यांच्याविषयी.

 

गळकं छप्पर, ओल असणारी जमीन, धड हवा यायला जागा नाही का प्रकाश नाही अशा त्या जागेत कम्पोस्टच्या प्लांटच्या आत पाच मिनिटं उभं राहणं सुद्धा सोसायटीच्या कोणा रहिवाश्याला झेपणार नाही. करोनाच्या काळातसुद्धा एक दिवसही खाडा न करता आठवड्याचे सात दिवस हे काम चालू असतं. यातल्या एका मावशीला करोना झाला. दोन आठवडे ती काम करू शकणार नाही. दोन आठवडे प्लांट बंद. कचरा बाहेर कुणाला द्यायचा म्हटला, तरी तो नीट वेगळा केलेला लागतो. सुक्या कचर्‍यातच सॅनिटरी कचरा, ओल्या कचर्‍यात दुधाच्या पिशव्या असा सगळा प्रकार चालत नाही. शहाण्या शिकलेल्या मोठ्या सोसायटीतल्या लोकांना आपला कचरा कसा टाकावा हे माहित नसतं, ते वेगळं करणं या मावशीखेरीज कुणाला येत नाही. ती कामावर नसली तर कम्पोस्टिंगचा क्रशर चालणार नाही. ती नसली तर कचरा वेगळा होणार नाही, मनपाची गाडी सुका कचरासुद्धा उचलणार नाही. म्हणजे गेली कित्येक वर्षं एकही खाडा न करता एकही सुट्टी न घेता ती काम करते आहे. अशी कुणी मावशी आपण केलेला कचरा निस्तरत असते याचा सोसायटीत राहणार्‍यांना इतकी वर्षं पत्ताही नाही.