Saturday, November 21, 2009

सुई, दोरा आणि मी

    आमची शाळा मुलाची आणि मुलींची एकत्र होती. प्रत्येक वर्गात साधारण २५ मुली, आणि ३० मुलं. तर शाळेत आठवीनंतर चित्रकलेऐवजी मुलांसाठी बागकाम आणि मुलींसाठी शिवण असे विषय होते. हा माझ्या मते भयंकर मोठा अन्याय होता. एक तर आवडती चित्रकला सोडून द्यायची, आणि शिवाय मुलं बागकाम करत असतांना मुलींनी शिवण शिकायचं? सगळ्या मुलांना बागकामात गती असते, आणि सगळ्या मुलींना(च) शिवण आलं पाहिजे हे लॉजिक तेंव्हा माझ्या काही पचनी पडलं नव्हतं. पण विद्यार्थांनी प्रश्न विचाराण्याची आणि त्यांच्या असल्या प्रश्नांना उत्तर देण्याची पद्धत शाळेत नव्हती आणि माझ्याखेरीज शाळेतल्या कुणाला - शिक्षकांना, मुलींना किंवा मुलांना यात काही वावगं वाटतही नव्हतं.
   
    हा अन्याय माझ्यावर नववीत होणार असला, तरी पाचवीपासूनच मला याचा भयंकर राग होता, आणि निषेध म्हणून मी चुकूनही शिवण शिकायचा कधी प्रयत्न केला नाही. अगदी आईचा भरतकामाचा सुंदर रेशमाच्या लडींनी भरलेला डबासुद्धा मला मोहवू शकला नाही. आईने कधी जबरदस्ती केली नाही, पण मला अगदी जुजबी का होईना पण शिवण शिकवायचा प्रयत्न नक्कीच केला. पण ज्याला शिकायचंच नाही त्याला कोण शिकवू शकणार? सुदैवाने आठवीनंतर मी ती शाळा सोडली, त्यामुळे ही नावड एवढ्यावरच राहिली.

    पुढे कॉलेजमध्ये कधीतरी जाणवलं - पोहणं, स्वयंपाक यांसारखंच शिवणं हे सुद्धा एक जीवनावश्यक कौशल्य आहे. मुलींनाच नव्हे, सगळ्यांनाच आलं पाहिजे असं. त्यानंतर मग साधं कुठे उसवलं तर चार टाके घालणंच काय, पण अगदी हौसेने ड्रेसवर कर्नाटकी कशिदा भरण्यापर्यंत माझी प्रगती झाली. (त्यासाठी किती वेळ लागला हा भाग वेगळा - कारण प्रत्येक टाका मनासारखा आला पाहिजे ना!) नेटक्या,एकसारख्या टाक्यांमधलं सौंदर्य खुणवायला लागलं. काश्मिरी टाका, कांथा, कर्नाटकी कशिदा अशा आपल्या भरतकामातल्या सांस्कृतिक वारश्याचं महत्त्व जाणवायला लागलं. उत्तम बसणारा, आपल्याला हवा तसा (शिंप्याला नव्हे) कपडा शिवण्यातला सर्जनाचा आनंद आपण इतके दिवस का दूर ठेवला हा प्रश्न पडला. आयुष्यात एकदा तरी हे सगळं आपल्या हाताने करून बघितलं पाहिजे याची खात्री पटली. एवढे दिवस या कलेपासून आपण का फटकून वागत होतो याचा मागोवा घेताना लक्षात आलं, की याचं मूळ त्या (मी कधीच अटेंड न केलेल्या) जबरदस्तीने लादलेल्या शिवणाच्या तासामध्ये आहे!

Wednesday, November 11, 2009

सरहस्यानि जृंभकास्त्राणि ...

कॉलेजमध्ये एक उत्तररामचरितातला वेचा (हा खास अर्जुनवाडकर बाईंचा शब्द) अभ्यासाला होता ... त्यात वासंती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढणाऱ्या लवकुशांचं कौतुक कुणाला तरी सांगत असते - या दोन तेजस्वी कुमारांना इतर अनेक विद्या, कला आणि शस्त्रास्त्रांबरोबरच सरहस्य - म्हणजे मंत्रासहित - जृंभकास्त्रही अवगत आहे. या अस्त्राच्या प्रयोगाने शत्रूला एकापाठोपाठ एक जांभया यायला लागतात, आणि शेवटी शत्रू हतबल होतो. उत्तररामचरितातलं तेंव्हा शिकलेलं बाकी फारसं काही आठवलं नाही तरी हे जृंभकास्त्र मात्र पक्कं डोक्यात बसलं. फार ओळखीचं वाटतंय ना हे अस्त्र? नुकताच अनुभव घेतला मी त्याच्या सामर्थ्याचा.




पंचतारांकित जेवणानंतर, ‘पोस्ट लंच (टॉर्चर) सेशन’मध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी खोलीमध्ये केलेला वातानुकुलित अंधार. ज्याचा तुमच्या कामाशी काडीचाही संबंध नाही असलं कुठलं तरी ट्रेनिंग. वर्षातले नेमून दिलेले ट्रेनिंगचे किमान तास भरण्यासाठी (‘दुसरं ट्रेनिंग शनिवारी येतंय - शनिवार नको वाया घालवायला’ किंवा ‘हे ट्रेनिंग या हॉटेलमध्ये आहे - जेवण चांगलं मिळेल दुसऱ्या ट्रेनिंगपेक्षा’ एवढ्या महान उद्देशाने) जमलेले सहाध्यायी. ‘मोले घातले बोलाया नाही रस नाही अपेक्षा’ तत्त्वावर बोलणारा वक्ता समोर. (याला बोलण्याचे तासावर पैसे मिळतात.) शेजारचे दोघे भारत ऑस्ट्रेलिया वन डे सिरीज नेटवर बघत असतात. पलिकडे ‘वेक अप सिड’ डाऊनलोड होत असतो. कोपऱ्यातल्या चित्रकाराच्या प्रतिभेला बहर आलेला असतो. एक दोन कामाची माणसं जोरजोरात लॅपटॉप बडवत इन्स्टंट मेसेजरवरून शेळ्या हाकत असतात. ट्रेनिंगला उशिरा आल्यामुळे नेटवर्क केबल, लॅपटॉपसाठी पॉवर पॉईंट अशा जीवनावश्यक गोष्टींना मुकलेल्या तुम्हाला ट्रेनरच्या थेट समोर बसून चुळबुळण्याखेरीज गत्यंतर नसते. पुढच्या रांगेतला एखादा महाभाग ‘पोस्ट लंच’ सुरू झाल्या झाल्या पाच मिनिटातच डुलक्या काढायला लागतो. बाकी लोकांची नेत्रपल्लवी सुरू होते. पुढचा बळी कोण याचा अंदाज आपण घ्यायला लागतो. समोरच्या वक्त्याचा आवाज हळुहळू दूरदूर, खोलातून यायला लागतो. पुढची जांभई दाबून टाकण्याचे तुमचे प्रयत्न फोल ठरतात, आणि हळुहळू वातावरणाचा अंमल तुमच्यावर चढायला सुरुवात होते. तब्येतीत गाणाऱ्या गवयाने विलंबित ख्याल आळवावा आणि नंतर छोटा ख्याल संपवून तराण्यावर पोहोचावं, तशी सुरुवातीला पंधरा मिनिटांनी येणारी जांभई आता दर मिनिटाला येऊ लागते. जांभया देऊन देऊन डोळ्यातून गंगाजमुना वहायला लागतात. डोळ्याच्या कोपऱ्यातून तुमच्या आजुबाजूचे एक एक वीर धारातीर्थी पडतांना दिसत असतात, त्याबरोबरच तुमची जबाबदारी मिनिटामिनिटागणिक वाढत असते. बाकी कुठेच बघणं श्रेयस्कर राहिलं नसल्यामुळे वक्ता तुमच्याकडेच बघून बोलायला लागतो. पुढचे तीन तास आता तुम्ही, तुमची जांभई आणि वक्त्याची अंगाई अशी घनघोर लढाई. ट्रेनिंगला उशिरा पोहोचल्याची एवढी मोठी शिक्षा? बहुत नाइन्साफी है! (एक मौलिक शंका: ट्रेनिंगमध्ये जांभया देऊन देऊन जबडा निखळला तर कंपनी कडून नुकसानभरपाई मिळू शकते का?)

Friday, November 6, 2009

आजची गंमत


आता किमान चार पोस्टतरी बागेतला फोटो टाकायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण असं काही बघितलं, की फोटो काढावाच लागतो, आणि तो मनासारखा आल्यावर पोस्टल्याशिवाय चैन पडत नाही :)



मोठ्या आकाराच्या फोटोसाठी वरच्या फोटोवर टिचकी मारा.

कळीशेजारच्या कवडीसारख्या आकारावरचा तो थेंब बघितलात? तो पाण्याचा थेंब नाही. झाडावरच्या प्रत्येक काळीला अशी एक एक कवडी आहे, आणि प्रत्येक कवडीवर पाण्यासारखा दिसणारा (मधाचा?) एक एक थेंब आहे! किती सुबक कलाकृती निर्माण केलीय त्याने - आज हा थेंब दिसला नसता तर एवढी मोठ्ठी गंमत मला कधी कळलीच नसती! अशी किती गुपितं एकेका कळीमध्ये लपलेली असतील?


देवाची करणी अन कळीवर कवडी!