Tuesday, September 18, 2012

बाप्पा मोरया!
बाप्पा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे.
आणि आभाळाएवढं मोठ्ठं मन दे.
.
.
.
.
.
.
आणि मला पुढच्या वर्षी वेळेवर मूर्ती बनवायला सुरुवात करायची बुद्धी दे. :)
***************************
हा आमचा मिनिमालिस्ट बाप्पा. यंदा चक्क गणेश चतुर्थीपूर्वी (अर्धा तास आधी) पूर्ण झालाय. त्यामुळॆ पूजा होण्याचं भाग्य लाभणार त्याला.
***************************
बाप्पा बनवतांचे हे अजून काही फोटो:

bappa_2012

Wednesday, September 12, 2012

अण्णा, पुढे काय?


काल एक आय ए सी चं एक ओपिनियन पोल आलंय – टीम अण्णानी निवडणूकांमध्ये उतरावं का नाही यावर मत घेण्यासाठी. त्या होय / नाही वाल्या पोलमध्ये माझं मत मांडणं शक्य नाही, म्हणून ही पोस्ट.

************************

अण्णा, तुमचे पाठिराखे भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र आलेत. कुठल्या एका राजकीय विचारसरणीमुळे नाहीत. त्यात समाजवादी आहेत, हिंदुत्ववादी आहेत, आणि कधीच कुणालाच मत न देणारेही आहेत. भ्रष्टाचाराला विरोध हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. भ्रष्टाचाराला आळा सगळ्यांनाच घालावा लागेल. हा एक ‘हायजिन फॅक्टर’ आहे, तो असलाच पाहिजे पण तेवढा पुरेसा नाही. निवडून येणार्‍या राजकीय पक्षाला आर्थिक धोरण लागतं, विधायक जाहीरनामा लागतो. निवडणुका राजकीय पक्षांना लढू द्या.

भ्रष्टाचाराविरोधातल्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा ही प्रतिक्रिया आहे – आजच्या परिस्थितीवरची. पण फक्त मोर्चे आणि उपोषणं पुरेशी होणार नाहीत आंदोलनासाठी. दबावगट बनवावे लागतील गावागावात. त्यांनी गावपातळीवर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यावा लागेल. जातीचा दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट अश्या सामान्य नागरिकांना नडणार्‍या भ्रष्टाचाराविरुद्ध ते आवाज उठवू शकतील? लोकांची ही कामं सोपी व्हावीत म्हणून मार्गदर्शन करू शकतील? एखादा मेणबत्तीवाला मोर्चा काढण्यापेक्षा हे अवघड नक्कीच आहे, पण राजकीय पक्ष म्हणून निवडून येऊन भ्रष्टाचार दूर करण्यापेक्षा सोपंय. आणि होण्यासारखं आहे.

तुम्ही गांधीजींचा आदर्श ठेवता. त्यांचं सत्याग्रहाचं तंत्र वापरण्याचा आग्रह धरता. गांधीजींनी चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम देऊन कार्यकर्त्यांना आंदोलनाबरोबर जोडून ठेवलं. आणि गरीबातल्या गरीब माणसाला माझ्या कृतीतून फायदा झाला पाहिजे असा निकष लावला. आंदोलनकर्त्यांचं चारित्र्य, त्यांची वागणूक आदर्श असलीच पाहिजे म्हणून हट्ट धरला. मोर्चामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते एकीकडे “घरभाडं फुल कॅशमध्ये घेतो. पुढेमागे इन्कमटॅक्सवाल्यांचं लफडं नको!” म्हणतांना बघितलं ना, की फार त्रास होतो अण्णा. त्यांच्या पातळीवरचा भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यापासून सुरुवात करावी आंदोलनाने असं वाटतं मला. गांधीजींच्या मार्गाने आंदोलन चालवायचं असेल, तर हाच एक मार्ग दिसतो मला तरी.
*************
 
तुम्हाला काय वाटतं?