Monday, July 22, 2013

पेरिले ते (न) उगवते ...कित्येक महिन्यात मी इथे बागेविषयी काहीही लिहिलेलं नाही. 

कारण सध्या मला बागेत जायलाच मिळत नाहीये! टेरेसचं दार उघडलं, की मनीमाऊ बागेत हजर होते, आणि पानं तोडणं, मातीत हात घालणं असे उद्योग ताबडतोब सुरू होतात! सद्ध्या मला बागेला कबुतरांपेक्षा जास्त तिच्यापासूनच जपावं लागतंय.
घरातल्या झाडांची केंव्हाच उचलबांगडी झाली. ती कशीबशी बाहेरच्या उन्हात तग धरून आहेत. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे काही झाडं गेली माझी. :(

पण आपण ढवळाढवळ केली नाही, तरी बागेतलं जीवन काही थांबत नाही. सद्ध्या इतका मस्त पाऊस पडतोय, त्याने नवी संजीवनी दिलीय माझ्या झाडांना! फेब्रुवारी – मार्चमध्ये (अजून मनीमाऊ रांगायला नव्हती तेंव्हा) मी उत्साहाने बाळागाजरांचं बी पेरलं होतं. ते कबुतरांपासून वाचवण्यासाठी त्या कुंडीत बर्‍याच काड्या खोचून ठेवल्या होत्या. त्यानंतर मला फक्त पाणी घालायला वेळ झाला. ते सुद्धा मला जमलं नाही तर मी बाईंनाच सांगत होते. जी काही बाळागाजराची रोपं आली होती, ती ऊन, कबुतरं या सगळ्यात वाळून गेली. मी सगळ्या कुंड्यांना पाणी घालायचं सांगितलंय म्हणून बाई याही कुंडीत पाणी घालत होत्या अधूनमधून. आता ती कुंडी अशी दिसते आहे:
"ब्लीडिंग हार्ट"चा वेल
कबुतरांसाठी खोचलेल्या काड्यांपैकी “ब्लीडिंग हार्ट” च्या वेलाच्या काडीला पालवी फुटली, आणि आता पावसात अशी मस्त फुलं आली आहेत! गंमत म्हणजे हा नवा वेल रुजत असतांना माझ्याकडचं ब्लीडिंग हार्टचं चांगलं मोठं झालेलं मूळ झाड उन्हाने वाळून गेलं!

पावसाळा सुरू होतांना दुहेरी गोकर्णाच्या बिया दुसर्‍या कुंडीत टाकल्या. त्या आल्याच नाहीत. त्याऐवजी मागच्या वर्षीच्या स्पायडर फ्लॉवरचं एक मस्त रोपट आलंय! या फुलाच्या बिया गोळा करायच्या राहून गेल्या होत्या मागच्या वर्षी.
मागच्या वर्षी उन्हाने करपून गेलेलं सनसेट बेल्सचं झाड पण आपणहून आलंय यंदा!
स्पायडर फ्लॉवर आणि सनसेट बेल्सची रोपटी
जांभळी अबोली टिकवायचा मी या उन्हाळ्यात जमेल तितका प्रयत्न केला, पण ती गेली. आणि मी पूर्ण दुर्लक्ष करूनही बहरणारं हे खोटं ब्रह्मकमळ: 
खोटं ब्रह्मकमळ


एकूणात काय, तर न पेरिले तेही उगवते, पेरिले ते न उगवते, बोलण्यासारखे नाही, पण काहीतरी उत्तर निश्चित येते एवढं नक्की! :D

Monday, July 1, 2013

समृद्धीचे घेटोसद्ध्या मला मराठी आणि इंग्रजी पेपरांच्या शनिवारच्या रंगीत पुरवण्या बघितल्यावर आपण स्वित्झर्लंडात असल्याचा भास होतो. फक्त स्वित्झर्लंडाची जनसंख्या भारताएवढी झाल्याने तिथे व्हिला बांधण्याऐवजी टोलेजंग इमारतींमध्ये माणसं रहायला लागली असावीत एवढाच फरक. सर्व सुखसोयींनी सज्ज रिझॉर्ट असावेत तसे अगम्य नावांचे गृहप्रकल्प पुण्याच्या आसपास कावळ्याच्या छत्र्यांसारखे सगळीकडे उगवतांना दिसतात. कारण त्यांना मार्केट आहे.

चांगली गोष्ट म्हणजे या सगळ्या सुखसोयी असणारी घरं घेण्याइतका पैसा इतक्या लोकांकडे आलाय. त्याहून चांगली गोष्ट म्हणजे यातल्या बहुसंख्यांनी हा स्वतः कमावलाय. त्याहून चांगली गोष्ट म्हणजे हा पैसा कमावणारे वेगवेगळ्या गावातून, आर्थिक, सामाजिक स्तरातून शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर पुढे आलेले आहेत.

हे लोक कंपनीच्या बसने किंवा स्वतःच्या वाहनाने कामावर जातात. त्यांची मुलं स्कूलबसने शाळेला येतात – जातात. शाळा खार्चिक आहेत, पण परवडतात. त्या दर्जाच्या सुविधा दुसर्‍या स्वस्तातल्या शाळांमध्ये मिळत नाहीत. यांची खरेदी बिग बझार, रिलायन्स किंवा एखाद्या मॉलमधून होते. त्यांच्या मनोरंजनासाठी मल्टीप्लेक्स आहेत. या वर्तुळाच्या आत सगळं काही शक्य तेवढं आलबेल आहे. बाहेरच्या घाणीपासून आणि गदारोळापासून दूर, सुसज्ज सिक्युरिटीच्या आत.

सरकारी सिस्टीम्स, बाकीचा समाज यापासून अलिप्त असे हे समृद्धीचे घेटो ठिकठिकाणी दिसतात, आणि दर वेळी त्यांचं बाकी समाजापासूनचं तुटलेलंपण बघितलं की हे आपल्याला पुढे कुठे घेऊन जाईल असा प्रश्न पडतो. समाजातला सामाजिक, आर्थिकदृष्ट्या उंचावलेला असा हा मोठा गट दूर जाण्यात फार मोठा धोका वाटतो. ते साध्या शाळांमध्ये मुलांना घालत नाहीत, त्यामुळे साध्या शाळांचा दर्जा खलावत जातो. ते सरकारी दवाखन्यात जात नाहीत, त्यामुळे तिथली बेपर्वाई वाढत जाते. ते सार्वजनिक वाहतुक वापरत नाहीत, मग सार्वजनिक वाहतुक स्त्रियांसाठी सुरक्षित राहत नाही. त्यांची मुलं सार्वजनिक बागांमध्ये खेळत नाहीत, आणि सार्वजनिक बागांमधलं मवाल्यांचं प्रमाण वाढत जातं. ते मतदान करत नाहीत, आणि गुंड निवडून यायला हातभार लागतो. ते सरकारी नोकर्‍यांचा विचार करत नाहीत, आणि  सरकारी नोकर्‍यांमध्ये सर्वोत्तम टॅलंट पोहोचत नाही.

आपल्याकडे मध्यमवर्गाचं एलियनेशन तसं जुनंच आहे ... पण आज जीवनशैलीमधल्या बदलामुळे ते अजून विस्तारलंय असं वाटतं. सगळ्याच क्षेत्रात रस्त्यावरच्या गर्दीपासून हा शहाणा गट तुटून अजून दूर दूर जातोय. परदेशात न जाताही आपल्याच देशात परका बनतोय. यात त्यांचा दोष आहे असं नाही, पण मुद्दामहून प्रयत्न केले, तरच त्यांना कुंपणापलिकडचं जग दिसेल अशी परिस्थिती आहे आता. ज्यांना कधी बाकी समाजात मिसळायची संधीच मिळाली नाही, अश्या यांच्या पुढच्या पिढीची परिस्थिती काय असेल? हा फार मोठा तोटा वाटतो एकूण समाजाचा. समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून कुणी याचा अभ्यास करत असेल का? काय उपाय आहे यावर?