Wednesday, August 19, 2009

नातं मातीचं

माझं लहानपण लहान गावात, भरपूर जागा, मोठ्ठं अंगण असणऱ्या घरात गेलं. कित्येक वेळा जेवायला, पाणी प्यायला सोडता आम्ही सगळा दिवस बागेतच घालवत असू. बागेतच आमचे कित्येक प्रयोग चालायचे. लोहचुंबक घेऊन मातीमधून लोखंडाचे कण गोळा करणं आणि त्या लोखंडाच्या कणांपासून वेगवेगळे आकार करणं, पानं, कचरा गोळा करून त्याचं खत बनवण्याचा प्रयत्न करणं, पावसाळ्यात गांडुळं बाहेर आली म्हणजे त्यांना उचलून गुलाबाच्या आळ्यात टाकणं असे अनंत उद्योग असायचे. समोर मंजूकडे गेलं म्हणजे तर जर्सीला खाऊ घालणं, तिची धार काढणं, ताज्या, अजून गरम असणाऱ्या शेणाने सारवणं अशी अजून इंटरेस्टिंग आयटम्सची यात भर पडायची. म्हणजे बागकामातलं काही खूप समजत होतं किंवा आम्ही लावलेली झाडं जगायचीच अशातला काही भाग नव्हता - पण बागेत एकदम ‘घरच्यासारखं’ वाटायचं एवढं मात्र खरं.

पुण्यात आल्यावर खूपच गोष्टी बदलल्या. अंगण नसणारं घर, तेही पहिल्या मजल्यावर. गावातल्या मैत्रिणी, तिथल्या गमती जश्या हळुहळू मागे पडल्या, तशीच बागसुद्धा. गॅलरीच्या टिचभर जागेत कुंड्यांमध्ये झाडं लावणं म्हणजे झाडांवरती अन्याय वाटायचा. त्यामुळे कधी रस्त्यात, कुणच्या बागेत एखादं आनंदी झाड बघितलं म्हणजे ते तेवढ्यापुरतं एन्जॉय करायचं एवढाच या सोयऱ्यांशी संबंध उरला होता.

खूप वर्षे झाडांपासून दूर राहिल्यावर परत एकदा गच्चीत छोटी का होईना, पण बाग करायची असं ठरवलं. पहिल्या दिवशी कुंड्या भरतांनाच मला पहिला धक्का बसला - माती - शेणखतात हात घालताना मला घाण वाटते आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माती परकी वाटावी इतकी नागर मी कधी झाले? माती मला कधीपासून ’अस्वच्छ’ वाटायला लागली? शेणा-मातीची घाण वाटल्यावर नोकरी सोडून शेती कशी करणार मी? माझ्या शाळेतल्या मुलांबरोबर बागकाम कसं करणार?

परवा खत घालताना सहजपणे मातीमधली, शेणखतातली ढेकळं हाताने फोडत होते. इतक्या वर्षांच्या विरहाने आलेला दुरावा त्या ढेकळांसारखाच हळुहळू विरघळायला लागला म्हणायचा. गाडं हळुहळू पूर्वपदावर यायला लागलं तर!

आज संध्याकाळी मस्त पाऊस झाला. गच्चीत मोठ्ठं तळं साठलं होतं. ते पाणी काढायला गेले, तर पाण्यात केवढी तरी गांडुळं. पाणी वाहून गेलं की कोरड्या फरशीवर ही मरणार. आणि सातव्या मजल्यावरच्या कुंड्यांमधल्या मातीत परत गांडुळं कुठून येणार? शांतपणे ती गांडुळं पकडून परत कुंड्यांमध्ये सोडली. गेल्या दोन महिन्यात गच्चीमध्ये कुंडीत लावलेल्या चार झाडांनी आपल्याला काय दिलंय, याची एकदम जाणीव झाली. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. पण जाणीव तरी ठेवायलाच हवी ना.

Sunday, August 16, 2009

ओळखा मी कोण?

तसं आपण खूप वेळा भेटतो. म्हणजे अगदी ’अतिपरिचयात अवज्ञा’ होण्याइतक्या वेळा. पण तरीही मला वाटलं की या फोटोत तुम्ही मला ओळखूच शकणार नाही ...खालच्या फोटोवर टिचकी मारली म्हणजे मोठा फोटो उघडेल. नीट बघा माझा फोटो ... आणि सांगा बरं माझं नाव ...

Thursday, August 13, 2009

तू सब्र तो कर मेरे यार ...

भक्तांच्या आणि बडव्यांच्या गर्दीच्या महापूरातही आषाढी कार्तिकीला त्याच्या मूर्तीच्या पायावर क्षणभर डोकं टेकतानाही तो भेटावा एवढी श्रद्धा माझ्याजवळ नाही. निरव शांतता, समोर प्रसन्न फुलं वाहिलेली शंकराची पिंड, कुणीही लुडबूड करणारा पुजारी जवळपास नाही, डोळे दिपवून टाकेल असं त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन नाही, भोवताली पाणी पसरलेलं - डोळे मिटले, की क्षणात तो समोर दिसावा अशी कुडलसंगमासारखी देवळं फारच क्वचितच सापडतात. नाही तर तो दिसतो एकटीनेच टेकडी चढत असताना, भरभरून बहरलेल्या एखाद्या सुंदर झाडाखाली, एखादी सुंदर कलाकृती अनुभवताना, एखादं आवडीचं काम मन लावून करताना, कुणीही न वाचण्यासाठी काही लिहिताना. तो सहजच भेटतो - अजून वेगळे काहीच उपचार नको असतात त्याला. नेम, नियम, व्रतवैकल्य, नियमित पूजा, ध्यानधारणा असं काहीच मला येत नाही. कधीतरी त्याची आठवण आली म्हणजे मी त्याला बोलवते, आणि तो ही येतो भेटायला. माझ्या बाजूने ही एक केवळ casual relationship आहे - nothing very serious. यापेक्षा मोठी कमिटमेंट देण्याची माझी तयारी नाही, आणि हे समजून घेण्याइतका तो मॅच्युअर आहे. प्रेम ठरवून करता येत नाही, आपोआप व्हावं लागतं. त्याच्याविषयी अजून काही मला वाटावं, त्याच्या नित्य सहवासाची आस लागावी म्हणून मी फक्त वाट बघू शकते. तो तर जगाच्या अंतापर्यंत वाट बघायला तयार आहे.

Sunday, August 9, 2009

मेजवानीबागेतल्या सोनचाफ्याला मस्त फूल आलं आहे. ते तोडायला गेले.

नेहेमी सोनचाफ्याच्या झाडावर असणारा पांढरा कोळी आणि एक्झोराच्या फुलांवर कायम बसणारी माशी एकत्र काय करताहेत इथे? माशी उडत का नाहीये?


कशी उडणार? तिचं डोकं कोळ्याच्या तोंडात आहे!

महिनाभराची बेगमी...लहान तोंडी मोठा घास!

Monday, August 3, 2009

का लिहायचं?

एखादा विषय ‘माझ्याविषयी लिहिलं तरी चालेल’ म्हणून उदार मनाने परवानगी देतो. ब्लॉगवरचं नवं पोस्ट आकार घेऊ लागतं. डोक्यात एक डेमन थ्रेड सुरू झालेला असतो. अजून थोssडासा आकार आला, कि लिहिता येईल. बोटं टायपायला उतावीळ असतात. अशा वेळी नेमकं कुठलं तरी नको तेवढं काम येतं. ऑफिसमध्ये, घरी, गाडी चालवताना, जागेपणी, झोपेत ... पूर्ण वेळ त्या कामाचंच प्रोसेसिंग डोक्यात चालू असतं. शेवटी तो ब्लॉगचा दानव दोरा वेळ संपून मरून जातो. नंतर वेळ मिळतो, पण लिहायची इच्छा नसते / काही सुचत नाही / लॅपटॉप बडवण्यापेक्षा कागदावर रेघोट्या ओढण्यात / मातीत खेळण्यात जास्त रस वाटतो ... थोडक्यात म्हणजे चांगले तीन - चार आठवडे आपण ब्लॉगकडे ढुंकूनही बघत नाही. अचानक ब्लॉगवर नवी कॉमेंट येते / मेलीस का म्हणून कुणीतरी प्रेमाने विचारतं. लिंक उघडून आपण आपलाच ब्लॉग तिऱ्हाईतासारखा वाचत असतो...

हे आपण लिहिलंय? कधी? इतकं वाईट लिहितो आपण? लिहिताना शंभर वेळा वाचलं तरी दिसले नसते असे दोष दिसायला लागतात - फारच त्रोटक ... रटाळ ... आशय काहीच नाही ... सुमार दर्जा ... एका एका पोस्टवर शेरे मिळत जातात, आणि ते पोस्ट डिलिट करायला बोटं शिवशिवायला लागतात.

हे आपण लिहिलेलं नाही. आपण असं काही लिहिणं शक्यच नाही. तसंही महिनाभरापूर्वीची मी आणि आजची मी एक कुठे आहे? नदी तीच आहे असं आपण म्हणतो ... प्रत्यक्षात दर वेळी आपण वेगळं पाणी बघत असतो ना? तीच नदी परत बघितल्यासारखं वाटणं हा तर केवळ आभास! जे मी लिहिलेलं नाही, ते मी का डिलिट करावं?

मला माहित आहे, आणखी एका महिन्याने मला हेही लिहिलेलं उडवून टाकायची अनिवार इच्छा होणार आहे. पण आज लिहिणं भाग आहे. नाईलाज आहे. आज जे काही टाईपते आहे, ते सुद्धा खरं तर मी लिहिलेलं नाहीच.

‘आपण लिहिलेलं’ वाचताना, त्यातला ‘आपण’ दूर झाला, तर केवढा फरक पडतो!