Tuesday, February 9, 2010

फ्री हिट काऊंटरवाल्यांचे आभार!

    डिसेंबर २००८ मध्ये ब्लॉगवर फ्री हिट काऊंटर टाकला. तोवर साधारण ५०० हिट्स झाल्या असतील असा अंदाज होता, त्यामुळे ५०० पासूनच सुरुवात केली. त्यानंतर दर पोस्टला किती लोकांनी भेट दिली, हे बघणं हा नवा चाळा सुरू झाला. आपण लिहितो, ते केवळ स्वान्तसुखाय असं कितीही म्हटलं, तरी ब्लॉग हिट चा आकडा वाढणं हे सुखावणारंच होतं. माझ्याही नकळत मनात कुठेतरी हिशोब होत असावा ... या आठवड्याला किती हिट्स झाल्या याचा. परवा अचानक फ्री हिट काऊंटर ७००० च्या जवळ होता तो सरळ २८०० ला रिसेट झाला. टेंप्लेट कोडला हात लावलेला नसताना हे कसं काय झालं म्हणून अस्वस्थ वाटलं उगाचच. त्या अस्वस्थ वाटण्याने जाणीव करून दिली ... हा काऊंटर काढून टाकायचा असं आपण ठरवतो आहोत, पण कुठेतरी मनात ‘टार्गेट’ आहे किती ब्लॉग हिट्स हव्यात याचं. 
    रिसेट झाल्यामुळे आता त्या आकड्याला काही किंमत नाही राहिली. ... The counter does not count any more. एका निरर्थक ‘उद्दिष्टा’पासून मुक्त केल्याबद्दल फ्री हिट काऊंटरवाल्यांचे आभार मानायला पाहिजेत!
    पुढच्या ब्लॉगसफाईमधे काऊंटर नक्की काढून टाकणार!

Wednesday, February 3, 2010

कॅच मी इफ यू कॅन...

    पुण्याला नवीनच रहायला आलो होतो तेंव्हाची गोष्ट. सोसायटीमध्ये आमची बिल्डिंग कोपऱ्याला होती ... त्यात आमचा मागच्या बाजूचा फ्लॅट.एका बाजूला ऊसाचं शेत आणि दुसरीकडे कालवा आणि त्याच्या बाजूची झाडी, पेरूची बाग असा ‘व्ह्यू’ मिळायचा खिडक्यांमधून. सगळीकडे हिरवंगार. आमच्यासारखेच ही हिरवाई ऍप्रिशिएट करणारे बरेच पाहुणेही यायचे घरी. मुख्यतः उंदीर. शेतातलं खाणं संपलं, की ते आमच्याकडे यायचे. एक दिवस तर आजी रात्री झोपलेली असताना तिच्या बोटाला उंदीर चावला! तर उंदरांचा बंदोबस्त हा एक आवश्यक कार्यक्रम झाला.

    सुरुवातीला एक - दोन वेळा उंदरावर विषप्रयोग करण्यात आला. पण विष खाऊन तो कुठेतरी कोपऱ्यात मरून पडलेला असायचा, आणि नंतर मेलेला उंदीर शोधणं फार जिवावर यायचं. त्यात परत हा उंदीर खाऊन कावळ्याला, कुत्र्याला अशी पूर्ण त्याच्या अन्नसाखळीमध्ये विषबाधा होणार, एका उंदरासाठी आपण पर्यावरणाचं एवढं नुकसान करणार हे काही योग्य नाही असं सर्वानुमते ठरलं. सापळा लावण्याचा पर्यायही फेटाळण्यात आला, (कारण आता आठवत नाही.) त्यानंतर उरलेला पर्याय म्हणजे उंदीर पकडणे. ही उंदीर पकडणे मोहीम म्हणजे एकदम ‘क्वालिटी फॅमिली टाईम’ असायचा ... आई, बाबा, मी, घरी असलेच तर भाऊ असे सगळेच ऍक्टीव्ह भिडू या रोमहर्षक खेळामध्ये भाग घ्यायचे. महाभारतामध्ये कसे आपण धर्मयुद्धाचे नियम वाचतो, तसे यातही नियम होते. पहिला नियम म्हणजे आपलं उद्दिष्ट उंदीर पकडणं हे आहे - उंदीर मारणं नाही. आपली बिल्डिंग दोन वर्षांपूर्वी झाली - आपण या जागेत उपरे आहोत. उंदरांच्या कित्येक पिढ्या इथे आपल्या कितीतरी आधीपासून राहत आहेत. दुसरं म्हणजे फेअर गेम. उंदीर आपणहून बाहेर जात असेल,तर त्याला धरायचं नाही. नाहीतरी आपण त्याला बाहेर काढण्यासाठीच हे करतोय ना? आणि धरल्यावर विनाकारण झोडपायचं नाही ... फक्त बाहेर जरा लांब कचराकुंडीमध्ये टाकून द्यायचं.

    साधारण आठ दहा दिवसातून एकदा आमचा सामना व्हायचा. म्हणतात ना, ‘प्रॅक्टिस मेक्स अ मॅन पर्फेक्ट’ ... सुरुवातीला शिकाऊ असणारी आमची टीम हळुहळू यात चांगलीच तरबेज झाली. गोल कीपर, सेंटर फॉरवर्ड असा प्रत्येकाचा रोलसुद्धा ठरलेला. कुठलं शस्त्र कोणी, कधी वापरायचं, हे सुद्धा ठरलेलं. एक दिवस मात्र हाईट झाली. सकाळीसकाळीच आईने उंदीर बघितल्याची खबर दिली. पद्धतशीर कामाला सुरुवात झाली. first define your scope. म्हणजे पहिल्यांदा बाकी खोल्यांची दारं बंद करायची, नॉन प्लेईंग मेंबर्सना मैदानाबाहेर काढायचं. उंदीर आणि त्याच्यापाठोपआठ हिंडणारी आमची टीम यांचं कार्यक्षेत्र मर्यादित करायचं. स्वयंपाकघरातल्या लॉफ्टवर खुडबूड ऐकू येत होती. काठीने तिथलं सामान हलवून उंदराला खाली उडी मारायला लावणं हे माझं काम. ते मी चोख बजावलं. दुसरीकडे काठी फिरवून उंदराला आईच्या दिशेने जायला भाग पाडणं हे भावाचं काम. done. येणाऱ्या उंदराला बरोबर खराट्याखाली धरायचं. आईचं काम. खराट्याखालून त्याला कोळश्याच्या चिमट्याने धरून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं - माझं काम. पिशवीला गाठ मारून ती कचरा कुंडीमध्ये फेकून यायची - बाबांचं काम. दहा मिनिटात operation successful.

    सगळे आपापली आयुधं जागेवर ठेवून वळणार, तोच पुन्हा फ्रिजच्या मागून खुडबूड ... दुसरा उंदीर. पुन्हा एकदा व्यूहरचना, काठ्या, खराटा, चिमटा, उंदराची कचराकुंडीमध्ये रवानगी. आता आजीच्या झोपायच्या खोलीतल्या लाफ्टवरून आवाज. तिसरा उंदीर. बाथरूमच्या वरच्या माळ्यावर. चौथा उंदीर. आईबाबांच्या बेडरूममध्ये ... पाचवा. तिथेच अजून एक ... सहावा! हे म्हणजे जरा अतीच होत होतं. एका वेळी उंदीर पकडायचे म्हणजे किती ... टीम आता बऱ्यापैकी दमलेली होती. तरीही हातासरशी सहाव्याची कचराकुंडीमध्ये रवानगी केलीच. हुश्श म्हणून शेवटी एकदाचे सगळे बसणार, तोच पुन्हा स्वयंपाकघरात लॉफ्टवर खुडबूड. आता मात्र हद्द झाली. हा नक्की शेवटाचा असं म्हणून अखेरीस सगळे उठले. तर हा उंदीर म्हणजे घुशीच्या आकाराचा होता ... आजवर पकडलेल्या सगळ्यांचा बाप शोभावा असा. त्याला मी सराईतपणे लॉफ्टवरून हुसकलं. भावाने नेहेमीप्रमाणे आईच्या खराट्याच्या दिशेने ढकललं. पण हा पठ्ठ्या आईच्या दिशेने जाण्याऐवजी परत खालून सरळ उडी मारून पुन्हा लॉफ्टवर पोहोचला. जमिनीवरून लॉफ्टवर उडी मारणारा उंदीर आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. पुन्हा मी वरून हुसकल्यावर याच प्रसंगाची पुनरावृत्ती. दोन चार वेळा हे झाल्यावर उंदीर बहुतेक एवढी उंच उडी मारून दमला असावा. आता तो लॉफ्टवरून उतरायलाच तयार नव्हता. काठी त्याला लागून रक्त निघालं तरी हलत नव्हता. आता? शेवटी भावाने दुसरीकडून लॉफ्टवर काठी घातली, आणि उंदराने सरळ माझ्या अंगावर उडी मारली.

    "ईईईईईsssss" मी किंचाळले. त्यामुळे आई दचकली. ती बेसावध असताना उंदीर तिच्या समोरून फ्रिजच्या मागे जाऊन लपला.

    "आपण सगळे १० मिनिटाचा ब्रेक घेऊ या का? उंदीर सुद्धा किती दमलाय आता!" मी म्हटलं. प्रस्ताव एकमताने मंजूर झाला, आणि सगळ्यांनी एक छोटा ‘ड्रिंक्स ब्रेक’ घेतला. ब्रेक के बाद पुन्हा लढाईला तोंड फुटलं. उंदीर रक्तबंबाळ झालेला दिसत होता, पण थांबायला तयार नव्हता. काही केल्या तो खराट्याखाली येत नव्हता. "अरे बाबा, एवढा आकांताने पळू नकोस. इथे कुणाला तुझा जीव घ्यायचा नाहीये." मी म्हटलं. उंदीर काही ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नसावा. त्याचं पळणं आता स्लो मोशनमध्ये चाललं होतं. पण आमच्या काठ्या आणि खराटेसुद्धा एव्हाना स्लो मोशनमध्येच फिरायला लागल्यामुळे तो हाती लागत नव्हता. अर्धा पाऊण तास अशी लढत दिल्यावर अचानक तो गायब झाला. आमच्या दमलेल्या भिडूंनी बराच शोध घेतला, पण त्याचा थांगपत्ता लागेना. अखेरीस तो उंदीर हवेत विरून गेला हे मान्य करून सगळ्यांना माघार घ्यावी लागली. दिवसभर कुठे काही खुडबूडही ऐकू आली नाही.

    रात्री आईबाबांनी अंथरूण घालताना बेडखालचा ड्रॉवर उघडला, तेंव्हा सकाळचा पराक्रमी उंदीर ड्रॉवरच्या झाकणाच्या आत चादरीच्या घडीवर सापडला!

Tuesday, February 2, 2010

हरवलेला

घराच्या वस्तूशांतीच्या वेळची गोष्ट. भरपूर नातेवाईक मंडळी जमली होती. तीन चार दिवस घर एकदम गजबजलेलं होतं. वास्तूशांत झाली, घर शांत व्हायला सुरुवात झाली. एक एक पाहुणे मंडळी जायला लागली आणि घरातली एक एक वस्तू जागेवर यायला लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत घर मोकळं झालं, हळुहळू नॉर्मलवर येऊन पोहोचलं ... आणि तिला शोध लागला, एक चमचा गायब आहे! पाहुणे मंडळींपैकी कुणीतरी आपला चमचा ठेवून तिच्या चमच्यातला एक घेऊन गेलेत. लग्नाच्या आधी दोघांनी मिळून संसाराला लागणाऱ्या गोष्टींची यादी बनवून हौसेने केलेल्या खरेदीतला एक. दर बदलून आलेला चमचा वापरताना तिला हटकून त्याची आठवण येते. कुठे असेल बिचारा? आपला चमचा कसा ओळखू येत नाही या लोकांना? तेंव्हा स्वतःचा विसरले तसा हा सुद्धा कुठेतरी गळपटणार ... महिनेच्या महिने कुठल्यातरी डब्यात पडून राहणार, किंवा अजून कुठेतरी विसरलेला असणार ... धुवून आल्यावर पुसताना कुणी त्याच्याकडे बघून ओळखीचं हसणार नाही. त्याच्या बरोबरचे बाकीचे काय करताहेत या क्षणी याचा हळूच मनाशी हिशोब लावणार नाही. काय काय लिहून ठेवलंय बिचाऱ्याच्या नशिबात कोण जाणे. उरलेल्या पाचांशी त्याची आता जन्मात भेट नाही!