Showing posts with label सिनेमा. Show all posts
Showing posts with label सिनेमा. Show all posts

Saturday, February 25, 2012

Hana's Suitecase


मागच्या आठवड्यात ‘द पियानिस्ट’ बघितला - त्याच्यावरून नॉर्मलला यायच्या आधी आज ‘हॅनाज सूटकेस’ हाती पडलं, आणि वाचून होईपर्यंत खालीच ठेवता आलं नाही. इथे लिहिल्यावर कदाचित थोडं मनाला हलकं वाटेल, म्हणून इथे लिहिते आहे - नाहीतर आकाश भरून भरून आलंय. काळेकुट्ट ढग जमलेत अगदी  :(

झेकोस्लोवाकियामधल्या एका बारा - तेरा वर्षाच्या ज्यू मुलीची, हॅना ब्रॅडीची ही गोष्ट. ‘डायरी ऑफ ऍन फ्रॅंक’ची झेक आवृत्ती म्हणू का याला? तितकीच अस्वस्थ करणारी.

तोक्योच्या हॉलोकास्ट एज्युकेशन रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर फुमिको इशिओका यांच्या हाती हॉलोकास्टची स्मृती म्हणून एक सूटकेस आली. पोलंडमध्ये आऊसश्विट्झच्या संग्रहालयाकडून आलेल्या या सूटकेसवर तिच्या तेरा वर्षांच्या मालकिणीचं नाव होतं. एवढ्या माहितीच्या जोरावर फुमिकोनी जगभरची हॉलोकास्ट संग्रहालयं, ज्यूंविषयी माहिती देणारी केंद्र धुंडाळली. या शोधाशोधीतून त्यांना जगाच्या दुसर्‍या टोकाला कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या हॅनाच्या भावाचा पत्ता मिळाला, आणि संग्रहालयातल्या एका अनोळखी वस्तूला चेहरा मिळाला. लहान मुलांसाठी लिहिलेल्या या पुस्तकात हॅनाची गोष्ट आणि फुमिकोची हॅनाच्या शोधाची गोष्ट अश्या दोन्ही गोष्टी समांतर जातात.

जेमतेम शंभर - सव्वाशे पानांचं पुस्तक. लहानच काय, मोठ्यांनासुद्धा मुळापासून हलवून सोडणारं. सत्यकथा.

इथे हॅनाविषयी अजून माहिती मिळेल. इनसाईड हॅनाज सूटकेस नावाची डॉक्युमेंटरी आहे या गोष्टीविषयी. सध्यातरी मला ही डॉक्युमेंटरी बघण्याची हिंमत नाही.

Saturday, November 19, 2011

रॉकस्टार

    आज कपिलाषष्ठीचा योग असावा. आज नवर्‍याने आणि मी थेटरात जाऊन ताजा ताजा शिणुमा बघितला! सिनेमा सलग, ताजा असताना आणि थेटरात जाऊन बघणं हा अनुभव माझ्यासाठी सद्ध्या इतका दुर्मीळ झालाय, की अगदी रा१ बघायला सुद्धा मी तयार झाले असते म्हणा ... त्यामुळे मी इथे त्याचं कीबोर्ड झिजेपर्यंत कवतिक लिहिलं, तरी ते जरा मीठ शिंपडूनच वाचा.


    या शिणुमाला टाईम्सने चार तारे दिलेत. त्यात राजने रॉकस्टारच्या गाण्यांबद्दल इथे लिहून ठेवलंय. त्यामुळे बहुधा आपण डोंगराएवढ्या अपेक्षा घेऊन बघायला जाणार, आणि अपेक्षाभंग होऊन परत येणार अश्या तयारीनेच गेले होते. पण अपेक्षाभंगाच्या अपेक्षेचा भंग झाला. सिनेमा मनापासून आवडला.

    याहून जास्त तारे तोडत नाही. मला सिनेमाची चिकित्सा करता येत नाही. त्यातल्या एकेका पैलूविषयी काही मत देण्याएवढं तर अजिबात समजत नाही. म्हणजे अगदी सिनेमा बघताना त्यातली गाणी आवडली, तरी गाण्याचे शब्दसुद्धा नंतर आठवत नाहीत. फक्त ओव्हरऑल परिणाम जाणवतो. या अडाणीपणाला मी होलिस्टिक व्ह्यू असं गोंडस नाव दिलंय.  तर माझ्या होलिस्टिक व्ह्यूनुसार रॉकस्टार चार तारेवाला आहे.  जरूर बघा, आणि गाणी तर ऐकाच ऐका. आवडला नाही, तर मला जरूर सांगा, कदाचित माझा सिनेमाविषयीचा अडाणीपणा त्यातून थोडा कमी होईल.

Friday, January 8, 2010

अस्वस्थ करणारी गोष्ट

    ऍनच्या ८० व्या वाढदिवसाची बातमी पाहिली तेंव्हापासून लिहायचं होतं तिच्याविषयी. महेंद्र काकांनी शिंडलर्स लिस्टविषयी लिहिलं आणि पुन्हा आठवण करून दिली.

***********************************************

    ऍन फ्रॅंक पहिल्यांदा भेटली कॉलेजमध्ये असताना. तिच्या डायरीचा मराठी अनुवाद वाचताना. पहिल्या भेटीतच चटका लावून गेली, पण आधाश्यासारखं वाचत गेलं म्हणजे वाचलेलं पचवायला फारसा अवधी मिळत नाही. हळुहळू मी तिला विसरले.




    पुढच्या वेळी आमची भेट झाली ती स्टाइलिस्टिक्समध्ये ... भाषांतर कसं करू नये याचा उत्तम नमुना म्हणून! ऍन फ्रॅंकने तिची डायरी लिहिली डच भाषेत. डच मधून जर्मन, इंग्रजी, फ्रेंच अशी ती हळुहळू वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होत होत जगभर पोहोचली. प्रत्येक भाषांतरकारने `ये हृदयीचे ते हृदयी' करताना थोडंफार गाळलं होतं, आणि एका भाषांतरावरून दुसरं भाषांतर अशी भाषांतरं झाल्यामुळे कानगोष्टींसारखी गत झाली होती. मूळ डयरी म्हणजे पौगंडावस्थेतल्या ऍनची जीवाभावाची सखी होती. त्यात तिने आपल्या आईवडिलांविषयी, नव्यानेच जाग्या होत असणाऱ्या लैंगिक जाणिवांविषयी मोकळेपणाने लिहिलं होतं. ही भाषांतरावरून केलेली भाषांतरं अधिकधिक सोज्ज्वळ होत गेली, आणि त्याच वेळी खऱ्या ऍनपसून दूरही. या अभ्यासाच्या निमित्ताने ऍनची डायरी इंग्रजी, मराठी, जर्मन मधून वाचली. त्या वेळी आमच्यावर हिटलर, थर्ड राईश आणि दुसऱ्या महायुद्धाविषयीच्या इतक्या पुस्तकांचा मारा होत होता, की ऍन पुन्हा एकदा विस्मृतीमध्ये गेली.

    पुन्हा एकदा वर्षभरापूर्वी ऍनच्या भेटीचा योग आला ... ऍमस्टरडॅम बघताना. इतक्या वर्षांपासून माहित असलेली गोष्ट. नुकतीच डाखाऊची छळछावणी बघितलेली. एवढ्या छळकथा ऐकल्यावर अजून काय धक्का बसणार ऍनचं घर बघताना? त्यामुळे गावातल्या टूरिस्ट ऍटॅक्शन्सपैकी एक आयटम - आलोच आहोत तर बघू या असा दृष्टीकोन होता ऍन फ्रॅंक म्युझियमला जाताना. पण ऍनने पुन्हा एकदा रडवलं. अंगावर येणाऱ्या त्या छोट्याश्या जिन्याने वर जाताना ऍनच्या डायरीमधलं वास्तव समोर आलं. एवढ्याश्या जागेत महिनोनमहिने एवढी माणसं कशी राहिली असतील? बिग बॉसचा पहिलाच एपिसोड बघून मी नवऱ्याला म्हटलं होतं ... कुणी मला कितीही पैसे दिले तरी अश्या बंदिस्त घरात मी दोन दिवसांच्या वर काही नॉर्मल राहू शकणार नाही. दिवसरात्र घरातच राहायचं. घराबाहेर पडणं सोडा, पण खिडकीचा पडदासुद्धा वर करायचा नाही. दिवसा कामगार खाली काम करत असताना पाण्याचा नळ, फ्लश असले आवाज होऊ द्यायचे नाहीत. रात्री खालच्या कारखान्यातली माणसं घरी गेली, म्हणजे थोडी फार मोकळीक जिन्याने खाली - वर करायला, थोडा आवाज करायला. देश जर्मनीच्या कब्जामध्ये. जगभर युद्ध पेटलेलं. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा. त्यात कधी नव्हे तेवढा कडक हिवाळा. बाहेरच्यांनी जिवावर उदार होऊन त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तू कश्या पुरवल्या असतील? गोष्ट एका दिवसाची नाही. महिने च्या महिने असं जगायचंय. हा अज्ञातवास कधी संपणार माहित नाही. त्यांचं मनोबल कसं टिकून राहिलं असेल? असं दिवाभीतासारखं अनिश्चिततेमध्ये जगण्यापेक्षा छळछावणीतल्या यातना परवडल्या असं नसेल वाटून गेलं या माणसांना? खिडक्यांच्या पडद्याच्या फटीतून बाहेर बघताना बारा तेरा वर्षाच्या ऍनला कसं दिसलं असेल जग?

    काही दिवसांपूर्वी जर्मन बातम्यांमध्ये ऐकलं ... ऍन फ्रॅंक आज जिवंत असती तर ८० वर्षांची झाली असती. ८० वर्षांच्या आयुष्यात बघावं लागणार नाही एवढं तिने १५ - १६ वर्षात भोगलंय. ऍन कशी म्हातारी होईल? जगायला उत्सुक असणारी एक टीनेजर मुलगी म्हणून ती मनाच्या कोपऱ्यात कायमची जाऊन बसलीय.

***********************************************

    ऍनच्या आयुष्यावर ऑस्कर विजेता हॉलिवूडपट आहे. पुन्हा एकदा तिचं आयुष्य अनुभवायची माझी तरी तयारी नाही सद्ध्या. पण तुम्हाला मिळाला तर आवश्य बघा.

(ऍनचं छायाचित्र जालावरून साभार)

Friday, October 31, 2008

आमेली आणि तिचं मोमार्त


पॅरिस बघायला गेल्यावर 'Montmartre' (याचा मी केलेला, माझ्या मते फ्रेंच उच्चार म्हणजे मोsमार्त) हा भाग आवर्जून बघ असं ब्रिजित मामीने सांगितलं होतं. तिथे सुदैवने मोमार्त ची walking tour घ्यायची संधी मिळाली. आईने जितक्या कौतुकाने सदाशिव पेठेतल्या कुठल्या गल्लीत ना. ग. गोरे राहायचे, कुठे वसंतराव देशपांडे राहायचे, भीमसेनचं घर कुठे होतं, एसेम कुठे, दत्तो वामन पोतदार कुठे, भास्करबुवा कुठे, वसुदेव बळवंतांचं नृसिंहमंदिर कुठलं या सगळ्या खुणा पुण्यात राहायला आल्यावर दाखवल्या होत्या त्याची आठवण झाली. व्हॅन गॉ, पिकसो असे नंतर जगप्रसिद्ध झालेले कलाकार त्यांच्या उमेदवारीच्या काळात पॅरिसच्या या भागात राहात होते. इथल्या प्रत्येक गल्लीला, घराला, दुकानाला असा काही इतिहास आहे. कुणीतरी प्रेमाने दाखवल्याशिवाय त्या जागेची जादू समजत नाही. तर आमच्या मोमार्त पदयात्रेचा गाईड होता जॉर्ज. त्याने तीन तासांच्या त्या ट्रिपमध्ये तीस वेळा तरी उल्लेख केला असेल तो ’आमेली’चा. या सिनेमा इतक्या प्रेमाने मोमार्त, किंवा एकूणच पॅरिसचं चित्रण कुणी केलं नसेल असं त्याचं म्हणणं. एवढं काय अहे त्या सिनेमात एकदा बघायला पाहिजे म्हणून मी तेंव्हा ’एकदा करायला पाहिजे’ च्या माझ्या लांबलचक यादीत एका आयटमची भर घातली होती.
मागच्या आठवड्यात प्रसाद हुबळीला होता, त्यामुळे रात्री त्याच्याशी गप्पा शक्य नव्हत्या. इतक्या थंडीत खरेदीला बाहेर पडण्याचा उत्साह नव्हता. काहीतरी छान बघावं असं वाटत होतं. आणि तेंव्हा अचानक आमेलीची आठवण झाली. यूट्युबवर इंग्रजी सबटायटलमध्ये मिळालाही तो लगेच.
आमेली म्हणजे एक परिकथा आहे. 'life is beautiful' किंवा 'Sound of music' सारखी. एवढं रुक्ष, निरस बालपण अनुभवलेली मुलगी इतकं निर्मळ, आनंदी मन घेऊन मोठी होते! ती भावूक आहे, खोडकर आहे, स्वप्नाळू आहे. सिनेमाची गोष्ट इथे सांगण्यात अर्थ नाही. त्यातल्या घटनांइतकंच महत्त्व आहे सिनेमाच्या मांडणीला. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या सुंदर टिपल्या आहेत दिग्दर्शकाने! नक्की, न विसरता बघा हा सिनेमा. आणि पॅरिसला जाल तेंव्हा डिस्नेलॅंड बघण्याआधी मोमार्त बघा. कारण डिस्नेलॅंड पॅरिसजवळ आहे, पण डिस्नेलॅंडमध्ये पॅरिस नाही सापडणार. ते सापडेल मोमार्तच्या गल्ल्यांमध्ये.
(फोटो: मोमार्तच्या टेकडीवरचं प्रसिद्ध चर्च (sacre coeur). समोर उजवीकडे अंधारात जरा बारकाईने बघितलं, तर आमचा गाईड जॉर्ज दिसेल.)