Sunday, February 16, 2020

बाबा

रविवारचा दिवस असावा. शाळा-बिळा कसली घाई असायचे दिवस नव्हतेच ते, तुम्हीही निवांत होतात. सकाळी सकाळीच आपण दोघं फिरायला गेलो होतो. नदीवर. मस्त सोनेरी ऊन पडलेलं होतं. काय गप्पा मारल्या आपण, काय खेळलो ते काही आठवत नाही, पण नदीकडे जाणारा तो रस्ता, सोनेरी ऊन, दोन-तीन वर्षांची मी बाबांचा हात धरून फिरायला चाललेय हा आयुष्य समृद्ध करणार्‍या क्षणांच्या अल्बममधला फोटो पक्का मनात ठसलेला आहे माझ्या.

अजून दोन तीन वर्षांनंतरची गोष्ट. कशावरून तरी मी रुसले होते. आईने नेहेमीप्रमाणे सहज माझी समजूत काढली, आणि मी जेवायला आले. तेवढ्यात तुम्ही मला काहीतरी म्हटलं, आणि मी  पुन्हा फुरंगटून बसले. “आता तुम्हीच काढा तिची समजूत!” आई वैतागून म्हणाली. हे काही तुम्हाला जमण्यातलं काम नाही हे उमजून मी मुकाट्याने तुमच्यासोबत जेवायला आले.

आजूबाजूच्या घरातलं वातावरण आणि आपल्या घरातलं वातावरण यात खूप फरक होता. आपल्या घरात नवरा-बायकोचं भांडण हा प्रकार व्हायला आधी वेगळं मत लागतं, तेच नव्हतं. आणि घरात बाबांना मत नसलं, तरी बाकी सगळ्यांना मतं होती, आणि ती मांडायची मोकळीकही होती. फार वैतागली तर आई कधीतरी आम्हाला एखादा धपाटा घालायची, पण तुम्ही कधीच हात उगारला नाहीत. आणि तुम्ही चिडलात, तरी तुमचा राग एका क्षणात कसा गायब करायचा, ते आम्हाला सगळ्यांनाच माहित होतं.   

एक घर म्हणून एकत्र खूप मज्जा करायचो आपण. भटकंती, खाण्याचे प्रयोग, वैज्ञानिक प्रयोग, गाणं ऐकणं, आवडत्या गाण्यांच्या कॅसेट्स बनवून घेणं, पुस्तकं विकत घेऊन वाचणं – लहान गावात राहिलो तरी खूप समृद्ध होतं आमचं बालपण. आईच्या योजना आणि बाकीच्यांची त्याला मनापासून साथ असं हे सगळं चालायचं. माझ्या जन्माच्याही आधीची, इगतपुरीला असतानाची गोष्ट. कळसूबाईला जाऊन यायचं ठरलं तुमचं सगळ्यांचं. खूप चढायला लागतं अशी ऐकीव माहिती. मग सगळ्यांना जमेल का नाही ते समजावं, म्हणून तुम्ही आधी एकटेच कळसूबाई चढून आलात. आठवडाभरात मग तुम्ही, आई, आंबेकर काका, काकू असे सगळे कळसूबाईला गेलात. ट्रेकिंगचे बूट, सॅक, कपडे असला काहीही जामानिमा नसताना. बिनाकामाचं घराबाहेर कशाला पडायचं असा विचार करण्याच्या काळात तुमची अशी भटकंती चालायची. तुम्ही एकटे गाडी चालवणारे असताना नागपूरहून गोव्याला गाडी चालवत सुद्धा ट्रीप निघायची.    

तुम्ही, भाऊ, मी आपली तिघांची एक सांकेतिक भाषा होती. अगदी घरातल्या बाकीच्यांनासुद्धा समजायची नाही ती. पण बाकी ट च्या, रच्या वगैरे भाषांपेक्षा युनिक ... म्हणजे बोलायला सोपी पण समजायला अवघड अशी. एरवी फारसे गप्पा न मारणारे तुम्ही या भाषेत मात्र भरपूर बोलायचात. अगदी शेवटी पार्किनसनिझमने तुम्हाला तुमच्या शरीरात कोंडून ठेवलं होतं, तेंव्हाही ही भाषा ऐकून मात्र तुमचे कान टवकारायचे. या भाषेसारखेच आपले काही विनोद पण खास होते ... बाकी कुणाला न समजणारे.

आम्ही मराठी शाळेत शिकलो. पुढे कॉलेजमध्ये इंग्रजीशी जुळवून घ्यायला फारसं जड गेलं नाही, कारण घरात मराठी इतकीच इंग्रजी पुस्तकंही होती. आणि कुठला शब्द आडलाच, तर डिक्शनरीमध्ये शोधायची वेळ कधी यायची नाही – तुम्हाला विचारणं पुरेसं होतं.


अतिशय बुद्धीमान आणी कर्तबगार बाप, सुगरण आई. पण दोघांचे सूर कधी जुळलेच नाहीत. आयुष्यातल्या सगळ्या वैफल्याचा राग त्यांनी आपल्या मुलांवर काढला. प्रेम कसं असतं हे लहानपणी अनुभवायलाच मिळालं नाही तुम्हाला. त्यामुळे आई तुमच्या आयुष्यात आल्यावर सगळं विश्वच बदलून गेलं तुमचं. तिच्यावर मनापासून प्रेम केलंत तुम्ही. पण आयुष्यातले सगळे निर्णयही तिच्यावरच सोडून निवांत झालात.

आईच्या कर्तृत्वापुढे तुम्ही कुठेच नव्हता. पण तुमची काही हरकत नव्हती त्याला. पुरुषी अहंकार, हेवा, मत्सर अशा कशाचा तुम्हाला गंधही नव्हता. लहान मुलाची निरागसता, सरलता होती तुमच्याजवळ. आई सांगते, की दवाखान्यामध्ये कुणीतरी तुमच्यावर अफरातफरीचा आळ घेतला कधीतरी. पण “इतका चालूपणा या माणसाला करताच येणार नाही!” म्हणून तुम्हाला निर्दोष ठरवलं त्यांनी.  

आईचं आणि तुमचं आयुष्य फार सुंदर बनवलंत तुम्ही दोघांनी. उत्तम पुस्तकं, उत्तम संगीत, उत्तम माणसं असं सगळं जोडलंत, भरपूर फिरलात, मोकळ्या मनाने अनुभव घेतलेत. बदलायची, शिकायची तयारी ठेवलीत. शक्य तिथे तिथे लोकांना मदत केलीत. लोकांच्या नजरेतून मुलं यशस्वी नव्हती तेंव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. जे योग्य वाटलं, ते सोयीचं नसलं तरी केलंत.

मला आठवतंय, एक दिवशी झोपतांना तुमच्या हातावर काहीतरी लागलेलं दिसलं. काय लागलंय म्हणून मी विचारलं. “काही नाही. रक्त दिलं म्हणून असं दिसतंय” तुम्ही सहज म्हणालात.

कुठल्याही गोष्टीला शेवट असतोच. तो होणारच होता. पण त्याने असं पाकळी पाकळीने तुम्हाला मिटवत, अनोळखी करत जायला नको होतं असं वाटतं. चित्र काढण्यासाठी तुमचा फोटो शोधत होते. गेल्या पाच सहा वर्षातल्या एकाही फोटोत मला तुम्ही ओळखीचे वाटला नाहीत. पायाचं एवढं मोठं ऑपरेशन झालेलं असताना एका आठवड्यात दोन वेळा कळसुबाई चढणार्‍या माणसाला वॉकर घेऊनही चालता न येणं बघणं फार दुःखाचं असतं बाबा.