Showing posts with label किडेमाकोडे. Show all posts
Showing posts with label किडेमाकोडे. Show all posts

Thursday, January 30, 2020

गोड गोष्ट



माझ्या गॅलरीत हा नेस्टिंग बॉक्स कित्येक वर्षांपासून होता. कुठल्याच पक्ष्याला आजवर ती जागा घरासाठी पसंत पडली नसावी. आठ - दहा महिन्यापूर्वी तिथे मधमाश्या रहायला आल्या. घरात एवढ्या जवळ मधमाश्या म्हणजे काही धोका तर नाही ना, काय करायला हवं हे विचारायला अमित गोडसेंना फोन केला. त्याचा फोन लागला नाही म्हणून मग मैत्रिणीकडून त्याचा सहकारी प्रवीण पाटील याचा नंबर मिळाला.

या माश्या काहीही करत नाहीत, पोळ्यावर रात्री प्रकाश पडणार नाही एवढं बघा, आणि मोठा आवाज टाळा एवढीच काळजी घ्यायला त्यानी सांगितलं आणि आमच्या नेस्टिंग बॉक्समध्ये आलेले शेजारी लवकरच नव्या घरात रुळले. रात्री गॅलरीतला दिवा न लावणे एवढंच पथ्य आम्ही पाळत होतो. पोळ्यापासून एक फूट अंतरातल्या झाडाच्या फांद्या छाटण्यालासुद्धा त्यांची काहीच हरकत नव्हती. माझ्याकडच्या तुतीची खूपशी फळं पिकण्यापूर्वी झडून जायची, ती आता टिकायला लागली. यात वाढलेल्या परागीभवनाचा काही संबंध असावा असं मला वाटतं. पुढचे कित्येक महिने अनइव्हेंटफुल गेले. सकाळी त्यांची कामाला जायची लगबग बघून मला ऑफिस भरायच्या – सुटायच्या वेळी नळ स्टॉपच्या सिग्नलला थांबल्यासारखं वाटायचं. सगळ्यांना मरणाची घाई. फुलं काय सुकून जाणार आहेत का दोन मिनिटं उशीर झाला तर? :)

असं सगळं गेल्या महिन्यापर्यंत सुरळित चाललं होतं. पण मग माश्यांची लोकसंख्या वाढून त्यांना झोपायला नेस्टिंग बॉक्स पुरेनासा झाला. रात्री थोड्या माश्या बॉक्सच्या बाहेर झोपायला लागल्या. त्यांना रात्री घरातल्या दिव्यांचा प्रकाश दिसायला लागला, आणि उठून कामाला लागायची वेळ झाली म्हणून त्या झोपण्याऐवजी घरातल्या दिव्यांभोवती फिरायला लागल्या. त्या फिरून थकल्या, की भिंतीवर किंवा जमिनीवर बसायच्या, आणि मग मी त्यांना बाहेर परत सोडायचे. एक – दोन वेळा माशी पायाखाली आली / हाताखाली चिरडली गेली तॆंव्हा मला चावली होती, पण दोन चार दिवस जरा दुखण्यापलिकडे त्याचा काही त्रास झाला नव्हता. अशी घरात बसलेली माशी एकदा नवर्‍याला चावली. म्हणजे माशी भिंतीवर बसली होती, तिला याचा धक्का लागला आणि ती चावली. त्याला याची जोरदार reaction आली आणि भरपूर सूज येऊन ठणकायला लागलं. जवळजवळ आठवडा लागला सूज उतरायला. तेंव्हापासून संध्याकाळी घरातले दिवे लावण्यापूर्वी गॅलरीचं दार बंद करायचं एवढी एक  काळजी मी घ्यायला लागले. पण माश्यांची संख्या मुंबईच्या लोकसंख्येसारखी वाढत असावी. आता दार बंद केलं तरी फटीतन रोज चार – पाच माश्या घरात यायला लागल्या, आणि घरातल्या चपला न घालता बेसावधपणे चालणार्‍या सदस्यांना त्यांचा प्रसाद नियमितपणे मिळायला लागला – माऊचा बाबा, माऊची आजी, माऊ अश्या सगळ्यांचा यात नंबर लागला. आता मात्र पोळं हलवायला लागणार हे लक्षात आलं.

पुन्हा एकदा प्रवीण पाटीलला फोन केला, पोळ्याचा – खरं म्हणजे नेस्टिंग बॉक्सचा फोटो पाठवला. आज येऊन त्यानी  आणि त्याच्या सहकार्‍यानी ते पोळं नेस्टिंग बॉक्ससकट काढून नेलंय – मधमाश्या पाळणार्‍या कुणाला तरी देण्यासाठी. हे काढण्याचं काम सगळं इतक्या सहज चाललं होतं – कुठलंही protective gear वगैरे न वापरता – की माऊ आणि तिच्या मैत्रिणी पोळ्यापासून दोन फुटांवरून डोकावून बघत होत्या. “आता नाकाला माशी चावेल, बाजूला व्हा!” म्हणून त्यांना बाजूला करावं लागलं. पोळं काढायचं काम संध्याकाळी अंधार पडल्यावर केल्यामुळे व्हिडिओ / फोटो काढता आले नाहीत मला. पण दिवसा माश्या इकडेतिकडे उडत असतात, त्यांना गोळा करायला वेळ लागतो. रात्री सगळ्या एकत्र मिळतात. त्यामुळे अंधार असताना हे काम करणं त्यांना सोयीचं जातं. हे करताना दोन माश्या घरात आल्या, तर अगदी त्या दोन माश्या सुद्धा शोधून सोबत घेऊन गेलेत ते. जिथे राणी तिथे त्या माश्यांचं घर. ती गेल्यावर या बिचार्‍या मरूनच गेल्या असत्या नाहीतर. एकही माशी न मारता, न दुखावता त्यांना त्यांच्या नव्या घरी नेलंय त्यांनी. Hats off to their dedication!!!


बाकीच्या मधमाश्या काढणार्‍यांपेक्षा यांचा दर बहुतेक जास्त आहे (१३०० रुपये झाले) – पण माश्यांचं पुनर्वसन करताहेत ते, मारून टाकत नाहीयेत. आणि जातांना एक छोटीशी मधाची बाटली भेट म्हणून दिलीय त्यांनी ... इतके दिवस माश्या इथे होत्या म्हणून.  

बर्‍याच दिवसांनी आज रात्री गॅलरीमध्ये दिवा चालू आहे, दार उघडं आहे. घरातली चप्पल न घालता कुणीही बिनधास्त फिरायला हरकत नाहीये. पण आपण त्रास होतोय म्हणून शेजार्‍यांना हुसकून लावलंय अशी काहीतरी बोच वाटतेय. मधमाश्या नसतील तर माणसंही संपून जातील हे माहित आहे, पण मधमाश्या शेजार्‍यांच्या अंगणात असाव्यात, आपल्या नाही अशीच आपली अपेक्षा आहे. माझं घर, माझी जमीन ही दुसर्‍या कुठल्याही प्राण्याची नाही, पक्त माझीच आहे असं म्हणणारा प्राणी फक्त माणूसच असावा.

तुमच्या घरात मधमाश्यांनी पोळं केलंय? पोळं जाळणार्‍याला बोलावून माश्यांना बेघर करू नका. Bee Basket शी संपर्क साधा, मधमाश्यांना नवं घर मिळवून द्या. 



Wednesday, February 17, 2016

गोगलगाय आणि पोटात पाय!

    मागे अलिबागच्या पोस्टमध्ये मी म्हटलं होतं की शंख समजून चुकून दोन जिवंत गोगलगायी उचलून घरी आणल्यात. तसे ते शंख फार सुंदर दिसणारे वगैरे नव्हते, पण समुद्रावर जाऊन एकही शंख / शिंपला सापडला नाही यावर माझाच विश्वास बसत नव्हता म्हणून हे शंख उचलले. साडेतीन – चार इंच आकाराचे हे दोन शंख दोन दिवसांनी स्वच्छ करायला पाण्यात टाकले आणि आतल्या काळपट तपकिरी गोगलगायी बाहेर आल्या.

Giant African Land Snail


    आता यांचं काय बरं करायचं? बागेतल्या गोगलगायी झाडांचे कोवळे कोंब खातात, म्हणून त्यांना कटाक्षाने झाडांपासून लांब ठेवावं एवढं ठरवलं. पण कुठे सोडायच्या त्या हे बघावं म्हणून नेटवर जरा शोधाशोध केली. पहिल्यांदाच गोगलगायींविषयी माहिती शोधत होते. तेंव्हा समजलं, की या बहुतेक Giant African Land Snail  प्रकारच्या गोगलगायी आहेत, मूळच्या पूर्व अफ्रिकेतल्या या गोगलगायी आज जगात अनेक ठिकाणी (आपल्या कोकणासकट) आढळतात.

    या जातीच्या गोगलगायी पाच सात वर्षे आरामात जगू शकतात. हवा अती थंड असेल तर hibernate करतात, फार उन्हाळा / पाण्याची कमतरता असेल तर aestivate करतात (हायबरनेशन थंडीमध्ये करतात, तसंच उन्हाळ्याला / पाण्याच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी inactivity आणि metabolic rate कमी करणे म्हणजे aestivation.) हा aestivation चा कालावधी तीन वर्षांपर्यंत असू शकतो!!! यांचं अन्न म्हणजे सुमारे ५०० प्रकारच्या वनस्पती. जगातल्या सर्वाधिक invasive समजल्या जाणार्या  १०० प्रजांतींमध्ये यांचा समावेश होतो. शेती / बागांचं प्रचंड नुकसान त्या करू शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेच्या काही भागात यांच्या बंदोबस्तासाठी बरेच प्रयत्न केले जातात. (आपल्याकडे शेताला गोगलगायींच्या उपद्रवाविषयी मला काहीही माहित नव्हतं!) आफ्रिकेत त्यांचा फार त्रास नाही, कारण तिथे या खाल्ल्या जातात – त्यांचे मांस अतिशय पौष्टिक आणि रुचकर समजतात!

    गोगलगायी hermaphrodites आहेत. म्हणजे प्रत्येक गोगलगायीत स्त्री आणि पुरुष जननेंद्रिये दोन्ही असतात. दोन गोगलगायींचे मिलन होते, त्यानंतर दोघीही अंडी घालू शकतात, आणि त्यांच्या प्रजननाचा वेग प्रचंड असतो.

    गोगलगायींना दिसतं, वास येतो, पण ऐकू येत नाही. त्या निशाचर असतात, सूर्यप्रकाश टाळतात.

    दिसायला नाजूक वाटल्या तरी गोगलगायी त्यांच्या वजनाच्या १० पट वजन उचलू शकतात!

    हे सगळं समजल्यावर कुठून ते शंख उचलायची बुद्धी झाली म्हणून पहिले कपाळाला हात लावला. मग त्यांना टेकडीवरच्या पाण्याच्या टाकीत किंवा अशा कुठेतरी सोडून देण्याची बुद्धी झाली नाही म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. आता या कुठे ठेवू / कशा नष्ट करू म्हणून सध्या चिंतेत आहे. तुम्हाला कुणाला चविष्ट गोगलगाय खायची असेल तर घेऊन जा, खास आग्रहाचं निमंत्रण!!!

Friday, October 18, 2013

बागुलबुवा : २



खूप खूप दिवसांपूर्वी इथे एका बागुलबुवाची गंमत सांगितली होती. तेंव्हा सुरवंटराव उडून गेल्यावर नुसता रिकामा कोष मागे ठेवून गेले होते. आज त्यांना मुद्देमालासह पकडलं:



इतके सुंदर रंग! आणि हे सोनचाफ्यावर असं लपून बसलं होतं, की मला दिसलंच नव्हतं. वाळकं पान म्हणून काढायला मी हात घातला, आणि जवळजवळ त्याला हात लागल्यावर माझ्या लक्षात आलं ... हे ताजं ताजं फूलपाखरू आहे ! हिरवा रंग थेट सोनचाफ्याच्या कोवळ्या पानाचा, तर राखाडी रंग वाळक्या पानासारखा. झाडाचाच एक भाग होऊन पानाच्या खालच्या बाजूने बसलंय ते. अजून पंख चिकटलेले आहेत त्यामुळे उडता येत नाहीये त्याला.

सकाळी अजून जरा लवकर हा शोध लागला असता तर कदाचित कोषातून बाहेर पडण्याचं नाट्य बघायला मिळालं असतं! अजून तासाभराने इथे फक्त मागच्या वेळसारखाच रिकामा कोष होता :)

फूलपाखरू बघितल्यावर लक्षात आलं ... याचे सुरवंट भारी खादाड असतात. त्यांना कसला स्पर्श झाला म्हणजे ते एक दुर्गंध सोडतात, त्यामुळे बहुतेक पक्षी यांच्या वाटेला जात नसावेत. त्यांना मी कित्येक वेळा सोनचाफ्यावरून हुसकून लावलं आहे. हे फूलपाखरू मात्र कधीच बघितलं नव्हतं बागेत. कुठे बरं जात असतील ही फुलपाखरं?
***
फुलपाखरू सापडल्यावर मी खूश होते, लगेच ही पोस्ट टाकली. त्याचा रंग जरा वेगळा वाटत होता नेहेमी पाहिलेल्या फुलपाखरांपेक्षा ... पण नाव गाव शोधायचा काही प्रयत्न नव्हता केलेला. मधे जरा सवड मिळाली आणि उगाचच हे फूलपाखरू आठवलं. जरा शोधून बघू या याचा कुलवृत्तांत म्हणून गूगलबाबाला विचारलं, आणि मोठ्ठा खजिना हाती लागला! याचं नाव आहे tailed Jay (Graphium agamemnon agamemnon). आणि याच्या जीवनक्रमावर ही अप्रतिम ब्लॉगपोस्ट आहे!

Wednesday, November 23, 2011

बागुलबुवा?


गेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये एक ट्रेनिंग होतं. सकाळी घाईतच घरून निघायला लागत होतं, त्यामुळे झाडांशी निवांत गप्पा होत नव्हत्या. शनिवारी ३-४ दिवसांच्या खंडानंतर जरा बारकाईने बघितलं, तर सोनचाफ्याच्या झाडावर हे सापडलं ...






घाईत, अगेन्स्ट लाईट, वार्‍यावर हलणार्‍या पानाचे फोटो काढलेत. त्यामुळे फार स्पष्ट नाहीत. :(

सध्या मी याला ‘बागुलबुवाची कात’ असं नाव दिलंय.  :)

चार दिवसांपूर्वी या पानावर हे दिसलं नव्हतं. नक्की.

गोगलगाईने शंख उतरवून ठेवल्यावर अजून एक आवरण उतरवून ठेवावं, तसं काहीसं दिसतंय हे. पण मग शंख आणि गोगलगाय कुठे गायब झाली?

चार दिवसात एवढी जाडजूड होणारी खादाड आळी असावी असं म्हटलं, तर तश्या खादाडीच्या खुणा जवळपासच्या पानांवर नाहीत.

कुठल्या पक्ष्याने आणून टाकलं म्हणावं, तर पानाला खालच्या बाजूने, कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक धाग्याने हे चिकटलं होतं.

गुगलूनही फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे बरेच कीटक, आळ्या कात टाकतात हे समजलं, पण अशी एकसंध नाही.

फोटो काढल्यानंतर पानावरून हे कवच काडीने काढून टाकलं. ते इतकं नाजुक होतं, की काडीच्या स्पर्शानेही तुटत होतं - पण नाजुक धाग्याची पानावरची पकड एवढी घट्ट, की आवरण तुटलं, तरी धागे कायम!

माझं लक्ष नसताना कोण कारभार करत असावं बरं बागेत? :) :)

Monday, October 3, 2011

Pin Up Girl

बागेत एका नवीन कॉलनीचा मला शोध लागलाय.
स्कॉलरच्या पानावर काय कचरा पाडलाय, म्हणून मी तो हाताने काढणार होते ...

तर हे चक्क माशीचं घर आहे. एखादी टाचणी टोचावी, तसं तिने आपलं घर पानाला पिन अप केलंय.

ही माशी फुलांवर नेहेमी असते. तिच्या जेवणात किंवा विश्रांतीत मी फुलं तोडून व्यत्यय आणण्यावर अजूनतरी कधी तिने आक्षेप घेतलेला नाही. अगदी आज तिच्यापासून चार इंचावर कॅमेरा धरून मी तिच्या घरात डोकावून बघत असतानाही नाही. बागेतल्या झाडांना तिचा काही त्रास नाहीये. बागेतून घरात ती कधी शिरलेली नाही. कधी चावेल की काय या भीतीने तिला तिच्या घरातून उगाचच हुसकून लावू नये असं वाटतंय.

मी बघितलेल्या गांधिलमाश्या याहून मोठ्या, जास्त लाल, आणि जास्त आक्रमक होत्या. ही गांधीलमाशीच आहे का?

Sunday, August 9, 2009

मेजवानी



बागेतल्या सोनचाफ्याला मस्त फूल आलं आहे. ते तोडायला गेले.

नेहेमी सोनचाफ्याच्या झाडावर असणारा पांढरा कोळी आणि एक्झोराच्या फुलांवर कायम बसणारी माशी एकत्र काय करताहेत इथे? माशी उडत का नाहीये?


कशी उडणार? तिचं डोकं कोळ्याच्या तोंडात आहे!

महिनाभराची बेगमी...



लहान तोंडी मोठा घास!