Monday, October 25, 2010

हावरट

पुस्तकांची खा खा सुटलीय. किती घेतली आणि वाचली तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही.

एका दिवसात २ पुस्तक प्रदर्शनं.

    दुर्गा भागवतांचं ‘आठवले तसे’. (झालं वाचून. दुर्गाबाईंनी टीका केलेली माणसंही मोठ्या कर्तृत्त्वाची माणसं आहेत. त्यांच्याहून मोठं कर्तृत्त्व आणि स्पष्ट विचार असणार्‍या दुर्गाबाईंना टीका करण्याचा हक्क पोहोचतो. आपण तो भाग सोडू्न द्यायचा.)

    साधनाताई आमटेंच्या आठवणी - ‘समिधा’. (नेहेमी मोठ्या झालेल्या माणसांच्या बायकोच्या आठवणी म्हणजे अन्याय, फरफट, दिव्याखालचा अंधार यांचंच चित्रण जास्त असतं. हे पुस्तक तसं नाही. हा दोघांनी मिळून केलेला प्रवास आहे. त्यामुळे फार आवडलं पुस्तक.)

    स्वगत - जयप्रकाशांची तुरुंगातली दैनंदिनी, पुलंनी मराठीत आणलेली. (उत्सुकता म्हणून घेतलीय, पण सुरुवातीचे काही दिवस वाचून तरी फार तात्कालिक संदर्भ वाटताहेत - आणिबाणीच्या परिस्थितीचे. बघू पुढे काही इंटरेस्टिंग सापडतंय का ते.)


    रविंद्रनाथांची ‘गोरा’ - कित्येक दिवसांपासून वाचायची आहे. गॉर्कीच्या ‘मदर’सारखीच रटाळ आहे असं ऐकून आहे, तरीही. (एक आशावादी, महत्त्वाकांक्षी प्रकल्प.घरात पुस्तकं ठेवायला जागा नाही, तरी जे वाचण्याची खात्री नाही असं पुस्तक मी कशाला विकत आणलंय मलाही माहित नाही. सुदैवाने नवर्‍याची पुस्तकं वेगाळी असतात, त्यामुळे अश्या विकत घेऊन न वाचलेल्या पुस्तकांची त्याला कल्पना नाही. नाही तर काही खैर नव्हती.)

    पूर्निया - डॉ.अनिल अवचटांचं पहिलं पुस्तक.

    ना ग गोर्‍यांचे सीतेचे पोहे.

    राजा शिरगुप्पे यांची शोधयात्रा - ग्रामीण महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांची.

    विनय हर्डीकरांचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’.

    महाराष्ट्र देशा - दोन प्रती (हार्ड बाऊंड मिळतंच नाहीये आता), ‘हिंदू’(आणि त्याच्यावर फुकट मिळाल्यामुळे ‘कोसला’), टाईम्स सूडोकू आणि जिब्रानचं प्रॉफेट ही पुस्तकं देण्यासाठी घेतली आहेत, त्यामुळे ती मोजायची नाहीत.

    ‘अक्षरधारा’वाले कार्ड स्वीकारत नाहीत, जवळचे पैसे संपले. आणि निवडलेली पुस्तकंही हातात मावेनाशी झाली. नाही तर?

    अजून दिवाळी अंक नाही दिसले कुठे.

    पुणे बुक फेअरला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा स्टॉल आहे. तिथे ‘किशोर’ मधल्या निवडक कथा, कविता, इ. ची संकलित पुस्तकं होती. आमच्याकडे माझे भाऊ लहान असतानापासूनच्या काळातले किशोरचे अंक जपून ठेवलेले होते. या जुन्या अंकांमध्ये काही अतिशय सुंदर लेखमाला होत्या - ‘चीनचे प्राचीन शोध’ - यात कागद, रेशीम, घड्याळ, लोहचुंबक, चिनी माती अश्या शोधांविषयी अतिशय रंजक माहिती होती. ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ मध्ये पारा आणि गंधकापासून औषधनिर्मिती करणारा नागार्जुन, शुल्बसूत्रकार कात्यायन, पिंगल अश्या प्राचीन भारतीय ज्ञानोपासकांविषयी फार सुंदर माहिती होती. पाठयपुस्तक निर्मिती मंडळाला या मालिका पुस्तकरूपाने प्रसिद्ध नाही करता येणर का?

Monday, October 18, 2010

हेरगिरी

    आपले बॉलिवूडवाले तारेतारका ‘स्ट्रिक्टली प्रायव्हेट’ मध्ये लग्न वगैरे उरकून घेतात ना, टपून बसलेल्या मिडियावाल्यांना गुंगारा देत, तसं आल्याचं झाड लपून छपून फुलत असावं अशी मला शंका होती. रोज सकाळी मी बघते, तेंव्हा झाड नेहेमीसारखंच दिसत होतं - पण एक दिवस मला छडा लागलाच. सकाळी तपकिरी आणि पिवळी अश्या रंगसंगतीची दोन नाजुक फुलं झाडाजवळ पडलेली सापडली. मग कालच्या दिवशी सारखं दोन दोन तासांनी झाडावर नजर ठेवून होते, आणि शेवटी चोरी पकडलीच :)

    तर आल्याचं फूल हे असं दिसतं ... ‘हिरवाईचा उत्सव’ मधल्या फोटोतली आल्याची कळी होती ना, तिला आलेली ही फुलं. फूल दुपारी फुलतं, आणि लगेच रात्री गळूनही पडतं. काल संध्याकाळच्या वेड्या पावसामध्ये कॅमेर्‍यावर छत्री धरून हा फोटो काढलाय ...


    फ्लॅशमुळे पिवळा रंग इथे फिकट दिसतोय - प्रत्यक्षात तो पिवळा धमक आहे. पुन्हा, पाऊस नसताना फूल आलं, तर अजून चांगला फोटो घेता येईल.

Wednesday, October 13, 2010

चाकोरी

महिन्यांमागून महिने. सकाळी नाईलाजाने उठायचं, आवरून ऑफिसला जायचं, घरी परतल्यावर उरलेलं ऑफिसचं काम, जे शनिवार-रविवारवर टाकणं शक्यच नाही तेवढंच घरातलं काम, बागेशी गप्पा, वाचन, गाणं ऐकणं असं काहीतरी थोडंफार - डोकं ताळ्यावर ठेवण्यापुरतं. एक दिवस संपला. शनिवार -रविवार एका दिवसाने जवळ आला या आनंदात झोपायचं. जगायचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस. त्यांची वाट बघत उरलेले दिवस घालवायचे.

    काहीतरी जबरदस्त चुकतंय. माझं ऑफिसमधलं काम एवढं बोअरिंग नाही. किंबहुना अश्या ठिकाणी, अश्या प्रकारचं काम करायला मिळणं हे कित्येकांचं स्वप्न असेल. मग मला असं साचलेल्या डबक्यासारखं का वाटतंय?

    कारण या दिवसाला काही उद्देशच नाहीये. काल केलं म्हनून आज ऑफिसचं काम करायचं, असा प्रकार चाललाय. पुन्हा न मिळणार्‍या वेळाचा प्रचंड अपव्यय. पाट्या टाकणं. Its not fair to my employer, my family, myself.
   
    थोडं थांबून, या चौकटीच्या बाहेर जाऊन चित्राकडे बघायला हवंय. त्यातून कदाचित आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होईल, मिळतंय त्याची किंमत कळेल. कदाचित लपलेला उद्देश सापडेल. कामातला इंटरेस्ट सापडेल, किंवा इंटरेस्टिंग काम सापडेल.

    तर एवढं फ्रस्ट्रेशन आल्यावर मला कळलं - नेहेमीच्या कामातून ब्रेक घेणं गरजेचं असतं. कुणाला ब्रेक म्हणजे आठवडाभराची घरच्यांबरोबरची सहल पुरेल, कुणाला एखादा हिमालयातला ट्रेक पुन्हा स्वतःची ओळख करून देईल. तर मोठ्ठी सुट्टी घ्यायचा प्लॅन आहे. प्लॅन करताना मोठ्ठी वाटाणारी सुट्टी काय काय करायचंय याचं गाणित बसवताना लहान वाटायला लागलीय :) सुट्टीच्या नुसत्या कल्पनेनेच एकदम मन फुलपाखरू झालंय. मला पाच वर्षं एक काम केल्यावर अशी सुट्टी घ्यायला हवी - नव्याने विचार करायला. हे समजण्यासाठी एवढे महिने खर्च करायला लागलेत!

Monday, October 4, 2010

ऑल इन / आफ्टर अ डेज वर्क

(मागच्या जर्मनी भेटीमध्ये काही पूर्व जर्मनीतले सहकारी, काही पश्चिमेचे, एक ब्राझिलची अशी टीम होती, त्यामुळे बर्‍याच गंमतीजमती झाल्या.त्याविषयी लिहायला सुरुवात केली होती, पण दोन महिन्यांपासून हे अर्धमुर्ध लिहून पडून आहे ... आज तसंच प्रकाशित करते आहे.)

********************


माणसं तशी एकेकेट्याने असताना बर्‍यापैकी नॉर्मल वागतात - पण त्यांची काही कॉम्बिनेशन्स एकदम डेंजर असतात.  असंच एक कॉम्बिनेशन गेले दोन आठवडे झाले होतं. त्याचा हा कॅलिडोस्कोप.

********************

रात्री साडेनऊला ऑफिसमधून निघून वाट शोधत परदेशातलं अनोळखी गाव बघायला साधारणपणे शहाणी म्हणण्यासारखी माणसं जात नाहीत. पण सगळेच "जाऊन तर बघू या" म्हणणारे निघाल्यावर अश्या प्रवासात धमाल मजा येते. नकाशा, जीपीएस अश्या क्षुद्र साधनांवाचून तुमचं काही अडत नाही. एक एक्झिट चुकली तर पुढची ... त्यात काय एवढं? नाही तरी आपल्याला काय घाई आहे पोहोचायची? रोज हॉटेलपासून ऑफिसपर्यंतचा प्रवासही रोमांचक असतो - कारण रोज नवाच रस्ता सापडतो.

********************

मला जर्मन बीयर चढलीय का? का खरंच माझ्या आजुबाजूचे लोक या भागातल्या डुकरांच्या संख्येविषयी, डुकरांच्या रोगांमधल्या स्पेशलायझेशनविषयी गंभीर चर्चा करताहेत? इथली डुकरं स्वच्छ असतात, त्यांची पिल्लं गोजिरवाणी दिसतात हे मान्य. पण डुक्कर हा प्राणी माणसाला स्पेशलायझेशन म्हणून का बरं निवडावासा वाटावा? आणि या उच्च शिक्षणासाठी ब्राझीलहून युरोपला शिकायला यावं? या परिसरात साडेचार लाख डुकरं आहेत? नाही ऍक्च्युअली त्यांनी साडेचार मिलियन म्हटलं ... म्हणजे पंचेचाळीस लाख! (पुण्यात किती असावीत?) हानोवरचं व्हेटर्नरी कॉलेज आणि क्लिनिक डुकरांसाठी जगप्रसिद्ध आहे ही ज्ञानप्राप्ती हा सगळा संवाद ऐकण्यातून झाली. यांची चर्चा चाललीय तोवर अजून एक बियर घ्यावी हे बरं. इट हेल्प्स मेंटेन युअर सॅनिटी.

********************

एखाद्या माणसाची सूचना तुम्हाला मान्य होत नाही, परिस्थितीशी अगदीच विसंगत वाटते कधीकधी. मान्य. पण म्हणून तुम्ही कामाच्या ठिकाणी, मिटिंगमध्ये ‘हाल्फ’ (अर्धा) म्हणून त्याची संभवना करू शकता? हे जरा जास्तच होतंय. चारपाच वेळा ‘हाल्फ’ ऐकल्यावर मला शोध लागला ... ही बाई हिच्या ब्राझिलियन पोर्तुगीज उच्चारांप्रमाणे जर्मन ‘राल्फ’ चा ‘हाल्फ’ बनवते आहे :D. आधी जर्मन ‘र’एवढा गटरल - बहुसंख्य अन्यभाषिकांना न झेपणारा ... त्याचं पोर्तुगीज रूप एवढं भीषण असेल याची मला कल्पना नव्हती.

********************

जर्मन सॉसेजेस कुणी कसं खाऊ शकतं? त्याला एक विचित्र वास असतो, आणि प्लॅस्टिकचा तुकडा खाल्ल्यासारखा स्वाद असतो. एकदम साउअरक्राउटशी स्पर्धा करेल इतका अनइंटरेस्टिंग प्रकार आहे हा.

********************

दररोज स्टीक आणि वाईनवाचून जेवण न होणार्‍या ब्राझीलच्या बाईला जर्मनीमध्ये रात्री साडेबारा वाजता मेथी खाकरा आणि दही - पोहे मेतकूट खायला घालायची आयडिया कशी वाटते? याला आन्तरराष्ट्रीय स्तरावरची देवाणघेवाण म्हणायचं का? ;) आणि जेंव्हा ही आंतरराष्टीय परिषद सिंगापूरमधल्या कुणाला तरी चर्चेत सामील करून घेते, तेंव्हा तर मी स्वतःच आचंबित होते. खरंच जग एवढं जवळ आलंय? जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून लोक एकमेकांच्या सहकार्याने एवढ्या मोठ्या आर्थिक उलथापालथी घडवून आणतात? यातल्या कुणालाच या आर्थिक घडामोडींमधून प्रत्यक्ष फायदा नाही. फायदा होणार तो कंपनीला. त्या अजस्त्र यंत्रातल्या खिळ्यांना कदाचित एखादी शाबासकीची मेल मिळेल या धडपडीकरता. बस. what motivates them to go that extra mile? याच्या एक शतांश डेडिकेशन दाखवलं तरी आपल्या देशाचे किती प्रश्न सुटतील!(मग पन्नास वर्षं झाली तरी बेळगावचा प्रश्न का बरं सुटत नाही? काश्मीर धुमसायचं का थांबत नाही? आपल्याला एकाही शेजार्‍याबरोबर बरे संबंध का निर्माण करता येत नाहीत? )

********************

राजाच्या जुन्या बागेतल्या मेळ्यामध्ये खेळ करणारे हे ऍक्रोबॅट्स रबराचे बनवलेले आहेत का? यांना मिळतात तश्या टाळ्या पुण्यातल्या दोरीवरच्या डोंबार्‍याच्या मुलीला कधी मिळणार? दर उन्हाळ्यात इथे आकर्षक दारूकामाची स्पर्धा असते. दर रविवारी एक या प्रमाणे आठ - दहा जगप्रसिद्ध फटाक्यांचे निर्माते आपलं दारूकाम सादर करतात, आणि त्यातून त्या वर्षाचा विजेता निवडला जातो. आजचं दारूकाम छानच होतं, पण तोक्योमध्ये त्यांच्या उन्हाळी उत्सवामध्ये (हानाबी मध्ये) याहून सरस काम बघायला मिळतं. दारूकामाच्या आधी एक गरम हवेचा बलून सोडतात, आणि त्या बलूनच्या खाली एक जिमनॅस्ट हवेत तरंगत कसरती करत असते. बलूनला लटकत कसरती करायला वेताचा मलखांब हा किती परफेक्ट प्रकार होईल!

********************

ब्राझिल हा दक्षिण अमेरिकेतला एकमेव पोर्तुगीजभाषिक देश आहे. (बाकी संपूर्ण दक्षिण अमेरिका स्पॅनिश बोलणारी.) काही काळ पोर्तुगीज साम्राज्याची राजधानी रिओला होती. ब्राझिलची सहकारी म्हणजे गोरी, काळी, पिवळी, इंडियन - काय रंगाची असणार याविषयी मला काहीही कल्पना नव्हती. प्रत्यक्ष भेटल्यावर समजलं - ब्राझिलची सहकारी म्हणजे कुठल्याही रंगाची असू शकते. ब्राझिल हा अतिशय सुंदर देश आहे, भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, लोकशाही विशेष रुजलेली नाही. इथली संस्कृती काही बाबतीत अमिरिकेला अगदी जवळची, तर कौटुंबिक संबंध एकदम भारतातल्यासारखे. आपली सासू ऐशीव्या वर्षी केवढी ऍक्टिव्ह आहे याचं वर्णन वर्णन ओल्गा सांगत होती ... आयुष्यभर तिने पब चालवला - अजूनही ती रोज थोडा वेळ गल्ल्यावर बसते. काठापदराची साडी, ठसठशीत कुंकू आणि हातभर बांगड्या घालणारी माझी सासू पबच्या गल्ल्यावर बसली तर कसं दिसेल असं चित्र क्षणभर माझ्या डोळ्यापुढे तरळून गेलं :)

********************