Wednesday, January 19, 2011

एकटी

एकटीनेच सुट्टी घेतली आहेस?


एकटीच फिरणार?

अरेरे ... नवर्‍याला सुट्टी नाही मिळाली का? बिच्चारी ... बोअर होशील ना आता एकटी फिरताना!

सुट्टीवर जाताना असं काय काय एवढं ऐकलं, की मलाच शंका यायला लागली आपण काय करतोय या विषयी. शेवटी आईला म्हटलं: "तुला सुद्धा वाटतंय का ग मी एकटी बोअर होईन म्हणून? "

"अगं स्वतःशीच गप्पा मारायच्यात म्हणून जाते आहेस ना? मग बोअर कशी होशील?" या तिच्या दिलाश्याने जागी झाले मी. दुसर्‍या कुणाची सोबत असली नसली तरी आपल्याला शेवटी एकटीनेच शोधायचंय ना स्वतःला? मग  आपलीच कंपनी काही काळ एन्जॉय करावी. स्वतःशीच निवांत गप्पा माराव्यात यासारखं सुख नाही. जरा चौकटीबाहेर जाऊन आपल्या आयुष्याची चौकट निरखावी असं वाटतंय ना? मग आपल्या जवळच्या सगळ्यांकडेच थोडे दिवस लांबून बघायला हवंय. त्यांच्या सोबतच राहिले तर  नीट दिसणार नाही हे सगळं.

आता हा फोटो एकाकी वाटातोय का तुम्हाला? समोर सुंदर समुद्र पसरलाय. मागे स्वच्छ वाळूचा किनारा. वर आकाशात सुरेख चित्रकारी केली आहे. नजर जाईल तिथवर समुद्र, वाळू आणि आकाशातलं सोनं. नकोशी गर्दी करणारं फ्रेममध्ये काहीच नाही. कळेल न कळेल अशी आपली ओल्या वाळूतली प्रतिमाही आहेच सोबतीला. शिवाय फ्रेमबाहेर राहून फोटो घेणाराही जवळ कुठेतरी आहेच की ... बस्स - अजून काय हवं असतं माणसाला आयुष्यात?फोटो आळश्यांच्या राजाने काढलाय. इतका सुंदर समुद्र आणि किनारा समोर असताना पाण्यात शिरायचं सोडून फोटो काढायचं पाप मी करणार नाही ;)