Friday, December 12, 2014

What a plant knows (and other things you didn’t know about plants)


कोर्सेरावर कोर्सचं हे नाव बघितलं, आणि ताबडतोब माझं नाव नोंदवलं!
 
“कोर्सेरा” हे माझं मागच्या वर्षात गवसलेलं ताजंताजं प्रेम. मुक्त शिक्षण असावं तर असं! जगाच्या पाठीवर कुठूनही, वाट्टेल त्या विषयावर, आपल्याला सोयीच्या वेळी फुकटात शिकायची सोय करून ठेवलीय त्यांनी. वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे इथे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात.  साधारण सहा आठवडे ते बारा आठवडे असा कालावधी एकेका कोर्सचा. मी आतापर्यंत चार तरी कोर्सेस मनापासून पूर्ण केलेत. (दोन तीन कोर्स काही तरी विघ्न येऊन अर्धवट टाकावे लागले, ते आता पुढच्या सेशनला.) आतापर्यंत मी अनुभवलेला तिथे शिकवणार्‍यांचा दर्जा, सहाध्यायींकडून शिकायला मिळणार्‍या गोष्टी आणि ऑनलाईन संवादाची पातळी या सगळ्यानेच मी प्रभावित झाले आहे.

तिथला तेल अवीव युनिव्हर्सिटीचा हा ऑनलाईन कोर्स. आठवड्याला साधारण ३ -४ तासांचा वेळ इथली व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी काढला, तर एकदम अलिबाबाची गुहाच उघडली! झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का ... एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले! ;) ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स!!! आणि थोडासा मोकळा वेळ असेल, तर तुमच्या आवडीचे कोर्सेस कोर्सेरावर धुंडाळून तर बघा ... केवढातरी खजिना गवसेल!

Wednesday, December 10, 2014

जिवंतपणाचं लक्षण ...


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.

आता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.

कात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच!) जास्तच कापणी केलीय का आपण? नवी पालवी येईल ना याला पुन्हा? अश्या शंका यायला लागतात.

या शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो. 


त्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो!


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात...

***
(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून ... पळा!!! :) )

Tuesday, December 9, 2014

रंग याचा वेगळा ...“मला दहा मुलं आहेत. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही!” असं ज्यांच्याविषयी त्यांच्या आईने म्हटलंय, त्या दाभोळकर “अजबखान्या”तलं एक आपत्य म्हणजे दत्तप्रसाद. यापूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये त्यांचे एक – दोन लेख वाचले होते, आणि अजून माहिती करून घ्यायची उत्सुकता होती. आईने “रंग याचा वेगळा” घेऊन दिलं आणि गेले तीन –चार दिवस वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवून, सगळी कामं टाकून या पुस्तकात बुडून गेले होते.  

दत्तप्रसाद दाभोळकर यांनी संशोधक म्हणून मोठं काम केलंय. हौस म्हणून शोधपत्रकारिता केली आहे. एखादा विषय भावला म्हणून त्याचा पाठपुरावा करून त्याविषयी अभ्यासपूर्ण, सुंदर, मूलगामी असं काही लिहिलंय. त्यांच्या भावंडांपैकी नरेंद्र दाभोलकरांनी अंनिसच्या कामाला वाहून घेतलं किंवा मुकुंद दाभोळकरांनी प्रयोग परिवार उभा केला. असं एकाच क्षेत्रात बुडून जाण्याचा दत्तप्रसादांचा पिंड नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जत्रेत फिरणार्‍या मुलाच्या उत्सुकतेने त्यांनी आयुष्याकडे बघितलंय, वेगवेगळे अनुभव घेतलेत.  

भारताच्या अंटार्टिका मोहिमेविषयीचा आणि एकूणातच भारतातल्या संशोधन क्षेत्राविषयी त्यांचा लेख वाचला आणि मोठ्ठा धक्का बसला. आपल्याकडे संशोधनाचं फारसं काही चांगलं नाही हे मी बाहेरून ऐकून होते, पण परिस्थिती इतकी भीषण असेल याची कल्पना नव्हती. सरकारी संशोधन संस्था, आपल्या उद्योगांमधले संशोधन विभाग या सगळ्या अरेबियन नाईट्समधल्या सुरस कहाण्या इथे वाचायला मिळतात.  

सरदार सरोवर, मोठे विकासप्रकल्प, विस्थापितांचे प्रश्न आणि पर्यावरण याविषयी माझ्या मनात मोठ्ठं कन्फ्यूजन आहे. मला यातल्या सगळ्यांच्याच बाजू बर्‍याच अंशी पटतात आणि नेमकं काय चुकतंय ते सांगता येत नाही. “माते नर्मदे” मी वाचलेलं नाही. (आजवर हे वाचलंच पाहिजे म्हणून कुणी समोर कसं ठेवलं नाही याचं आता आश्चर्य वाटतंय!) नर्मदा प्रकल्पाविषयी दाभोळकर जे म्हणतात त्यात अभिनिवेश दिसत नाही तर  स्पष्ट विचार आणि ठोस उपाययोजना आहेत असं वाटतं, त्यामुळे त्यांचं म्हणणं पूर्ण पटतंय. आता “माते नर्मदे” वाचणं आलं! 

एके काळी विवेकानंदांची पारायणं केल्यावर गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या वाटेला गेलेले नाही. दाभोळकरांनी विवेकानंदाविषयी लिहिलेलं वाचून खूप काही नवं हाती सापडल्यासारखं वाटतंय, पुन्हा विवेकानंद वाचावेसे वाटताहेत, त्यांचं विवेकानंदांवरचं पुस्तक वाचावंसं वाटतंय.  

राजधानी दिल्लीची क्षणचित्रं, १८५७ वरची त्यांची टिप्पणी, १९९० च्या भांबावलेल्या रशियाचा त्यांनी घेतलेला वेध, किंवा त्यांची व्यक्तीचित्रं ... या पुस्तकातले त्यांचे लेख वाचून अजून वाचायच्या पुस्तकांची एक मोठी यादी तयार झालीये मनात. एवढं दाभोळकरमय होऊन जाण्यासारखं काय आहे या पुस्तकात? दाभोळकरांची लेखनशैली आवडली, त्यांच्या अभ्यासाला, विचाराला दाद द्यावीशी वाटली हे तर आहेच. पण याहूनही आवडलंय ते त्यांचं जगणं, त्यांची वेगवेगळ्या प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. ज्या वेळी जे भावलं, ते तेंव्हा जीव ओतून करणं आणि नंतर त्यापासून वेगळं होणं. त्यांना संशोधनक्षेत्र आतून बाहेरून माहित आहे पण त्यातल्या राजकारणात ते नसतात. दिल्ली कशी चालते ते त्यांनी बघितलंय, पण ते ती चालवायला प्रयत्न करत नाहीत. अनेक साहित्यिकांचा त्यांचा स्नेह आहे, स्वतःचं लेखन आहे. ज्ञानपीठसारख्या पुरस्काराचं राजकारण त्यांनी बघितलंय. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळावं म्हणून ते सर्व प्रयत्न करतात, पण स्वतः साहित्यातल्या राजकारणापासून दूर राहण्याचं साधतात. हे जाम आवडलंय!!!

***
रंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन
संपादन: भानू काळे
कॉंटिनेंटल प्रकाशन
किंमत ४०० रू.