आईकडे मी कधी लोणी काढायच्या भानगडीत पडले नव्हते. एक तर ते बाबांचं 'designated' काम होतं, आणि मी उठेपर्यंत बहुधा ताक घुसळून झालेलं असायचं. सकाळी (साखरझोपेमध्ये) बाबांचा ताक घुसळण्याचा आवाज ऐकला म्हणजे मनात ’अरे वा आज ताजं ताक मिळणार’ अशी नोंद घ्यायची आणि पुन्हा कुशीवर वळून झोपायचं एवढाच ताक घुसळणे / लोणी काढणे प्रकाराशी नियमित संबंध. भुसावळला कधीतरी मंजूकडे ताक केलं असेल किंवा एखाद्या वेळी बाबांना बरं वगैरे नसल्यामुळे कधी ताक घुसळलं असेल तेवढंच.
लग्नानंतर आम्ही ’चंद्रकांत’चं दूध घ्यायला सुरुवात केली आणि एक नवीन समस्या निर्माण झाली. एवढ्या सायीचं करायचं काय? बाबांसारखं एका दिवसाआड ताक करायला तर परवडणार नव्हतं. प्रसादचा ’साय टाकून दे’ हा पर्याय मी ताबडतोब हाणून पाडला. ’फार साय येते. दूध फार चांगलं आहे’ म्हणून दूध बदलणं फारच गाढवपणाचं वाटत होतं. अखेर आठवडाभराच्या सायीला विरजण न लावताच मिक्सरमध्ये (ताक टाकून देऊन) लोणी करायची वेळ आली.मिक्सरमध्ये ताक मी कधी केलंच काय, झोपेमध्ये ऐकलं सुद्धा नव्हतं. रविवारी तासभर खास या कामासाठी राखून ठेवून, बाई आणि प्रसाद आपले प्रयोग बघायला नाहीत याची खात्री करून घेतली. मनाचा हिय्या करून ती साय मिक्सरमध्ये घातली आणि मिक्सर लावला. त्या सायीला काही दया येईना. सुदैवाने मिक्सर प्रसादच्या ’फिलिप्स’चा होता - त्यामुळे एकीकडे साय लावून मला दुसरे उद्योग करता येत होते. अखेरीस अर्ध्या तासाने कसंतरी लोणी निघालं. विरजण लावलंच नव्हतं,त्यामुळे ताजं ताक मिळण्याचा प्रश्नच नव्हता. एवढे कष्ट करून ताक न मिळणं म्हणजे फारच झालं. पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रयोग,विरजण लावून. एक कवकवीत, बेचव रसायन ताक म्हणून उरलं. मागच्या वेळेसारखं ते धड टाकूनही देता येईना - किती झालं तरी ते शेवटी ’ताजं ताक’ होतं ना! पुढच्या वेळी ठरवलं - या मिक्सरच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं साधं रवी घेउन ताक करावं.(बाबांची आठवण काढत)रवी घेऊन बसले. अर्धा तास घुसळून काही होईना. बाबा नेमके किती वेळ ताक घुसळत असावेत बरं सकाळी? तेवढ्यात कुणाचातरी वेळखाऊ फोन आला. तो संपेपर्यंत प्रसाद आला, आणि कुठेतरी बाहेर जायचं निघालं. आता या अर्धवट झालेल्या ताकाचं मी काय करू? ते तसंच टाकून शेवटी गेले. परत आल्यावर बघितलं तर ताक / साय परत मूळपदाला.
दर आठवड्याचे प्रयोग अयशस्वी होता होता अखेरीस दर रविवारी सायीची भीती वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. लोणी काढणे हे माझी सगळी कल्पकता, एनर्जी आणि वेळ खाऊन टाकणारं एक ’कॄष्णविवर’ दर्जाचं, ’काळ्या यादीमधलं’ काम बनलं. दर रविवारी पुढे ढकलून शेवटी साय काढायला आणि फ्रिजमध्ये ठेवायला घरात एकाही भांड्यात कणभरही जागा शिल्लक नाही अशी परिस्थिती आल्यावर नाईलाजाने मी महिनाभराची साय एका रविवारी दिवसभर घुसळून टाकली आणि बाबांनी केलेल्या ताज्या ताकाच्या आठवणी काढत पुढच्या सायमुक्त रविवारची वाट बघत बसले. महिनाभराच्या(?) सायीसाठी एक मोठ्ठं पातेलं बनवायला सुरुवात केली, आणि महिन्याला तीनच रविवार असतात हे कटु सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी केली.
असंच एकदा सायीचं ते जंगी पातेलं भरल्यावर मी शनिवारी त्याला विरजण लावून ठेवलं होतं. रविवारी नेमक्या मी घरात नसतांना दुपारी बाई कामाला आल्या. हे कसलं पातेलं आहे ते त्यांना कळेना. अखेरीस त्यांनी आणि प्रसादने "दूध नासलेलं दिसतंय" असा निष्कर्ष काढला, आणि पातेलं रिकामं करून चांगलं स्वच्छ घासून ठेवलं!
अखेर एका रविवारी ती अटळ घटना घडली. माझा साय-प्रयोग करायला एकांतच मिळेना! एवढी तयारी करून मी नेमकं काय करणार अहे, ते बघायला बरोब्बर सासुबाई आल्या. नाईलाजाने मी त्यांच्या समक्ष मिक्सर सुरू केला. त्यांनी २-४ मिनिटं एकंदर रागरंग बघितला, मग हळूच सांगितलं-"मिक्सरचं कुठलं पातं लावलं आहेस तू? फ्लिपर लावत जा. आणि मिक्सर असा फुल स्पीडला नाही चालवायचा लोण्यासाठी." पुढच्या रविवारी (सासुबाई नसतांन अर्थातच - त्या तोवर परत गेल्या होत्या हुबळीला) माझा नवा प्रयोग. दहा मिनिटांत लोणी तयार, आणि शिवाय पिणेबल ताजं ताकसुद्धा!
जवळजवळ वर्षभर चाललेल्या या लोणी प्रकल्पामधून एक ’मंथन थिअरी’ तयार झाली माझ्याजवळ. पहिली गोष्ट म्हणजे, आपण घाईकरून मंथन लवकर संपत नाही. दुसरं म्हणजे, या मंथनातून काहीही निष्पन्न होणं अशक्य आहे असं वाटायला लागेपर्यंत आपल्याला कुठलीच प्रगती दिसत नाही. खूप वेळ तुम्ही नुसतेच प्रयत्न करत राहता, दॄष्य परिणाम काहीच नसतो. या स्थितीमध्ये प्रयत्नांना चिकटून रहावंच लागतं. त्यानंतर जेंव्हा परिणम दिसायला लागतो, तेंव्हा होणारा आनंद खास असतो. या वेळेपर्यंत ’by grace of God things are taking place' असं म्हणण्याची आपल्या मनाची तयारी झालेली असते, कर्ताभाव संपलेला असतो. तिसरा मुद्दा म्हणजे परिणाम दिसायला लागले म्हणून ताबडतोब थांबण्यासारखा गाढवपणा नाही. अजून थोडंसं टिकून राहिलं तर याच्या कितीतरी पट जास्त फळ मिळतं. Take things to their logical conclusion. चौथी गोष्ट म्हणजे,अत्याधुनिक सधनं हा तुमच्या अडाणीपणावरचा उतारा नाही. ती कशी वापरायची हे तुम्हाला कळायला हवं. आणि शेवटचं म्हणजे, ask your mom in law... she also knows something.
इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
Monday, June 23, 2008
Saturday, June 7, 2008
भीती
भीती
काही महिन्यांपूर्वी ’अंतर्नाद’ मध्ये हेमंत जोगळेकरांचा भीतीविषयीचा लेख वाचला. त्यातलं काहीच पटलं नाही somehow. खूप उथळ, वरवरचं वाटलं. शाळकरी मुलांनी लिहिलेला निबंध वाचत असल्यासारखं वाटलं - भाषेची पकड यॆण्यासाठीचा सराव. शब्दांचा फुलोरा. त्यातून व्यक्त काय करायचं आहे त्यांना? ’सगळ्या माणसांच्या मनामध्यॆ, कायम भीती ही असतेच.’ बस एवढंच सार संपूर्ण लेखाचं.
जगातल्या प्रत्येक माणसाने आयुष्यात कधीतरी प्रचंड, तळ नसलेली भीती अनुभवली असेल कदाचित. बहुधा मरणाची भीती. पण मग एखाद्या ध्येयाने वेडे होऊन जे या भीतीच्या पलिकडे जाऊ शकले, ते कसे गेले? का ’Courage is fear that has said its prayers' एवढं साधं, सरळ असतं हे सगळं? माधवराव पेशव्यांबरोबर सती गेलेल्या रमाबाईंना क्षणभरही भीती वाटली नसेल? मुरारबाजी, तानाजी, फिरंगोजी यांच्या लहानपणापासून ऐकलेल्या इतिहासातल्या गोष्टींमध्ये नुसतं "ते खूप शूर होते. मरणाला घाबरणारे नव्हते" म्हणून बोळवण करतात. ही सगळी माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कुठल्याच क्षणी न घाबरण्याचा कुठला तरी "mutant gene" घेऊन जन्माला आली असतील असं मला वाटत नाही.
लहानपणी मला कसलीच भीती वाटायची नाही म्हणून आई टरकून होती. पोहोता येत नसतांनासुद्धा मी बिनधास्त माझ्या डोक्याएवढ्या, त्याहूनही खोल पाण्यामध्यॆ धडाधड उड्या मारायचे. Somehow,आपण पाण्यात बुडू, मरून जाऊ असं मला कधी वाटलंच नाही. पाणी आपल्याशी खेळतंय असं वाटायचं. आणि आपल्याला मुद्दामहून कोणी बुडवण्याचा प्रयत्न करणार नाही अशीही पूर्ण श्रद्धा होती. हा attitude आजही विशेष बदललेला नाही. प्रसाद्ला हा निष्काळजीपणा वाटतो. माझा हा स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. तो बदलण्याची मला इच्छाही नाही. भीती न वाटणं हे अनैसर्गिक आहे का?
भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं? सगळे निर्भय म्हणून नावाजलेले लोक काही मुद्दाम, थ्रील म्हणून धोका पत्करणारे नव्हते - म्हणजे थ्रील अनुभवण्यासाठी मुद्दमहून मृत्यूगोलामध्ये उडी घेणारे नव्हते. पण वेळ आली तेंव्हा त्यांनी तेही केलं. कसं? मला असं काही करण्याची वेळ आली तर? मला प्रथम थोडं शांत बसावंसं वाटेल. (fear saying its prayers ;)) नंतर मग फक्त आल्या क्षणाचा विचार करायचा. एका सीमेपर्यंत तुम्हाला भीती वाटेल. त्यानंतर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचता. तेंव्हा फक्त ’इस पल की सच्चाई’ जाणवते असं मला वाटतं.
ऑपरेशन हा एक मला न पचणारा प्रकार आहे. एकूणातच वैद्यकसाम्राज्य आणि त्यांचा तुमच्याकडे ’स्त्री, वय ३१, यापूर्वीचे मोठॆ आजार, आजोबा काय रोगाने गेले...’ केस नंबर १६ म्हणून बघण्याचा दृष्टीकोन पचनी पडणं जडच जातं. एक तर हे लोक तुमच्याकडे फक्त शरीर म्हणून बघत असतात. त्याच्या भविष्याविषयी छातीठोक विधानं करत असतात. पुन्हा treatment विषयी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगणारे डॉक्टर मोजकेच. त्यमुळे शक्यतो आपलं आरोग्य आपण सांभाळावं, डॉक्टरच्या वाटेला जाऊ नयॆ असं माझं मत. पण ऑपरेशन करायचं ठरल्यावर माझा नाईलाज झाला. (आता कुठे पळून जाणर? ;) ) शेवटी म्हटलं, let me face it. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांवर माझा १००% विश्वास होता. मग आपल्या शरीराला दोन चार तास पूर्णपणे त्यांच्या हवाली करायला काय हरकत आहे? मस्त निर्धास्त, शांत झोप लागली या विचाराने. एवढी निवांत मी कित्येक वर्षात नव्हते. हा विचार मनात येण्यापूर्वी जी अस्वस्थता होती, ती भीती होती का? आणि मग मझ्या विचारांनी भीतीवर मात केली?
बाबा आमटे जिला ’निर्भयतेची साधना’ म्हणतात ती नेमकी कशी असते? जन्मतः भिरू असणारी व्यक्ती ठरवून निर्भय होऊ शकते? कसं बनायचं निर्भय? कशाची भीती, कशामुळे भीती वाटते याचा वस्तुनिष्ठ विचार करून, या विचारांमुळे भावनेच्या पलीकडे जाता येतं? का एखाद्या लहान बाळासारखं निर्धास्त कुणाच्यातरी मांडीवर ’घालू तयावरी भार’ म्हणून झोपणं त्यापेक्षा सोपं आहे? रमाबाई किंवा तानाजीराव वर भेटलॆ म्हणजे त्यांना विचारायला पाहिजे.

Subscribe to:
Posts (Atom)