हल्ली पुण्यात गाढवं दिसत नाहीत फारशी. खूप दिवसांनी हे गोजिरवाणं पिल्लू बघायला मिळालं ...
पिल्लामुळे आमच्या जुन्या `गळाभेटी'ची आठवण जागी झाली.
मी दुसरी - तिसरीत असतानाची गोष्ट. आमची शाळा सकाळी सातची असायची. मोठा भाऊ तेंव्हा नुकताच स्कुटर चालवायला शिकत होता. एक दिवस शिकाऊ उत्साहाने तो मला शाळेत सोडायला तयार झाला. थोडाफार उशीरही झालेला होता निघायला. अजून त्याच्याकडे लायसन्स नव्हता आणि तेवढा सरावही नव्हता, त्यामुळे गर्दी, मोठे चौक, मामा असं सगळं टाळत आणि ‘शॉर्टकट’ने जायचं होतं. आमच्या ‘शॉर्टकट’ मध्ये एक मोठा मोकळा प्लॉट तिरपा ओलांडून जायला लागायचं. आम्ही रोज शाळेला जाऊन - येऊन तशी पायवाट बनवून टाकली होती.(हा प्लॉट म्हणजे न कसलेलं शेत होतं - खानदेशातली काळीभोर, लोण्यासारखी मऊ माती पावसाळ्यात त्याचं रूपांतर चिखलाच्या मोठ्ठ्या खड्ड्यात करून टाकायची. पण आता पावसाळा संपलेला होता, त्यामुळे तसं इकडनं जाणं सेफ होतं. तर भाऊ आणि मी निघालो स्कुटरवरून. प्लॉटपर्यंत व्यवस्थित पोहोचलो. हवेत सुखद गारवा होता. प्लॉट हिरव्यागार लुसलुशीत गवताने सजलेला होता. गवतावर पडलेलं दव अजूनच रोमॅंटिक मूडमध्ये घेऊन जाणारं. एकूण वातावरण एकदम प्रसन्न होतं.
तिथे चरणाऱ्या गाढवांच्या जोडीलाही सकाळचा हा प्रसन्नपणा जाणवला असावा. फारच खुशीत येऊन त्यांनी एकदम हिंदी सिनेमातल्या हिरो-हिरॉईनप्रमाणे एकमेकांच्या मागे पळायला सुरुवात केली. हिरोईन आमच्या स्कूटरसमोरून धावत पलिकडे गेली. पाठोपाठ येणाऱ्या हिरोला त्याच्या आणि प्रियेच्या मधली स्कूटर बहुतेक दिसलीच नाही. काय होतंय ते समजायच्या आत मी, स्कूटर आणि भाऊ जमिनीवर, आणि आकाशात हिरो अशी कोरिओग्रफी बघायला मिळाली. एक कोलांटी मारून हिरो तडक त्याच्या प्रियेपठोपाठ निघून गेला. स्कूटर चालू कशी होणार म्हणून भाऊ धडपडत उभा राहिला. ‘बजाज सुपर’वर कुठे ओरखाडा सुद्धा नव्हता. भावावरही नव्हता. माझ्यावरही नव्हता. (सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बंधूराजांच्या प्रॅक्टीसमुळे मला वाहनावरून पडण्याची प्रॅक्टीस होती.) दप्तरामधली पाटी फुटलेली होती या पलिकडे या घटनेला पुरावा नव्हता. पण ही‘गाढवांची परस्परभेट’ बरेच दिवस पुरली नंतर चिडवायला.