हरेकृष्णजींची ही पोस्ट वाचली, आणि निकोलाउस लेनाऊ (Nikolaus Lenau) या ऑस्ट्रियन कवीची Die drei Zegeuner (तीन जिप्सी) ही कविता आठवली. लेनाऊची मूळ कविता बॅलड प्रकारची - म्हणजे गेय आहे. हा त्या कवितेचा मी केलेला स्वैर अनुवाद ...
************************************************************
एकदा माझी थकली भागलेली गाडी
रेताड माळरानावरून
रडत खडत चालली होती
तेंव्हा कुरणामध्ये मला तीन जिप्सी दिसले.
सायंकाळच्या प्रकाशात उजळून
त्यांच्यातला एकजण आपल्याचसाठी
हातातल्या सारंगीवर
एक मनस्वी गाणे छेडत होता
दुसर्याच्या हातात चिलीम होती
आणि जगातल्या आणखी कुठल्याच गोष्टीची
गरज नसावी अश्या समाधानात
तो चिलीमीच्या धुराकडे बघत होता
तिसर्याने आपल्या झांजा एका झाडावर अडकवून
मस्त ताणून दिली होती
झांजांच्या दोरीवरून वार्याची झुळुक जात होती
आणि त्याच्या हृदयावरून एक स्वप्न चाललं होतं
तिघांच्या फाटालेल्या कपड्यांवर
रंगीबेरंगी ठिगळं होती
पण नियतीवर
तिघांनीही मात केली होती
आयुष्य आपल्यावर रुसतं तेंव्हा
त्याला कसं झटकून टाकायचं
हे झोपून, चिलीम ओढून, सारंगी वाजवून
तीन प्रकारे त्यांनी मला दाखवलं होतं.
जिप्सींचे सावळे चेहेरे
आणि काळेभोर केस
कितीतरी वेळ बघितल्यावर
पुढे जाणं भाग होतं
************************************************************