नवर्याने आयुष्यात एक काम धड केलं नाही. हिनेच त्याला खाऊ - पिऊ घालायचं, संसाराचं गाडं ओढायचं. त्याने फक्त रिकामटेकड्या शिष्यांना गोळा करायचं, आणि दिवसभर तोंडपाटीलकी करायची. या सत्याच्या शोधाने कधी कुणाचं पोट भरलंय? काही कामधंदा नको का माणसाला? काही पोटापाण्याची व्यवस्था?
शिष्यांनी तरी किती डोक्यावर चढवून ठेवावं याला? हाक मारून ओ देत नाही म्हणून वैतागून शेवटी अंगावर पाणी फेकावं, तर त्यावर याची टिप्पणी ... "ढगांच्या गडगडाटानंतर पाऊस पडाणारच!" ... आणि हे सुद्धा कौतुकाने नोंदवून ठेवणारे याचे शिष्य.
हे अथेन्सचे नागरिक तरी एवढ्या निरुपयोगी आणि निरुपद्रवी माणसाला कसे घाबरले कोण जाणे.
पण याला तरी समजलं पाहिजे ना? बिनाकामाचा असला तरी असल्याचा आधार होता. आता सत्याच्या नावाने घरदारावर तुळशीपत्र ठेवून मरायला निघाल्यावर पोरांकडे कोण बघणार? झांटीपीच्या नशीबाचे भोग काही संपत नाहीत.
तत्त्वामागे जाणारा सॉक्रेटिस इतिहासात अजरामर, आणि फरफटत खस्ता खात त्याच्यामागे येणारी बिचारी कजाग झांटीपीही.
आता नवरा-बायकोची भांडणं काय होत नाहीत? फाटक्या तोंडाची असली म्हणून काय झालं, प्रेम होतंच ना तिचं नवर्यावर? जगरहाटीपेक्षा काय वेगळी अपेक्षा ठेवली होती तिने संसाराकडून? पण एकदा नवर्याच्या अंगावर टाकलेलं पाणी शतकानुशतकं छळत राहणार बिचारीला. आणि आपला बिनकामाचा नवरा एवढं काय करून गेलाय हा प्रश्न सुद्धा.
*************************************************************
तुकोबाची अवली काय किंवा सॉक्रेटिसची झांटीपी ... त्यांच्या नवर्यांचं कौतुक वाचताना मला नेहेमी हा प्रश्न पडलाय ... यांच्या बायकांना काय वाटत असेल?
इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
Monday, May 31, 2010
Thursday, May 27, 2010
वैशाख पौर्णिमा
घाबरू नका ... मी यापुढे दिवसाला तीन पोस्ट लिहायला सुरुवात करणार नाहीये ... ही पोस्ट २ महिन्यांपासून ड्राफ्ट म्हणून पडून आहे योग्य मुहुर्ताची वाट बघत ... आज फक्त ती प्रकाशित केलीय वेळेचं औचित्य साधून.
*************************************************************
वैशाख वणव्याने तप्त झालेल्या धरतीवर आपल्या सौम्य शीतल चांदण्याची वृष्टी करणारा पौर्णिमेचा चंद्र. जे परिपूर्ण असतं, ते सुंदर असतं, आनंदी असतं. पौर्णिमेच्या चंद्रासारखं. एका तपश्चर्येची पूर्तता होण्यासाठी याहून सुयोग्य वेळ कुठली असणार?
सत्य शोधायला महालाबाहेर पडलेला, अपार करुणेने भरलेला तो राजपुत्र. सत्य शोधायला त्याने सर्व मार्ग अवलंबले. देहदंडन करून बघितलं, वेगवेगळे गुरू करून बघितले. त्याला सत्य सापडलं ते स्वतःच्या आत शोधल्यावरच. आयुष्य हे दुःखाने भरलेलं आहे. या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. ही तृष्णा विझवून टाका, दुःख आपोआप दूर जाईल. वैशाख पौर्णिमेला त्याला हे गूढ उकललं. आयुष्यभर ज्याचा ध्यास होता, ते सत्य सापडण्याच्या क्षणी तो म्हणतो ...
आनंद, दुःख, आशा निराशा याचं घर बांधून मला जखडून ठेवणाऱ्या तुला मी जन्मामागून जन्म शोधतो आहे. तुझ्या या घरापायी मला कितीएक जन्मांची दुःख सहन करावी लागली. आता मात्र मी तुला बघितलंय - परत काही तू मला बांधून ठेवू शकणार नाहीस. तुझे पाश, तुझं घर सगळंच आता भंग पावलं आहे. मनातले सगळे विकार गळून गेले आहेत, मला पुन्हा पुन्हा या चक्रात अडकवणारी तहान शमली आहे.

बौद्ध होणं सोपं आहे ... बुद्ध होण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार?

अनेक जाति संसारं संधाबिस्सं अनिब्बस्सं
गहकारक गवेसन्तु, दुक्ख जाति पुन: पुन:
गहकारकं दिठ्ठोसि पुन गेह न काहसि
सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसङ्गमत्
विसंङ्खारगतं चित्तं तण्हानं खयमज्झगा
आनंद, दुःख, आशा निराशा याचं घर बांधून मला जखडून ठेवणाऱ्या तुला मी जन्मामागून जन्म शोधतो आहे. तुझ्या या घरापायी मला कितीएक जन्मांची दुःख सहन करावी लागली. आता मात्र मी तुला बघितलंय - परत काही तू मला बांधून ठेवू शकणार नाहीस. तुझे पाश, तुझं घर सगळंच आता भंग पावलं आहे. मनातले सगळे विकार गळून गेले आहेत, मला पुन्हा पुन्हा या चक्रात अडकवणारी तहान शमली आहे.
*************************************************************
बौद्ध होणं सोपं आहे ... बुद्ध होण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार?
Wednesday, May 26, 2010
स्कॉलर आणि राक्षस
वर्षभरापूर्वी गच्चीतल्या बागेची सुरुवात केली तेंव्हा दोन फिलोडेंड्रॉनची रोपं आणली होती.
हा माझा ‘स्कॉलर’:
शाळेत, कॉलेजमध्ये पहिल्या बेंचवर बसणारी सिन्सियर, अभ्यासू मुलं असतात ना, पहिल्या दिवसापासून सगळ्या असाईनमेंट पूर्ण असणारी, तसा. लावल्यापासून आजपर्यंत नियमित, एका वेगाने वाढणारा. कुंडीत मॉसस्टिक लावल्यावर सिन्सियरली तिला धरून चढलेला. प्रत्येक पान नेटक्या आकाराचं, रंगाचं. अगदी भेटायला आलेल्या मैत्रिणीने ‘हे प्लॅस्टिकचं झाड ना?’ म्हणून विचारलं, इतका शिस्तीचा.
यांना कधी कंटाळा येत नाही का? दंगा करावासा वाटत नाही का? सगळ्या नियमांमध्ये आणि शिस्तीमध्ये बोअर होत नाही का? सारखं काय शहाण्यासारखं वागायचं? हे प्रश्न मला स्कॉलर मंडळींना बघून पडायचे, आज याला बघून पडतात. हे आपल्याला झेपणारं नाही, याची तेंव्हाही खात्री होती, आजही आजे. स्कॉलर मंडळींविषयीचा जुनाच आदर याच्याविषयी वाटतो.
आणि हा राक्षस:
याचं सगळं त्या स्कॉलरच्या उलट. कुठलाही नियम याला मान्य नाही. कुंडीतल्या मॉसस्टिकचा आणि याचा दूरान्वयेही संबंध नाही, कारण आपण कसं वाढावं हे दुसरं कुणी ठरवणंच मुळात याला मान्य नाही. तो अपनी मर्जी का राजा आहे. सगळी पानं साधारण एका आकाराची असावीत हे याच्या गावीही नाही. याचं आजवर आलेलं प्रत्येक पान जुन्या पानापेक्षा मोठं आहे, म्हणून त्याचं प्रेमाचं नाव ‘राक्षस’. नर्सरीमधून आणल्यावर पहिल्यांदा ज्या कुंडीत हा राक्षस लावला, ती त्याला आवडली नाही. आणि आपली नाराजी त्याने अगदी स्पष्टपणे व्यक्तही केली. नुसतंच भुंडं खोड, पानांचा फारसा पत्ता नाही, असलेली पानं लगेच पिवळी पडणं असा बाग-आंधळ्यालासुद्धा नजरेआड न करता येणारा तीव्र निषेध त्याने व्यक्त केला. त्यामुळे थोड्या दिवसांतच त्याला नवी कुंडी मिळाली. हे नवं घर आवडल्याचंही आणि खूश असल्याचंही त्याने तितक्याच जोरात सांगितलं. एवढा तरारून आला, की हेच ते जुनं केविलवाणं झाड यावर विश्वास बसू नये.
गच्चीतल्या वेड्या वार्यावर डोलायला याला आवडतं. भले त्यामुळे पानांच्या चिंध्या झाल्या तरीही. वार्यापासून थोडं संरक्षण म्हणून याला कोपर्यात हलवावं, तर शेजारच्या भिंतीवर घासून हा पानांची लक्तरं करून घेतो. त्यामुळे मारामारी करून आलेल्या पोरासारखा का दिसेना, याला तिथे वार्यातच ठेवायचं असं मी ठरवलंय. नाही तरी मला कुठे व्हर्सायसारखी ‘शिस्तबद्ध’ बाग करायचीय? तो मजेत असला म्हणजे झालं. स्कॉलरसारखा मला याच्याविषयी आदर बिदर वाटत नाही - पण आपल्यासारखंच कुणीतरी आहे हे बघून बरं नक्कीच वाटतं.
आता तुम्हीच सांगा, या दोघांना एका जातीची दोन झाडं कुणी म्हणेल का? या बोटॅनिस्ट लोकांना काही समजत नाही असं माझं मत झालंय.
(फोटो भर दुपारच्या रम्य वातावरणात काढलेत, आणि दोघंही आता या फोटोंपेक्षा दुप्पट मोठे झाले आहेत... पण ताजे फोटो काढायचा कंटाळा केलाय फोटोमुळे पोस्ट लांबणीवर पडेल म्हणून ... तेंव्हा समजून घ्या.)

दुसरा वाढदिवस
२४मे ला ब्लॉगचा दुसरा वाढदिवस होता. ब्लॉगवरचं दुसरं वर्ष कसं होतं याचा सहजच मनाशी आढावा झाला. यावर्षी कितीतरी मराठी ब्लॉगर्सशी मैत्री झाली. ब्लॉगर मेळावे, इ-सभा आणि व्यक्तिगत पातळीवरही ब्लॉगर्सचा परस्परसंवाद या वर्षी वाढल्यासारखा वाटतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत आता ‘मराठी ब्लॉगर परिवार’असं काही आहे असं वाटतंय. कदाचित असा परिवार पूर्वीही असेल आणि मला त्याची कल्पना नसेल, किंवा तेंव्हा थोडा विस्कळित असेल.
ब्लॉग हे मराठीमध्ये तुलनेने नवीन माध्यम आहे, आणि हळुहळू ते बाळसं धरतंय. त्याचा आवाका, शक्तीस्थानं आणि मर्यादा यांचा आपल्याला अजून अंदाज येतोय. मराठी ब्लॉगलेखनाचं स्वरूप, दर्जा, ब्लॉगकडून अपेक्षा याविषयी गेल्या काही दिवसात नीरजाच्या आणि वटवट सत्यवानाच्या पोस्टच्या निमित्ताने भरपूर लिहिलं गेलंय. त्यात अजून भर टाकण्यासारखं माझ्याजवळ काही नाही.
माझ्या ब्लॉगवरच्या लेखनाच्या स्वरूपात बदल झालाय. अगदी सुरुवातीच्या पोस्ट या वहीतलं लिखाण ब्लॉगवर पुन्हा उतरवणं या स्वरूपाच्या होत्या. दोन वेळा हाताखालून गेल्यामुळे त्याच्या मांडणीमध्ये जास्त नेमकेपणा होता, लांबीही जास्त होती. भाषेचा बाज काहीसा वेगळा होता. हळुहळू पोस्टची लांबी कमी झालीय. फोटोचा, दुव्यांचा वापर वाढलाय. लिहिण्यातला प्रवाहीपणा वाढल्यासारखा वाटतोय. स्वतःचं नसलेलं लिखाण इथे न टाकण्याचा माझा मूळ बेत होता. पण कवितांच्या वहीमधून हळुहळू माझे आवडते कवी इथे दिसायला लागलेत. आपले नसलेले फोटो, चित्रं न टाकण्याचं मात्र एक ऍन फ्रॅंकचा अपवाद सोडल्यास जमलंय. नेहेमीच्या मराठी अनुभवविश्वाबाहेरचं काही मांडता आलं तर बघावं अशी एक इच्छा होती. फुटकळ अनुवादांमधून ती काही अंशी का होईना पण साधता येते आहे असं वाटतंय. फुकटात जागा मिळते आहे म्हणून वाट्टेल ते (महेंद्र काका, मला उगीचच तुमच्या ब्लॉगवर टीका केल्यासारखं वाटतंय हे लिहिताना ... तुमच्या ब्लॉगचं नाव बदला प्लीज :D ), लिहिणं टाळायचं, जे जालावर उपलब्ध आहे, त्याची द्विरुक्ती टाळायची असं एक धोरण होतं. तरीही थोड्याफार ‘टाईमपास’ पोस्ट झाल्यात. पण एकंदरीत स्वतःच्या मनाला भिडणारं, आपल्याला परत कधी वाचावंस वाटेल असं लिहायचं हे बर्यापैकी जमलंय असं वाटतंय.
दोन वर्षात पन्नास -पंचावन्न पोस्ट म्हणजे मी अजूनही ‘स्लो ब्लॉगर’च आहे. अर्थात ब्लॉगला सुरुवात करताना याची कल्पना होती. माझ्या कामाचं स्वरूप बैठं आहे, आणि कामानिमित्त‘व्हर्च्युअल टीम’ मध्येच बहुधा आठवडेच्या आठवडे संवाद असतो. त्यामुळे हाडामांसाच्या माणसांशी प्रत्यक्ष बोलणं, लॅपटॉपच्या बाहेरच्या खर्याखुर्या जगाकडे बघणं ही प्रायॉरिटी होती. आणि लिहिल्यापेक्षा जास्त वाचणं ही सुद्धा. त्यामुळे साधारण दोन आठवड्याला एक पोस्ट झाली तरी मी सुखी आहे. ब्लॉगवरच्या प्रतिक्रियांना आवर्जून उत्तरं लिहिणं हे मात्र ‘ब्लॉगेटिकेट्स’ मधून शिकलेय.
ब्लॉग दोन वर्षांचा झाल्यासारखा वाटतोय का तुम्हाला? ‘मोठा’ झाल्यावर त्याने अजून काय काय करायला हवं असं तुमचं मत आहे? आणि हो, वर वाढदिवसाचा केक ठेवलाय :)
Subscribe to:
Posts (Atom)