Friday, November 12, 2010

चवळी सूप

खादाडी पोस्ट लिहिण्याला माझा तात्त्विक विरोध आहे. असल्या पोस्ट लिहिताना लेखकाला समस्त वाचकवर्गाला टुकटुक करून आम्ही काय काय मस्त खाल्लं हे सांगण्याची संधी मिळते. वर आणखी शिक्षा म्हणून छान छान फोटो टाकता येतात. हा वाचकांवर (विशेषतः ऑफिसमध्ये बसून ब्लॉग वाचणार्‍या बापड्या वाचकांवर) अन्याय आहे. तेंव्हा खादाडीवरची पोस्ट लिहिणार नाही असा माझा निश्चय आहे. तो मी फक्त या पोस्टपुरता गुंडाळून ठेवलेला आहे  याची कृपया नोंद घ्यावी :D

साहित्य: चवळीचे चार दाणे, कॅमेरा, ऊन, पाऊस, माती, पेशन्स इ.

वेळ: सुमारे तीन महिने

कृती: बारीक पांढर्‍या चवळीच्या पाकिटातले लाल दिसणारे चार दाणे घ्यावेत.
साधारणपणे ऑगस्टमध्ये ते पेरावेत. त्यांना भरपूर ऊन आणि पाऊस मिळाला पाहिजे. आठवडाभरात त्यांना कोंब येतात. कबुतरं, मध्येच पडलेली उघडीप यात दोन कोंब वाळून जातात. उरलेले दोन वेल तासातासने वाढत असावेत असं वाटण्यासारख्या वेगाने चढत जातात. त्याला खालीलप्रमाणे फुलं आली, म्हणजे वेल नीट वाढतोय असे समजावे.

ही फुलं जोडीजोडीने येतात. फुल एका दिवसात वाळतं, आणि चवळीची शेंग दिसायला लागते. प्रत्येक शेंग पूर्ण वाढून काळपट झाली की काढावी आणि सावलीत सुकवावी. दोन दिवसांनी तिचे दाणे काढावेत. याप्रमाणे रोज १५-२० दाणे निघतील. ते सठवत रहावेत. वेलावरच्या सगळ्या शेंगा याप्रमाणे काढून झाल्या, म्हणजे लक्षात येते, की याची उसळ अर्धी वाटीपेक्षा जास्त होणार नाही.
तेंव्हा घरात कुणी नसताना चवळीचे सूप करून एकटयाने प्यावे. पुराव्यासाठी एक फोटो काढून ठेवावा.

सूचना:

१. फुलं मोजून किती शेंगा येणार, ‘पीक’ किती निघणार याची स्वप्नं बघू नयेत. अंदाज हमखास चुकतो. काही शेंगा पोचट निघतात, काही भरण्यापूर्वीच सुकून जातात. तेंव्हा भरून, वाळून हातात पडेपर्यंत शेंग आली म्हणू नये.
२. सुपात काहीही घातले / घालायचे राहिले, तरी घरच्या चवळीचे सूप गोडच लागते. तेंव्हा पुढची कृती विचारू नये.
३. वेलावर नुसती फुलं असताना आल्यागेल्या प्रत्येकाला "ओळखा बरं कसला वेल आहे ते" म्हणून भाव खाऊन घ्यावा. नंतर कुणाला देण्याइतके चवळीचे दाणे निघण्याची शक्यता कमीच असते.