Friday, August 19, 2011

अण्णा

रोज
चढत्या भाजणीने बाहेर पडणार्‍या
भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या बातम्या वाचताना
मला हे जाणवत असतं.

मागच्याच वर्षी बनवलेल्या रस्त्यावरचे
खड्डे चुकवत
रोज ऑफिसला जाताना
मला हे जाणवत असतं.

मी भरलेल्या कराचे पैसे
खिरापतीसारखे वाटले जातात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

मोठमोठ्या नावांची वृत्तपत्र
एकेका नेत्याचे गुलाम असल्यासारखी
वागतांना दिसतात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

मी मत देऊनही
देश विकून खाणारे
गेंड्यालाही लाजवील अश्या कातडीचे
‘नेते’ निवडून येतात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

परदेशी सहकार्‍यांच्या
"तुमच्या देशात इतकी कर्तबगार माणसं असूनही
देशाची प्रगती मुंगीच्या पवलांनी का होते?"
या प्रश्नानी निरुत्तर होताना
मला हे जाणवत असतं.

हा देश चालवण्याची आमच्या तथाकथित नेत्यांची लायकी नाही.
We deserve a better government.

आणि हे ही जाणवत असतं
की एक सामान्य नागरिक म्हणून
माझ्या स्वतंत्र देशात
माझ्या एकटीच्या मताला
जवळजवळ शून्य किंमत आहे.
नेमकं सांगायचं तर
एकशे वीस कोटींपैकी एक.

अश्या हजारोंच्या, लाखोंच्या मतांना
अण्णा तुम्ही आवाज मिळवून दिलात!

Tuesday, August 9, 2011

कैवल्याचं झाड



ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे ॥


मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे ॥


उजेडी राहिले, उजेड होऊन

    ‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे?

    म्हणजे magnolia champaca

    म्हणजे michelia champaca


    म्हणजे supramental psychological perfection 

    म्हणजे जगातलं सगळ्यात महागडं परफ्यूम ज्याच्यापासून बनवतात ते joy perfume tree,

    म्हणजे


    रोज मी या झाडाच्या नव्याने प्रेमात पडते आहे. त्यामुळे ‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे अजून काही वेगळं असतं असं सांगायचा तुम्ही प्रयत्नच करू नका. त्याला फक्त माझ्या छोट्याश्या गच्चीचा राजा मानायला मी तयार नाही.

    गेले कित्येक महिने मला बागेकडे बघायला वेळ नाही. रोज सूर्य उगवतो, त्यांना प्रकाश देतो. रोज पाऊस पडतो, त्यांची तहान भागवतो. (आणि रोज मी जाऊन करंटेपणाने फक्त फुलं काढते ... वेळ नसल्याच्या सबबीवर :( ). आणि तरीही माझं हे छोटंसं सोन्याचं झाड भरभरून फुलतंय.   बाहेरच्या पाकळ्या सोनेरी, आतल्या भगव्याकडे झुकणार्‍या. आणि फुलात न मावणारा गंध. बस्स, जन्नत!

Monday, August 8, 2011

कुसुमाग्रज: शिलाखंड

कुसुमाग्रज, समिधा संग्रहातून.

************************************************************
शिलाखंड

    एका उंच डोंगरमाथ्यावर पडलेला एक शिलाखंड होता तो.

    तेव्हा मेघ त्याच्यावर निर्मळ उदकाचा अभिषेक करीत.

    उषःकालाच्या देवता त्यावर दवबिंदूंचे सिंचन करीत.

    सूर्याच्या तेजात आणि चंद्राच्या चांदण्यात तो न्हाऊन निघे.

    भोवतालचे हिरवे दुर्वांकुर आपल्या चिमुकल्या पात्यांनी त्याला हळूच स्पर्श करीत.

    हरीण आणि त्याची पाडसे त्याच्या अंगावर मान टाकून केव्हा विसावा घेत.

    सर्प आपल्या शीतल शरीराचा केव्हा त्याला विळखा घालीत.

    आकाशाच्या सावलीत --

    आणि या सर्वांच्या संगतीत --

    एका उंच डोंगरमाथ्यावर तो तेव्हा राहत होता.

    *    *    *

    आता तो एका मंदिरात आहे.
   
    मंदिर वैभवशाली आहे.
   
    नामांकित कारागिरांनी ते बांधले आहे आणि थोर कलावंतांनी ते शोभिवंत केले आहे.

    शिल्पकाराने त्याचे स्वतःचे स्वरूपही पालटून टाकले आहे.

    काळ्या आणि ओबडधोबड अशा त्या शिलाखंडाचे --

    आता एका मनोहर देवमूर्तीत रूपांतर झाले आहे.

    त्याच्या अंगावर जरीची वस्त्रे आहेत. गळ्यात, मनगटांत आणि पायांत सोन्याचे आणि रत्नाचे अलंकार आहेत.

    दिवसातून तीन वेळा श्रीमंती थाटाने त्याची पूजा होते.

    मंजूळ वाद्यांचा गजर होतो.

    आणि शेकडो भक्त त्याला वंदन करून त्याचा जयजयकार करतात.

    आणि हे सर्व होत असताना

    कोणाला न ऐकू येणार्‍या, न समजणार्‍या शब्दांत तो स्वतःशी पुटपुटत असतो,

    ‘केवढा अधःपात झाला माझा! माझ्या सुखपूर्ण जीवनाचा किती दुःखपूर्ण शेवट हा! ’

************************************************************    पुन्हा एकदा समिधामधूनच? समिधा सुंदर आहे. पण स्वतःचं काही लिहायचं सोडूनच दिलं आहेस का तू? आईने विचारलंय. तर आता थोडे दिवस कवितांचे वही मिटून ठेवायचीय. आता थोडं काही स्वतःला लिहायला सुचू देत, ते इथे उतरवलं जाऊ देत. पुन्हा केंव्हा तरी दुष्काळ पडला म्हणजे पुन्हा कवितांची वही काढून कुसुमाग्रजांची मेजवानी आपण फिरून एन्जॉय करू या.

Wednesday, August 3, 2011

कुसुमाग्रज: सारंगिया

‘समिधा’ जवळ नव्हतं त्यामुळे अजून काही कविता इथे टाकायच्या राहिल्या होत्या. ही त्यातली एक.
**********************************************************

सारंगिया

    नाही, आपण समजता ते खरे नाही.

    किनखापी गवसणीतून माझी सारंगी बाहेर पडते ती धनासाठी नव्हे.

    तारांच्या या समुदायावरून माझी धनुकली फिरू लागते ती आपले मनोरंजन कराण्यासाठी नव्हे.

    त्या उभयतांच्या मीलनातून मी मधुर रागरागिण्यांची बरसात करतो ती कीर्तीसाठी नव्हे.

    मला धन मिळत असेल, कीर्ती मिळत असेल आणि आपले मनोरंजनही होत असेल.

    पण यातील कोणत्याही गोष्टीसाठी मी सारंगीला स्पर्श करीत नाही.

    मी सांगणार आहे ते आपल्याला खरे वाटणार नाही कदाचित्, पण ते खरे आहे.

    सारंगीतून निघणारे स्वर मला दिसतात म्हणून मी सारंगी वाजवतो. ते पुनःपुन्हा दिसावेत म्हणून मी सारंगिया झालो.

    मोहळाला स्पर्श करताच त्यातून असंख्य मधमाशा चारी दिशांना उडू लागल्या,

   त्याप्रमाणे माझ्या धनुकलीचा तारांना स्पर्श होताच त्यांमधून ध्वनि-लहरींचा एक जथा बाहेर पडून उडू लागतो.

    तारांवर बसलेली लहान लहान पाखरेच जणू माझी धनुकली उठवून देते!

    काही स्वरलहरी पाण्याच्या धारेसारख्या रुपेरी असतात, काही रमणींच्या गालांवरील लज्जेप्रमाणे आरक्त असतात, काही फुललेल्या अंगाराप्रमाणे ताम्रवर्ण असतात, काही सोनेरी असतात, काही चांदण्यासारख्या चंदेरीही असतात.

    मी तार छेडली की या विविधरंगी ध्वनिपुष्पांचा दाट मांडव माझ्याभोवती घातला जातो.
    आणि एका विलक्षण आनंदाने माझे अंतःकारण बेहोष होते.

    माझ्या हातातली धनुकली तारांवर फिरत असते आणि माझे मिटलेले डोळे त्या सुंदर लहरींचा मागोवा घेत असतात.

    नृत्यांगना आपल्या झिरझिरीत वस्त्राचा पिसारा फुलवते त्याप्रमाणे त्या स्वरलहरी आपल्या रंगाचा सुरम्य विस्तार करतात.

    आणि नाचत नाचत, हासत खेळत, गात आणि गुणगुणत, मागे वळून पाहात, खाली वाकून बघत,

    मेघमंडलापर्यंत जातात आणि अंतर्धान पावतात.

    हे अलौकिक दृष्य पुनःपुन्हा दिसावे म्हणून मी सारंगिया झालो.