गेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये एक ट्रेनिंग होतं. सकाळी घाईतच घरून निघायला लागत होतं, त्यामुळे झाडांशी निवांत गप्पा होत नव्हत्या. शनिवारी ३-४ दिवसांच्या खंडानंतर जरा बारकाईने बघितलं, तर सोनचाफ्याच्या झाडावर हे सापडलं ...
घाईत, अगेन्स्ट लाईट, वार्यावर हलणार्या पानाचे फोटो काढलेत. त्यामुळे फार स्पष्ट नाहीत. :(
सध्या मी याला ‘बागुलबुवाची कात’ असं नाव दिलंय. :)
चार दिवसांपूर्वी या पानावर हे दिसलं नव्हतं. नक्की.
गोगलगाईने शंख उतरवून ठेवल्यावर अजून एक आवरण उतरवून ठेवावं, तसं काहीसं दिसतंय हे. पण मग शंख आणि गोगलगाय कुठे गायब झाली?
चार दिवसात एवढी जाडजूड होणारी खादाड आळी असावी असं म्हटलं, तर तश्या खादाडीच्या खुणा जवळपासच्या पानांवर नाहीत.
कुठल्या पक्ष्याने आणून टाकलं म्हणावं, तर पानाला खालच्या बाजूने, कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक धाग्याने हे चिकटलं होतं.
गुगलूनही फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे बरेच कीटक, आळ्या कात टाकतात हे समजलं, पण अशी एकसंध नाही.
फोटो काढल्यानंतर पानावरून हे कवच काडीने काढून टाकलं. ते इतकं नाजुक होतं, की काडीच्या स्पर्शानेही तुटत होतं - पण नाजुक धाग्याची पानावरची पकड एवढी घट्ट, की आवरण तुटलं, तरी धागे कायम!
माझं लक्ष नसताना कोण कारभार करत असावं बरं बागेत? :) :)