नाट्यक्षेत्राशी,
अभिनयाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. अगदी शाळेतल्या नाटकात भाग घेण्याचा
अनुभवसुद्धा गाठीशी नाही ... मुळात आमच्या शाळेत गॅदरिंग आणि नाटक हे प्रकारच
नव्हते! पडद्याच्या दुसर्या बाजूने नाटकाकडे बघण्याचा अनुभवही जेमतेमच. त्यामुळे
या पुस्तकाची बहुधा मी ढ मधली ढ वाचक असेन. तरीही, इतक्या मंद वाचकाला खिळवून
ठेवणारं विजयाबाई लिहितात. त्यांची गोष्ट वाचतांना त्यांच्या चष्म्यातून आपल्याला
मराठी (आणि काही अंशी भारतीय आणि जागतिक रंगभूमीचीसुद्धा) सहा दशकांची वाटचाल बघायला मिळते.
बाईंच्या कहाणीतली मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे इतकी
वर्षं एका क्षेत्रात वावरूनसुद्धा त्यांच्यामध्ये साचलेपणा नाही, बनचुकेपणा नाही. बर्याच
वेळा असं दिसतं, की तुम्ही एखाद्या क्षेत्रातले तज्ञ म्हणून प्रसिद्ध होता, लोक
तुमच्याकडे शिकायला येतात, आणि तुमचं पुढे शिकणं राहूनच जातं. इतक्या कार्यशाळा
घेऊन, इतक्या लोकांना तयार करूनही बाईंच्या शिकण्यात खंड पडलेला नाही, नवं
शिकण्याची, वेगळं काही करून बघण्याची आच कमी झालेली नाही. कलाकार म्हणून त्या पुस्तकाच्या
अखेरपर्यंत तेवढ्याच जिवंत वाटतात.
या पुस्तकात मला फार जवळचं वाटणारं म्हणजे कार्यक्षेत्रातला बदल. बारा
वर्षं जीव ओतून रंगायनची चळवळ उभी केल्यानंतर त्यांना त्यापेक्षा वेगळं काही
करावंसं वाटतं, आणि आपल्या ‘प्रायोगिक’ प्रतिमेचं कुठलंही गाठोडं सोबत न घेता त्या
लोकमान्य रंगभूमीवर काम करून बघतात. ब्रेश्तचं जर्मन नाटक मराठीमधून
लोकनाट्याच्या अंगाने उभं करून त्याचे जर्मनीमध्ये यशस्वी प्रयोग करणं,
मुद्राराक्षस, हयवदन, नागमंडल ही नाटकं जर्मन
कलाकारांबरोबर जर्मन भाषेत बसवणं असं सांस्कृतिक देवाणघेवाणीचं अवघड आव्हान
स्वीकारतात, टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका बनवून बघतात आणि एनएसडीची धुरा असेल किंवा
एनसीपीएचं संचालकत्व असेल, या भूमिकाही स्वीकारतात. आपल्याला सध्याच्या कामात
तोचतोचपणा जाणवतोय, नवं काही करायला हवंय हे समजून, आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर
पडून असं नवं नवं करून बघण्याची ‘रिस्क’ आयुष्यभर घेऊ शकणारी माणसं थोडी असतात. ती
भूतकाळाचं ओझं बाळगत नाहीत, आणि मनाने कधी म्हातारी होत नाहीत.
या वृत्तीचाच दुसरा भाग म्हणजे जे करायचं ते मनापासून, जीव
ओतून. पाट्या टाकायच्या नाहीत. टाळ्या मिळत असल्या तरीही आपल्याला खोटी वाटणारी
भूमिका करायची नाही. असं म्हणणारं कुणी भेटलं म्हणजे मधूनच डळमळीत होणर्या आपल्या
विचाराला पुन्हा बळ येतं.
एका मनस्वी बाईची मस्त गोष्ट. अगदी ओघवत्या शब्दात, गप्पा माराव्यात त्या सहजतेने मांडलेली. जरूर, जरूर वाचा.
झिम्मा: आठवणींचा गोफ
विजया मेहता
राजहंस प्रकाशन
किंमत रु. ३७५