आजोबांच्या दवाखान्यातली बाटली. टांगानिका टेरिटरी ते हिंदुस्थान एवढा मोठा प्रवास बोटीने करून ती बाटली भारतात आली. पु्ण्यातल्या भाड्याच्या घरात राहिली, मुंबईला राहिली, नंतर फिरतीच्या नोकरीमधली सगळी बदलीची गावं तिने बघितली. मग पुन्हा पुण्यात, अजून एक नवं घर. तब्बल ऐशी नव्वद वर्षं आपल्या नाजुक तब्येतीला सांभाळत ती झाकणाला धरून होती. या वर्षी मात्र तिच्या मधे काच बसवलेल्या पत्र्याच्या झाकणाने राम म्हटलं.
केवढं जग बघितलंय या बाटलीने !
तिने आजोबांकडे भक्तीभावाने येणारे मसाई पेशंट्स बघितले असतील.
आजोबांच्या मागे सगळ्या मुलांची शिक्षणं खंबीरपणे पूर्ण करणार्या आजीची धडाडी बघितली असेल.
आपल्या वडलांचा वारसा चालवणार्या त्यांच्या लेकीकडे त्याच भक्तीभावाने येणारे पेशंट्स बघून तिला आफ्रिकेतले दिवस आठवले असतील.
ही बाटली मला कुणाकडे सुपुर्द करायची वेळ आली, तर माझ्याविषयी सांगण्यासारखं तिच्याकडे काय असेल बरं?