मागच्या आठवड्यात ‘द पियानिस्ट’ बघितला - त्याच्यावरून नॉर्मलला यायच्या आधी आज ‘हॅनाज सूटकेस’ हाती पडलं, आणि वाचून होईपर्यंत खालीच ठेवता आलं नाही. इथे लिहिल्यावर कदाचित थोडं मनाला हलकं वाटेल, म्हणून इथे लिहिते आहे - नाहीतर आकाश भरून भरून आलंय. काळेकुट्ट ढग जमलेत अगदी :(
झेकोस्लोवाकियामधल्या एका बारा - तेरा वर्षाच्या ज्यू मुलीची, हॅना ब्रॅडीची ही गोष्ट. ‘डायरी ऑफ ऍन फ्रॅंक’ची झेक आवृत्ती म्हणू का याला? तितकीच अस्वस्थ करणारी.
तोक्योच्या हॉलोकास्ट एज्युकेशन रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर फुमिको इशिओका यांच्या हाती हॉलोकास्टची स्मृती म्हणून एक सूटकेस आली. पोलंडमध्ये आऊसश्विट्झच्या संग्रहालयाकडून आलेल्या या सूटकेसवर तिच्या तेरा वर्षांच्या मालकिणीचं नाव होतं. एवढ्या माहितीच्या जोरावर फुमिकोनी जगभरची हॉलोकास्ट संग्रहालयं, ज्यूंविषयी माहिती देणारी केंद्र धुंडाळली. या शोधाशोधीतून त्यांना जगाच्या दुसर्या टोकाला कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या हॅनाच्या भावाचा पत्ता मिळाला, आणि संग्रहालयातल्या एका अनोळखी वस्तूला चेहरा मिळाला. लहान मुलांसाठी लिहिलेल्या या पुस्तकात हॅनाची गोष्ट आणि फुमिकोची हॅनाच्या शोधाची गोष्ट अश्या दोन्ही गोष्टी समांतर जातात.
जेमतेम शंभर - सव्वाशे पानांचं पुस्तक. लहानच काय, मोठ्यांनासुद्धा मुळापासून हलवून सोडणारं. सत्यकथा.
इथे हॅनाविषयी अजून माहिती मिळेल. इनसाईड हॅनाज सूटकेस नावाची डॉक्युमेंटरी आहे या गोष्टीविषयी. सध्यातरी मला ही डॉक्युमेंटरी बघण्याची हिंमत नाही.