Wednesday, November 7, 2012

वो नीलम परी ...

तिकडे दूर अमेरिकेत वादळ येणार म्हणून आम्ही बाल्कनीची तिकिटं काढून पॉपकॉर्न घेऊन बसलो होतो, तोवर चोरपावलाने या चक्रीवादळाने कधी प्रवेश केला समजलंच नाही.

सुमारे आठ पाऊंड डायनामाईट. त्याने आमच्या शांत आखीवरेखीव दिवसाला सुरुंग लावलाय. सगळ्या सिस्टीम कोलमडून पडल्यात, प्रायॉरिटीजच्या ठिकर्‍या झाल्यात, नियोजनांना केटो मिळालाय. सद्ध्या नुसतंच हातावर हात धरून बघत बसलोय काय गोड वाताहात चाललीय ते. अजून अंदाजही घेतला नाही झालेल्या नुकसानाचा. निवांत आयुष्याचा विमा उतरवून ठेवलेला नव्हता ... आता कुठे भरपाई मागावी बरं?

***

ही आमची सरप्राईज गिफ्ट. याहून सुंदर आणि वाट बघायला लावणारी दिवाळीची भेट मला आजवर मिळाली नव्हती.

दत्तक बाळ मिळण्याला लोक ‘रेडिमेड’ का समजतात कोण जाणे ... हे ‘आयतं’ बाळ मिळण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो आणि वाट बघावी लागते हे करून बघाल तर समजेल.

***
त.टी. – तुम्हाला केटो माहित नाही? के(राची)टो(पली) हे अस्त्र व्हेटोहूनही शक्तीमान असून कुठल्याही बेतावर हे अस्त्र वापराचे अनिर्बंध अधिकार परीकडे आहेत.

त.टी. २ – यापुढे इथल्या अनियमिततेला सज्जड कारण आहे याची कृपया नोंद घेण्यात यावी! :)

त.टी. ३ - सध्या मला मनीमाऊला निरखण्यातून सवड न मिळाल्यामुळे फोटो काढलेले नाहीत. तेंव्हा पाच आठवड्यांचं बाळ कसं दिसतं ते सध्यातरी गुगलबाबालाच विचारा.