Thursday, May 30, 2013

होऊ घातलेला घट्ट मित्र




म्हणजे तो मित्र होता, पण अगदी जवळचा म्हणावा इतका नाही.

काही माणसांना फार न भेटताही ती जवळची वाटतात.  
आत कुठेतरी खात्री वाटते आपल्या तारा नक्की जुळणार म्हणून. 
तिथे कधी गैरसमज वगैरे होत नाहीत. 
सवड मिळेल तशी, हळुहळू ही मैत्री मस्त फुलत जाणार आहे याची खात्री असते अपल्याला. 
पण हे सगळं घडून यायला आपल्याला वेगळं काही तातडीने करायची गरज आहे, हे सगळं जगाच्या अंतापर्यंत असंच राहणार नाही हे समजून न घेण्याचा करंटेपणा करतो आपण. 
कशाची वाट बघत असतो आपण नेमकी? 

ही आपोआप फुलण्याची अपेक्षा असणारी मैत्री तशीच अर्धवट टाकून जाणारा निघून जातो. 
हे काही जाण्याचं वय नव्हतं वगैरे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी. 
तसं म्हटलं, तर कुठलंही वय जाण्याचं असतंही आणि नसतंही.
आपण मात्र अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागत असतो. 

एक गुणी माणूस अकाली गेला याचं वाईट वाटणं हा एक भाग झाला. 
त्याने करण्यासारख्या, हाती घेतलेल्या किती गोष्टी होत्या, त्याच्या जाण्यानं किती नुकसान झालं हे सगळं आहेच. 

तुझी मला किती किंमत वाटते हे त्याच्याजवळ व्यक्त न करण्याची बेपर्वाई आपण केलीय याची बोच आता आयुष्यभराची.


Wednesday, May 22, 2013

(आळशी ब्लॉगरचा कबूलीजबाब)

आपण काहीही न करता वय वाढतच असतं. तसा ब्लॉग एका वर्षाने मोठा झालाय. आता “अरे वा, वाढदिवस!” असं कौतुकाने म्हणण्याऐवजी त्याचे वय चोरायचे दिवस जवळ आले आहेत.
गेल्या वर्षभरात इथे ओरिसाची भटकंती वगळता फारसं काही घडलेलं नाही. म्हणजे गेल्या वर्षभरात काही घडलंच नाही का लिहिण्याजोगं? तसं बघितलं तर बरंच काही घडलं, पण ते सगळं अनुभवण्यात मी इतकी बुडून गेले आहे, की त्याविषयी लिहिणं शक्य नाही. इथे काही लिहायला थोडी अस्वस्थता, बेचैनी लागते, काहीतरी सांगायची आस लागते, ती नाहीये सद्ध्या. भरल्या पोटी लिहायला सुचत नाही तसंच भरल्या मनानेही लिहिणं अवघडच जातं, नाही का? अजून काही दिवस हे असेच जातील असं वाटतंय. मग पुन्हा नव्या उत्साहाने काहीतरी सांगावंसं वाटेल, एखादा फोटो, एखादं पुस्तक लिहितं करेल. तोवर मी पुन्हा गायबते इथून.