कित्येक महिन्यात मी इथे बागेविषयी काहीही
लिहिलेलं नाही.
कारण सध्या मला बागेत जायलाच मिळत नाहीये!
टेरेसचं दार उघडलं, की मनीमाऊ बागेत हजर होते, आणि पानं तोडणं, मातीत हात घालणं
असे उद्योग ताबडतोब सुरू होतात! सद्ध्या मला बागेला कबुतरांपेक्षा जास्त
तिच्यापासूनच जपावं लागतंय.
घरातल्या झाडांची केंव्हाच उचलबांगडी झाली. ती
कशीबशी बाहेरच्या उन्हात तग धरून आहेत. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे काही झाडं गेली
माझी. :(
पण आपण ढवळाढवळ केली नाही, तरी बागेतलं जीवन काही
थांबत नाही. सद्ध्या इतका मस्त पाऊस पडतोय, त्याने नवी संजीवनी दिलीय माझ्या
झाडांना! फेब्रुवारी – मार्चमध्ये (अजून मनीमाऊ रांगायला नव्हती तेंव्हा) मी उत्साहाने
बाळागाजरांचं बी पेरलं होतं. ते कबुतरांपासून वाचवण्यासाठी त्या कुंडीत बर्याच
काड्या खोचून ठेवल्या होत्या. त्यानंतर मला फक्त पाणी घालायला वेळ झाला. ते सुद्धा
मला जमलं नाही तर मी बाईंनाच सांगत होते. जी काही बाळागाजराची रोपं आली होती, ती ऊन,
कबुतरं या सगळ्यात वाळून गेली. मी सगळ्या कुंड्यांना पाणी घालायचं सांगितलंय म्हणून
बाई याही कुंडीत पाणी घालत होत्या अधूनमधून. आता ती कुंडी अशी दिसते आहे:
"ब्लीडिंग हार्ट"चा वेल |
कबुतरांसाठी खोचलेल्या काड्यांपैकी “ब्लीडिंग
हार्ट” च्या वेलाच्या काडीला पालवी फुटली, आणि आता पावसात अशी मस्त फुलं आली आहेत!
गंमत म्हणजे हा नवा वेल रुजत असतांना माझ्याकडचं ब्लीडिंग हार्टचं चांगलं मोठं
झालेलं मूळ झाड उन्हाने वाळून गेलं!
पावसाळा सुरू होतांना दुहेरी गोकर्णाच्या बिया
दुसर्या कुंडीत टाकल्या. त्या आल्याच नाहीत. त्याऐवजी मागच्या वर्षीच्या स्पायडर
फ्लॉवरचं एक मस्त रोपट आलंय! या फुलाच्या बिया गोळा करायच्या राहून गेल्या होत्या
मागच्या वर्षी.
मागच्या वर्षी उन्हाने करपून गेलेलं सनसेट बेल्सचं झाड पण आपणहून आलंय यंदा!
स्पायडर फ्लॉवर आणि सनसेट बेल्सची रोपटी |
जांभळी अबोली टिकवायचा मी या उन्हाळ्यात जमेल
तितका प्रयत्न केला, पण ती गेली. आणि मी पूर्ण दुर्लक्ष करूनही बहरणारं हे खोटं ब्रह्मकमळ:
खोटं ब्रह्मकमळ |
एकूणात काय, तर न पेरिले तेही उगवते, पेरिले ते
न उगवते, बोलण्यासारखे नाही, पण काहीतरी उत्तर निश्चित येते एवढं नक्की! :D