Thursday, October 31, 2013

दिवाळी



बघता बघता दिवाळी आलीसुद्धा. काही म्हणता काही तयारी केली नाही दिवाळीची. आज मग एकदम खडबडून जाग आली. काही नाही तर किमान कंदील तरी करावा!

साहित्य अर्थातच घरात सापडलं ते. कुठल्यातरी प्रोजेक्टसाठी केंव्हाचा लाल रंगाचा कार्डशीट पेपर पडलेला होता घरात. आईला आवराआवरी करतांना बटर पेपर सापडला, आणि एक काळं मार्कर सापडलं. एवढ्या सगळ्या साधनसंपत्तीच्या सहाय्याने, माऊ उठायच्या आत जे काही बनवता येईल ते बनवायचं असं उद्दिष्ट ठेवून डिझाईन (?) केलं. ;)


हे एंड प्रॉडक्ट – अजून गो लाईव्ह बाकी आहे :



तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा! अशी आयत्या वेळची नाहीतर नीट नियोजन करून केलेली – दिवाळी मस्त जाऊ देत तुमची!!!


Wednesday, October 23, 2013

एक ट्रक लाकूड



कदंब तोडला आज त्यांनी.

सकाळपासून एक एक फांदी छाटणं चाललंय.

इतक्या राजबिंड्या झाडाला असं विद्रूप होत होत मरतांना बघावं लागतंय – सात आठ वेळा तरी त्याच्याखालून गेले असेन मी दिवसभरात.

रोज त्याच्या जवळून जातांना त्याचं हिरवं वैभव डोळ्यात साठवून घेण्याचं सुख भोगलंय. भर उन्हात त्याच्या सावलीचा थंडावा अनुभवलाय. पाऊस सुरू झाल्यावर सारखा हा फुलला का म्हणून नजर ठेवून असायचं. आणि हा असा चुकार की नेमका पाऊस लागून राहिला की फुलणार, त्या सुंदर फुलांचा मनासारखा फोटो काही काढू देणार नाही.

आज मान वर करून त्याच्याकडे बघायची हिंमत नाही झाली. पायाखाली त्याच्या हिरव्यागार पानांचा गालिचा खुपतोय. त्याच्या समोरून जाणं टाळण्यापलिकडे काहीही करू शकत नाही मी.

“का तोडताय तुम्ही हे झाड?”
“त्याच्या फांद्या रस्त्यावर येतात.”
“मग?”
“सोसायटीच्या आवारातलं झाड आहे. परमिशन आहे आमच्याकडे. (तुम्ही कोण चौकशी करणार? )” 

झाड सोसायटीच्या आवारात आहे. त्याच्या जगण्यामरण्याचे निर्णय घेण्याचा अधिकार सोसायटीचा आहे. तुम्ही विनाकारण रक्त कशाला तापवताय?

तो आहे, हा त्याचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

सिमेंटकॉंक्रिटच्या जंगलात एवढं सुंदर झाड लावायची चूक मुळात कुणी कशाला करावी?

आणि निमूट समोर बघत रस्त्याने जायचं सोडून सोसायटीच्या मालकीच्या झाडावर जीव जडवण्याचा मूर्खपणा करणार्‍याने करावे तसे भरावे.

Friday, October 18, 2013

बागुलबुवा : २



खूप खूप दिवसांपूर्वी इथे एका बागुलबुवाची गंमत सांगितली होती. तेंव्हा सुरवंटराव उडून गेल्यावर नुसता रिकामा कोष मागे ठेवून गेले होते. आज त्यांना मुद्देमालासह पकडलं:



इतके सुंदर रंग! आणि हे सोनचाफ्यावर असं लपून बसलं होतं, की मला दिसलंच नव्हतं. वाळकं पान म्हणून काढायला मी हात घातला, आणि जवळजवळ त्याला हात लागल्यावर माझ्या लक्षात आलं ... हे ताजं ताजं फूलपाखरू आहे ! हिरवा रंग थेट सोनचाफ्याच्या कोवळ्या पानाचा, तर राखाडी रंग वाळक्या पानासारखा. झाडाचाच एक भाग होऊन पानाच्या खालच्या बाजूने बसलंय ते. अजून पंख चिकटलेले आहेत त्यामुळे उडता येत नाहीये त्याला.

सकाळी अजून जरा लवकर हा शोध लागला असता तर कदाचित कोषातून बाहेर पडण्याचं नाट्य बघायला मिळालं असतं! अजून तासाभराने इथे फक्त मागच्या वेळसारखाच रिकामा कोष होता :)

फूलपाखरू बघितल्यावर लक्षात आलं ... याचे सुरवंट भारी खादाड असतात. त्यांना कसला स्पर्श झाला म्हणजे ते एक दुर्गंध सोडतात, त्यामुळे बहुतेक पक्षी यांच्या वाटेला जात नसावेत. त्यांना मी कित्येक वेळा सोनचाफ्यावरून हुसकून लावलं आहे. हे फूलपाखरू मात्र कधीच बघितलं नव्हतं बागेत. कुठे बरं जात असतील ही फुलपाखरं?
***
फुलपाखरू सापडल्यावर मी खूश होते, लगेच ही पोस्ट टाकली. त्याचा रंग जरा वेगळा वाटत होता नेहेमी पाहिलेल्या फुलपाखरांपेक्षा ... पण नाव गाव शोधायचा काही प्रयत्न नव्हता केलेला. मधे जरा सवड मिळाली आणि उगाचच हे फूलपाखरू आठवलं. जरा शोधून बघू या याचा कुलवृत्तांत म्हणून गूगलबाबाला विचारलं, आणि मोठ्ठा खजिना हाती लागला! याचं नाव आहे tailed Jay (Graphium agamemnon agamemnon). आणि याच्या जीवनक्रमावर ही अप्रतिम ब्लॉगपोस्ट आहे!