आमच्या शाळेच्या वर्गातली
मुलं-मुली (वर्गातली मुलं-मुली ५० वर्षांनंतरसुद्धा मुलं-मुलीच असतात बरं! :) ) शाळा संपल्यावर २५ वर्षांनी भेटली मागच्या
रविवारी. गावातून, परगावहून, परदेशातून ठिकठिकाणून सगळे जमले होते – ४८ जण! जुन्या
मित्रमैत्रिणींना खूप दिवसांनी भेटतांना खरं तर जरा धाकधूक असते माझ्या मनात. जुन्या
आठवणी रम्य असतात, आणि आता त्या व्यक्तीला परत भेटतांना ती मजा आली नाही तर विरस
होतो. त्यातून आमची एकत्र शाळा असली, तरी मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलणं
म्हणजे अब्रम्हण्यम् असं वातावरण त्यावेळी असल्याने बहुसंख्य मुलांची नावं पण मला
आठवत नव्हती! त्यामुळे निम्म्या पब्लिकची ओळख फारशी नाहीच असं एकीकडे वाटत होतं.
आमच्यातल्या
संयोजकांची मेहनत नक्कीच दाद देण्यासारखी! कार्यक्रमाचं नियोजन एकदम नेटकं केलं
त्यांनी. अगदी सगळ्यांचा ग्रूप फोटो काढून त्याची एक एक फ्रेम केलेली प्रतसुद्धा
त्याच दिवशी प्रत्येकाच्या हातात! पण हा कार्यक्रम आवडला त्यामागे निव्वळ
स्मृतीरंजनापेक्षा बरंच जास्त काहीतरी होतं.
सगळ्यांना भेटून
मस्त वाटलं एकदम. (आपल्या वर्गात इतकी इंटरेस्टिंग मुलंमुली होती हे एकदम भारी –
कॉलर ताठ वगैरे. :) ) शाळेत असतांना
व्हायच्या तश्याच मनमोकळ्या गप्पा.
त्यापेक्षा मस्त
वाटलं म्हणजे आमच्यातल्या एकाने स्वतःहून पुढाकार घेऊन गेटटुगेदरचा पूर्ण खर्च उचलल्याचं.
त्याहून मस्त वाटलं
ते पुन्हा कधी जमू यात हे ठरवतांना, त्याही कार्यक्रमाचा खर्च उचलण्यासाठी दुसरा एक वर्गमित्र
असाच स्वतःहून पुढे आल्यावर.
या सगळ्यापेक्षाही मस्त
म्हणजे आपल्या शाळेतल्या गरजू मुलांसाठी आपण आर्थिक मदत करू या असं ठरवून लगेच पहिली
टोकन अमाऊंटही लगे हाथ जमा झाले. This group definitely means
business.
पण सगळ्यात मला आनंद
कसला झाला असेल तर अगदी अनपेक्षितरित्या गाजरे सर भेटल्याचा. शाळेत गाजरे सरांनी
रसायनशास्त्र आणि गणित इतक्या प्रेमाने शिकवलं होतं ... सातवीच्या स्कॉलरशिपला एक
ते आगगाडी, तिचा वेग, पुलाची / बोगद्याची लांबी असलं गणित होतं. त्याचं लॉजिक काही
केल्या माझ्या डोक्यात राहात नव्हतं. हे गणित मी सरांकडून किती वेळा समजावून घेतलं
असेल, आणि त्यांनी न चिडता ते मला किती वेळा परत समजावलं असेल याची गणती नाही. रोज
मी त्यांना विचारायचे, आणि दुसर्या दिवशीपर्यंत पुन्हा विसरून जायचे. शिक्षकाला
किती पेशन्स पाहिजे म्हणून कुणी विचारलं तर मी म्हणेन सरांएवढा!
पण सरांना मी कधीही
विसरू शकणार नाही कारण त्यांच्याकडून शिकायला मिळालेलं गणित आणि
रसायनशास्त्रापलिकडचं काहीतरी. सातवी – आठवीतली गोष्ट असेल. शिल्पा आणि मी – एकदम घट्ट
मैत्रिणी. कधीतरी आमच्यात ’तात्त्विक मतभेद’ झाले.
“तू पाणी ‘प्यायलं’ काय
म्हणतेस? पाणी ‘पिलं’ म्हणायला हवं.” तिने घरी, बाहेर ऐकलेली ही भाषा.
“‘प्यायलं’च
बरोबर आहे ग!” माझ्या घरात बोलली जाणारी भाषा.
“चल, आपण सरांना
विचारू.”
सर सुद्धा ’पिलं’
म्हणणारे. हेच बरोबर म्हणून मला असंच बोलायचा आग्रह त्यांनी केला तर? It
is a lost cause for me. निरिच्छेनेच मी तयार होते.
“बेटा, आपण इकडे ‘पिलं’ म्हणतो. काही चुकीचं नाही त्यात. बाहेर तिकडे पुण्यामुंबईकडे
‘प्यायलं’ म्हणतात. तेसुद्धा बरोबरच आहे हा. तुमचं दोघींचंही म्हणणं बरोबर आहे.”
सर समजावून सांगतात.
इतकी मामुली गोष्ट. आपण म्हणतो तेच बरोबर असं सहज म्हणू शकले
असते सर. त्यात फार काही वावगं आहे असं मला तेंव्हाही वाटलं नसतं. तोवरचा मोठ्यांचा याबाबतचा अनुभव वाईटच. माणूस
जितका मोठा तितका त्याचा भाषा, जात यांविषयीचा अभिनिवेश मोठा. पण आपल्यापेक्षा वेगळं
काही बरोबर असतं, आपलं चुकीचं नसतांना दुसर्याचंही बरोबर असू शकतं हे ज्या
सहजतेने त्यांनी एकदाच समजावून सांगितलं, त्यानंतर ते आगगाडी आणि बोगद्याच्या
गणितापेक्षा पक्कं जाऊन बसलं डोक्यात.