Thursday, July 17, 2014

दुनिया भल्याबुर्‍याची



    मागच्या आठवड्यात माऊ शाळेत जायला लागली. काल आणि आज परत माऊला शाळेत एक मुलगा चावला. चावला म्हणजे अजून दाताचे वळ दिसताहेत, संध्याकाळी बिचारीला ताप आला इतका वाईट चावला. याला शाळेचा हलगर्जीपणा, मुलाच्या पालकांची बेपर्वाई का अजून काय कारण आहे ते शोधण्यात मला रस नाहीये. दुर्दैवाने अशी मुलं माऊला आयुष्यभर भेटणार आहेत, त्यांना पाठीशी घालणारे आईबाप भेटणार आहेत, त्यांना आवरायला असमर्थ असणारी यंत्रणा भेटणार आहे.

    हा मुलगा परत नुसता जवळ आला तरी त्याला एक कचकून फटका द्यायचा म्हणून सांगायचा मोह होतोय तिला. पण कधी टीचरना सांगायचं, कधी स्वतः फटका द्यायचा हे कसं समजावं तिला? शाळेत तिने मुक्त बागडायचं का त्याच्यावर लक्ष ठेवत रहायचं सारखं? असल्या दुष्ट मुलांपायी तिने तिला मनापासून आवडणार्‍या शाळेची धास्ती घ्यावी? माऊची आई म्हणून मी फार कमी पडते आहे असं वाटतंय.

    आजवर माऊच्या विश्वात वाईट कुणीच नव्हतं. कुठलीही अनोळखी व्यक्ती म्हणजे अजून ओळख न झालेले काका – मावशी – आजी – आजोबा – ताई - दादा होते. ओळखीच्यांच्या इतक्याच विश्वासाने ज्यांच्याशी वागावं असे. घराबाहेर पहिलं पाऊल ठेवतांना एकदम एवढा मोठा धडा शिकायचा तिने? काही माणसं वाईट असतात, आपल्याला त्रास देतात. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकायला पावणेदोन म्हणजे फार लहान वय झालं. “हा मुलगा वेडा आहे” हे तिला शिकवणं फार जड जातंय.