शाळेला जायची गडबड. अजून माऊची पोळी संपयचीय, मोजे, बूट घालून व्हायचेत, औषध घ्यायचं राहिलंय.
खिडकीत आई एक एक घास
भरवते आहे, एकीकडे माऊचं खिडकीतून बाहेर बघणं चाललंय. औषध काढायला आई तिथून बाजूला
गेल्यावर माऊ तिच्याकडच्या गाणार्या भूभूला खिडकीतून दिसणारी आज्जी, काका
दाखवायला लागते. खिडकीच्या आतून भूभूला नीट दिसत नाहीये सगळं, म्हणून मग भूभूला
गजाबाहेर काढते. तेवढ्यात आई आल्यामुळे घाईघाईने भूभूला आत घेण्याची धडपड सुरू
होते, आणि भूभू अडकून बसतो.
“अग, थांब ... भूभू
पडेल खाली!” आई ओरडल्याबरोबर पटकन माऊ भूभूला सोडून देते आणि बिचारा भूभू
बाहेरच्या विंडोसीलवर जाऊन बसतो. आता इथे आई, बाबा कुणाचाच हात पोहोचणार नाहीये.
भूभूचा त्रिशंकू झालाय. तिथून खाली पडला तर बिचारा थेट सात मजले खालीच जाईल. भूभू माऊचा
लाडका असला तरी तो तिचा नाहीचे मुळी. खालच्या दादाने उदारपणे थोडे दिवस खेळायला
दिलाय तो माऊला. बर्यापैकी महागातला. थोडक्यात, आता काय करायचं या विचाराने आईला
घाम फुटलाय. एकीकडे माऊला धपाटा घालायला हात शिवशिवतोय, दुसरीकडे तिचं “भूभू,
तिकडे काका शिमिंग करतोय बघ, दिसला ना तुला?” संभाषण ऐकलेलं असल्यामुळे हसू आवरत
नाहीये.
कशीतरी माऊला वेळेत
तयार करून आई शाळेत घेऊन जाते. तिथे आज एक वेगळंच रहस्य आहे आईसाठी. भूभूचा विचार
करायला वेळच नाहीये. काल माऊच्या डे केअरच्या बॅगेत काल दुसर्याच कुणाचा तरी फ्रॉक
आणि चड्डी बदललेल्या ओल्या कपड्यांमध्ये आलेय, आणि माऊची चड्डी आणि शॉर्ट गायब
आहे. या गमतीजमती नेहेमी शाळेत होतात, पण हे सगळं डे केअरच्या बॅगेत बघून आई
चक्रावून गेली आहे. डे केअर – वर्ग – डे केअर अश्या फेर्या केल्यावर अखेरीस हे
रहस्य उलगडतं. काल माऊ वर्गातून डे केअरला पिवळा फ्रॉक घालून आली होती ना, तो आणि
चड्डी भिजली म्हणून डे केअरच्या ताईंनी बदलली, बदललेले कपडे नेहेमीप्रमाणे डे
केअरच्या बॅगेत.
पण पिवळा फ्रॉक तर
माऊचा नाहीचे!
वर्गात माऊने
जीन्सची शॉर्ट आणि चड्डी ओली केली म्हणून वर्गातल्या ताईंनी कपडे बदलले तिचे आणि
तो पिवळा फ्रॉक - चड्डी घातली. तो वर्गातल्या अजून कुणाचातरी हरवलेला असणार!
हे कोडं सुटल्यावर
आईचं डोकं तेज चालायला लागतं. घरी आल्यावर खिडकीतून आरसा बाहेर काढून ती भूभूची
पोझिशन नीट बघून घेते. आणि कपड्यांच्या हॅंगरने अलगद भूभूला वर उचलते. माऊ
येण्यापूर्वी रोजच्या दिवसात इतक्या प्रकारचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आईने
स्वप्नातही केलं नसेल.
माऊच्या खिडकीमध्ये
दिवसभर काय काय घडामोडी चाललेल्या असतात याचा कुणी व्हिडिओ केला तर इतका मनोरंजक होईल ना!