Monday, September 8, 2014

हिडन ओऍसिस


पुण्याच्या जवळ, जिथे माऊला घेऊन एक दिवस, रात्र धमाल करता येईल अशी जागा शोधत होतो आम्ही. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर पाऊस पडला म्हणून हॉटेलच्या खोलीत नुसतं बसून रहावं लागलं असं होऊन चालणार नव्हतं, आणि पुण्याजवळच्या तारांकित रिझॉर्टसचे दर बघून तिथे जावंसं वाटत नव्हतं. अशी शोधाशोध चालू असतांना एका रिझॉर्टविषयी अर्धवट माहिती मिळाली. तिथे म्हणे शेत वगैरे होतं, आणि काही अनाथ मुलंही रहायला होती. रिझॉर्ट आणि अनाथालय? हे कॉम्बिनेशन काही पचण्यासारखं वाटलं नाही मला. पण चौकशी तर करून बघावी म्हणून फोन केला. इथला मालक पण गमतीशीरच वाटला. चौकशीला / बुकिंगला फोन केल्यावर चेक इनची वेळ, पैसे कधी भरायचे, आमचं रिझॉर्ट कसं जगात बेश्ट आहे यातलं काहीही सांगायला त्याला वेळच नव्हता. “आमच्याकडे जागा खाली आहे, तुम्ही किती जण, कधी येताय ते एसएमएस करा, मी कसं यायचं त्याचे डिटेल्स पाठवतो.” एवढं बोलून त्याने माझी बोळवण केली. हे कसं यायचं त्याचे डिटेल्स थेट आम्ही जायच्या आदल्या दिवसापर्यंत आलेच नव्हते! मी वैतागून फोन केला, तर याने “तुम्ही कधी येणार म्हणाला होता?” म्हणून विचारलं मला! हे काही खरं दिसत नाही. आपल्याला तिथे जाऊन बुकिंग नाही म्हणून परत यायला लागणार बहुतेक. मामला ठीकठीकच दिसतोय एकूण. मी मनाशी एका फसलेल्या सहलीची तयारी करत होते.
दुसर्‍या दिवशी निघाल्यावर तिथल्या मॅनेजरला फोन केला, त्यानेही “तुम्ही आज रात्री राहणार आहात का” म्हणून विचारलं आणि मी मनाशी म्हटलं, “बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आपण घरीच.” मस्त पावसाळी वातावरणात चांगल्या रस्त्यावरून आणि अगदी नेमक्या खुणांसह पत्ता मिळाल्याने अजिबात न चुकता आम्ही चाललो होतो. ट्रीप छान होणार आजची अशी पहिली शक्यता वाटली ती एका वळणावर हिला पाहिल्यावर:
कळलावी / ‘अग्निशिखा’

गेली कित्येक वर्षं कळलावीच्या सुंदर फुलांचे फोटो बघून आपल्याला ही कधी भेटणार म्हणून मी तरसत होते. ती सहजच भेटली या वाटेवर!
“रिझॉर्ट”ला पोहोचल्यावर खोली बघितली आणि एकीकडे जीव भांड्यात पडला – माऊच्या उपद्व्यापात तुटेल असं काहीही नव्हतं खोलीत – खरं तर काहीच नव्हतं. दोन गाद्या जमिनीवर घालून चादरी उश्या दिल्या होत्या, आणि एकीकडे जास्तीच्या गाद्या, उश्या, चादरी ठेवलेल्या. बाकी मोठ्ठीच्या मोठ्ठी खोली रि..का..मी!!! तर दुसरीकडे नेमकं काय वाढून ठेवलंय समोर अशी जराशी काळजीही वाटली.
चहा – पोहे घेताघेता समजलं ... इथे सुट्टीच्या दिवशी नेहेमी शंभर – दिडशे पर्यंत लोक येतात. आज चक्क कुणीच नव्हतं – फक्त आम्ही तिघं! या जागेला “रिझॉर्ट” म्हणणं तितकं बरोबर नाही. हे इको –फार्म आहे. एकूण शंभरएक एकराच्या परिसरामध्ये सेंद्रीय शेती आहे, गाई, इमू, ससे, घोडे, बकर्‍या, कोंबड्या – बदकं असे प्राणी – पक्षी आहेत, ऍडव्हेंचर स्पॉर्टच्या ऍक्टिव्हिटी आहेत,
बर्मा ब्रिज
आणि शेजारीच एका छोट्याश्या नदीवरचा बांध असल्याने हा परिसर पाऊस चांगला झाला असेल तर पावसाळ्याच्या दिवसात तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो!
गराडे धरणाचं पाणी
कानात वारं शिरलेल्या वासरासारखं माऊने दिवसभर हुंदडून घेतलं इथे. :)  

फार्मपासून दीडएक किलोमीटरवर त्या बांधापर्यंत चालत जाता येतं, आणि मस्त पाण्यात खेळता येतं. ही जागा इतकी आवडली, की दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा “आबू बघायला” फेरी झाली आमची. 
बांधार्‍याजवळ
जातांना मोर दिसला, येतांना सुगरण पक्ष्यांची घरबांधणी प्रात्यक्षिकं बघायला मिळाली. :)

बांधाच्या वाटेवर खडकाळ माळ असल्याने मस्त रानफुलं भेटली ...




दुसर्‍या दिवशी फार्मच्या मालकांची भेट झाली तिथे, आणि थोडा उलगडा झाला या जागेविषयी. हा माणूस मर्चंट नेव्हीमध्ये आहे. अगदीच उधळमाधळ केली नाही तर मर्चंट नेव्हीतल्या माणसाला म्हातारपणी पैशाचा प्रश्न पडू नये. पण सोबतीचा, आजूबाजूला माणसं असण्याचा प्रश्न त्यालाही असतोच. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी इथे प्रथम वीसएक मुलांचं अनाथालय काढलं. मग उरलेल्या जागेत शेती, जनावरं वगैरे. या अनाथालयाचा खर्च निघावा इतपत पर्यटन हे त्यानंतर आलं. केवळ इथे येऊन गेलेल्या लोकांच्या अनुभवांवरून, कुठलीही जाहिरात न करता जितके लोक इथे येतात तेवढं त्यांना पुरेसं आहे. (यांची वेबसाईट आहे म्हणे, पण सध्या तरी चालत नाहीये.) स्वतः मालक पैश्याच्या मागे नसल्यामुळे इथल्या लोकांच्या वागण्यात कुठेच कमर्शियल विचार दिसत नाही फारसा. हा त्यांचा “रिटायरमेंट प्लॅन” ऐकून वाटलं, इतका शहाणा स्वार्थ सगळ्यांना जमला तर किती छान होईल!

***
हिडन ओऍसिस, सासवडजवळ. (इथून पुरंदर - वज्रगड मस्त दिसतात!)

 

Friday, September 5, 2014

घरचा बाप्पा


म्हणजे घरी बनवलेला, घरी सजवलेला, घरी बसवलेला आणि घरीच विसर्जित केलेला बाप्पा.

यंदा बाप्पाचे दिवस जवळ आले तसे दुकानातले बाप्पा बघून माऊ इतकी खूश होती, की बाप्पा घरी असणं मस्टच होतं. विकत घेतलेला बाप्पा आम्ही बसवत नाही, त्यामुळे बाप्पा बनवणं ओघाने आलंच. मागे केलेल्या बाप्पाच्या अनुभवावरून यंदा त्यापेक्षा चांगला बाप्पा बनवायचे मनसुबे मी रचत होते.
पण सुरुवातीलाच माशी शिंकली. माती आधी जास्त घट्ट, मग जास्त सैल, ती थोडी वाळल्यावर बनवावी इतका वेळ नाही अशी सगळी गंमत गंमत झाली, आणि “होईल तसा करू” म्हणून मी तश्या सैल मातीचाच बाप्पा बनवला. जरा वेळाने थोडा वाळल्यावर अजून एक हात फिरवता येईल अशी आशा होती, पण थोड्या वेळानंतरची ती घडी काही आलीच नाही. बिचारा बाप्पा बनवला तसाच ओबडधोबड वाळून गेला. आणि मी पण “हम तो बना चुके” म्हणून तसाच तो रंगवला. खरं तर मागच्या अनुभवावरून बाप्पा शक्यतो रंगवायचा नाही असं ठरवलं होतं (मूर्ती पाण्यात विरघळल्यावर पोस्टर कलरचा – प्रामुख्याने दागिन्यांना वापरलेला सोनेरी रंगाचा - वर तवंग आला होता मागच्या वेळी. त्यामुळे न रंगवताच बसवायचा विचार होता आधी.) पण मूर्ती सुबक न झाल्याने नुसता पांढरा रंग द्यायचा ठरवला मग. 





असा बाप्पा चतुर्थीच्या तब्बल एक दिवस आधी तयार झाला, आणि मग पानाफुलांची आरास करून झाल्यावर एकदम वेगळाच भासायला लागला. मातीची मूर्ती आणि बाप्पा यातलं ट्रान्स्फॉर्मेशन खरंच माझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे. पण आपणच केलेली, आतापर्यंत सगळ्या अंगांनी बारकाईने निरखलेली मूर्ती आरती झाल्यावर वेगळीच दिसायला लागते एवढं खरं.


माऊच्या उत्साहापुढे मूर्ती तयार होईपर्यंत आणि नंतरही कशी टिकाव धरणार याची मला फार शंका होती. “आपला बाप्पा आहे, त्याला हात नाही लावायचा, दूरूनच ‘मोरया’ करायचं” हे तिला कितीही पढवलेलं असलं तरीही. पण दुसर्‍या दिवशी सकाळी तिला खुर्चीत चढून बाप्पाशी गप्पा मारतांना ऐकलं ... “गुड मॉर्निंग बाप्पा ... कसा आहेस? तुझी गाई झाली का? :)” आणि मग मी निश्चिंत झाले. बाप्पाचे पाच दिवस माऊला बाप्पा बाप्पा करत घरभर नाचतांना बघणं एवढं मोठं सुख नसेल. 


विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी बादलीत मूर्ती पूर्ण विरघळल्यावर “बाप्पा आता त्याच्या घरी गेलाय.” हे थोडंफार पटलंय, पण “आई आपला बाप्पा कुठे गेला? तो कधी येणार आहे?” हे प्रश्न अजून चाललेत. एवढ्यासाठीच तर होता ना घरचा बाप्पा? :)