माऊचा वाढदिवस झाला या आठवड्यात. वाढदिवसाच्या तयारीच्या
निमित्ताने आईने आणि मी भरपूर मज्जा करून घेतली. दुपारी माऊ झोपली, की आमचे उद्योग सुरू
व्हायचे. ती पण मग कधीतरी हळूच उठून येऊन आम्हाला चकित करायची. माऊपासून सगळ्या
गमतीजमती लपवून ठेवणं ही मोठ्ठी कसरत होती!
तिच्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रिणी तर येणारच होत्या,
मग लाडक्या बुक्काला आणि लंबूला पण बोलवायचं ठरवलं आम्ही.
बुक्का तयार झालाय ...
आणि लंबूपण निघालाय ! :)
बुक्का, लंबूच्या मित्रमैत्रिणी त्यांच्या सोबत आल्याच मग
:) उरलेल्या कागदातून खारूताई, चिऊ, मनीमाऊ बनवल्या. रंगीत मॅगेझिनचे आणि घरात सापडलेले दुसरे कागद वापरून फुलं, फुलपाखरं तयार झाली.
मनीमाऊ आणि खारूताई |
एक एक चित्र झाल्यावर पुढच्यात अजून सुधारणा होत होती, वेगळं सुचत होतं. आईने बनवलेल्या मनीमाऊ, खारूताईच्या पुढे पहिले बनवलेला बुक्का बिचारा अगदीच साधासुधा दिसतोय!
ही सगळी सजावट:
सजावट |
(वरच्या फोटोत मधली लाल फुलं ओळखीची वाटतात? मागच्या दिवाळीतल्या आकाशकंदिलाचे उरलेले तुकडे वापरून केलीत ती ;) )
आलेल्या छोट्या मित्रमैत्रिणींना छोटीशी भेट द्यायला गुंजनच्या ब्लॉगवर आहेत तसे पाऊच पण बनवले
मग ... सुंदर चित्रांचं म्हणून वर्षानुवर्ष नुसतंच जपून ठेवलेलं कॅलेंडर सत्कारणी लागलं त्या निमित्तने. :)
फार फार तर अर्धा तासाचं काम, एकदम सोप्पं.
हे सगळं विकत आणून / कंत्राट देऊन कमी कष्टात, सुबक झालं असतं बहुतेक ... पण ते करतांना आलेली मज्जा विकत कशी मिळणार? :)