शाळेत सहावी – सातवीला कधीतरी ही
कविता होती.
मी तेंव्हा बहुतेक दिवसभर
माझ्या घट्ट मैत्रिणीच्या घरीच पडीक असायचे. फक्त जेवायला खायला आणि झोपायला घरी!
मैत्रिणीची आई मला तिची चौथी मुलगीच म्हणायची! तिची आई यूपीमधल्या छोट्याश्या
गावातली. लहानपणीच लग्न झालेलं. प्रेमळ पण अतिशय परंपराप्रिय सासू, मेहनती, समजदार
पण आईच्या कधीही शब्दाबाहेर न जाणारा नवरा – त्याचे वडील अकाली गेल्याने सगळ्या
धाकट्या भावंडांची जबाबदारी स्वीकारून स्वतः नोकरी करत त्यांना शिकवणारा. दादा आणि
वहिनीला आईवडलांसारखं मानणारे धाकटे दीर. अश्या घरातल्या त्या “आई”ला मी कधी
तिच्या नात्यांच्या पलिकडे बघितलेलंच नव्हतं. लग्नाला पंचवीस – तीस वर्षं होऊनही
सासूच्या धाकात राहणारी, घरातल्या कामाचा आणि रूढीपरंपरांचा बोजा न पेलवून नेहेमी
आजारी आजारी राहणारी ही माझी “दुसरी आई” फार प्रेमळ होती.
एकदा नेहेमीप्रमाणे मैत्रिणीच्या
घरी आमचा एकत्र ’अभ्यास’ चालला होता. दोघी मिळून ही कविता म्हणत होतो. मैत्रिणीची
आई आमच्या कविता म्हणण्यात सामिल झाली! मराठी - इंग्रजी कविता, सुभाषितं माझ्या आईकडून
मी भरपूर ऐकली होती, तिच्या शाळेतल्या, कॉलेजातल्या गमतीजमती ऐकल्या होत्या,
तिच्या मैत्रिणींविषयी ऐकलं होतं. शाळेत काय चालतं हे तिला ऐकवलंही होतं. आपली आई
ही आई असण्याव्यतिरिक्त घराबाहेर आणि घरातही बरीच काही आहे हे समजत होतं. मैत्रिणीच्या आईला मात्र मी कधी हातात पुस्तक
धरलेलं बघितलं नव्हतं. तिच्या घर-संसारापलिकडे तिला कधी काही अस्तित्व होतं, तीही
कधीतरी अल्लड मुलगी होती, शाळेत जात होती, तिथे तिच्या मैत्रिणी असतील, आवडते –
नावडते विषय असतील, आवडीच्या, तिला पाठ असलेल्या कविता असतील असं कधी मनातही आलं
नव्हतं आमच्या! इतक्या दिवसांच्या सहवासात फक्त त्या एका कवितेपुरती दिसली ती मला.
त्या कवितेविषयी, तिच्या शाळेविषयी कधी विचारायचं राहूनच गेलं तिला!