Tuesday, August 11, 2015

योगायोग!

केवळ नशीब म्हणून वाचले असं कितीतरी वेळा झालंय माझ्या बाबत. अशीच ही मी चौथी पाचवीत असतानाची गोष्ट. रेल्वे कॉलनीतली. रेल्वे कॉलनी म्हणजे एकदम सुस्त परिसर. जुन्या काळात बांधलेले प्रचंड बंगले, त्यांची भली मोठी आंगणं, पुढे – मागे – बाजूला प्रचंड आकाराची (बहुधा निगा न राखलेली) बाग. एका घराचा दुसर्‍याशी संबंध नाही. रस्त्यावरून किंवा गेटमधून घराचं दार सुद्धा नीट दिसणार नाही. संध्याकाळीसुद्धा रस्त्यात फारसं कुणी दिसायचं नाही. आता तर दुपारी अडीच ते साडेतीन मधली वेळ असेल. म्हणजे सगळं शांत शांत. घरात मी एकटीच जागी होते. दोघे भाऊ शाळेत / कॉलेजात, बाबा बाहेर गेलेले. आजी बहुतेक झोपलेली. दार वाजलं. मी जाळीच्या दारातून बघितलं तर एक नऊवारी नेसलेली गावाकडून आल्यासारखी दिसणारी मध्यमवयीन बाई बाहेर उभी.

डॉक्टरांनी प्रायव्हेट पेशंट घेऊ नयेत असा नियम असला तरी कितीतरी डॉक्टर घरी पेशंट बघत, त्यामुळे आईचे पेशंटही डॉक्टरांना भेटायला म्हणून वेळीअवेळी कधीही घरी येत. कधी बरी झालेली एखादी आजीबाई शेतावरनं पिशवीभर ताजी भाजी डॉक्टरीण बाईंसाठी घेऊन येई, कधी कुणी बाळाच्या जन्माचे पेढे-बर्फी घेऊन येई. तपासायला आलेल्यांना “घरी तपासत नाहीत, दवाखान्यात भेटा” म्हणून बोळवण करावी लागे, किंवा असे कुणी भेटायला आलं तर त्यांचा निरोप घेऊन ठेवावा लागे. दारात अनोळखी कुणी उभं असण्यात विशेष काहीच नव्हतं त्यामुळे.

“डॉक्टर नाहीत घरी. आणि घरी तपासत नाहीत त्या.” मी नेहेमीप्रमाणे सांगितलं. “ताई दार उघड जरा.” ती बाई म्हणाली. मी दार उघडलं. “इकडे ये.” तिने माझा हात धरला, आणि एकदम गॅरेजच्या दिशेने मला ती ओढतच न्यायला लागली. गॅरेजचं गेट वेगळं, घराचं वेगळं. गॅरेजच्या रस्त्याला तिने मला नेलं तर घरातून कुणाला दिसणारही नाही. तितक्यात घराचं गेट वाजलं - दवाखान्यातून आई अचानक घरी आली होती. गेटमध्ये कुणीतरी पाहून ही बाई माझा हात सोडून गॅरेजच्या दिशेने पसार झाली. मी गोठल्यासारखी जागीच उभी. किती मूर्ख आणि बावळट आहोत आपण! ही बाई आपल्याला पळवून नेत होती, आणि आपल्याला ते समजलंही नाही ... आपण तिला प्रतिकार केला नाही! आई आत्ता आली नसती तर! हे सगळं आईला किंवा कुणाला सांगायचीही लाज वाटली मला!    

“का ग बाहेर का उभी आहेस अशी?” आईने विचारलं.

“काही नाही ... बहुतेक पेशंट होती कुणीतरी. गेली.” मी.

“बर. येईल परत.”

आजवर हा प्रसंग कधी कुणाला सांगितला नव्हता. आज लेकीच्या शाळेतल्या आयांच्या ग्रूपवर पुण्यातल्या शाळेचा किस्सा फिरतोय – एक माणूस शाळेच्या दाराजवळ उभा होता, शाळा सुटल्यावर एका मुलाला म्हणाला, “आज तुझी आई नाहीये घरी. तिने मला तुला घेऊन यायला सांगितलंय!” सुदैवाने तो मुलगा शाळेत पळून गेला परत. हाच किस्सा पुण्याच्या अजून एक दोन शाळांमध्ये घडला म्हणे. कसं जपायचं मुलांना? कितीही पढवलेलं असलं, तरी त्या क्षणी मुलाला पळून जायचं सुचेल आणि / किंवा कुणीतरी दुसरं मदतीला येईल अशी आशा करायची आपण! त्यावरून हे आठवलं. आपला मूर्खपणा तेंव्हा मी आईला सांगितला असता तर कदाचित ती बाई सापडलीही असती ... कोण जाणे तिच्या बरोबर अजून कोण कोण होतं, माझ्याबाबतचा प्रयत्न फसल्यावर तिने दुसरीकडे पुन्हा प्रयत्न केला का!