Wednesday, September 7, 2016

आयता (आणि सुशिक्षित) बाप्पा

    पुण्यात दर वर्षी पर्यावरण पूरक बाप्पा बनवण्याच्या ढिगाने कार्यशाळा होतात, पण आजवर मला त्यातल्या एकाही ठिकाणी जायची बुद्धी झालेली नाही. माकडाच्या घरासारखं दर वर्षी घाईघाईने बाप्पा बनवतांना मी ठरवते, की पुढच्या वर्षी नक्की कार्यशाळेला जायचं, तंत्र शिकून घ्यायचं, आणि बाप्पाबरोबरच या विचाराचंही विसर्जन होतं. या वर्षी चक्क आमच्या सोसायटीमध्येच कार्यशाळा होती, पण मला यंदाही न जायला सबब होतीच. (अगदी खरं सांगायचं तर मला तितकं मनापासून जावंसंच वाटत नाहीये अशा कार्यशाळेत. मूर्ती बनवण्याचं तंत्र मला माहित नाही, कुणाला कधी बनवतांना पाहिलेलंही नाही. पण आपण जमेल तसा, बनवला – मोडला – परत बनवला असा चुकत माकत बनवलेला बाप्पाच जास्त आवडतोय. दर वेळी मी नव्या चुका करते आणि त्यातून आपण काहीतरी शिकतोय असा समज करून घेते. :) हा उगाचच अडमुठेपणा (आणि त्याहूनही शिकायचा कंटाळा) आहे, हे समजतंय. आपलं अडाणीपणा ग्लोरीफाय करणं चाललंय, हे कळतंय पण तरीही!), पण माऊची आजी जायला उत्सुक होती, वेळ, जागा पण तिच्या सोयीची होती. त्यामुळे तिचं नाव नोंदवलं, आणि या वर्षी आपण आजीने बनवलेला आयता बाप्पा बसवू या असं ठरवलं!

आजी कार्यशाळेला गेल्यामुळे बर्‍याच नव्या गोष्टी कळल्या: त्यांनी माती चाळून घेतली, जी मी नेहेमी घेत नाही. शिवाय, माती नेमकी किती घट्ट भिजवायची हे बघायला मिळालं. (पुरीच्या कणकेसारखी घट्ट!) अजून एक युक्ती म्हणजे हात, डोकं जोडतांना मधे टूथपिक किंवा छोटी काडी घातली म्हणजे ते जास्त पक्कं बसतं. नाही तर हात, डोकं करतांना मला नेहेमी टेन्शन असायचं तुटायला नको म्हणून. खेरीज, बाप्पाची बैठक करतांना पाय आणि धड कसं जोडायचं हा मला नेहेमी पडणारा प्रश्न. बाप्पाच्या गळ्यात रुळणारा मोठा हार, शेला, उपरणं असं करून मी पोट बर्‍यापैकी झाकून टाकते, म्हणजे तिथलं कन्फ्यूजन बघणार्‍याला कळत नाही. ;)  कार्यशाळेच्या पध्दतीत ते आधी नुसते पाय करून घेतात, मग त्यावर एक उभा दंडागोल ठेवतात. नंतर पोट मोठं करण्यासाठी (लंबोदर!) त्याला वरून अजून थर लावतात. हे जास्त सोपं आहे. मी बाप्पा बनवतांना टूथपिक वगळाता काहीही हत्यार वापरत नव्हते. साध्यासाध्या हत्यारांनी मूर्तीमधली सफाई कितीतरी वाढते. मूर्ती पूर्ण वाळेपर्यंत (साधारण ३ दिवस लागतात) रोज गार्डन स्प्रेयरने तिच्यावर पाणी मारायचं म्हणजे तडे जात नाहीत. (गार्डन स्प्रेयर नसेल तर रंगाच्या ब्रशने.)मूर्ती सावलीतच सुकवायची.




    रंगकामाच्या दिवशी मात्र आजी तिथे शिकायला गेली नव्हती. कारण मला विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर हीच माती पुढच्या वर्षी परत वापरायची होती, आणि तिथे ते नेहेमीचे रंग वापरणार होते. हे रंग पर्यावरणपूरक नाहीत. त्यांचा (विशेषतः सोनेरी रंगाचा) पाण्यावर तवंग येतो, माती परत वापरता येत नाही मग. आजीने मग पोस्टर कलर वापरून बाप्पा घरीच रंगवला.

    बोनस म्हणजे आजीचं पाहून माऊच्या कलाकार ताईला पण स्फूर्ती झाली. तिने पण आजीच्या मार्गदर्शनाखाली एक छोटा बाप्पा बनवला. त्यामुळे आमच्याकडे या वर्षी दोन दोन मस्त आयते आणि शिकलेले बाप्पा आले!


    बाप्पाच्या सजावटीसाठी फुलांची प्रभावळपण आजीने बनवली आहे. हिरव्या रंगासाठी करवंट्यांमध्ये गहू पेरले होते, पणत्यांमध्ये अळीवपण पेरले होते. नेमक्या किती दिवसात गहू येतील याची खात्री नव्हती, आणि अळीव किती दिवस चांगले दिसतील याची. पाच दिवसांमध्ये गव्हाचे अंकूर मस्त दिसायला लागले, ते सजावटीसाठी वापरले. अळीवाला पणत्यांमध्ये जागा थोडी कमी पडली. शिवाय पाच दिवसात ते जास्त मोठे झाले, वेडेवाकडे वाढले. त्यामुळे ते वापरले नाहीत. हे फायनल बाप्पा:




    बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी मला हे सगळं अजून नीट शिकून घेण्याची बुद्धी द्या!!!

***
काल ही पोस्ट टाकली, पण मन भरलं नव्हतं. या वर्षी बाप्पाला नीट, पोटभर भेटायला मिळालंच नव्हतं अजून. आणि फोटो पण सगळे घाईघाईत काढले होते.  त्यामुळे समाधान वाटत नव्हतं. काल दुपारी संधी मिळाली. बाप्पा आणि मी निवांत भेटलो, गप्पा मारल्या, थोडे फोटो पण काढले. मग जरा बरं वाटलं. कालचे फोटो इथे आहेत :

https://goo.gl/photos/NzUkewyMmLtH9itm7



Thursday, September 1, 2016

मलाही केंव्हा कळले नाही :)

गेले आठ – दहा दिवस एक चिमुकला सूर्यपक्षी बागेत झोपायला येतोय. खोट्या ब्रह्मकमळाच्या दोन पानांचं अंथरूण – पांघरूण त्याला आवडलंय. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी तो आपल्या झोपायच्या खोलीत येऊन पोहोचतो. थोडा वेळ शांत निश्चल बसून राहतो, आणि मग चोच पंखात दडवून गाढ झोपून जातो, ते डायरेक्ट सकाळी उजाडायला लागेपर्यंत. वर मस्त दुसर्‍या पानाचं पांघरूण आहे पावसापासून बचावासाठी. एका विशिष्ट कोनातूनच, त्याच्यासमोर अक्षरशः एक फुटावर आपलं नाक येईपर्यंत दिसत नाही इतका बेमालूम लपतो इथे तो.

पण तरीही. रोज त्याला बघून पडणारे प्रश्न वाढत चाललेत. :)

कायम मान इतकी वाकडी करून झोपल्यावर मान अवघडत नाही का याची? (मला तर उशी असल्याने / नसल्याने / बदलल्याने सुद्धा त्रास होतो मानेला! )

ब्रह्मकमळाच्या पानाची उभी कड पायात धरून तो झोपतो – तलवारीच्या पात्यावर झोपावं तसं. रात्री झोपेत पायाची पकड कधी सैल होत नाही? वार्‍याने पान हलल्यामुळे झोक जात नाही? असं सारा वेळ पायात पान घट्ट पकडून ठेवल्यावर पाय भरून येत नाहीत?




रात्री कधीच तहान लागलीय / शू आलीय / उकडतंय / थंडी वाजतेय / भूक लागलीय / पोट जास्त भरलंय / उगाचच स्वप्न पडलं म्हणून जाग येत नाही?

एवढ्या अवघड जागी बसून विश्रांती कशी मिळू शकते जिवाला!!! बागेत दुसर्‍या  कुंड्या आहेत, पानांनी पूर्ण झाकलेने निवांत कोपरेही आहेत एक – दोन. या सगळ्या सुखाच्या जागा सोडून हे “असिधाराव्रत” का बरं घेतलं असेल या सूर्यपक्ष्याने असा प्रश्न सद्ध्या त्याला बघून पडातोय, आणि त्यामुळे कुसुमाग्रजांचं तृणाचं पातं आठवतंय.

रोज रात्री त्याला गुड नाईट म्हणून मग झोपायला जाते सध्या माऊ. :)