Sunday, April 23, 2017

पुन्हा एकदा सोन्याच्या फुलांचं झाड



सोनसावर माझी लाडकी. माझा असा समज होता, की या झाडाचा उत्सव असतो जेमतेम दोन – तीन आठवडे, जानेवारी – फेब्रुवारीमध्ये फुलं आल्यावर. एरवी हे झाड विशेष काही बघण्यासारखं नाही. या वर्षी ही फुलं पोटभर बघितली. 

त्या सुंदर फुलांच्या मानाने नंतर येणारी वांग्याच्या आकाराची बोंडं अगदीच बेंगळूर वाटायची मला. पण आज पाहिलं तर ती बोंडं झाडावरच उकलली होती, आणि सोनसावरीचा कापूस झाडांखाली पडला होता. आधी एकदम बोअरिंग दिसणारं बोंड उकलल्यावर एवढं मस्त दिसत होतं! उकलतांना त्याच्या बाहेरच्या तपकिरी सालीच्या पाच पाकळ्या आणि आतल्या ऑफ व्हाईट अवरणाच्याही पाच पाकळ्या झाल्या होत्या. इतकी सुंदर रंगसंगती आणि सुबक आकार! खरंच सोन्याच्या फुलांच्या झाडाला साजेसा. एका आड एक तपकिरी आणि ऑफ व्हाईट पाकळी आणि त्यातून डोकावणारा कापूस अशी ही बोंडं झाडावर लटकत होती.




क्वचित कुठेतरी बोंडाच्या पाकळ्या खाली पडलेल्या दिसल्या.



सोनसावरीची बी तशी मोठी, जरा जड आहे आणि कापसाचे तंतू लहान. त्यामुळे या कापसाच्या म्हातार्‍या वार्‍यावर उडत नव्हत्या, झाडाखालीच पडल्या होत्या. दोन – चार बिया आणल्यात, बघू रुजवता येतात का या पावसाळ्यात!


Friday, April 21, 2017

लोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र

“लोकशाहीवादी अम्मीस ... दीर्घपत्र” वाचलं. १९९० मध्ये गेलेल्या आपल्या आईला सईद मिर्झांनी तिच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या या दीर्घपत्रात आईशी संवाद आहे. सोव्हिएत रशियाचं विघटन, अमेरिकेवरचा दहशतवादी हल्ला, त्सुनामी, रामजन्मभूमीचं आंदोलन, बाबरी मशीद पाडणं, त्यानंतरच्या दंगली, मुंबईतले बॉंबस्फोट ... मुंबईतल्या एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय उदारमतवादी मुस्लीम कुटुंबातल्या, आपल्या लोकशाहीवर ठाम विश्वास असणाऱ्या आईला तिच्या मृत्यूनंतर जगात आणि देशात झालेल्या ठळक घडामोडी सांगून या दीर्घ पत्राची सुरुवात होते. आणि त्यापुढे, आई जिवंत असतांना जे जे सांगायचं राहून गेलं, ते सगळं आईशी बोललं जातं. आईइतक्या जवळच्या व्यक्तीला सांगायच्या राहिलेल्या गोष्टी कधी एक-दोन आणि एकाच पातळीवरच्या कश्या असतील? त्यासाठी एखाद्या म्युरलसारखी रचना या पुस्तकात आहे. यात कादंबरी आहे, सिनेमाची संहिता आहे, आत्मकथन आहे, देशातल्या - जगातल्या परिस्थितीविषयी टिप्पणी आहे, इतिहास आणि संस्कृतीविषयी भाष्य आहे, काव्य आहे, स्वतःशीच संवादही आहे, गप्पा आहेत. एकाच पुस्तकात एवढं सगळं असतांना, हे सगळं वाचतांना विस्कळीतपणा जाणवला का? मी तरी पुस्तक वाचतांना एवढी गुंग होऊन गेले होते, की मला त्यात विस्कळीतपणा, रूळ बदलतांना होणारी खडखड ऐकायला आली नाही.

नेहेमी पुस्तक आवडलं, तर ते वाचून खाली ठेवल्याबरोबर मला त्याविषयी काहीतरी म्हणावंसं वाटतं. हे पुस्तक काल वाचून झालं, मी अजून विचार करते आहे – नेमकं काय काय वाटतंय मला?

जाती-धर्मामध्ये अभिमान धरण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही – तुम्ही अमुक एका जातीचे / धर्माचे / देशाचे असण्यात तुमचं कर्तृत्व काय आहे? It is just accidental. पण तरीही जन्माने चिकटलेली ही ओळख आपण नाकारू शकत नाही, आणि कधीकधी आपल्या विचारातही नकळत हे कुठेतरी झिरपत असतं.

बाबरी मशीद पडली तेंव्हा मलाही आनंद वाटला होता. मी हिंदू आहे, मुसलमान फार वरचढ झालेत, त्यांना चांगली अद्दल घडली असं काहीतरी वाटलं होतं का मला तेंव्हा? माहित नाही. फार कळत नव्हतं तेंव्हा, मात्र हा एक निर्णायक क्षण आहे असं वाटलं होतं एवढं नक्की.  पण तेंव्हाच्या रथयात्रा, देशभरातून गोळा केलेल्या “श्रीराम” लिहिलेल्या विटा, कारसेवा – एकूण सगळाच धार्मिक उन्माद - या सगळ्याचा आज मी विचार करते तेंव्हा मला भयानक वाटतं हे. खरोखर आफूची गोळी आहे ही – एवढ्या लोकांना त्यांच्या रोजच्या जगण्यातले खरे प्रश्न विसरवून एकमेकांविरुद्ध भडकवायला लावणारी.  (आणिबाणीविषयी वाचूनही तेवढंच अस्वस्थ वाटतं, किंवा आज देशात जे ध्रुवीकरण चाललं आहे तेही तितकंच भयानक वाटतं म्हणा.) दुर्दैवाने आपल्याकडचे खरे प्रश्न सोडवण्यात कुणालाच रस नाहीये. त्यामुळे या सगळ्याला विरोध करणारेही त्यांची त्यांची छुपी कारणं घेऊन विरोध करतात.

इस्लामविषयी काही ठामपणे म्हणणं अवघड आहे मला. माझी इस्लामशी धर्म आणि संस्कृती म्हणून ओळख प्रामुख्याने मध्ययुगातला भारत, मुस्लीम आक्रमणं, त्यानंतर घडलेले धार्मिक अत्याचार, फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती,  या सगळ्याला अजूनही चिकटून राहणारं आजचं धर्माचं राजकारण, मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांचा दहशतवाद एवढ्या distorted आणि partial प्रतिमेमधून झालेली आहे. इतिहास नेहेमी जेत्यांचा असतो. जगाच्या इतिहासाची तोंडओळख करून घेताना मी अरब विद्वानांविषयी काहीच शिकलेले नाही. पूर्वेकडचं ज्ञान पाश्चात्यांपर्यंत अरबांमर्फत पोहोचलं एवढंच मला त्यांच्याविषयी माहित आहे. इब्न रश्द, इब्न सिना, अल गझाली ही नावंही मला नवीन आहेत. या सगळ्यांची जवळून ओळख करून घ्यावीशी वाटते आहे.

मी मूळ इंग्रजी पुस्तक वाचलेलं नाही, मिलिंद चंपानेरकरांनी केलेलं मराठी भाषांतर वाचलं. भाषांतर तसं ठीक, पण दोन – चार ठिकाणी बारीक खडे लागले दाताखाली. (याला २०१६चा साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळालाय.)


लेखक: सईद अख्तर मिर्झा
मराठी अनुवाद: मिलिंद चंपानेरकर
रोहन प्रकाशन
दुसरी आवृत्ती, २०१७.
मूल्य ३२० रुपये.