Wednesday, August 23, 2017

कुसुमकली सा मेरा मानस

माऊला मी स्वतः दुकानात जाऊन आजवर एकही चॉकलेट विकत आणलेलं नाही. पण तिला चॉकलेट देणार्‍यांची अजिबात कमतरता नाही. पण ही सगळी चॉकलेटं आम्ही हातात आल्याआल्या फस्त करत नाही. दिवसाला जास्तीत जास्त एक, आणि काही नियमांची पूर्तता केल्यावरच, असे चॉकलेटचे उभयपक्षी मान्य असे कायदे आहेत. :) आजवर घरात माऊला द्यायला चॉकलेट नाही असं कधीच झालेलं नाही. चॉकलेट खायचं म्हणजे तिच्या सखीला दिल्याशिवाय माऊला ते गोड लागत नाही. अगदी बाहेर कुठे दुकानात सुट्टे नाहीत म्हणून दुकानदार काकानी गोळी दिली तरी माऊ “अजून एक दे – माझ्या मैत्रिणीसाठी!” म्हणून हक्काने दुसरी गोळी मिळवते.

असंच कुणीतरी दिलेलं एक किटकॅट. हे माऊने पहिल्यांदाच खाल्लं, आणि तिला ते फारच आवडलं. पण पंचाईत अशी झाली, की त्यात नेमके ३ तुकडे होते. एक माऊचा, एक सखीचा. तिसर्‍याचं काय? तिला म्हटलं, तू एकटी असशील तेंव्हा खा ते. पण नाही पटलं तितकंसं. (दोघी एकमेकींशिवाय असण्याची कल्पनाच मुळात आम्हाला आवडत नाही. अगदी गावाला जायचं म्हटलं तरी निघतांना जीव कासावीस होतो!) मग म्हटलं, आजच्या दिवस दोघी वेगवेगळं चॉकलेट खा. हे तर अजिबातच नाही पटलं. शेवटी त्या किटकॅटच्या तुकड्याचे दोन तुकडे, आणि अजून एक एक छोटं चॉकलेट अशी समसमान विभागणी झाली.

कितीही जवळची मैत्रीण असली, तरी तिच्यासाठी आवडत्या चॉकलेटच्या शेवटच्या तुकड्यातला निम्मा स्वतःहून शेअर करणं माऊच्या वयाची असताना मला नसतं जमलं बहुतेक! म्हणजे मी पण दिला असता तुकडा, पण नाईलाजाने, मैत्रिणीला वाईट वाटेल म्हणून / आईला आपण किती अप्पलपोटे आहोत असं वाटेल म्हणून. आणि मैत्रीण समोर नसतांना तर नाहीच. माऊ मैत्रिणीसमोर जेवढ्या हिरीरीने तिची बाजू घेते, तेवढीच ती नसतानाही. आणि आपल्याला जास्त खायला मिळण्यापेक्षा सगळ्यांना वाटून खाण्यात तिला जास्त आनंद वाटतोय. माझं तोंड चॉकलेट न खाताच गोड झालंय. देवा, माझं पिल्लू असंच वेडं राहू देत! आमेन!

Monday, August 7, 2017

सदिच्छा!

माऊला टेकडीवर जायला खूप आवडतं, पण सकाळी कधी मी तिला टेकडीवर नेत नाही. सुट्टीच्या दिवशी सकाळी टेकडी म्हणजे माझा एकटीचा वेळ असतो. आपल्या गतीने, इकडची तिकडची झाडं बघत टेकडी चढायची, वर फिरायचं आणि घरी परत यायचं म्हणजे माझ्यासाठी एकदम ध्यान केल्यासारखं असतं. सकाळी मोकळ्या हवेत पाय जितके चालतील तितका डोक्यातल्या कचर्‍याचा निचरा होतो! असं मस्त फिरून परत आल्यावर जे काही वाटतं, त्याला तोड नाही असं माझं मत आहे! अर्थात ही चैन रोज करायला मिळत नाही, फक्त सुट्टीच्या दिवशीच ही संधी मिळते. त्यामुळे हा वेळ कुणाबरोबरही शेयर करायला मी अर्थातच नाखूश असते. अगदी माऊसोबत सुद्धा. माऊला घेऊन मी संध्याकाळी परत एकदा टेकडीवर जाईन, पण सकाळी तिला बरोबर घेणार नाही!

तरीही कुणीतरी वाटेत भेटतं, चार शब्द बोलतं. तितपत तंद्री मोडणं मी चालवून घेते. मागच्या वेळी मात्र गंमत झाली. टेकडीवर नियमित येणारे अगदी रोज, सकाळ – संध्याकाळ येणारेसुद्धा लोक आहेत. त्यातले थोडेफार लोक (माझं आजूबाजूच्या लोकांकडे कधी लक्ष नसतं, तरीही) मला ओळखतात. त्यातले एक आजोबा. खरं तर तरूण आजोबा म्हणायला हवे असे. कारण निवृत्त झालेत, पण उत्साह तरुणासरखा आहे त्यांचा. भलतेच गप्पिष्ट. बरेच वेळा दिसतात, दिसले की दोन शब्द नक्कीच बोलतात. दोन चार वेळा अगदी मला थांबवून सुद्धा गप्पा मारल्यात त्यांनी. खूप कळकळीने बोलतात, त्यांच्या विषयात त्यांना बरंच काही माहित असतं, काही चांगलं व्हावं अशी मनापासून इच्छा असते. तर आज हे आजोबा अगदी चढायला सुरुवात करतानाच भेटले. चालतांना मी फारसं बोलत नाहीच, पण चढताना तर नाहीच नाही. तोंड किंवा पाय एकच काहीतरी चालू शकतं माझं एका वेळी. आजोबांचं स्वगत चालू होतं, मी आपली अगदीच शिष्टपणा वाटू नये इतक्या वेळा एकाक्षरी प्रतिसाद देत होते. टेकडी चढून झाली, पहिल्या बाप्पाचं देऊळ आलं. (टेकडी चढल्याचढल्या हा दिसतो, म्हणून पहिला बाप्पा. माऊने केलेलं बारसं.) अजून पुढे जाऊन खडीसाखरेचा बाप्पा आला (इथे संध्याकाळी प्रसादाला नेहेमी खडीसाखर असते!), पुढे बांबूच्या बेटापाशी पोहोचलो, तिथून तीन वेगवेगळ्या दिशांना रस्ते फुटतात. यांनी पण नेमका माझाच रस्ता निवडला! वाटेतलं मोहाचं झाड आलं आणि गेलं, शेवटी नंदीबैलाच्या बाप्पाला जाऊन पोहोचलो आम्ही. (या बाप्पाच्या समोरच्या जमिनीवर कोळ्यासारख्या दिसणार्‍या नंदीबैल किड्यांची भरपूर घरं असतात. मातीमध्ये छोटा खड्डा करून तिथे हा मातीखाली लपून बसतो. एखादी मुंगी आली, की तिच्या पायानी खड्याच्या कडेची माती आत पडते, आणि झटकन उडी मारून नंदीबैल सावज धरतो. इथे गेलं, की नंदीबैलाच्या खड्ड्यांमध्ये बारीक काडी घालून त्याला बाहेर काढायचं हा माऊचा आणि सखीचा लाडका खेळ आहे. ) तरी आजोबांचं स्वगत काही संपलं नाही!!! वाटेत नभाळी फुलली होती, फालसा(?)ला फळं धरायला लागली होती, रंगीत सुरवंट दिसले, हिरवं पोपटी गवत उन्हात चमकत होतं, अगदी जवळून मोराचे आवाज आले – मी एक दोन वेळा या सगळ्याकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा क्षीण प्रयत्न केला. (पण ते निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यामुळे इतक्या क्षुद्र distractions मुळे चित्त विचलित होऊ न देता ते तासभर बोलत राहू शकतात.) त्यांचं म्हणणं असं, की टेकडीवर आल्यावर दहा – पंधरा मिनिटं लोकांनी एका ठिकाणी गप्पा मारल्या तर किती मज्जा येईल! वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी एकत्र गप्पा मारून डोक्याला किती खुराक मिळेल! उदाहरणार्थ, “भोसडीच्या!” ही तुम्हा आम्हाला शिवी म्हणून माहित आहे. पण हा म्हणे संस्कृतमधल्या “भोs सदिच्छा!” या अभिवादनाचा अपभ्रंश आहे. हे त्यांना टेकडीवर येणार्‍या एका भाषातज्ञांकडून समजलंय. आजोबा आता टेकडीवर त्यांच्या मित्रांना भेटतांना नेहेमी “भोS सदिच्छा!” म्हणतात!

नंदीबैलाच्या बाप्पाच्या इथे आजोबांना अजून काही स्नेही भेटतात. ते गप्पा मारत थांबतात, मी आल्या वाटेने परत निघते. जातांना ज्या सगळ्यांना धड भेटता न आल्याची चुटपूट लागून राहिली होती, त्या सगळ्या सग्या सोयर्‍यांना मी परतीच्या वाटेवर निवांत भेटते. तरीही, आजचा चालण्यातला निम्मा वेळ आजोबांनी खाऊन टाकल्याचा सूड मग ब्लॉगवर त्यांचा किस्सा लिहून तरी निघणारच ना! ;)





Friday, August 4, 2017

माऊचा मित्र :)

काल अचानक माऊचा एक मित्र तिच्याशी खेळायला घरी आला होता. हा माऊचा अगदी लाडका मित्र आहे. तो छोटा असताना माऊने त्याला अगदी कौतुकाने मांडीवर वगैरे घेतलंय. आता तो मांडीवर घ्यायच्या आकाराचा राहिलेला नाही, माऊपेक्षा मोठ्ठा झालाय, पण म्हणून काय झालं, माऊ ताई आहे ना त्याची! कधीही सोसायटीत खाली खेळताना, टेकडीवर, पार्किंगमध्ये – कुठेही तो दिसला की माऊ त्याला भेटायला धावत सुटते. त्याच्या बरोबर त्याचा दादा असतोच. दादाशी गप्पा मारत मित्राशी खेळणं चालतं. हल्ली कधीकधी माऊला जाणवायला लागलंय आपला दोस्त मोठा झाल्याचं. त्यामुळे मग मधेच तिला भीती वाटते त्याच्याशी खेळायची. पण त्याला भेटायचं तर असतंच.

तर हा मित्र काल रात्री एकटाच घरी येऊन थडकला. सोबत दादा नव्हता. रात्री उशीरा माऊ अगदी झोपायला आली होती, तेंव्हा दार वाजलं. बाबाने बघितलं, तर दारात हा उभा! माऊने लग्गेच ओळखलं त्याला. याचं घर सोसायटीच्या अगदी दुसर्‍या टोकाला, नेमका फ्लॅट नंबर मलाही माहित नाही. याला माऊचं घर कसं सापडलं असेल? लिफ्टमधून एकटा आला, का एवढे जिने चढून आला? काही हा असेना, आता एवढा भेटायला आलाय म्हटल्यावर त्याला दारात कसा ताटकळत ठेवणार? दार उघडल्याबरोबर तो आपलंच घर असल्यासारखा आत शिरला. जरा भांबावला होता, पण त्याच्याशी बोलल्यावर एकदम निवांत झाला. घरभर फिरला. माऊ रंगीत खडू घेऊन काहीतरी चित्र काढत बसली होती, त्यातला एक लगेच मटकावला त्याने. मग बाकी घराचं इन्स्पेक्शन सुरू झालं. एकीकडे माझं चाललं होतं, “एका ठिकाणी बस. दादा कुठंय तुझा? तू एकटाच कसा आलास? तुमची चुकामूक झालीये का? पाणी वगैरे हवंय का तुला? बाहेर गॅलरीमधून आपण दादाला हाक मारू या का?” पण त्याला ऐकायला वेळ कुठंय! माऊचा बाबा त्याच्या दादाला शोधायला निघाला. वॉचमन काकांना पण त्याने फोन केला हा एकटाच इकडे आलाय म्हणून. इकडे याने मग माऊच्या खेळण्यांकडे मोर्चा वळवला. माऊच्या खेळण्यांमधला मोठ्ठा गुलाबी बॉल त्याला भलताच आवडला. पण तो खेळायला घेतल्याबरोबर त्याला दात लागून फुस्स करून एकदम हवाच गेली त्याची. मग दुसरा कडक बॉल घेऊन त्याच्याशी मस्त खेळत बसला तो. त्याच्या पाठोपाठ माऊ घरभर लाह्यांसारखी तडतड उडत होती. त्याचा दादा आला, त्याला हाक मारली,” बघीरा!” पण हे महाराज आपले बॉलशी खेळण्यातच मग्न. आपला दादा हरवला होता, आपण नवीन ठिकाणी आलोय, आपल्याला घराचा रस्ता माहित नाहीये, कशाची पर्वा नाही त्याला. मित्र मैत्रिणी भेटले, की आम्ही खूश! अल्सेशियन असला, तरी माऊच्याच जातीचा आहे म्हटलं तो!

******
नंतर त्याच्या दादाने सांगितलं - हे दोघं नेहेमीसारखे रात्री फिरायला बाहेर पडले. बघीरा नेहेमीसारखा धावत, पण आज दादाच्या पायाला लागलं होतं, त्यामुळे तो मागे पडला. तोवर हा एकटाच पुढे आला. बघिराला एवढे जिने चढायला आवडत नाहीत. म्हणजे बहुतेक समोर लिफ्ट उघडी असावी तिच्यामध्ये शिरला, आणि लिफ्ट बंद होऊन वर आली. एकटा लिफ्टमधून येतांना घाबरला असणार नक्कीच. पण नीट बाहेर पडला. आणि मग त्याने पायाने बरोबर माऊच्याच घराचा दरवाजा कसा वाजवला त्यालाच माहित!