Thursday, January 30, 2020

गोड गोष्ट



माझ्या गॅलरीत हा नेस्टिंग बॉक्स कित्येक वर्षांपासून होता. कुठल्याच पक्ष्याला आजवर ती जागा घरासाठी पसंत पडली नसावी. आठ - दहा महिन्यापूर्वी तिथे मधमाश्या रहायला आल्या. घरात एवढ्या जवळ मधमाश्या म्हणजे काही धोका तर नाही ना, काय करायला हवं हे विचारायला अमित गोडसेंना फोन केला. त्याचा फोन लागला नाही म्हणून मग मैत्रिणीकडून त्याचा सहकारी प्रवीण पाटील याचा नंबर मिळाला.

या माश्या काहीही करत नाहीत, पोळ्यावर रात्री प्रकाश पडणार नाही एवढं बघा, आणि मोठा आवाज टाळा एवढीच काळजी घ्यायला त्यानी सांगितलं आणि आमच्या नेस्टिंग बॉक्समध्ये आलेले शेजारी लवकरच नव्या घरात रुळले. रात्री गॅलरीतला दिवा न लावणे एवढंच पथ्य आम्ही पाळत होतो. पोळ्यापासून एक फूट अंतरातल्या झाडाच्या फांद्या छाटण्यालासुद्धा त्यांची काहीच हरकत नव्हती. माझ्याकडच्या तुतीची खूपशी फळं पिकण्यापूर्वी झडून जायची, ती आता टिकायला लागली. यात वाढलेल्या परागीभवनाचा काही संबंध असावा असं मला वाटतं. पुढचे कित्येक महिने अनइव्हेंटफुल गेले. सकाळी त्यांची कामाला जायची लगबग बघून मला ऑफिस भरायच्या – सुटायच्या वेळी नळ स्टॉपच्या सिग्नलला थांबल्यासारखं वाटायचं. सगळ्यांना मरणाची घाई. फुलं काय सुकून जाणार आहेत का दोन मिनिटं उशीर झाला तर? :)

असं सगळं गेल्या महिन्यापर्यंत सुरळित चाललं होतं. पण मग माश्यांची लोकसंख्या वाढून त्यांना झोपायला नेस्टिंग बॉक्स पुरेनासा झाला. रात्री थोड्या माश्या बॉक्सच्या बाहेर झोपायला लागल्या. त्यांना रात्री घरातल्या दिव्यांचा प्रकाश दिसायला लागला, आणि उठून कामाला लागायची वेळ झाली म्हणून त्या झोपण्याऐवजी घरातल्या दिव्यांभोवती फिरायला लागल्या. त्या फिरून थकल्या, की भिंतीवर किंवा जमिनीवर बसायच्या, आणि मग मी त्यांना बाहेर परत सोडायचे. एक – दोन वेळा माशी पायाखाली आली / हाताखाली चिरडली गेली तॆंव्हा मला चावली होती, पण दोन चार दिवस जरा दुखण्यापलिकडे त्याचा काही त्रास झाला नव्हता. अशी घरात बसलेली माशी एकदा नवर्‍याला चावली. म्हणजे माशी भिंतीवर बसली होती, तिला याचा धक्का लागला आणि ती चावली. त्याला याची जोरदार reaction आली आणि भरपूर सूज येऊन ठणकायला लागलं. जवळजवळ आठवडा लागला सूज उतरायला. तेंव्हापासून संध्याकाळी घरातले दिवे लावण्यापूर्वी गॅलरीचं दार बंद करायचं एवढी एक  काळजी मी घ्यायला लागले. पण माश्यांची संख्या मुंबईच्या लोकसंख्येसारखी वाढत असावी. आता दार बंद केलं तरी फटीतन रोज चार – पाच माश्या घरात यायला लागल्या, आणि घरातल्या चपला न घालता बेसावधपणे चालणार्‍या सदस्यांना त्यांचा प्रसाद नियमितपणे मिळायला लागला – माऊचा बाबा, माऊची आजी, माऊ अश्या सगळ्यांचा यात नंबर लागला. आता मात्र पोळं हलवायला लागणार हे लक्षात आलं.

पुन्हा एकदा प्रवीण पाटीलला फोन केला, पोळ्याचा – खरं म्हणजे नेस्टिंग बॉक्सचा फोटो पाठवला. आज येऊन त्यानी  आणि त्याच्या सहकार्‍यानी ते पोळं नेस्टिंग बॉक्ससकट काढून नेलंय – मधमाश्या पाळणार्‍या कुणाला तरी देण्यासाठी. हे काढण्याचं काम सगळं इतक्या सहज चाललं होतं – कुठलंही protective gear वगैरे न वापरता – की माऊ आणि तिच्या मैत्रिणी पोळ्यापासून दोन फुटांवरून डोकावून बघत होत्या. “आता नाकाला माशी चावेल, बाजूला व्हा!” म्हणून त्यांना बाजूला करावं लागलं. पोळं काढायचं काम संध्याकाळी अंधार पडल्यावर केल्यामुळे व्हिडिओ / फोटो काढता आले नाहीत मला. पण दिवसा माश्या इकडेतिकडे उडत असतात, त्यांना गोळा करायला वेळ लागतो. रात्री सगळ्या एकत्र मिळतात. त्यामुळे अंधार असताना हे काम करणं त्यांना सोयीचं जातं. हे करताना दोन माश्या घरात आल्या, तर अगदी त्या दोन माश्या सुद्धा शोधून सोबत घेऊन गेलेत ते. जिथे राणी तिथे त्या माश्यांचं घर. ती गेल्यावर या बिचार्‍या मरूनच गेल्या असत्या नाहीतर. एकही माशी न मारता, न दुखावता त्यांना त्यांच्या नव्या घरी नेलंय त्यांनी. Hats off to their dedication!!!


बाकीच्या मधमाश्या काढणार्‍यांपेक्षा यांचा दर बहुतेक जास्त आहे (१३०० रुपये झाले) – पण माश्यांचं पुनर्वसन करताहेत ते, मारून टाकत नाहीयेत. आणि जातांना एक छोटीशी मधाची बाटली भेट म्हणून दिलीय त्यांनी ... इतके दिवस माश्या इथे होत्या म्हणून.  

बर्‍याच दिवसांनी आज रात्री गॅलरीमध्ये दिवा चालू आहे, दार उघडं आहे. घरातली चप्पल न घालता कुणीही बिनधास्त फिरायला हरकत नाहीये. पण आपण त्रास होतोय म्हणून शेजार्‍यांना हुसकून लावलंय अशी काहीतरी बोच वाटतेय. मधमाश्या नसतील तर माणसंही संपून जातील हे माहित आहे, पण मधमाश्या शेजार्‍यांच्या अंगणात असाव्यात, आपल्या नाही अशीच आपली अपेक्षा आहे. माझं घर, माझी जमीन ही दुसर्‍या कुठल्याही प्राण्याची नाही, पक्त माझीच आहे असं म्हणणारा प्राणी फक्त माणूसच असावा.

तुमच्या घरात मधमाश्यांनी पोळं केलंय? पोळं जाळणार्‍याला बोलावून माश्यांना बेघर करू नका. Bee Basket शी संपर्क साधा, मधमाश्यांना नवं घर मिळवून द्या.