Sunday, March 1, 2020

माझी शाळा, माझा वर्ग


आपल्याला अजिबात शिकवायला येत नाही आणि शिकवायला आवडत तर त्याहून नाही याविषयी माझी फार पूर्वीपासून खात्री होती. म्हणजे इतकं बोलणं, समजावून सांगणं, परत परत सांगणं यासाठी लागणारा पेशन्स आपल्याकडे अजिबात नाही हे मी ओळखून होते. त्यामुळे पोटापाण्यासाठी उद्योग शोधतांना शिकवणे या पर्यायाचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मागच्या जन्मी मी काहीतरी फार मोठं पाप केलेलं असणार त्यामुळे माऊकडून अभ्यास करून घेणे हे संकट आपल्या वाट्याला आलंय याची तर माझी खात्रीच आहे. तिनेही असाच काहतरी सॉल्लीड गफला करून ठेवला असणार मागच्या जन्मी, त्यामुळे माझ्यासोबत अभ्यास करायची वेळ तिच्यावर वारंवार येते. असतात एकेकाचे भोग.

पण ... इविद्यालोका नावाची एक संस्था आहे. असंच काहीतरी शोधतांना मला यांचा शोध लागला. आपल्याकडे दुर्गम भागातल्या शाळांमध्ये शिक्षकांची, शिक्षणसाधनांची बर्‍याचदा कमतरता असते. अश्या कित्येक शाळांमध्ये कुणालाही स्काईप वापरून घरबसल्या आठवड्याला दोन तास शिकवता यावं अशी व्यवस्था यांनी उभी केली आहे. शिकवता येत नसलं, तरी कसं शिकवावं यातलं अपल्याला काहीतरी समजतं असा माझा समज आहे. त्यामुळे टीचर व्हॉलेंटियर म्हणून मी इथे नोंदणी केली. शिकवायचं म्हटाल्यावर हे आपलं काम नाही असं वाटत होतंच, तरीही. 

पहिल्या तासाच्या आधी तर जाम टेन्शन आलं होतं. काय बोलायचं या मुलांशी? काय आवडेल त्यांना? कुठल्या भाषेत संवाद साधायचा? बोलतील आपल्याशी, का बुजतील? मुळात हा अव्यापारेषु व्यापार करायला कोणी सांगितलं होतं मला? पण आता हाती घेतलंय तर ते तडीला नेलं पाहिजे म्हणून हजार वेळा “मला जमणार नाही” म्हणून मेल टाकायचा मोह झाला तरी शेवटी तो तास घेतला. आणि मग दुसरा तास घ्यायची वेळ आली. एकेक तास मुलांशी बोलायला दोन तास मी तयारी करत होते. अजूनही प्रत्येक तास घेतांना नको नको वाटत होतंच. त्यात माऊच्या शाळेत कुठल्या तरी असाईनमेंटमध्ये आई काय करते विचारल्यावर तिने बिनदिक्कत “माझी आई टीचर आहे!” म्हणून जाहीर करून टाकलं. (गेल्या वर्षी तिची आई फार्मर होती. त्याच्या आधीच्या वर्षी रिसर्चर होती. दर वर्षी  तिला टीचर वेगळ्या होत्या म्हणून बरं, नाही तर माऊच्या आईच्या प्रोफेशन्सची लिस्ट बघून त्यांना धाप लागली असती. ;) ) पण तास टाळायचा नाही हा माझा हट्ट कायम होता. या सगळ्या शंका हळुहळू कधी कुठे कश्या विरत गेल्या ते समजलंच नाही. मला कधी वाटलं नव्हतं इतक्या सहजतेने आता आमच्या गप्पा व्हायला लागल्या. मुलांना कोडी घालणं, ओरिगामीमध्ये काहीतरी करणं, चित्रं अशी धमाल सुरू झाली. बहुसंख्य मुलांना समजत सगळं होतं. काही तर एकदम तेज होती. पण लक्षात ठेवणं मात्र जमत नव्हतं. वर्गात एकी अशी, की उत्तर चुकलं, तरी सगळ्या वर्गाचं उत्तर एक असायचं.

या मुलांची ओळख करून घेतांना तुमच्या गावात / गावाजवळ कुठली खास गोष्ट आहे म्हणून विचारल्यावर त्यांनी सांगितलं,
मच्या गावाजवळ शिवाजी महाराजांचा किल्ला आहे!”
“किती जवळ?”
“वर्गाच्या दारातून दिसतो इतक्या जवळ!”

हे ऐकून अर्थातच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. माऊसोबत मी हा किल्ला बघायला येणार, तुम्ही दाखवाल का म्हणून मी विचारलं, आणि सगळी पोरं एका पायावर तयार झाली. आता प्रत्येक तासाला तुम्ही कधी येणार म्हणून त्यांची चौकशी सुरू झाली. पावसाळा संपता संपता जायचा माझा विचार होता. पण या वर्षीचा पावसाळा संपेचना. मग परीक्षा, सुट्टी, माऊची वेळ असं करता करता फेब्रुवारी संपायला आला. काही झालं तरी या महिन्यात जायचंच असा माझा निश्चय होता. एकदा ठरलेलं ऐन वेळी रद्दही करावं लागलं. पण अखेरीस माझा निश्चय पूर्ण व्हावा म्हणून या फेब्रुवारीला एक जादा दिवस मिळाला, आणि गेल्या शनिवारी आमचा जायचा बेत ठरला. माझा प्लॅन साधा होता. माऊला लाल डाब्यातून घेऊन जायचं, पोरांना भेटायचं, त्यांच्यासोबत गडावर जाऊन यायचं, आणि मज्जा करायची. पण शाळेतले सगळे शिक्षक – शिक्षिका, सगळी मुलं, आणि माझी मुलं यांनी तो प्लॅन साधा राहू दिला नाही. सगळ्यांचंच आगत्य, प्रेम यांनी भारावून गेलेय मी. आपण शिकवू शकतो, आपल्याकडून कोणीतरी काही शिकेल, आपण कुणासाठी गुरू वगैरे असू असं मी आजवर कधी स्वप्नही बघितलेलं नाही. शनिवारी या सगळ्याला धक्का बसला जोरदार. मुलांशी संवाद साधायची माझी गरज, शिकवायला शिकणं आणि मज्जा एवढंच माझं या खटाटोपामागचं कारण होतं. ही संधी मला दिल्याबद्दल इविद्यालोकावर मी खूश होते. पण हे दुसर्‍या कुणासाठी एवढं मोलाचं असू शकेल असं वाटलंच नव्हतं. मुलांची पत्रं, त्यांनी स्वतः लिहिलेली कविता वाचल्यावर तर काय बोलावं सुचत नाहीये.  

काल जे बघितलं ते चित्र खूप आश्वासक आहे. माणदेशातल्या हजार एक लोकवस्ती असलेल्या गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा. पहिली ते सातवी सात वर्ग, सहा शिक्षक. मुलं आनंदाने शिकावीत असं वातावरण. त्यांनी शिकावं म्हणून धडपडणारे शिक्षक. मेहनती, हिकमती, समजूतदार, स्वतंत्र मुलं. पुण्यातल्या सगळं आयतं हातात मिळाणार्‍या, सुरक्षित कोषातच जगणार्‍या मुलांपेक्षा ती खूप हुशार वाटली मला.






त्यांच्या गावातली शाळा सातवीपर्यंत आहे. त्यानंतर दहावीपर्यंत शेजारच्या गावातली शाळा. पुढे काय करू शकतील ही? काही थोड्यांची घरची मोठी शेती, पोल्ट्री, गुरं आहेत. ज्यांच्या आईबापांचं हातावर पोट आहे त्यांचं काय? काय करायला हवं त्यांनी? मुलींनी? “जगायला” पुण्यामुंबईला येण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून काय करता येईल? विचार करते आहे. काल पोरांनी जरा जास्तच त्रास दिलाय.