तुम्ही सहज म्हणून एखादी गोष्ट करायला घेता, आणि त्यातून अगदीच अनपेक्षितपणे वेगळं काही करायला मिळतं. असं खूप वेळा झालंय माझ्या बाबतीत. तसाच हा एक सुखद योगायोग. कित्येक वर्षांनी मी लॉकडाऊनच्या काळात चित्रं काढली, रंगवली. गंमत म्हणून ती सोशल मिडियावर शेअरही केली. ती आवडली म्हणून आवर्जून सांगणार्यांमुळे हुरूप आला, अजून चित्रं काढली. राजगुरू सरांनीही यातली काही चित्रं पाहिली, आणि त्यांचा मला फोन आला, “मी जर्मन भाषेत एक आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहितोय, त्या पुस्तकामध्ये तू काही रेखाटनं करशील का?”
राजगुरू सरांबरोबर काम म्हणजे मज्जा आणि शिकणंही. त्यामुळे ध्यानीमनी नसताना आलेली ही संधी मी नाकारणं शक्यच नव्हतं.
“मी पुस्तक वाचते, त्यात चित्रासारख्या जागा शोधते, एखादं चित्रं काढून तुम्हाला दाखवते. तुम्हाला आवडलं तर पुढे करू. मी व्यावसायिक चित्रकार नाही, या सगळ्याचं रीतसर शिक्षणही घेतलेलं नाही. बघू कसं जमतंय ते.” मी सरांना म्हटलं.
कुणालाही प्रोत्साहन देणं, नवं काही करायला पाठबळ देणं ही सरांची खासियत. “तुला जमेल हे नक्की!” त्यांनी सुरुवातीपासून पूर्ण विश्वास दाखवला.
एक एक करत अशी सात – आठ चित्रं काढून झाली. याचे फोटो काढून मी सरांना पाठवत होते, त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढचं काम करत होते. पुस्तकाचा आकार किती असणार, त्यात ही चित्रं कशी दिसणार याचा फार विचार नव्हता केला सुरुवातीला. त्यातल्या तांत्रिक खाचाखोचा मग लक्षात आल्या. आभाताई भागवत, सुश्रुत कुलकर्णी अशा चित्रकलेतल्या आणि पुस्तक प्रकाशन – छपाईमधल्या तज्ज्ञांचा मग सल्ला घेतला. त्यांच्या सूचनेप्रमाणे बदल केले, आणि प्रूफामध्ये कशीतरी दिसणारी चित्रं आता एकदम चकाचक सफाईदार दिसायला लागली.
जर्मन पुस्तक पुण्यात छापण्यामध्ये येणार्या अडचणी, करोना, लॉकडाऊन, दिवाळी अंक छपाईची गडबड या सगळ्यात आज सतीश आळेकरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. एज्युनोव्हा प्रकाशनाने काढलेलं हे पुस्तक अगदी देखणं झालंय.
कित्येक वर्षात मी जर्मन पुस्तक वाचलेलं नाही, पण हे पुस्तक वाचताना कुठे डिक्शनरीची गरज पडली नाही. सर जसे वर्गात हसत खेळत गप्पा मारत शिकवतात, तशीच अगदी सहज, सगळ्यांना समजेल अशा शैलीत लिहिलेली ही गोष्ट आहे.
वर्गात सर शिकवत असताना काहीतरी बारीक बारीक खोड्या विद्यार्थीधर्माला जागून चालायच्याच. जर्मनचा आमचा वर्ग म्हणजे एसपीचं ‘जर्मन डिपार्टमेंट’ ही एक छोटी खोली होती. सरांच्या टेबलाच्या समोर भिंतीच्या तिन्ही बाजूंनी आमच्या खुर्च्या. म्हणजे पुढचा बेंच – बॅकबेंचर अशी काही भानगड नसायची. तर कुणीतरी पद्माच्या पायातला बूट उडवला, आणि तो सगळ्या वर्गाच्या मध्यावर सगळ्यांचा समोर येऊन पडला. “नेम चुकला वाटतं!” सर म्हणाले, आणि मग अख्ख्या वर्गात हशा! असे सरांनी वर्गात शिकवतांना घडलेले कितीतरी किस्से आहेत. त्याहूनही जास्त किस्से सरांनी सांगितलेले लक्षात आहेत. गोष्ट सांगण्याची उत्तम हातोटी सरांजवळ आहे. त्यामुळे पुढेमागे या पुस्तकाचं अभिवाचनही सरांनी करावं, असं मी सरांना म्हणेन.