*************************************************************
वैशाख वणव्याने तप्त झालेल्या धरतीवर आपल्या सौम्य शीतल चांदण्याची वृष्टी करणारा पौर्णिमेचा चंद्र. जे परिपूर्ण असतं, ते सुंदर असतं, आनंदी असतं. पौर्णिमेच्या चंद्रासारखं. एका तपश्चर्येची पूर्तता होण्यासाठी याहून सुयोग्य वेळ कुठली असणार?
सत्य शोधायला महालाबाहेर पडलेला, अपार करुणेने भरलेला तो राजपुत्र. सत्य शोधायला त्याने सर्व मार्ग अवलंबले. देहदंडन करून बघितलं, वेगवेगळे गुरू करून बघितले. त्याला सत्य सापडलं ते स्वतःच्या आत शोधल्यावरच. आयुष्य हे दुःखाने भरलेलं आहे. या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. ही तृष्णा विझवून टाका, दुःख आपोआप दूर जाईल. वैशाख पौर्णिमेला त्याला हे गूढ उकललं. आयुष्यभर ज्याचा ध्यास होता, ते सत्य सापडण्याच्या क्षणी तो म्हणतो ...
अनेक जाति संसारं संधाबिस्सं अनिब्बस्सं
गहकारक गवेसन्तु, दुक्ख जाति पुन: पुन:
गहकारकं दिठ्ठोसि पुन गेह न काहसि
सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसङ्गमत्
विसंङ्खारगतं चित्तं तण्हानं खयमज्झगा
आनंद, दुःख, आशा निराशा याचं घर बांधून मला जखडून ठेवणाऱ्या तुला मी जन्मामागून जन्म शोधतो आहे. तुझ्या या घरापायी मला कितीएक जन्मांची दुःख सहन करावी लागली. आता मात्र मी तुला बघितलंय - परत काही तू मला बांधून ठेवू शकणार नाहीस. तुझे पाश, तुझं घर सगळंच आता भंग पावलं आहे. मनातले सगळे विकार गळून गेले आहेत, मला पुन्हा पुन्हा या चक्रात अडकवणारी तहान शमली आहे.
*************************************************************
बौद्ध होणं सोपं आहे ... बुद्ध होण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार?

